गाईड : आज फिर जीने की तमन्ना है…!

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*******

एक तरुण, देखणी मुलगी… नृत्यनिपुण… तिची आई देवदासी… आपल्या वाट्याला जे भोग आले ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत असं आईला वाटतं आणि ती त्या मुलीचं लग्न एका वयस्कर आर्किआलॉजिस्ट – पुरातत्वशास्त्रज्ञाशी लावते. तो खूप श्रीमंत, गडगंज माणूस असतो. त्याला फक्त तिचं ‘नाचणं’ आवडत नसतं. कारण त्याच्यामते नृत्यकलेला सामाजिक प्रतिष्ठा नसते. शिवाय त्याला वेळही नसतो फारसा आपल्या तरुण बायकोसाठी. पण कपडालत्ता, दागदागिने, सगळी सुखं अगदी हात जोडून उभी करतो तो आपल्या या नव्या नवरीसमोर. नीट राहायचं ना तिने? पण नाही! ती गाठते एक प्रेम करणारा तरुण पुरुष… आणि जाते त्या नवऱ्याला सोडून! कित्ती वाईट्ट… …

गडबडलात ना? काहीही वाईट नाहीये यात! ज्या संबंधात प्रेमच नाहीये, फक्त तिरस्कार आणि उपकाराची भावना आहे, तो संबंध कसा टिकायचा? का टिकवायचा? ज्याला आपल्या जोडीदाराबद्दल आदर नाही, अशा माणसाशी संसार का करत राहायचा? केवळ लग्न झालंय म्हणून? लग्न ही फक्त एक ‘रीत’ आहे. प्रेम या सगळ्या रीतीभातींच्या वर – सर्वोपरी असतं. प्रेमात वयातली अंतरं मोजली जात नाहीत, प्रेमाला फक्त मनातलं अंतर कळतं… आणि जेव्हा दोन मनात अंतराय नसतो, तेव्हा हे प्रेमी जीव एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात… अगदी काहीही…! हेच सांगणारी ही कथा, एका मनस्वी वाटाड्याची आणि त्याच्या प्रेमाखातर समाजाचीही पर्वा न करणाऱ्या त्याच्या प्रियतमेची ही जगावेगळी प्रेमकहाणी – गाईड!

1965 मध्ये ‘गाईड’ प्रदर्शित झाला. तूफान यश मिळाले या सिनेमाला. उत्तम गोष्ट, उत्कृष्ट पटकथा, सुजाण दिग्दर्शन, अवीट गोडीची गाणी, दर्जेदार अभिनय…काय-काय सांगावं ‘गाईड’बद्दल? सर्वांगसुंदर सिनेमा! रासीपुरी कृष्णस्वामी नारायण (आर. के. नारायण) यांनी ‘गाईड’ची गोष्ट त्यांच्या आवडत्या मालगुडीच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. सिनेमा बनवताना मालगुडीचे उदयपुर केलेले त्यांना अजिबात पसंत नव्हते. पण ‘गाईड’च्या कथेवर सिनेमाचे संस्कार करणारा, दिग्दर्शक-पटकथाकार विजय आनंद याने आपला हट्ट सोडला नाही. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत.

खरं तर अत्यंत धाडसी विषयावरचा हा सिनेमा. Live-in Relationship बद्दल आपण आता-आता बोलायला लागलो. ‘गाईड’मध्ये कदाचित पहिल्यांदाच अशा नात्याचे चित्रण केले आहे. पण तरीही त्याने प्रेक्षकाला सांस्कृतिक धक्का दिला नाही. कारण ‘गाईड’मधल्या राजू-रोझीचे समंजस नाते, त्यांच्या प्रेमाची डूब, तिने नवऱ्याचे घर सोडण्याचे कारण आणि कथेला चटका लावणारं वळण देणारा नात्यातला तणाव…हे सारे मानवीय आहे. लेखकाने कोणालाच मखरात बसवलेले नाही. त्यांच्या मातीच्या पायासह ती माणसे आपली वाटतात आणि मग, ‘राजू ‘गाईड’चे पाय मातीचे असले तरी त्याचे मन सोन्याचे आहे,’ हे आपल्याला मान्य होतं. त्याचं मरण पाहतांना त्याला एकदा तरी आईच्या मायेनं पोटाशी घ्यावे वाटते. ‘वहां कौन है तेरा’ने सुरु झालेला एका ‘माणसा’चा प्रवास, ‘अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू, रामा मेघ दे’ या भिजलेल्या विलापिकेच्या साक्षीने संपत असतांना आपली अवस्था मात्र, ‘आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा…हाय रे विश्वास मेरे, हाय मेरी आशा’ अशी झालेली असते. मग प्रश्न पडतो, तो गाईड – वाटाड्या, म्हणून या सिनेमाचे नाव ‘गाईड’ की…भान सुटलेल्या प्रत्येकाला ‘मार्गदर्शन’ करणारा हा ‘गाईड?’

https://www.youtube.com/watch?v=7J1nr0-2O60

‘गाईड’मधल्या धाडसी विषयामुळे हा सिनेमा विकला जात नव्हता, पण देव आनंदच्या ‘नवकेतन’चे प्रॉडक्शन कंट्रोलर यश जोहर यांनी आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावले आणि ‘गाईड’ विकला गेला. (यश जोहर यांचा हा ‘जोहर’ – गुण, त्यांचे चिरंजीव करण जोहर याच्यात जरा ‘जास्त’च उतरलेला दिसतो. काहीही बनवतो आणि विकतो गडी.)

देव आनंद, वहिदा रहमान आणि सचिनदा ही ‘गाईड’मधली झळाळती नक्षत्रं आणि पडद्यामागे राहून त्यांना प्रकाश देणारा स्वयंप्रकाशी तारा – विजय आनंद! खरं तर चेतन आनंद यांनी ‘गाईड’चे दिग्दर्शन करावे असे ठरले होते. पण ते त्यांच्या ‘ह़क़ीकत’मध्ये गुंतले होते. त्यामुळे आनंद बंधूंमधल्या विजय या शेंडेफळाची वर्णी लागली. कानामागून आलेल्या या शेंडेफळाने याआधीच स्वत:ला सिद्ध केलं होतं. पण ‘गाईड’ने त्याच्या यशावर झळाळती सुवर्णमुद्रा उमटवली. दिग्दर्शक म्हणून विजय आनंदला मिळालेल्या ‘गाईड’ आणि नंतरच्या ‘ज्वेल थीफ’च्या यशानंतर देव आनंदचा अहंकार कुठेतरी दुखावला आणि त्यानंतर त्याने जे सुरु केले ती त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात ठरली, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ‘गाईड’ हिंदी सिनेमाचा मानबिंदू झाला!

देवने यातला राजू गाईड अप्रतिम उभा केला. त्याची ‘चॉकलेट हीरो’ची तयार प्रतिमा यात त्याच्या पथ्यावर पडली. केसांचा कोंबडा, त्यावर अलगद ठेवलेली हॅट, कानात सोन्याची बटणं आणि हातात वेताची छडी! सुईच्या नेढ्यातून आरपार जाईल अशी त्याची तब्येत पण पठ्ठ्याची नजर मर्दाची आणि हसणं मासूम (त्या त्याच्या तुटक्या दातासह!). रोझीवर जिवापाड प्रेम करणारा, तिचं करियर घडावं म्हणून स्वतःच्या कामावर पाणी सोडणारा, ती आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून शेवटी भान सुटलेला, आणि त्याभरात गुन्हा करायलाही मागेपुढे न पाहणारा राजू…! असं आत्मघात करणारं प्रेम माणूसच करु जाणे ना? फक्त त्या एका झंझावाती प्रेमामुळे राजू हीरो ठरतो. आणि हे सारे देवने अत्यंत कौशल्याने दाखवले आहे. शेवटी मारुन-मुटकून त्याला ‘स्वामी’ केले जाते, तो भाग, त्यातली राजूची घुसमट, जुनं भरजरी आयुष्य त्यातल्या प्रेमासह समोर उभं असताना, भोळ्याभाबड्या गावकऱ्यांचा विश्वास न तोडण्यामागची त्याची अगतिकता हे सारे देव आनंदने अनपेक्षित सहजपणे पेलले आहे.

https://www.youtube.com/watch?v=BpLyDTEw3Z4

वहिदा रहमान ‘गाईड’चा श्वास आहे. गुरुदत्तचे सिनेमे सोडले तर एवढी देखणी ती कधीच दिसली नाही. ती काही यात नवथर प्रेमिका नाही. त्यामुळे तिच्या प्रेमात शालीन अवघडलेपण नाही, पण अनुभवी बाईत असणारा आक्रमक धसमुसळेपणाही नाही. भावनांची उधळमाधळ संपल्यावर स्थिरचित्त झालेल्या प्रेमिकेच्या स्वीकारात जे आवेगी समर्पण असते…, ते सिनेमाभर रोझी झालेल्या वहिदाच्या डोळ्यात, हालचालीत दिसत राहते. दोघांचं प्रेमात पडणं आणि दोघांच्यातला बेबनाव, ही कथेतली दोन महत्त्वाची वळणं दोन गाण्यातून आपल्यापर्यंत पोचतात. ‘पिया तोसे नैना लागे रे’ आणि ‘मोसे छल किये जाये…सैंया बेईमान.’ ही दोन नृत्य आणि गाण्याशिवायचं सर्पनृत्य ‘गाईड’ची जान आहेत. सिनेमात नाचताना grace सांभाळणं गरजेचं आणि कठीणही असतं. त्यात डौल, आदब आणि लयबद्धता नसली की लास्य – सलज्ज नखरा संपतो आणि शिल्लक उरते ती उत्तान तंगड्याफेक! वहिदा नाचताना मेघमालेसम बरसते, बिजलीसारखी चमकते आणि नागिणीवानी लवलवते. सरोवराच्या नितळ पाण्यावर अल्लद बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांसारखा तिचा सहज पदन्यास आणि त्याच पाण्यावर आतून उठणाऱ्या आणि आवेग संपेपर्यंत गोड थरथरत राहणाऱ्या तरंगांसारखा तिचा अभिनय… पाहात राहावा… विसरता येऊ नये असा!

हे दोघे जितके मातब्बर तितकीच मातब्बर ‘गाईड’मधली गाणी. ती सगळी नऊच्या नऊ गाणी तुम्हाला माहीत आहेत आणि आवडीची आहेत, याबद्दल खात्री आहे. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग हैं’ हे विसाव्या शतकातलं अव्वल romantic गाणं आणि अव्वल से पेश्तर महीन, मधाळ गाणं, ‘दिन ढल जाये हाय रात न जाये!’ आहा..! त्यातली देव आनंदची दारूचा ग्लास धरण्याची अदा, वरून येणाऱ्या पायऱ्यांवर रोझीचं येणं, दोघांच्या बोटांचा स्पर्श.. वल्लाह, एवढा समंजस तरी मजबूर झालेला रोमान्स?? ज्याला नजर आहे त्यालाच कळतो तो.. विकल करून जातो! आता आणखी एकाच गाण्याबद्दल बोलू. कारण त्याशिवाय ‘गाईड’च्या आठवणींवर समापनाची मुद्रा उमटवता येणार नाही. सचिनदा ‘गाईड’ची गाणी करत असतांना राहुलदेवने त्यांच्याकडे त्यातलं एक गाणं करण्याचा हट्ट धरला. ‘माझ्या प्रतिष्ठेला साजेसे झाले तरच ठेवेन, नाही तर…,’ अशी तंबी देऊन सचिनदांनी त्याच्या हवाली एक गाणे केले. त्या गाण्यानं सचिनदांच्या प्रतिष्ठेवर सोन्याची झळाळी चढवली. ते गाणे म्हणजे, ‘कांटों से खींच के ये आंचल…आज फिर जीने की तमन्ना है…!’ रोझीला जगण्याची उमेद देणारा राजू स्वतः मरत असताना सिनेमा संपतो आणि आपल्या मनात ती एकच ओळ करुणपणे थरथरत राहते, ‘…आज फिर जीने की तमन्ना है…!’

‘गाईड’बद्दल अजून भरपूर सांगण्यासारखे आहे. पण परिपूर्ण दर्शन हे नेहमी हुरहूर संपवणारे असते. आणि ‘गाईड’च्या बाबतीत असे करणे अरसिकतेचे होईल. त्यापेक्षा तो एखाद्या प्रगल्भ प्रेमिकेसारखा मन व्यापून राहावा आणि एकांतात अलगद मनाबाहेर पडणाऱ्या मोरपंखी आठवणीसारखा हुळहुळत राहावा… हेच चांगले!

हे सुद्धा नक्की वाचा-गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..!https://bit.ly/3r4z4Qk

*******

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आह

[email protected]