चमत्काराची जादूगिरी…२५ वर्षांची महामारी

  ज्ञानेश महाराव

——————–

चमत्कार तेथे नमस्कार।तेणे जादूगिरीस चढे पूर॥

खऱ्या संतास ओळखी ना नर।चमत्कारा अभावी॥

या ओळी ‘राष्ट्रसंत’ तुकडोजी महाराज‌ (जन्म : ३० एप्रिल १९०९; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९६८) यांनी लिहिलेल्या ‘ग्राम गीता’मधील ‘संत चमत्कार’ या अध्यायातल्या आहेत. त्यात ‘माणूस हीच जात आणि माणुसकी हाच धर्म’ या विचाराने लोकसेवा, लोकजागृती-उन्नती करणाऱ्या संतांना चमत्कारांच्या बाता-बंडलात बांधून, माणसांतून उठवून त्यांच्यावर दैवत्व कसे लादलं जातं, याची माहिती दिलीय. तरीही संत ज्ञानेश्वरांनी पडकी भिंत कशी चालवली ? रेड्याच्या मुखातून ‘वेद’ कसे वदवून घेतले ? संत तुकारामांच्या सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवलेल्या गाथेच्या वह्या पुन्हा कशा वर आल्या ? महाराज सदेह वैकुंठाला विमानातून कसे गेले ? शिवाजीराजांची परीक्षा घेण्यासाठी ‘कथित’ गुरू आणि रामभक्त असल्याने ‘शेपूट’ असलेले रामदास स्वामी गडावर अचानक कसे अवतरले? याच्या सुरस, चमत्कारिक कहाण्या पुराणिक बुवा याची देही-डोळा ‘ब्रह्म पाहिले’च्या थाटात आजही सांगत असतात. अशाच चमत्कारांच्या कहाण्यांच्या बळावर साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, अष्टवक्री शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद, टेंबे स्वामी आदी अलीकडच्या छोट्या-मोठ्या संत- स्वामी महाराजांना वापरणाऱ्यांची दुकानं भरपूर गर्दी-गल्ल्यात सुरू आहेत. सोबत पडीक- दुर्लक्षित देवळातल्या दगडी देव-देवताही जागृत झाल्यात.

गेल्या १५-२० वर्षांत धंद्याचं गणित जमलेल्या ‘आंगणेवाडी’ सारख्या यात्रा-जत्रांनीही आपलं बस्तान पक्कं केलंय. यातूनच घाऊक प्रमाणात निर्माण झालेल्या भक्तांच्या अंधभक्तीने भारताला आज ‘विष्णू अवतारी’ प्रधानमंत्री लाभलाय. या बनावटीचा पाया २५ वर्षांपूर्वी घरातल्या, दारातल्या, देवळातल्या गणपतीच्या मूर्त्या दूध पिऊ लागण्याच्या चमत्कारात आहे. २१ सप्टेंबर १९९५ रोजी झालेल्या या अजब चमत्काराने हिंदुस्थानातच नव्हे, तर जगात मोठी धमाल उडवून दिली. त्याने हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनी ‘सारे विश्व आता हिंदूधर्ममय होणार, याचीच ही नांदी आहे,’ असा पुकारा करीत आपल्या खोट्या पराक्रमाचे झेंडे नाचवायला सुरुवात केली.

१९८४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी (तेव्हा ‘भाजप’चे दोनच खासदार निवडून आले होते) ‘भाजप- संघपरिवारा’ने आपल्या ‘विश्व हिंदू परिषद’ या संघटनेला पुढे करून अयोध्येतल्या ‘मंदिर-मशीद’ वादाला चालना दिली. शिलापूजन, गंगाजल, कारसेवा, रथयात्रा असे कार्यक्रम राबवत १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ११० खासदार निवडून आणण्यापर्यंत मजल मारली. या बळाच्या पाठिंब्यावर ‘जनता दल आघाडी’चे व्ही. पी. सिंग प्रधानमंत्री झाले. पण वर्षभरात ‘राम जन्मभूमीसाठी निघालेली लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा’ ‘जनता दल’चे राज्य असलेल्या बिहारात, मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवल्याने ‘भाजप’ने ‘व्ही.पी. सिंग सरकार’चा पाठिंबा काढला आणि सरकार पाडलं. ‘काँग्रेस’च्या पाठिंब्यावर चंद्रशेखर सहा महिन्यांसाठी ‘काळजीवाहू प्रधानमंत्री’ झाले. त्यानंतर मे १९९१ मध्ये मुदतपूर्व लोकसभा निवडणुकात ‘भाजप’ सत्तेवर येण्याची शक्यता अधिक होती. पण निवडणूक प्रचार काळात २१ मे १९९१ रोजी (श्रीपेरुम्बूदूर – तमिळनाडू ) येथे राजीव गांधी यांची हत्या झाली आणि पारडे फिरले. काँग्रेसची सरशी झाली. नरसिंह राव प्रधानमंत्री झाले.

उत्तर प्रदेशात तेव्हा ‘जनता दला’त असलेल्या मुलायमसिंह यादव यांचे सरकार होते. उत्तर प्रदेशात क्षत्रिय (यादव-ठाकूर), दलित आणि मुस्लीम हे तिथल्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारे समाज बहुसंख्येने आहेत‌. त्यांची मोट बांधून ‘काँग्रेस’ उत्तर प्रदेशाची आणि त्या बळावर देशाची सत्ता सातत्याने मिळवत होती. व्ही.पी. सिंग हे मूळचे ‘काँग्रेस’चे. पण ‘बोफोर्स तोफा घोटाळा’ प्रकरणात त्यांनी राजीव गांधी विरोधी भूमिका घेतल्याने ते ‘काँग्रेस’ विरोधकांसह ‘भाजप’चेही ‘मसीहा’ झाले. या ‘मसीहा’च्या पक्षाचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात होता. पण १९९१ च्या कारसेवेत बाबरी मशिदीवर चढाई करणाऱ्यांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कारसेवक मारले गेले. त्याने मुलायमसिंग ‘मुल्ला मुलायम’ झाले. परिणामी, विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ‘भाजप’चे सरकार आलं. त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी ‘संघ-भाजप’ नेत्यांच्या आदेशांना झिडकारून कारसेवकांनी बाबरी मशीद भुईसपाट केली. परिणामी, केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील ‘भाजप’चे ‘कल्याणसिंह सरकार’ बरखास्त केले. मुंबई व सुरत येथे हिंदू-मुस्लीम दंगे झाले. १२ मार्च १९९३ रोजी देश हादरवणारी १२ बॉम्बस्फोटांची मालिका मुंबईत झाली. त्यात प्रचंड मालमत्ता आणि जीवित हानी झाली.

त्यातून कट्टर हिंदू धर्मवादाला चालना देणारे ‘भाजप-संघ परिवार’चे नेते व त्यांचा हिंदू राष्ट्रवाद किती भंपक आणि बिनडोक आहे, त्याची कल्पना हिंदूंमधील विचारी- विवेकी सज्जनांना आली होती. म्हणूनच हिंदुत्वाच्या मुद्यावर ‘भाजप’ची पीछेहाट होत होती. तथापि, त्यांना महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ‘बोलका बाहुला’ अण्णा हजारेंची साथ मिळाल्याने १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना-भाजप’ युतीला सत्तेची लॉटरी लागली. त्यानंतर चारच महिन्यांत ‘गणपती दूध पिण्याचा जागतिक चमत्कार’ झाला! नव्हे घडवण्यात आला!

ज्यांनी संसाराकडे पाठ फिरवली आहे आणि फुकटचं खात आयुष्य घालवण्याचे व्रत घेतले आहे, अशा बोके संन्याशांना जमवून हिंदू समाजाला पुन्हा अंधकार युगात नेण्याचा तो कट होता‌. त्यासाठी हिंदू धर्म , हिंदू संस्कृती यांचे विकृत स्वरूप लोकमानसात बिंबवण्यासाठी त्यांनी मंदिर- मशीद वादाचा हिंसक उद्योग आरंभलाच होता. तो मुल्ला- मौलवींच्या माथेफिरूपणाशी स्पर्धा करणारा माथेफिरूपणा आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचा धर्मांध अट्टहास होता. तो अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, उमा भारती यांसारखे ‘विश्व हिंदू परिषद’चे नेते दाखवत होते‌. ‘हिंदूंनी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे’ अशी हवा ते निर्माण करीत होते. त्यासाठी अफवा उठविण्यापासून ते चमत्कार घडविण्यापर्यंत सारे काही घडवून आणण्याची व्यवस्था केली जात होती. त्यानुसार ‘गणपतीला दूधखुळा करण्याचा चमत्कार’ झाला. पण त्याने हिंदूंना घातकी अंधश्रद्धा, घातक रूढी-परंपरा आणि अज्ञान यामधून सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज सुधारक, समाजसेवकांच्या शतकांच्या प्रयत्नांवर या परंपरावादी मंडळींनी पाणी ओतले.

‘लोकहित’वादी गोपाळराव देशमुख, राजा राममोहन रॉय , ‘सुधारक’ गोपाळ गणेश आगरकर , महात्मा जोतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहूराजे, ‘प्रबोधन’कार ठाकरे, भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याच नव्हे तर, ‘गायीची हत्या झाली तरी चालेल पण या देशाच्या बुद्धीची हत्या देऊ नका’ असे स्पष्टपणे सांगणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट’ विनायक दामोदर सावरकर यांचाही सत्ताप्राप्ती चमत्कार घडवून आणणाऱ्यांनी पराभव केला! आणि तो घडून यावा, यासाठी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या गुरुजींच्या ‘संघ’टित स्वयंसेवकांच्या परिवाराने त्याला योजनापूर्वक सहाय्य केले! ‘मोदी सरकार’ आल्यापासून गेली ६ वर्षं ‘भाजप’च्या मंत्री- खासदारांपासून ते महापौर- नगरसेवकांपर्यंतचे लोकप्रतिनिधी आपण ‘संघ स्वयंसेवक’ असल्याचे आवर्जून सांगतात. हा संघाच्या ‘हाफ पँटची, फुल पॅन्ट’ झाल्याचा चमत्कार असावा! तेव्हा मात्र अफवा, चमत्कार आणि प्रक्षोभक भाषणाचे कार्यक्रम एकापाठोपाठ करीत राहण्याचे काम धर्म आघाडीवर वावरणाऱ्या ‘विश्व हिंदू परिषद’च्या नेत्यांनी करायचे आणि त्याचा फायदा ‘आम्ही त्याच्यापासून दूर आहोत’, असे दाखवत लाटणाऱ्या ‘भाजप’ने घ्यायचा, असे नियोजन होते. त्यानुसारच ‘गणपती दूध पिण्याचा’ सुविहित चमत्कार झाला.

तो होण्यापूर्वी व त्यानंतरही कुणा गणेश भक्ताने गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी चमच्याने दूध घेऊन ते मूर्तीच्या तोंडाजवळ नेले नसेल. तथापि, चमत्कार घडवण्यासाठी देवाला पुजाऱ्याद्वारे नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार असलेली पद्धत सोडून, चमच्याने गणपती मूर्तीच्या सोंडेजवळ दूध लावण्याचे काम करवून घेण्यात आले, हे स्पष्ट आहे. पूजा विधी शास्त्रानुसार, देवापुढच्या पूजेच्या भांड्यांत चमचा असतच नाही. तिथे तांब्या-पितळेची वा चांदीची पळी असते‌. असे असताना देवळात चमचे घुसले ! या चमच्यांनीच ‘गणपती दूध पितो’, चा चमत्कार पसरवला. त्यावेळी आजच्यासारखे ‘स्मार्टफोन’ नव्हते. ‘ब्रेकिंग न्यूज’वाले ‘टीव्ही चॅनल’ही नव्हते. तरीही उपलब्ध फोन-फॅक्सच्या यंत्रणेद्वारे चमत्काराची बातमी दोन-तीन तासांत देशभर पसरली आणि वेगवेगळ्या देवळांतून चमच्यांनी दूध पाजण्याचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सुरू व्हावा, तसा झाला‌. आजच्या ‘गोदी मीडिया’ची उणीव तेव्हा ‘बीबीसी’ने तत्परतेने भरून काढली. त्यांनी हा चमत्कार तत्परतेने चित्रित करून पुन्हा- पुन्हा दाखवून जागतिक केला. ही योजकता साक्षात बुद्धिदात्या गणपतीलाही सुचली नसती.

तथापि, ती ‘हिंदुत्व विश्व विजयासाठी सज्ज झालंय,’ हा उन्माद लोकांत पसरवण्याची विश्वव्यापी सुरुवात होती. जनतेला भारावून टाकण्याचा तो प्रयोग होता. ‘सारासार विचार-विवेक सोडा; हिंदू धर्मासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ आलीय ! देव जागृत होत आहेत. हिंदुत्वाची विजयपताका भारतवर्षावरच नव्हे, तर विश्वावर फडकवण्यासाठी सज्ज व्हा !’ असेच जणू या चमत्काराद्वारे सांगण्यात आले. हे सारे तंत्र मुल्ला-मौलवी वापरतात, तेच होते. ‘विचार करू नका. देव-धर्म ही विचारापलीकडची बाब आहे. श्रद्धा-भक्ती याचे सामर्थ्य बुद्धी सामर्थ्यापेक्षा प्रबळ आहे!’ हे लोक मनावर ठसवण्याचा हा अद्भुत, चमत्कारिक प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. त्याची कटू फळे भारत देश गेली २५ वर्षं भोगतोय !

————————–

गणपतीला दूध प्यायला लावणारे चमचे

‘भाजप’ ही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची राजकीय शाखा! भारताची ‘हिंदुराष्ट्र’ अशी ओळख करणे, हे संघाचे अंतिम उद्दिष्ट ! त्यासाठी ‘हिंदू संघटन’ आवश्यक! पण ते संघटन हिंदूंतील जाती-जमातींच्या छेदा-भेदांमुळे, देशाच्या फाळणीतून पाकिस्तानची ‘मुस्लीम राष्ट्र’ म्हणून निर्मिती होऊनही झालं नाही. ‘भाजप’चा पूर्वावतारी ‘जनसंघ’ने ‘हिंदू वोट बँक’ तयार करण्यासाठी बरीच वर्षं गाय वापरली. पण ती इंदिरा गांधींनी ‘गाय- वासरू’ला पक्षाची निशाणी बनवल्याने ‘काँग्रेस’ला पावली. १९७५ ते ७७ या आणीबाणी काळानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाप्रमाणे ‘जनसंघ’ही जनता पक्षात विसर्जित झाला आणि अडीच वर्षं सत्तेचे लोणी खाऊन झाल्यावर ‘जनता पक्षा’त फूट पाडून १९८० मध्ये ‘भारतीय जनता पक्षा’च्या अवतारात प्रकट झाला.

त्यानंतर, माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ जसा वस्तीच्या दिशेने दबा धरून बसतो ; तशी ‘भाजप’च्या राजकारणाची पावलं वाट्टेल ते करून सत्ताप्राप्तीच्या दिशेने पडू लागली. त्यासाठी सुरुवातीला ‘गांधीवादी- समाजवाद’ ही भूमिका घेतली. पण ते सोंग थोड्याच दिवसांत गळून पडलं. त्यात १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रधानमंत्री असलेल्या इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने निवडणुकीत ‘भाजप’चा दारुण पराभव झाला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ४१४ खासदारांनिशी ‘काँग्रेस’ सरकार देशात आले. या निवडणुकीत वाजपेयी आणि अडवाणी हे ‘भाजप’ नेतेही पराभूत झाले. आंध्र प्रदेशातील हमणकोडा या मतदारसंघातून चंदूपाटिया रेड्डी आणि गुजरातेतील महेसाणा येथून ए.के.पटेल हे दोघेच ‘भाजप’चे खासदार झाले. या पराभवाने खचलेला ‘भाजप- संघ परिवार’ अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदुत्ववादाच्या दिशेने वळाला. त्याला पूरक अशा ‘शहाबानो केस’चा सुप्रीम कोर्टाने तलाक विरोधात दिलेल्या निकालाला विरोध करण्यासाठी मुस्लिमांनी संसद भवनाच्या भोवती काढलेला मोर्चा, बाबरी मशिदीचा मंदिराच्या बाजूने लागलेला निकाल, लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारात अडवणे, यासारख्या घटना घडल्या.

व्ही.पी.सिंग यांनी बोफोर्स प्रकरणात आपल्या प्रधानमंत्री विरोधात ( राजीव गांधी ) भूमिका घेतली नसती आणि १९८९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली नसती; तर तेव्हाच ‘भाजप’ देशाचा प्रमुख सत्ताधारी पक्ष झाला असता. त्यानंतर बाबरी पतन झाले ते ‘भाजप’साठी राजकीय लाभदायी होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानेच ‘गणपती दूध पिण्याच्या चमत्कार’चा खेळ खेळवण्यात आला. कारण तोपर्यंत श्रद्धा, भक्ती आणि धर्मभावना ह्यांना साधनाप्रमाणे वापरून आपल्या साध्याप्रत पोहोचवणारे व्यवहारी बोके, खुलेआम ‘म्यॉऊ म्याऊ’ करण्याच्या तयारीचे झाले होते. त्यांच्या बळावरच स्वाध्याय, सत्संग, बैठका यांचा सनातनी बाजार पसरू लागला होता‌. नरेंद्र महाराज, अनिरुद्ध बापू यांच्यासारखे भक्तांचे खिसेकापू आणि आसारामसारखे घाशीराम संत-महंत देशभर तयार झाले होते. त्यांच्यातल्या दैवी शक्तीचे दर्शन घडवण्याआधी पत्थरी देव-देवतांनी आपली ताकद दाखवणे आवश्यक होतं. यासाठीच ‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार’ घडवण्यात आला.

यातून काय साधायचे ते ‘समर्पयामि’ म्हणून आपली दक्षिणा उचलणाऱ्यांना चांगलेच अवगत असते. या दक्षिणेच्या लुटीत आपला सत्ता बाजार उठू नये, यासाठी ‘काँग्रेस’तर्फे पाळलेल्या चंद्रास्वामीला (मूळ नाव नेमीचंद. जन्म:१९४८; मृत्यू : २४ मे २०१७) पुढे करण्यात आले. त्याने ‘गणपतीला दूध प्यायला मीच लावले’ असे जाहीर केले. (सहा महिन्यांनी त्याने काँग्रेसच्या ‘नरसिंह राव सरकार’ भोवतीचं बदनामीचं अरिष्ट नष्ट करण्यासाठी अयोध्येत सोमयज्ञाचे आयोजन केले होते. तरीही १९९६च्या लोकसभा निवडणुकीत ‘काँग्रेस’चा पराभव झाला आणि चंद्रास्वामीवर तुरुंगात जाण्याची वेळ आली.)

असाच व्यवहार ‘कालनिर्णय’कार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर (जन्म:१ फेब्रुवारी१९२९, मृत्यू :२० ऑगस्ट २०१३) यांनी केला. जयंतराव हे आघाडीतल्या मराठी वृत्तपत्रात आलटून- पालटून ‘राशिभविष्य’ लिहिणारे ज्योतिषी! अनेक संपादक, राजकारण्यांचे बोलवते- चालवते धनी! पोट फाडलेले अफजल खान आणि पोट फाडणारे शिवाजीराजे, या दोघांच्याही गोटा- पोटात आदराचे स्थान मिळालेले, अशी जयंतरावांची ख्याती! साहित्यिक, पत्रकार, कलाकार, उद्योजक अशा सगळ्यांशीच त्यांचा प्रेमव्यवहार असायचा. ‘राजगुरू’पद असते तर त्यावर जयंतरावांशिवाय दुसरे कुणी दिसलेच नसते, असा त्यांचा तेव्हा दबदबा होता.

परंतु, ‘राजगुरू’ पदाची व्यवस्था नसल्याने त्यांची धर्मशास्त्राचा अभ्यासक आणि ‘गणेशभक्त म्हणून प्रभादेवीच्या ‘सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’च्या शासन नियुक्त विश्वस्त मंडळावर वर्णी लागली होती. ही तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांची स्नेह-कृपा होती. त्यामुळेच ‘गणपतीची मूर्ती दूध पिते’ असा सकाळी ११ वाजता मंदिरातून फोन येताच, ‘काहीतरीच काय सांगता? मूर्ती कशी दूध पिईल?’ असे ते बोलून गेले. संत नामदेवांच्या हातून विठ्ठल जेवला, ही गोष्ट जयंतरावांनी नक्कीच वाचली होती. तरीही धर्मशास्त्राच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाला आणि अनुभवाला स्मरून ते खरं तेच बोलले. कारण, मूर्ती अशा प्रकारे काही खाऊ- पिऊ शकत नाही आणि तसा दाखला कुठल्याही पुराणात-शास्त्रात असल्याचे न आढळल्यामुळेच त्यांनी ‘मूर्ती दूध पिते’ यावर विश्वास ठेवला नाही. तरीही ‘मूर्तीचा दूध पिण्याचा चमत्कार, हे काहीतरी अरिष्टसूचक आहे,’ असे लोकमानसावर ठसवण्याचा प्रयत्न जयंतरावांनी ‘दैनिक लोकसत्ता’त खास लेख लिहून केला.

त्या लेखातील तपशिलानुसार, ‘त्या’ फोन नंतर ते अवघ्या दहा मिनिटांतच म्हणजे ११ वाजून १० मिनिटांनी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. ‘पुजारी चमच्याने मूर्तीला दूध पाजतो आहे,’ हे त्यांनी ‘अगदी जवळून बघितले!’ असे आजवर त्यांनी बघितले नव्हते, ऐकलेही नव्हते. पण ‘हे असे विपरीत, अप्राकृतिक घडत आहे, ते अनिष्ट- अशुभ- अरिष्टसूचक आहे,’ हे त्यांच्या लक्षात आले. परंतु, तेव्हा पितृपक्ष (श्राद्धपक्ष) चालू असल्याने त्यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. हे शास्त्राला धरून असेल. पण अनिष्ट – अशुभ- अप्राकृतिक डोळ्यादेखत घडतेय; ते थांबवण्यासाठी त्यांनी मंदिराचे विश्वस्त म्हणून पुजाऱ्याला ‘मूर्तीला चमचा-चमचा दूध पाजण्याचे तात्काळ बंद करा,’ अशी सूचना द्यायला पाहिजे होती. पण देवाशी असा पोरखेळ केला जात असतानाही जयंतराव गप्प बसले.

‘पूजा पात्रांत पळीचा वापर होत असताना, चमचा कसा आला? आणि तो मूर्तीच्या सोंडेजवळ टेकवण्याची कल्पना पुजाऱ्याला कशी सुचली?’ याचीही चौकशी जयंतरावांनी केली नाही. यावरून अफवा पसरवायचीच या पूर्वतयारीने सारी घटना सिद्धिविनायक मंदिरात घडवली गेली, हे स्पष्टपणे दिसते. गावोगावच्या मोक्याच्या ठिकाणची अशी नेमकी मंदिरे, असे नेमके चमचे आणि जयंतराव यांच्यासारखे ‘हुकमी साक्षीदार’ वापरले गेले, याचा पुरावाच जयंतरावांच्या लेखनातून जाहीर झाला.

————————————-

भक्तांच्या बत्त्या, बुद्धीची हत्या

‘मूर्ती दूध पिते’ हीदेखील एक सुविहित रथयात्राच होती. मात्र १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’ला त्याचं सत्ता-फळ मिळालं नाही. ‘काँग्रेस’च्या पाठिंब्यावर ‘जनता दल – डाव्या आघाडी’चं ‘देवेगौडा व गुजराल सरकार’ सत्तेत आलं. ते दीडच वर्षे टिकलं‌. त्यानंतर १९९८ व १९९९ या एक वर्षाच्या झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ‘वाजपेयी सरकार’च्या रूपात ‘भाजप- संघ परिवारा’ला सत्ता फळाचा लाभ झाला. या काळात देव-देवतांना वापरणारे चमत्कार घडवले गेले नाहीत. तथापि, पर्यटनाच्या नावाखाली देव-धर्म-भक्तीचा व्याप वाढवला. आसाराम, राम रहीम, रामदेव बाबा या नव्या बुवा- बाबांना हिंदुत्ववादी राजकारण पुढे रेटण्यासाठी मैदानात उतरवण्यात आलं. ‘हिंदू जागृती’च्या नावाखाली ‘सनातन’ची साखळी देशभर निर्माण करण्यात आली. ती चमत्काराच्या गोष्टी सांगत मजबूत करण्यात आली‌. ही सारी ‘दूधखुळ्या गणपती चमत्कारा’ची किमया होती.

लोकांना भक्तिभावात भारून टाकलं की, त्यांच्या सश्रद्ध मनावर जबरदस्त परिणाम होऊन, त्याचा फायदा राजकारणात उचलता येईल, असाच हा चमत्काराचा ‘प्रोजेक्ट’ होता. त्यानुसारच सगळे घडवले गेल्याचे शेकडो परिस्थितीजन्य पुरावे देता येतील‌‌. या चमत्काराने मिळालेल्या बळातूनच अनेक हिंसक, दहशतवादी कारवायांत हिंदू संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते सापडावेत, अशा हिंदू धर्माला कलंकित करणार्या घटनाही घडल्यात. २००४ ते २०१४ या काळात देशात ‘काँग्रेस-डाव्या आघाडी’चे ‘मनमोहन सिंग सरकार’ होतं. त्याला पाडून ‘अच्छे दिन’चं ‘गाजर’ दाखवत देशात आलेलं ‘भाजप’चं ‘मोदी सरकार’ हा ‘गणपतीने दूध पिण्या’सारखाच चमत्कार होता. तो घडविण्यासाठी ‘संघ परिवार’ राब राब राबला. ‘भाजपचं सरकार आल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होणार’, ही अफवा आश्वासन म्हणून लोकांत रुजवली आणि मतं मिळवली.

तथापि, गणपतीच्या मूर्त्यांना पाजलेलं दूध जसं देवळाच्या गटाराच्या दिशेने गेलं ; तसंच १५ लाख रुपयांच्या आश्वासनावर ‘निवडणूक जुमला’चा शिक्का मारून बुडवण्यात आलं. या खोटारडेपणाचा अंधभक्तांनी प्रसाद म्हणून स्वीकार केल्यानेच ; २०१९ ची लोकसभा निवडणूक ‘पुलवामा दहशतवादी हल्ल्या’चा बदला घेणाऱ्या ‘बालाकोट ऑपरेशन’मधला एकही मुडदा न दाखवण्याचा चमत्कार घडवत, ‘भाजप’ने बहुमताने जिंकली. ही श्रद्धा-भक्तीची ‘चमत्कारिक थेरपी’ आता ‘कोरोना’ने उघडी-नागडी करून ठेवलीय. विष्णू अवतारी प्रधानमंत्री ‘टाळ्या-थाळ्या वाजवा’चं मार्गदर्शन करण्यापलीकडे आणि देशात चुकीच्या पद्धतीने ‘लॉकडाऊन’ लादून अर्थव्यवस्थेची माती व करोडो लोकांच्या बेरोजगारीचा डोंगर उभारण्यापलीकडे गेल्या ५ महिन्यांत काहीएक करू शकले नाहीत. तरीही अंधभक्तांचे अजून डोळे उघडलेले नाहीत.

गणपतीला दूध हवंच असेल तर, त्याची मूर्ती हातातला मोदक खाली ठेवून आपल्या हाताने दुधाचे भांडे उचलून ते सोंडेला का लावत नाही, असा प्रश्न देवाला दूधखुळा बनवणाऱ्यांना पडला नसेल. पण आता २५ वर्षांनंतरही, ‘देवाला दूध पिण्याची गरज वा इच्छा आहे ; पण ते स्वतःच्या हाताने पिण्याएवढे बळ मात्र देवाला नाही,’ एवढे तरी समजले असेल, असं वाटत नाही. अन्यथा, फुकटचे भक्त आणि विकतचे ‘ट्रोलर’ माजले नसते. बुद्धी ‘लॉकडाऊन’ करून भाकड श्रद्धेच्या मागे धावणाऱ्यांचे काय होते, याची कित्येक उदाहरणे इतिहासात आहेत. तरीही तोच वेडेपणा आजही पाहायला मिळतो. यालाच वीर सावरकर ‘देशाच्या बुद्धीची हत्या’ म्हणतात! लोकहो, सावध व्हा!

■ (लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

    9322222145

Previous articleहिमालयाच्या अखंडतेवर निर्दयी हल्ला…
Next articleमाणसाने पृथ्वीपासून सर्वात दूरवर पाठवलेले यान कोणते?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.