गोष्ट विस्मरणात गेलेल्या थोर गांधीवाद्याची

(साभार : साप्ताहिक साधना)

-रामचंद्र गुहा

…………………..

15 ऑगस्ट या दिवसाची कल्पना अन्य भारतीयांप्रमाणे करतच मी मोठा झालो. 1947 च्या 15 ऑगस्टला स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. अलीकडच्या काही वर्षांत मात्र माझ्यासाठी स्वातंत्र्यदिनाची कल्पना, संदर्भ हे सगळं बरंच बदललं आहे. पूर्वी स्वातंत्र्यदिनाबद्दल जे वाटायचं, त्यापेक्षा किती तरी निराळ्या भावना आता मनात आहेत. माझ्या नेणीवेत 15 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1942 या दोन तारखा एकत्रच रुजलेल्या आहेत. 15 ऑगस्ट 1942 या दिवशी महादेव देसाई (पुणे येथील आगाखान पॅलेसमध्ये) तुरुंगात मरण पावले, त्यांच्या योगदानाशिवाय कदाचित भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला नसता. तरीही हा थोर देशभक्त आणि त्याचं योगदान इतकं विस्मरणात गेलं आहे की, स्वातंत्र्यदिनी कधीही या माणसाचा साधा नामोल्लेखही केला जात नाही.

कदाचित तेही या दिवसाची वाट पाहत असावेत. 1917 मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये गांधीजींसोबत काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून मृत्यू होईपर्यंत, जवळपास पाव शतक त्यांनी गांधीजींना साथ दिली. महात्मा गांधींची सेवा करण्यातच त्यांनी धन्यता मानली होती, या कामाकरता त्यांनी आ़युष्य वेचलं. ते गांधीजींचे सचिव, लेखनिक, अनुवादक, समुपदेशक, संदेशवाहक, संवादक, समस्यानिवारक असे सगळेच होते. कधीकधी ते गांधीजींसाठी स्वयंपाक करायचे. त्यांनी बनवलेली खिचडी गांधीजींना विशेष आवडायची.

गांधीजींच्या कामातील व प्रचारकार्यातील अविभाज्य भाग महादेव कसे झाले होते, याची साक्ष खुद्द गांधींनीच दिली आहे. 1918 मध्ये, म्हणजे महादेवभाई साबरमती आश्रमात गांधीजींचे सचिव म्हणून आले त्यानंतर एक वर्षानेच, गांधीजी मगनलाल या आपल्या पुतण्याला म्हणाले, ‘‘महादेव हा आता माझे हात, पाय आणि मेंदूही बनला आहे, त्यामुळे त्याच्याशिवाय माझी अवस्था पाय आणि वाणी गमावलेल्या माणसासारखी होऊन जाते. मी त्याला अधिकाधिक जवळून पाहतो, तेव्हा मला त्याचे गुण अधिकाधिक दिसू लागतात. आणि तो जितका सद्‌गुणी आहे, तितकाच विद्वानही आहे.’’ त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 1938 दरम्यान महादेव यांच्यावर अतिश्रमामुळे अक्षरश: कोलमडून पडण्याची वेळ आली आणि तरीही सुट्टी घ्यायला ते तयार नव्हते, तेव्हा गांधीजी रागावून त्यांना म्हणाले, ‘‘तुझ्यात सतत काम करत राहण्याचे खूळ निर्माण झाले आहे का? तुला हे माहीत ना का की, तू जर अपंग झालास तर पंख नसलेल्या पक्ष्यासारखी माझी अवस्था होईल? तू जर अंथरुणाला खिळून राहिलास तर मला माझी तीनचतुर्थांश कामे गुंडाळून ठेवावी लागतील.’’

महादेव यांना अगदी जवळून ओळखणारी एक व्यक्ती म्हणजे गांधीजींची इंग्लिश सहकारी मीराबेन (मॅडलिन स्लेड). ते दोघे पहिल्यांदा भेटले नोव्हेंबर 1925 मध्ये, जेव्हा मीराबेन यांना घेण्यासाठी महादेवभाई अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यानंतर ते 17 वर्षे म्हणजे महादेव यांच्या मृत्यूपर्यंत एकत्र काम करत होते. मीराबेन यांनी ‘अ स्पिरिट्‌स पिलग्रिमेज’ या आठवणींच्या पुस्तकात महादेव यांच्याबद्दल लिहिले आहे- ‘‘ते उंच होते, मिशा असणारा त्यांचा चेहरा छान दिसत असे, केस विरळ होत गेलेल्या कपाळामुळे ते बुद्धिमान वाटत असत. स्वभावत: ते अतिशय संवेदनशील होते, त्यांच्या सुबक रेखीच हातांतून ते जाणवत असे. कधी नव्हे अशा व गुंतागुंतीच्या समस्या उद्‌भवल्या तर त्या समजून घेण्यात त्यांची बौद्धिक चमक आणि कमालीची चपळाई दिसत असे. त्यामुळे ते बापूंचे उजवे हात बनले होते. नोंदी घेणे, चर्चा करणे, मसुदे तयार करणे ही सर्व कामे त्यांच्याकडून अगदी अचूक व आखीव रेखीव पद्धतीने पार पाडली जात असत. पण त्यांच्यातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे, त्यांचे बापूंशी असलेले समर्पण. त्यांच्यात व माझ्यात हा सर्वांत बळकट धागा होता.’’

1942 ला गांधीजींनी ‘चले जाव’ची हाक दिली. या  चळवळीदरम्यान गांधीजींना ब्रिटिशांनी अटक केली आणि पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कारावासात टाकलं. हा पॅलेस वसाहतवाद्यांनी आधीच त्यांच्या कारवायांसाठी ताब्यात घेतला होता. येथील कारावासात गांधीजींसोबत महादेव देसाई, मीराबेन हे त्यांचे निकटवर्ती अनुयायी होते. या कारावासातला मुक्काम लांबणार हे जाणवून 14 ऑगस्टच्या संध्याकाळी महादेव मीराबेनला म्हणाले, ‘हा कारावास म्हणजे लिहिण्यासाठी उसंत मिळण्याच्या दृष्टीने एक नामी संधीच चालून आली आहे. सहा तरी पुस्तकं लिहायचं माझ्या डोक्यात आहे. कित्येक दिवस डोक्यात घोळणारं हे सारं मला खरंच कागदावर उतरावंसं वाटतं आहे.’

कारावासात लेखन करण्याचा मानस महादेव यांनी मीराबेनला बोलून दाखवला, याला चोवीस तासही होत नाहीत तोच एक अघटित घडलं. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्याचं वय होतं अवघं पन्नास वर्षे. दुसऱ्या दिवशी गांधीजींनी महादेवची सुटकेस उघडली. त्यात त्यांच्या कपड्यांसोबत बायबलची एक प्रत सापडली. ही प्रत त्यांना ब्रिटिश अधिकारी अगाथा हैरिसन यांनी दिली होती. त्यासह वर्तमानपत्रांची काही कात्रणं, बरीच पुस्तकं होती. त्यात टागोरांचं ‘मुक्तधरा’ हे नाटक आणि ‘बॅटल फॉर एशिया’ हे पुस्तक होतं.

गुजराती आणि इंग्रजी साहित्याचा दांडगा व्यासंग असलेले महादेव, गांधींजींच्या सर्व अनुयायांपैकी सर्वाधिक अकादमिक शिक्षण घेतलेली व्यक्ती होते. त्यांना इतिहास, राजकारण आणि कायद्याच्या अभ्यासातही रुची होती. अमेरिकन इतिहासकर इयान देसाई यांनी, महादेव यांनी वाचन केलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून त्याबाबत काही नोंदी केल्या. राजकीय सिद्धांत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याबाबत त्यांच्याकडे तुटपुंजी माहिती असली तरी ते याबाबतच्या सर्व घडामोडी, तपशील स्वतः अभ्यास करून, मोठ्या कष्टाने गांधीजींना द्यायचे. हे सारं ते कसं करायचे, याबाबत इयान देसाई यांनी काही नोंदी करून ठेवल्या आहेत. याबाबतचा एक अत्यंत रंजक लेख इयान देसाई यांनी, काही वर्षांपूर्वी ‘विल्सन क्वारटर्ली’ या नियतकालिकात लिहिला होता. त्यात ते म्हणतात, ‘महादेव हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या बुद्धिजीवी आघाडीचा केंद्रबिंदू होते. गांधीजींना त्यांच्या कार्यकाळात स्वातंत्रलढ्याचं तत्त्वज्ञान विकसित करण्यात मोलाची मदत ते करत होते. ब्रिटिश वसाहतवादाविरोधातील वैचारिक संघर्ष सुरू ठेवण्यासाठी, माहिती व कल्पनांच्या पातळीवर लागणारं मोठं बळ ते गांधीजींना पुरवीत होते. त्यांना इत्थंभूत सगळी माहिती ते देत असत.

महादेव यांचं शिक्षणावर विलक्षण प्रेम होतं. त्यांच्या निधनानंतर ‘मँचेस्टर गार्डियन’मध्ये छापून आलेल्या मृत्युलेखातही याचा उल्लेख केला आहे. 1931 दरम्यान गांधीजी आणि त्यांच्या या सचिवाने इंग्लंडमध्ये भरपूर प्रवास केला, निमित्त होतं दुसऱ्या गोलमेज परिषदेचं. या प्रवासादरम्यान महादेव यांना इंग्रजी घरांना भेटी देणं, तेथील लोकजीवन पाहणं व अनुभवणं आवडत होतं, असंही ‘मँचेस्टर गार्डियन’च्या मृत्यूलेखात म्हंटलं आहे. ते इंग्रजी लोकांच्या घरी जाताच त्यांच्याकडील ग्रंथसंपदेकडे आकर्षित होत असत. ते पुस्तकं ज्या प्रकारे हाताळत असत, त्यावरूनही त्यांचं पुस्तकांवर किती प्रेम होतं, हे दिसून येतं. थोडासा जरी रिकामा वेळ मिळाला तर ते लगेच पुस्तकांच्या दुकानाकडे धाव घेत असत.

त्यांचं वाचन प्रचंड होतं, मात्र ते कधीही त्यांनी आपल्या मूळ कामाआड येऊ दिलं नाही. गांधीजींना सल्ला देणं, मदत करणं, सर्व कार्यक्रमांच्या तपशीलवार नोंदी ठेवणं हे सगळं ते अचूकतेने आणि विलक्षण कार्यक्षमतेनं करत असत. ते गांधीजींचा शब्दही खाली पडू देत नसत. गोपाळकृष्ण गांधी यांनी महादेवबाबतचं निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणतात, ‘महादेव हे गांधीजींच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नोंदी तर ठेवत असतच, पण त्यासोबत महात्मा किती वाजता उठायचे इथपासून अनेक बारीक-सारीक बिनमहत्त्वाचे तपशीलही नोंदवून ठेवायचे. ते गांधीजींशी इतके एकरूप झाले होते की केवळ दोन वेगळे देह दिसतात, म्हणून त्यांचं वेगळं अस्तित्व मान्य करावं. गांधीजींची दुसरी प्रतिमाच बनले होते जणू! त्यांनी केलेलं लेखनच पुढे अनेक इतिहासकारांसाठी व चरित्र लेखकांसाठी माहितीचा प्राथमिक स्रोत ठरलं.’

15 ऑगस्ट 1942 ला महादेव देसाईचं निधन झालं आणि त्यानंतर पाच वर्षांनी गांधीजींचं. गांधीजी त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठे होते. महादेवच्या मृत्यूनंतर त्यांना पदोपदी त्यांची आठवण येत होती. गांधीजींच्या मृत्यूच्या (हत्येच्या) एका आठवडा आधीपर्यंत ते अनेक गोष्टींमध्ये व्यस्त होते. हिंदू-मुस्लिमांमध्ये सलोखा निर्माण करणं, जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यामधील मतभेद दूर करणं या गोष्टींत व्यस्त असलेले गांधी आपली मोठी भाची मनूला म्हणाले. ‘कधी नव्हे इतकी आता महादेवची आठवण येते आहे. तो असता तर आताची ही परिस्थिती इतकी विकोपाला गेली नसती.’

वयाची चाळिशी येईपर्यंत, मला महादेव देसाई गांधीजींसाठी किती अनमोल होते, आणि भारतासाठी त्यांचे योगदान किती महत्त्वाचं आहे, याची पुरेशी जाणीव झाली नव्हती. गांधीजींच्या चरित्रावर काम करत असताना मी त्यांच्या खासगी दस्तांचा अभ्यास केला, तेव्हा मला खरं  महादेव यांच्या कामाचं महत्त्व समजलं, आपल्या देशासाठी ते किती मौल्यवान आहे, हे कळलं. आपल्या कामादरम्यान भावना आणि विचार यांचं योग्य नियमन करण्याचा त्यांचा मोठा गुण मला कळला.

माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अमेरिकेत वाढलेला माझा धाकटा चुलतभाऊ म्हणाला की, त्याला तोपर्यंत महादेव देसाई कोण आणि त्यांचं योगदान काय आहे, याची माहिती नव्हती. हे पुस्तक वाचून त्याला महादेव यांच्याबद्दल कळलं. तो म्हणाला, ‘महादेव देसाईशिवाय गांधीजी इतका मोठा स्वातंत्र्यलढा उभारू शकले नसते, याची आता मला खात्रीच पटली आहे. तरीही इतकं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महादेव देसाईचे पुतळे देशभरात का नाहीत, हे मला कळत नाही.’

आता गांधीजींप्रमाणे महादेव यांचा पुतळा, स्मारक बनवण्यासाठी खूप पैसा आणि विविध पातळ्यांवर सहकार्याची आवश्यकता असल्याने ते घडणं मला कठीण वाटतं. पण किमान, गुजराती आणि इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या एखाद्या तरुण अभ्यासकाने त्यांच्या चरित्रावर नव्याने काम करायला हवं. काही वर्षांपूर्वी महादेव यांचे चिरंजीव नारायण यांनी, आपल्या वडिलांच्या आयुष्यावर काही लिहिलं होतं. ते महत्त्वाचं आणि माहितीपर पुस्तक होतंच. परंतु आता एखाद्या अभ्यासकाने, संशोधकाने या चरित्रावर काम करणं आवश्यक आहे. म्हणजे कुटुंबाव्यतिरिक्त एखाद्या अभ्यासकाने प्राथमिक माहिती, स्रोतांचा अभ्यास करून, तटस्थपणे लिहिलं तर एक महत्त्वपूर्ण चरित्र साकार होईल.

महादेव देसाई कुंपणांमध्ये अडकणारा माणूस नव्हते. गांधीजींप्रमाणेच त्यांचा दृष्टिकोन वैश्विक होता. देशात, जगात काय सुरू आहे, हे जाणणारा गुजराती होता तो. तो स्त्रियांचा आदर करत असे. गांधीजींप्रमाणेच तो बहुसंख्याकवादाला विरोध करणारा हिंदू होता. जगाकडून नवीन गोष्टी शिकण्यात रस घेणारा तो एक सच्चा भारतीय होता. तो एक हरहुन्नरी आणि जाणता लेखक होता. त्याच्याकडे कमालीचा हजरजबाबीपणा होता. या साऱ्या शिदोरीच्या बळावर त्याने गांधींजींसाठी आणि गांधीजींसोबत या देशासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. त्यामुळे त्याचं चरित्र आवर्जून लिहिलं गेलं पाहिजे, तो एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरेल.

गांधीजींच्या संदर्भाने मीही महादेव देसाईबद्दल लिहिलं आहे. त्यात गांधीजींशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाबाबत लिहिलं आहे. यासह त्यांचे इतरांशी असलेले मैत्रीचे संबंध, त्यांनी केलेला पत्रव्यवहार महत्त्वाचा आहे. मी अभ्यासलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांनी नेहरूंशी  इंग्रजीत केलेला पत्रव्यवहार, मीराबेनशी केलेला पत्रव्यवहार, तमिळ संस्कृत विद्वान व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री यांच्याशी केलेला पत्रव्यवहार हे सारं वाचनात आलं. याशिवाय त्यांनी व्हाईसरॉयचे स्वीय सचिव गिल्बर्ट लेथवेट यांच्याशी केलेला पत्रव्यवहार आहे. अनेक कागदपत्रं मी धुंडाळली आणि यातला मला सर्वाधिक प्रिय असलेला खजिना गवसला तो एका फोटोच्या रुपात. 1936 चा हा फोटो. सेवाग्रामध्ये सकाळी गांधीजी चालत आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला दोन व्यक्ती. दोघांनीही खादीचे कपडे घातलेले आहेत. या फोटोतली एक व्यक्ती महादेव देसाई आणि दुसरी- खान अब्दुल गफारखान. उंचपुऱ्या धिप्पाड खान अब्दुल गफारखान यांनी प्रसन्न मुद्रेनं, सतत हसतमुख असलेल्या या ठेंगण्या माणसाच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवलेला आहे. असा हा फोटोही मोठा ऐतिहासिक ठेवा आहे.

तर आजच्या या स्वातंत्र्यदिनी आपण, हे राष्ट्र घडवणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांचं कृतज्ञतापूर्क स्मरण करू या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस, कमलादेवी चट्टोपाध्याय, बिरसा मुंडा, दादाभाई नौरोजी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, भगतसिंग इत्यादींच्या स्मृती जागवू या. या यादीतल्या नावांइतकंच महत्त्वाचं नाव आहे महादेव देसाई. जे स्वातंत्र्यदिनाच्या बरोबर पाच वर्ष आधी 15 ऑगस्टला या जगातून गेले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी मिळालेल्या स्वातंत्र्याकरता त्यांनी आपलं आयुष्य वेचलं, याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे.

(अनुवाद : प्रियांका तुपे)