चिनी मशिदींवर चिनी राष्ट्रध्वज कसे आले?

सारंग दर्शने

(सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग) 

चीनमध्ये साधारणपणे दोन कोटी दहा लाख मुस्लिम असावेत, असा अंदाज आहे. भारताच्या तुलनेत त्यांच्या एकूण लोकसंख्येतील हे प्रमाण फारच नगण्य म्हणजे दोन टक्केही नाही. चीन हा काही लोकशाही देश नाही आणि चीनचा राष्ट्रवादही कमालीचा आक्रमक आहे. त्याची झळ भारताला वारंवार लागली आहे. आजही बसते आहे. पण इतरांना आक्रमक किंवा विस्तारवादी वाटणारा चिनी राष्ट्रवाद हा चिनी राज्यकर्त्यांना आवश्यक व अटळ वाटत असावा, हे उघड आहे. अशा राष्ट्रवादाची मांडणी करताना ते जगातील कुणाचीही-अगदी पाकिस्तानसारख्या आश्रित मित्राचीही- पर्वा करीत नाहीत. दोन दिवसांपूर्वी ‘इस्लामिक असोसिएनशन ऑफ चायना’ या केंद्रीय संस्थेने नवा सल्लावजा फतवा काढला आहे. ही संस्था चिनी सांस्कृतिक क्रांतीनंतर १९५२ मध्ये स्थापन झालेली आहे. ती चीनमधल्या सगळ्या मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करीत असली तरी ती प्रामुख्याने चिनी राज्यकर्त्यांची मर्जी सांभाळते आणि ‘पॅन इस्लाम’पेक्षा चिनी इस्लामची अधिक काळजी घेते..

या संस्थेने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, चीनमधील प्रत्येक मशिदीवर यापुढे २४ तास चिनी राष्ट्रध्वज फडकला पाहिजे. चीनमधील बहुतेक मुस्लिम वस्ती ही वायव्य चीनमध्ये वसली आहे आणि देशातील एकूण ३५ हजार मशिदींपैकी अपवाद वगळता याच भागात वसलेल्या आहेत. तसा चीनमधील इस्लामचा इतिहास जवळपास भारताशी समांतर जातो. तेथेही इस्लामचा प्रवेश होऊन चौदाशे वर्षे झाली. म्हणजे, स्थापन झाल्यावर लगेचच तो तेथे पोहोचला असणार. चिनी लोकक्रांती झाल्यापासून सर्व चिनी राज्यकर्त्यांनी फुटीर इस्लामी शक्तींना अक्षरश: राक्षसी ताकद लावून चिरडून टाकले आहे. तेव्हापासून, कित्येक लाख चिनी मुस्लिम नागरिक कायमचे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी जगभरचे मानवतावादी कार्यकर्ते दबल्या आवाजात करीत असतात.

गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये चीनची आर्थिक ताकद वाढल्यापासून चीनने अत्यंत प्राचीन असा अरब-चीन अनुबंधही इतिहासातून, वास्तुशिल्पांमधून, चालीरीतींमधून इतकेच काय तर भाषिक चिह्नांमधूनही पुसून टाकण्यास सुरूवात केली आहे. उदाहरणेच द्यायची तर चीनमधील ‘हलाल’ दुकानांवर आता अरबी चिह्ने कोरता येत नाहीत. तेथे फक्त चिनी चित्रलिपीतच लिहिता येते. दुसरे असे की, चीनमध्ये नव्या मशिदी बांधताना किंवा रस्तारुंदी अथवा तत्सम कामांसाठी सरकारने पाडून टाकलेल्या मशिदी नव्याने उभारताना कलशाकृती घुमट शक्यतो बांधूच दिला जात नाही. हे काम अतिशय कुशलतेने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परवाना विभाग पार पाडतो. आज वायव्य चीनमधील मशिदी वेगाने मध्ययुगीन चिनी म्हणजेच लाकडी, आयताकृती आकाराला प्राधान्य देणाऱ्या डिझाईनमधून साकारत आहेत. शेकडो तशा झाल्याही आहेत.

या साऱ्या वाटचालीतला पुढचा टप्पा म्हणजे परवा निघालेला राष्ट्रध्वजाचा सल्लावजा हुकूमवजा फतवा! इस्लामिक असोसिएनशने हा सल्ला देताना एक पत्रच लिहिले आहे. त्यात चिनी राष्ट्रवादाचे भक्कम डोस या मशिदींच्या प्रशासकांना आणि एकूण मुस्लिम समाजालाही पाजण्यात आले आहेत. ‘असा राष्ट्रध्वज मशिदींवर लावणे म्हणजे राष्ट्रीय अस्मिता आणि मूलभूत साम्यवादी तत्त्वांशी बांधिलकी राखणे होय, असे या निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच चीन सरकारने ‘धर्म’ या विषयावरच एक श्वेतपत्रिका प्रकाशित केली होती. तीतही ‘कुणी कोणत्याही धर्माचे पालन केले तरी चीनची ‘साम्यवादी समाजरचना आणि मूल्यव्यवस्था’ सर्वोपरी आहे, असे बजावण्यात आले होते. यातील ‘बिटविन आणि बिहाइंड द लाइन्स’ सहज समजण्यासारखे आहे. विशेषत: हा राष्ट्रध्वजाचा निर्णय घेताना चीन सरकारने सध्या ‘रमझान’चा पवित्र महिना चालू आहे, हे मुद्दाम लक्षात ठेवलेले दिसते! मुस्लिम चिनी नागरिकांनी आपला धर्म आणि साम्यवादी विचारधारा यांची योग्य ती सांगड घालावी आणि आपल्या धर्मश्रद्धांमध्ये ‘राष्ट्रीय तत्त्वविचार’ सामावून घ्यावेत, असेही स्पष्टच बजावण्यात आले आहे.

ही श्वेतपत्रिका तसे म्हटले तर चीन सरकारने मान्यता दिलेल्या बौद्ध, ताओ, कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि इस्लाम या पाच धर्मांसाठी आहे. (हिंदू धर्माला चीनमध्ये अधिकृत मान्यता नाही.) यातल्या कॅथलिक व प्रोटेस्टंटांचा चीनने याआधीच पुरेसा बंदोबस्त केला आहे. बौद्ध धर्माचे खरे व एकमेव वारसदार आम्हीच आहोत, हे जगाच्या गळी उतरवण्यासाठी चीनने गेली काही वर्षे तुफान आक्रमक व्यूहरचना केली आहे. ताओ तर त्यांचाच आहे. मग उरला इस्लाम. आता त्याचा बंदोबस्त करण्याचे चीनने मनावर घेतलेले दिसते!

आंतरराष्ट्रीय संबंध आणि देशांतर्गत कारभार हे दोन्ही वेगळे ठेवून चीन जितका खंबीर व आक्रमक वागतो, तसे तर पूर्वीच्या सोविएत युनियन किंवा आजच्या अमेरिकेलाही कधी जमलेले नाही. ख्रिस्ती किंवा इस्लामी समाजांची जी काही कथित जागतिक ताकद आहे, त्याची गुंजभरही पत्रास चीनने कधी ठेवलेली नाही. आत्ताही तेच दिसते आहे.

चीनचे हे वागणे योग्य आहे की अयोग्य याचे स्वतंत्र परीक्षण अर्थातच होऊ शकते.

पण सकाळी उठल्यानंतर मार्क्स, लेनिन व माओ यांच्या नावाने आचमने सोडून स्नानसंध्या करणारे या चिनी राष्ट्रवादाचा अर्थ कसा लावतात हे एक कुतूहल तर अस्सल भारतीय सेक्युलर परंपरांचे झापडे लावून नुकसान करणारे स्यूडो या राष्ट्रवादाकडे कसे पाहतात, हे दुसरे कुतूहल!

चीन हे आदर्श राष्ट्र मुळीच नाही. पण ‘शत्रू’चेही काही गुण घेण्यासारखे असतात!!

(लेखक दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये कार्यरत आहेत)

(सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग) 

9821504025

Previous articleझारखंडचा ‘मादी’बाजार
Next articleविचारांनी जीवन लखलखीत झाले
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.