ग्रीष्मलळा…

– आशुतोष शेवाळकर

ग्रीष्माच्या कळा आणि झळा कुणाच्या आवडत्या तर कोणाच्या नावडत्या असू शकतात; पण ग्रीष्माच्या लळा लावणाऱ्या काही गोष्टी मात्र सगळ्यांच्याच आवडत्या असाव्यात. उन्हाळ्यात हमखास मिळणाऱ्या सुट्ट्या या तर लहानपणी सगळ्यांच्याच आवडत्या असायच्या. शिक्षण संपल्यापासून आयुष्यातून गेलेल्या या सुट्ट्या मी अजूनही खूप ‘मिस’ करतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पाहुणे म्हणून आलेली आते, मामे, चुलत भावंडं, दुपारी रंगलेले पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार, चौसरचे डावं, नाहीच काही तर नाव-गाव-वस्तू-प्राणी-सिनेमा वा ‘मेकॅनो’ वर विविध वस्तू तयार करणे या आठवणी तर प्रत्येकाच्याच मनातली आनंदाची ठेव असावी. भावंडं नसलेल्या माझ्यासारख्या एकल्याला उन्हाळा म्हणजे तर आप्तांचा कुंभमेळाच वाटायचा.

उन्हाळा हा एक गंधाचाही प्रवास असतो. मोगऱ्याचा सुगंध, उन्हाळ्याची चाहूल देतो आणि वाळ्याचा गंध त्याच्या मध्याची जाणीव करून देतो. कांद्याचा वास हाही असाच माझ्या मनात उन्हाळ्याला जोडलेल्या गंधापैकी एक आहे. ऊन लागल्यावर आई कांदा फोडून खोल श्वासाने त्याचा वास घ्यायला लावायची तेव्हा मेंदूत झिणझिण्या यायच्या. कांदा ठेचून, तो पातळ कापडात गुंडाळून मग त्याचा रस ती कपाळाला व हातापायाच्या तळव्यांना चोळून द्यायची, कापड पिळून मग तो रस कानात ओतायची. कानातला रस बाहेर काढतांना तो गरम गरम होऊन बाहेर पडणे आणि आत मग ‘थंड थंड’ वाटणे हे एक वेगळंच ‘फीलिंग’ असायचं. अजूनही ती उन्हाळा सुरू झाला की माझ्या गाडीत एक-दोन कांदे टाकून ठेवायला विसरत नाही. वाळा आणि मोगऱ्याने सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या गंधाचा हा प्रवास मग थोडीशी पावसाची चाहूल लागली की, वर्षभरासाठी घातलेल्या लोणच्याच्या खाराच्या घरभर पसरणाऱ्या गंधानी संपतो.

उन्हाळ्याला त्याच्या खास अशा काही चवीही असतात. दुपारी झोपेतून उठल्यावर भूक लागलेली असली की, कच्ची कैरी टाकून केलेला कच्चा चिवडा, लाहीवड्या, खारवड्या, पापडाच्या लाट्या किंवा सकाळी नदीवर किंवा विहिरीत पोहून आलं की सातूचे पीठ, मुगाचा लाडू ही उन्हाळी खाणी किंवा रात्री बाहेरच्या ओसरीत बसून केलेलं कलसलेलं वरण व ताज्या कैरीच्या लोणच्याचं जेवण आठवलं की, माझ्या तोंडाला अजूनही पाणी सुटतं. ‘फ्रीज’ दुर्मिळ असलेल्या त्या काळात कूलरच्या वरच्या टाकीच्या पाण्यातच टरबूज, खरबूज अशी उन्हाळी फळं ठेवलेली असायची. दुपारी झोपेतून उठल्यावर ती खाणे, एकी का बेकी करत संत्री खाणे या पण उन्हाळ्याच्या चवींच्या काही खास आठवणी आहेत.

आमच्या बाजूला नगरवालांकडे ‘फ्रीज’ होता. त्यांच्या मुलांबरोबर कधीमधी बर्फाचे खडे चाखायला मजा यायची. संध्याकाळी बाबा थकून सायकल चालवत घरी आलेत की, घामाझोकळ झालेले असायचे. त्यांना बर्फाचे थंड पाणी प्यायला आवडायचे. ते बर्फ मागून आणायला मग मला नगरवालांकडे पाठवायचे. मला ते भांडं घेऊन बर्फ मागायला जाणं खूप ओशाळवाणं व्हायचं.
उन्हाळ्यात सगळं गावच बाहेर अंगणात झोपायचं. त्यामुळे या काळात चोऱ्या वाढायच्या. लहान मुलांमध्ये मुलांना पळवण्यासाठी चकवे आले, हेंडवे निघाले अशा अफवा उठायच्या. मग माझा मोठा मामेभाऊ मिलिंद मला समजावून सांगायचा, चकवे म्हणजे माणसंच असतात. बोलत-बोलत आपल्याला गावाबाहेर नेतात आणि मग पळवून नेतात. हेंडवे म्हणजे भूत असतात. त्यांचे पाय उलटे असतात. कुणीही अनोळखी माणूस आपल्याशी बोलायला लागला की, आधी त्याच्या पायाकडे पाहायचं, मगच त्याच्याशी बोलायचं असं वगैरे तो मला समजाऊन सांगायचा. त्या काळात मग अनोळखी माणसांना माझ्या अशा त्यांच्या पायाकडे बघून बोलण्याच्या सवयीमुळे मी कदाचित खूप नम्र वगैरे वाटत असेन.

रिझल्ट लागणे, तो ऐकायला शाळेत जाणे, पहिला नंबर येणे, घरोघरी पेढे वाटून नमस्कार करून कौतुक करून घेणे हेही माझ्या उन्हाळ्याच्या ‘फील’शी जोडल्या गेलेलं एक ‘भावविश्व’ आहे. वाचनालयातला जुन्या पुस्तकांचा वास हाही माझ्या मनातल्या उन्हाळी गंधांना चिकटलेला एक गंध आहे. पोहणे हा सुद्धा तेव्हा फक्त उन्हाळ्यातच मिळणारा असा खास राखीव आनंद असायचा. आधी डालड्याचा ‘डब्बा’, मग ‘दोरी’ अशा क्रमाक्रमांनी ज्या दिवशी विनादोरीचं पोहता आलं, त्या दिवशीचा आनंद गगनात मावेनासा होता.

मग आम्ही गावाजवळच्या दामलेंच्या वाडीतल्या विहिरीत पोहायला जायचो. माझी मामेभावंडं आलीत की, त्यांना घेऊन मग मी नदीवर पोहायला जायला लागलो. येताना आम्ही मासोळ्या पकडून आणायचो. त्यातल्या थोड्या काचेच्या पाण्याच्या ‘जार’ मध्ये ठेवून ‘फिश पाँड’ करायचो. सकाळी जाग आल्याबरोबर पहिले या मासोळयांचा विचार मनात यायचा व जार मधे त्यांना पोहतांना पाहून अतीव आनंद व्हायचा. त्यातली एखादी मासोळी मेली की मग ती पाण्यातच उलटी पडायची तिचं पांढरं पोट वर दिसायचं मग त्यावेळी खूप वाईट वाटायचं. तिला हात आत बुडवून बाहेर काढलं तर हातांनाही वास लागायचा इतक्या लवकरच तिचं शरीर खराब व्हायला लागायचं. माझ्या मिलिंद या मामेभावाला ‘आय शेप’ म्हणजे डोळ्याच्या आकाराच्या मासोळयांचं तेव्हा खूप वेड होतं. बाकीच्या घरासमोरच्या विहिरीत सोडून द्यायचो.

त्या विहिरीत आधी एकही मासोळी नव्हती. कॉलेजसाठी गाव सोडल्यानंतर कधीतरी सुट्टीत वणीला गेलो असताना त्या जुन्या घरासमोर जाऊन त्या विहिरीत डोकावून पाहिलं तर फूट-दीडफूटाच्या झालेल्या मासोळ्या पोहताना दिसल्या. आपण बसवलेली ही वसाहत आता इतकी मोठी झाली आहे. असं मनात येऊन त्या दिवशी खूप अभिमान वाटला होता. आधी जिथे मिळेल तिथे पोहायला मन आसुसलेलं असायचं. आता घरीच स्विमिंग पुल झाल्यावर मात्र ‘जबसे सरकारने नशाबंदी तोड दी, मानो या ना मानो हमने पीनी छोड़ दी’ या गाण्यासारखी अवस्था झाली आहे.

बंगला बांधल्यावर मी मग जिन्याखाली मोठा फिशपॉन्ड पण तयार केला. समुद्रातल्या मासोळया दिसायला अधिक सुरेख असतात असं कोणी सांगितल्याने त्याला ‘मरीन टॅंक’ केला. मीठ टाकून त्याचं पाणी ‘सलाईन’ केलं. ‘सॅलीनीटी मिटर’ लावलं. महिनाभर त्या आतल्या वाळूत ‘बॅक्टीरियाच्या कॉलनीज्’ तयार होण्याची वाट पहिली. मग प्रत्येक ट्रीपमध्ये मुंबईवरून येतांना एकेक मासोळी आणून तिला त्यात सोडून, जगवून मग विविध प्रकारच्या समुद्रातल्या मासोळ्यांचा तो टॅंक हळूहळू तयार झाला. पण लहानपणच्या त्या काचेच्या पाण्याच्या जारच्या ‘फिश पॉन्ड’ चा आनंद व मजा आयुष्यात नंतर कधीच आली नाही.

हेही नक्की वाचा

ग्रीष्मझळाhttps://bit.ly/2T4SFBO

-ग्रीष्मकळाhttps://bit.ly/3bTxGce

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]

Previous articleग्रीष्मझळा…
Next articleकोरोनाची महामारी, धर्म आणि देवदेवदेव…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.