गोळवलकरांना नाकारण्याची हिंमत संघात आहे?

-अविनाश दुधे

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी  यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ यांच्या पुस्तकातील विचार संयुक्तिक नाहीत . ते विचार आता कालबाह्य झाले आहेत’ असे विधान संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीत केले  . भागवतांच्या या विधानांमुळे लगेच संघ बदलत आहे, हे मानण्याचे कारण नाही . पण कुठल्या का कारणाने होईना संघ जाहीरपणे आतापर्यंत संघाचे वेद, बायबल मानले जाणाऱ्या पुस्तकाला, त्यातील विचारांना नाकारतात  ही महत्वाची गोष्ट आहे . या विषयात काही वर्षापूर्वी लिहिलेला लेख ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी…

–संपादक

…………………………………………………………………………………………………….

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची कोणत्याही काळातील भाषणं वा त्यांचं लेखन अभ्यासलं तर ते वरवर अतिशय आकर्षक, संतुलित व समग्र विचार करणारं वगैरे आहे, असं वाटतं. मात्र त्या आकर्षकतेला न भुलता त्यांच्या लेखन व भाषणांची सखोल तपासणी केली तर त्यातील फसवेपणा व लबाडी सहज लक्षात येते. संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांचं ताजं भाषण याचं प्रकारात मोडणारं आहे. जयपूर येथे एका स्तंभलेखकांच्या परिषदेत बोलताना त्यांनी ‘प्रचलित हिंदू धर्माचे शास्त्रीय कसोटीवर मूल्यांकन होणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या मूल्यांना शास्त्रीय आधार नसल्याचे सिद्ध होईल, अशा मूल्यांचा त्याग केला पाहिजे,’ असं विधान केलं. वरवर पाहता हे विधान अतिशय क्रांतिकारक वाटतं. जगातील हिंदूंच्या सर्वात मोठय़ा संघटनेचा प्रमुख हे असं बोलतोय यावरून संघ आता बदलतोय, संघाची मंडळी बघा कसा आधुनिक विचार करतात आणि काळानुसार बदलतात, अशी अनेकांची भाबडी समजूत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच भाषणातील आणखी काही वाक्य तपासलीत तर भागवतांच्या विधानातील फोलपणा लक्षात येईल. ते म्हणतात, ‘सर्व विषय आणि समस्यांकडे हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञानाने पाहायला हवं. केवळ हिंदू धर्मातच जगाला संतुलितपणे पुढे नेण्याची क्षमता आहे वगैरे वगैरे.’ ही हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञानाची कॅसेट संघाचा प्रत्येक संघचालक व प्रमुख नेते ठिकठिकाणी वाजवीत असतात. मोहन भागवतांचा लौकिक अतिशय मेहनती व उत्तम संघटक असा आहे. मात्र तत्त्वचिंतक किंवा काही नवीन विचार करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती कधीच नव्हती. त्यामुळे भागवत जे हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणतात ते संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संघीयांच्या डोक्यात हिंदू तत्त्वज्ञान म्हणून जे काही घुसविलं आहे, तेच आहे हे स्पष्ट होतं.

 

गोळवलकर गुरुजींचं ‘विचारधन’ नावाचं प्रसिद्ध पुस्तक आहे. हे पुस्तक संघीयांसाठी वेद, बायबल, कुराण आहे. मुसलमान जसे कुराणातलं प्रत्येक वाक्य प्रमाण मानतात तसंच संघ परिवारासाठी विचारधनातले विचार प्रमाण असतात. आजपर्यंत एकाही संघीयाने गुरुजींचे विचार आपल्याला अमान्य आहेत किंवा ते अशास्त्रीय आहेत, असे सांगण्याची धमक दाखविली नाही. यावरून या पुस्तकाचा संघवाल्यावरील पगडा लक्षात येईल. (संघ ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी ‘विचारधन’ वाचलंच पाहिजे.) इंग्रजीत ‘बंच ऑफ थॉट्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्या पुस्तकात गुरुजींनी जे काही विचार उधळून ठेवले आहेत ते जरा सर्वच हिंदूंनी समजून घेतले पाहिजेत. गोळवलकर गुरुजींनी लोकशाही व आधुनिक समाजवादी रचनेला नकार देऊन प्राचीन चातुर्वण्र्य समाजव्यवस्था हीच आदर्श समाजव्यवस्था मानली होती. गुरुजींनी प्राचीन परंपरा व व्यवस्थेबद्दलचा आपला अभिमान कधी लपवून ठेवला नाही.

ऋग्वेदकालीन समाजव्यवस्थेपासून भारतीय समाज दुरावला म्हणून त्याची अवनती झाली आहे, समाज चारित्र्यहीन झाला. पौरुषहीन झाला,’ असे गोळवलकर गुरुजी सांगायचे. ‘भारतीय समाज पुन्हा एकवार समर्थ समाज म्हणून उभा करायचा असेल तर ऋग्वेदकालीन समाजव्यवस्थेत प्रत्येक वर्णाला जी कर्मे निश्‍चित करून दिली आहेत ती कर्मे त्याने मरणालासुद्धा न घाबरता केली पाहिजेत. कर्म आणि धर्म हे आपल्या संस्कृतीत एकरूप आहेत. त्यात भिन्नता नाही. म्हणून व्यक्तीप्रमाणे राष्ट्रही आपल्या स्वधर्माच्या मुळांना (स्वकर्माच्या मुळांना) चिकटून राहिले तरच त्याची सर्वांगीण उन्नती होते, वैभवाने ते बहरते,’ असे गुरुजींनी विचारधनात लिहून ठेवले आहे. एका मुलाखतीत गुरुजींना चातुर्वण्र्य ही रुढी आहे की की धर्म?,’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरच त्यांचं उत्तर लक्षात घेण्याजोगं आहे. ‘ती रुढी नसून तो धर्मच आहे. श्रुतिस्मृति ईश्‍वरनिर्मित आहेत व त्यात सांगितलेली चातुर्वण्र्य व्यवस्था हीदेखील ईश्‍वरनिर्मित आहे. मानवाने यात मोडतोड करण्याचा प्रत्येकाला असला तरी ती व्यवस्था ईश्‍वरनिर्मित असल्यामुळेच ती पुन्हा प्रस्थापित होणारच आहे,’ असे उत्तर गुरुजींनी दिले होते.

येथे गोळवलकर गुरुजी विज्ञानाविषयी कसा विचार करायचे हेही समजून घेण्याची गरज आहे. १९६६ मध्ये प्रयागच्या कुंभमेळ्यात जागतिक हिंदू संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले होते ‘आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. तेव्हा विज्ञान युगाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या धर्मात परिवर्तन केले पाहिजे, असे लोक सांगतात. मी उलट म्हणतो, आपल्या धर्माशी मेळ बसेल याप्रकारे विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. जर विज्ञानातील दरेक संशोधनागणिक धर्मात परिवर्तन केले तर धर्म हा धर्मच राहणार नाही. जिथे धर्मच राहत नाही तिथे समाजाची धारणाही होत नाही. लोकांची कर्तव्येही नीट ठरत नाही. लोकांच्या इहलोकीच्या आणि परलोकीच्या कल्याणाचा मार्ग सापडत नाही. म्हणून विज्ञानातील संशोधनागणिक धर्मात परिवर्तन करण्याचा विचार हा अनिष्ट विचार आहे.’ गुरुजींचं हे भाषण वाचलं तर लक्षात येईल की त्यांना परिवर्तनाचं वावडं होतं; किंबहुना विज्ञानातील नवनवीन संशोधनाने रुढी-संकल्पनांना धक्का बसत असल्याने धर्माशी मेळ बसेल या पद्धतीने विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असे ते सांगत होते. रावसाहेब कसबेंच्या भाषेत सांगायचं झाल्यास त्यांना ‘विज्ञानाचं हिंदूकरण’ करायचं होतं.

केंद्रातील याअगोदरच आणि आताचंही संघप्रणीत भाजपा सरकार नेमकं हेच करत आहे. त्यामुळे एकीकडे कालबाह्य रुढींना मूठमाती देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे जुन्या अवैज्ञानिक प्रथा-परंपरांचं पुनरुज्जीवन करायचं, नसलेल्या वैज्ञानिक परंपरेचा उदो उदो करायचा हे प्रकार संघ परिवार सातत्याने करत आहे. मागील कार्यकाळात मुरली मनोहर जोशींनी ज्योतिष हा अवैज्ञानिक प्रकार महाविद्यालयीन अभ्यासक्रमात घुसविला होता. आताच सरकार पुराणातल्या सार्‍या भाकडकथांचं उदात्तीकरण करायला निघाले आहे. जगातील सारे महत्त्वाचे वैज्ञानिक शोध भारतानेच लावले होते. वेदांमध्ये याची इत्थंभूत माहिती आहे, अशी पोपटपंची करणार्‍यांना सध्या संघ परिवारात खूप भाव आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गणेशमूर्तीचा हवाला देत भारतात पुराणकाळात प्लास्टिक सर्जरी केली जात होती, असे हास्यास्पद विधान केले होते. भारतीय संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदावर वाय. सुदर्शन राव आणि शालेय अभ्यासक्रमावर दीनानाथ बात्रा यांची निवड करून इतिहास लेखनाचे काटे उलटे फिरवायचे आहेत, याचे स्पष्ट संकेत संघ परिवाराने दिले आहेत. संघ परिवाराचा हा सारा खटाटोप जुन्या विषम व्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठीच आहे. मोहन भागवत आज कालबाह्य मूल्ये मोडीत काढण्याची भाषा करत असले तरी ९७ वर्षांच्या संघाच्या इतिहासात संघाने समाजसुधारणा किंवा अशास्त्रीय रुढी-परंपरेविरुद्ध लढा दिला याचं एकही उदाहरण नाही.

अस्पृश्यतेविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांपासून साने गुरुजींपर्यंत देशातील अनेक नेते, संघटना लढत असताना संघ त्यात कधी सामील झाला नाही. आम्ही संघात जात-पात मानत नाही, हे सांगण्यातच त्यांनी धन्यता मानली. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी जे लढे झालेत त्यातही संघ परिवार कुठेच नव्हता. स्त्री शिक्षण, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळावेत, विधवा विवाह, धर्म व परंपरेच्या नावाखाली होणारं स्त्रियांचं शोषण याविषयातही संघाने कधी तोंड उघडलं नाही. देवाचे दलाल बनून बसलेले पुजारी, पंडे, बडवे यांच्या हरामखोरीबद्दल संघाला चीड आहे, असेही कधी दिसले नाही. हिंदू धर्मातील यज्ञ आणि कर्मकांडांच स्तोम, कुंभमेळ्यासारखे निरर्थक उत्सव याविरुद्धही संघाने कधी आवाज उठविला नाही वा विरोध केला नाही. त्यामुळे कालबाह्य मूल्यांचा त्याग केला पाहिजे ही सरसंघचालकांची भाषा फसवी आहे. संघ परिवार सामान्य जनतेला कायम हिंदू जीवनदर्शनाच्या भूलभुलय्यात फसवीत आला आहे. मोहन भागवतांना कालबाह्य मूल्य मोडीत काढण्याबाबत खरंच प्रामाणिक कळवळा असेल तर सर्वात प्रथम त्यांनी गोळवलकर गुरुजींचं विचारधन आणि त्यातील त्यांचे तथाकथित विचार आम्हाला अमान्य आहेत, हे जाहीर करण्याची हिंमत दाखविली पाहिजे. जोपर्यंत गोळवलकरांचा विचार संघ नाकारत नाही तोपर्यंत त्यांना कालबाह्य मूल्यांबद्दल, विचारांबद्दल चीड आहे, यावर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही.


(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत .)

8888744796

Previous articleबरे झाले, शेषराव बरळ‍ले.
Next article‘महानायका’चं महारहस्य!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.