गोडसेभक्ती आता मुख्य प्रवाहात

साभार – साप्ताहिक साधना

-रामचंद्र गुहा

नव्वदीच्या दशकात जेष्ठ गांधीवादी नेत्या डॉ. सुशीला नायर धार्मिक सलोख्याचा प्रसार करण्याकरिता मंदिरांच्या शहरात म्हणजेच अयोध्येत गेल्या होत्या. तिथे आयोजित केलेल्या एका सर्व धर्म प्रार्थना सभेत त्यांनी गांधींना अत्यंत प्रिय असणारी ‘रघुपती राघव राजा राम’ ही प्रार्थना सामूहिकरीत्या गाण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रार्थनेतील ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ या ओळींवर त्या आल्या, तेव्हा क्रोधीत झालेल्या निदर्शकांचा एक गट त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना या ओळींच्या पुढे गाण्यापासून रोखले. त्यांचा राग शमवण्यासाठी सुशीला नायर त्यांना म्हणाल्या की, ‘हम गांधीजी की तरफ से आए हैं,’ (आम्ही गांधींच्या विचारांचे आणि त्यांच्या वारश्याचे प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहोत.) यावर उत्तरादाखल त्या निदर्शकांनी नायर यांना उत्तर दिले- ‘और हम गोडसे के तरफ से.’

तेव्हा आणि या घटनेच्या क्रित्येक वर्षांनंतरदेखील अनेक भाष्यकार नथुराम गोडसेची भक्ती करणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहाबाहेरील आणि दुर्लक्षित घटक म्हणून पाहत असत. आता काळ बदलला आहे. मागील लोकसभेतील भाजपचे खासदार साक्षीमहाराजांनी गोडसेचे गोडवे गायले होते आणि तरीसुद्धा भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने गोडसेची स्तुती करणारी वक्तव्ये केली होती. प्रज्ञासिंहच्या या वक्तव्यापासून पंतप्रधान मोदींनी जरी आपले हात झटकले असले, तरी तिच्या वक्तव्याला समर्थन देणारे भाजपचे अनेक उमेदवार देशभरात होते. विशेष म्हणजे गोडसेची भक्ती करणारे हे सर्व भाजप उमेदवार देशभरातून मोठ्या फरकाने निवडून आले.

नथुराम गोडसेची भक्ती करणारा समूह आता पार्श्वभागी न राहता, मुख्य प्रवाहात आला आहे. या समूहाचे सदस्य फक्त भाजपचे खासदारच नाहीत, तर संघाचे विचारकदेखील आहेत. नुकत्याच झालेल्या एका टीव्हीवरील चर्चेत प्रख्यात गुजराती लेखक विष्णू पंड्या यांनी प्रज्ञा ठाकूरला ‘संत’ म्हटले, इतकेच नव्हे तर याच्या पुढे जाऊन गांधींच्या मारेकऱ्याचे कौतुक करणाऱ्या प्रज्ञासिंहच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी असे भाष्य केले की, ‘गोडसे देशभक्त होता, ज्याप्रमाणे गांधी देशभक्त होते.’ लक्षात घेण्याजोगे म्हणजे, पंड्या हे काही सामान्य संघ स्वंयसेवक नसून पद्मश्रीविजेते आणि गुजरात साहित्य आकादमीचे अध्यक्ष आहेत. (पहा:https://thewire.in/…/pragya-thakur-godse-patriot-sangh-pari…)

महात्मा गांधींच्या जीवनकाळात हिंदुत्ववाद्यांच्या मनात त्यांच्याप्रती असणारऱ्या तिरस्काराला दोन आयाम होते. एक, गांधींचे अहिंसेचे तत्त्व त्यांना कमकुवत आणि नेभळट वाटत असे; आणि दुसरे म्हणजे मुस्लिमांना समान हक्क देण्याविषयी गांधींच्या आग्रहाला त्यांचा ठाम विरोध होता. आता यापुढे जाऊन, गांधींनी वल्लभभाई पटेलांना डावलून कथित प्रकारे जवाहरलाल नेहरूंची आपला राजकीय वारसदार म्हणून निवड करणे, हा आजच्या काळात गांधींविषयी असणाऱ्या तिरस्काराला प्राप्त झालेला नवीन आयाम आहे. आणि नेहरू हयात होते, तेव्हा उजव्या विचारसरणीच्या हिंदूंना नेहरूंविषयी विशेष राग होता, कारण गांधींप्रमाणेच नेहरुंनादेखील भारताने धर्माधारित हिंदू राष्ट्र व्हावे हे कदापि मान्य नव्हते. नेहरूंच्या मृत्यूनंतरदेखील ते नेहरूंचा द्वेष करतात, कारण नेहरूंच्या वारश्यावर आज एक घराणे आपला हक्क (अनुचित प्रकारे) सांगत आहे.

देशाची फाळणी कोणी एक व्यक्ती रोखू शकत नव्हती; फाळणीमुळे झालेल्या जखमावर फुंकर घालण्यासाठी गांधींइतके परिश्रम कोणीच घेतले नाहीत; पटेल आणि नेहरू हे एकमेकांचे विरोधक नव्हते तर सहकारी आणि हितचिंतक होते; कोणताही सभ्य व न्याय्य समाज धर्माधारित भेदभावाला थारा देत नाही, या सर्व बाबी उजव्या हिंदू विचारसरणीच्या व्यक्तींच्या विकृत, भ्रमित इतिहास आकलनामध्ये एकतर दाबल्या जातात किंवा पूर्णतः दुर्लक्षित केल्या जातात.

महात्मा गांधींच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्याविषयी जनतेत अतिशय विखारी प्रचार केला. (यासंबंधीचे विस्तृत विवेचन मी लिहिलेल्या गांधींच्या जीवनचरित्रामध्ये आले आहे). गांधींची हत्या संघाच्या एका माजी सदस्याने केल्यानंतर मात्र, संघाने गांधींविषयीचा आपला विखारी प्रचार थांबवला. 1950 आणि 60 च्या दशकात त्यांनी क्वचितच गांधींना संबोधले असावे. पण काहीश्या दबक्या स्वरात का होईना, 1970 नंतर त्यांनी गांधींची स्तुती करण्यास सुरुवात केली. याचे कारण, कदाचित अनेकांपैकी एक असले तरी संघाच्या देशभक्तीच्या व्याख्येत गांधी आता बसू लागले होते. संघासाठी गांधी आता एक देशभक्त बनले होते. पण इतके असूनसुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी गांधींना संस्मरणीयरीत्या दिलेले ‘राष्ट्रपिता’ संबोधन संघाला कधीच पचनी पडले नाही.

गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला कमी लेखताना संघाने नेहमी आपल्यात आणि गोडसेमध्ये एक सुरक्षित अंतर राखणे पसंत केले. आता मात्र असे करण्याचीदेखील गरज संघाला भासत नाही. या निकालांनी दिलेल्या पाशवी बहुमतामधून आलेल्या आत्मप्रौढीने आता संघाचे गोडसेविषयी असणारे खरे विचार आपसूकच पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळेच विष्णू पंड्यांचे विधान आपल्या समोर आहे- ‘गोडसे देशभक्त होता, ज्याप्रमाणे गांधी देशभक्त होते.’ लक्षात घेतले पाहिजे की, इथे महात्म्याची तुलना गोडसेबरोबर केली गेली आहे, आणि इतकेच नव्हे तर इथे गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेची देशभक्ती गांधींच्या अगोदर मांडली गेली आहे.

गोडसे देशभक्त होता, ज्याप्रमाणे गांधी देशभक्त होते- हाच संघाचा दृष्टिकोन आहे. संघापेक्षा जास्त उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींचा गांधींविषयीचा दृष्टिकोन मात्र यापेक्षा जास्त विपरीत आहे. त्यांच्या दृष्टीने गांधी हे देशद्रोही होते आणि गोडसे हा देशभक्त. खरे तर त्यांच्या व्याख्येत गोडसे हा एक महान देशभक्त होता, कारण त्याने एका देशद्रोह्याची हत्त्या केली होती. मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या व्हॉट्सअॅप फॉरवर्डसमधून आणि (विशेषतः उत्तर भारतात होणाऱ्या) जनसामन्यांच्या विविध चर्चांमधून हा दृष्टिकोन रूढ होत गेला आहे की, गांधींची हत्त्या करून गोडसेने योग्यच केले; किंबहुना त्याने गांधींची हत्या अगोदरच करावयास हवी होती. भारतात मागे राहिलेल्या मुस्लिमांनी पाकिस्तानला जाण्याचे टाळून आपली देशभक्ती सिद्ध केली होती. गांधी या मताचे होते की, या देशावर मागे राहिलेल्या मुस्लिमांचादेखील बरोबरीचा वाटा आहे आणि त्यामुळेच त्यांना समान हक्क प्रदान करण्यासाठी त्यांनी उपोषण केले होते.
या सनातनी विचारांच्या व्यक्तींचा असा दृष्टिकोन होता की, गांधींची हत्त्या हे उपोषण सुरू होण्यापूर्वीच करावयास हवी होती.

गांधी आणि गोडसेविषयी असणारा आपला खरा हेतू संघ इतरांच्या दृष्टीआड करू शकतो, परंतु कर्मठ हिंदुत्ववाद्यांचा दृष्टिकोन मात्र अगदी स्पष्ट आहे. त्यांच्या दृष्टीने गांधी हे खरे देशद्रोही होते, कारण त्यांनी फाळणीला विरोध केला नाही; त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानला देय असणारी रक्कम देण्याबाबत आग्रह धरला आणि त्यांचे मुस्लिम (आणि ख्रिश्चन) समाजावर तितकेच प्रेम होते, जितके हिंदू समाजावर; त्यामुळे ज्याने गांधींची हत्या केली तो माणूस खरा देशभक्त असला पाहिजे, असा या कर्मठ हिंदुत्ववाद्यांचा दृष्टिकोन आहे.

गोडसेला मानणाऱ्या आणि त्याचवेळी गांधींचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती आता संसदेत पोहोचल्या आहेत. त्यांना संसदेत त्याच भारतीयांनी पोहोचवले आहे, ज्यांना त्यांच्या विचारांशी आपले विचार सुसंगत वाटू लागले आहेत. खेदाची बाब म्हणजे गांधींच्या १५० व्या जयंतीवर्षी असे घडताना पाहणे म्हणजे एक कठोर, निर्दयी अशी शोकांतिका आहे, ज्याची वस्तुस्थिती आपणास मान्य करणे भाग आहे.

या स्तंभाची सुरुवात मी १९९० मधील अयोध्येतील गोडसेभक्तांची एक घटना नमूद करून केली होती. प्रस्तुत घटना मला सांगणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याने त्यावेळी असेदेखील भाकीत केले होते की, ज्याप्रमाणे प्राचीन काळी भारताने बुद्धाला देशाबाहेर काढले होते, अगदी तशीच वेळ गांधींवरदेखील येईल. २५ वर्षांनंतर गोडसेभक्तांची संख्या आता काही हजारांत नसून, लाखात पोहोचली आहे. या लाखो गोडसेभक्तांचे प्रतिनिधी आता संसदेत बसत आहेत आणि त्यातील काहींना मंत्रिपदही मिळणार आहे.

प्राचीन काळी भारतीयांनी बुद्धाला देशाबाहेर काढले होते, कारण त्याचा सामाजिक समतेचा मार्ग आपल्या इथे असणाऱ्या भेदभावांवर आधारलेल्या प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेच्या आड येत होता. आता अनेक भारतीय लोक महात्मा गांधींना आणि त्यांच्या विचारांना देशाबाहेर घालवू इच्छित आहेत, कारण गांधींचे विचार त्यांना आपल्या बहुसंख्य जमातवादी विचारांच्या आड येताना दिसत आहेत. कदाचित आपणच आता इतर जगाला गांधींचे विचार आपलेसे करू द्यायला हवेत, अगदी त्याच प्रकारे ज्याप्रकारे त्यांनी बुद्धांच्या विचारांना आपलेसे केले होते.

(अनुवाद : साजिद इनामदार)

-लेखक आंतरराष्टीय ख्यातीचे इतिहास संशोधक आहेत

(डिसेंबर २०१२ पासून रामचंद्र गुहा यांचा ‘कालपरवा’ हा स्तंभ साधना साप्ताहिकात नियमितपणे प्रसिद्ध होत आहे.)

 

Previous article१९३७ चा कायदा आणि काँग्रेसमधील मतभेद
Next articleसत्य असत्यासि मन करा ग्वाही…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here