आपल्याला आत्ता मिळालेला जन्म आपल्या पूर्वसंचितानुसार मिळालेला आहे. ते संचित नीट जगून आपण पूर्ण केले की मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल वा पुढचा जन्म अधिक चांगला मिळेल हा एका धर्माचा संस्कार तर कयामतच्या दिवशी अल्ला सर्वांच्या पापपुण्याचा निवाडा करून पुण्यवंतांना स्वर्ग व पाप्यांना नरक देईल ही दुसऱ्याची शिकवण. मग माणसे त्या समजुतीनिशी राहतात, वागतात, व्यवसाय करतात व जगतात. यात कोणताही बदल करणे त्यांना रुचत नाही वा ते पापकर्मे वाटत असते. ही व्यक्ती व समाज या दोहोंचीही मानसिकता असते. सत्तेशी लढता येते, धर्माशी वाद घालता येतो आणि धनवंतांशी दोन हात करता येतात… पण या मानसिकतेशी कसे लढणार? चार्वाक व सारे विज्ञानवादी या ठिकाणी दुबळे होतात.
पाश्चात्त्यांत गॅलिलिओपासून झालेली सुरुवात आत्ताच्या यंत्रयुगातील अव्वल दर्जाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञांपर्यंत होत राहिली. त्याच वेळी फ्रान्सिस बेकनपासून अलीकडच्या रसेल व चॉम्स्की यांच्यापर्यंत त्यांचे तत्त्वचिंतनही विकसित झाले. रुसो आणि व्हॉल्टेअर यांसारख्यांनी चर्च व धर्म यांची भरपूर टिंगलटवाळी करून त्यांचे सत्य स्वरूप जगासमोर आणले व त्यासाठी स्वतःला बहिष्कृतही करून घेतले. तिकडे मार्क्स झाला, फ्रॉईडही झाला आणि सेक्युलॅरिझमला आजचा अर्थ देणारा जॉन होलिओकही झाला. आईन्स्टाईनसारख्यांनी ऐन पौगंडावस्थेत धर्माचा त्याग केला. श्रद्धेच्या कचाट्यातून विचार मुक्त करण्याचे प्रयत्न असे गेली काही शतके सातत्याने तिकडे सुरू राहिले. ते धर्म पूर्णपणे नाकारत नसले तरी मनाने सेक्युलर होत गेले.
तसेही गेल्या दोन शतकांत हे जग फार बदलले आहे. अरब व मुस्लीम देशांचा अपवाद वगळला तर जगातील सर्व देशांनी धर्मनिरपेक्षता हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारले आहे. भारतासारख्या कर्मठ देशातून अनेक दुष्ट प्रथा हद्दपार झाल्या आहेत. अफ्रिकेतील देशही प्रगतीच्या मार्गावर येऊन युरोपशी स्पर्धा करू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसामाणसांतले अंतर कमी केले व त्याने ईश्वराविषयीचे व धर्मांविषयीचे संशय उभे करून त्याला इतिहासजमा करण्याचे काम चालवले आहे. आदिवासींच्या व मागासलेल्या समाजाच्या त्यांच्या जुन्या श्रद्धा अजून राहिल्या असल्या तरी एके काळी सारा समाजच त्या श्रद्धांच्या आहारी होता. ते चित्र आता राहिले नाही.