गाठी !!

-मिथिला सुभाष

इलॅस्टिकचा जमाना आल्यापासून लहानग्या पोरींचा वास्ता गाठींशी फारसा पडत नाही. आमच्या लहानपणी आमच्या अत्यंत घाईच्या वेळा गाठींशी झुंजण्यात, त्या सोडवण्यात किंवा तोडण्यात जायच्या. त्यामुळे गाठींशी कसं वागायचं याचं प्रशिक्षण आम्हाला नकळतपणे लहानपणीच मिळायचं. मला गाठींचा ‘फोबिया’ आहे. कुठेही जातांना, मला शिंक किंवा खोकला येईल आणि माझ्या कपड्यांत असलेली एखादी अत्यंत जबाबदार गाठ तटकन तुटेल आणि अनवस्था प्रसंग येईल अशी धास्ती मला सतत कुरतडत असते. त्यामुळे माझ्या पर्समधे कायम सर्व आकाराच्या सेफ्टीपिन्स आणि एक नाडी असते.

गाठी तरी कसकसल्या असतात. (आता आपण परकर, पायजमा, शलवार, वगैरेच्या जरा पलीकडे जाऊ.) ऋणानुबंधाच्या गाठी… रेशमाच्या गाठी… मनातल्या गाठी..!! प्रेमाच्या गाठी..!! आतली गाठ..!! नात्यांची गाठ.. मैत्रीची गाठ.. सुरगाठी-निरगाठी.. बाप रे..!! एका संकल्पनेची इतकी रूपं..?? आणि तरी ही सगळी ‘निर्गुण’ रूपं आहेत. सगुण गाठी आहेतच अजून. टायची गाठ, स्कार्फची गाठ, रिबीनची गाठ, गिफ्टपॅकची गाठ, बुटाच्या लेसची गाठ, यातही वेगवेगळ्या गाठी असतात. खेळाडू, सैनिक, विद्यार्थी आणि उच्च अधिकारी या सगळ्यांच्या बुटाच्या गाठी वेगळ्या असतात. किती गाठी भवताली..?? आजच हे आठवायला एक कारण झालंय. मी अनेकदा गानाडॉट कॉम वर गाणी ऐकते. ही साईट लोड होतांना एकमेकीत गुंफलेल्या दोन पोकळ गाठी एकमेकींच्या जीवात फिरत राहतात. ते पाहून मला घुसमटल्यासारखं होतं. कधीतरी मी त्यात अडकेन असं वाटत राहतं.

माणसांच्या नात्यातल्या गाठींना *‘रेशीम गाठ’* म्हणतात. रेशीम कितीही नाजूक असलं तरी त्यावर गाठ घट्ट बसते. सुटता सुटत नाही. ती सोडवायची म्हणजे तोडावीच लागते. आणि महत्प्रयासाने सोडवली जरी, तरी रेशमावर तिचे वळ राहतात. हट्टाने ते वळ काढायचे म्हंटले तर उकळत्या पाण्यावर चाळणीत ते रेशीम ठेवावं लागतं. ते चटके बसून सरळ होतं, पण त्याची चमक जाते, रया जाते. हे सारे ‘मानवी नात्या’च्या संदर्भातही होते. हट्टाने सोडवलेल्या गाठीचे रेशीम कधीच पूर्वीसारखे सरळ, चमकदार होत नाही. आणि मग वरवर पाहता नाती सुरु राहिली तरी ती आतून निर्जीव होतात. हे पाहिल्यावर वाटतं, कुणी बरं सर्वप्रथम या नात्यांना ‘रेशीम-गाठ’ म्हंटलं असेल? त्याला सलाम.

मी शक्यतो कुठलीही गाठ तोडत/कापत नाही. अगदी वाणसामानाच्या पिशव्यांच्या गाठी असल्या तरी त्या निगुतीने सोडवते. गाठी सोडवण्याच्या या सवयीमुळेच कदाचित, मी एकदा जोडलेली नाती कालपरत्वे बदलली तरी पूर्णपणे तुटत नाहीत. माझा गोतावळा वाढत राहतो. काहींच्या बाबतीत मनात वळ राहतात. ते काढण्याचा हट्ट न करता तसेच जपत राहते. हे बरं की वाईट मला माहीत नाही. पण गाठी मी तोडत नाही हे मात्र नक्की. मला गाठ तुटण्याची धास्तीच वाटते. त्यापेक्षा मुकाट्याने वळ जपत राहणे परवडले.

दुसरी अत्यंत महत्वाची गाठ म्हणजे जी आपण कुणाच्या तरी विरोधात मनाशी बांधतो. बघा, शब्द तोच. पण भावना एकदम वेगळी. रेशीम गाठीत जो एक दिलासा आहे, तसल्ली आहे, ती या गाठीत अजिबात नाही. ही अगदीच नकारात्मक गाठ आहे. अशा गाठीही अनेकजण वर्षानुवर्ष जपत असतात. कधी त्या गैरसमजातून आलेल्या असतात, कधी तात्कालिक रागाच्या भावनेतून. या गाठी ठसठसत्या असतात. त्यात तिरस्काराची दुर्गंधी असते. पण गाठी न तोडणे हा जसा एक स्वभाव असतो तसाच मनातल्या गाठी विनाकारण जपत राहणे हाही एक स्वभावविशेषच. अशी माणसं गाठीवर गाठी बांधत राहतात. या लोकांनी पायांनी मारलेल्या गाठी आपण हाताने सोडवू शकत नाही. हतबल व्हायला होतं मग.

हल्ली स्कार्फची अशी काही गाठ मारतात की ती खेचली तर सरळ फासच. भीती वाटते ती गाठ पाहून. टायची गाठ हेही एक कौशल्यच. तसं तर पक्की बसणारी कुठलीही गाठ कौशल्यानेच मारलेली असते.

याच गाठींचं एक मनोरम रूप मी काश्मीरमधे पाहिलंय. तिथले कलावंत गाठींचा एक टेबलक्लॉथ बनवतात. आपल्याला तो टेबल-स्प्रेड म्हणून वापरायचा नसेल तर त्या सगळ्या गाठी सोडवायच्या, त्यातून फूल उमलावं तसा गालिचा उमलतो. हेही गाठीचेच एक रूप. मनातल्या तिरस्काराच्या सगळ्या गाठी जर अशाच सहज सुटून, फुलासारख्या उमलू शकणाऱ्या सुरगाठी असत्या तर..??

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleक्या विचारों की सान पर चमकेगा हिन्दी सिनेमा?
Next articleमीरेचा स्वर – लता!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here