जगातील सर्वांत श्रीमंत पुस्तकविक्या

(साभार: साप्ताहिक साधना)

-विनायक पाचलग

जेफ बेझोस याचा एकूणच प्रवास हा ‘संकटातून संधीकडे’ असा राहिला आहे. कारण 2002 चे डॉट.कॉम संकट, 2008 ची जागतिक मंदी आणि आताचे 2020 मधील कोरोनाचे संकट- हे तीनही त्याच्या नेतृत्वाखाली ॲमेझॉनने यशस्वीपणे परतवून लावले आहे. अशा संकटातदेखील ही कंपनी टॉपला आहे. ॲमेझॉन वेबसर्व्हर, किंडल आणि ॲलेक्सा व्हॉइस असिस्टंट अशा गोष्टी या त्यांनी निर्माण केलेल्या उत्तम तंत्रज्ञानाची प्रतीके आहेत. ह्या सर्व तांत्रिक गोष्टी या जागतिक दर्जाच्या असल्या, तरी ॲपल किंवा फेसबुकसारख्या थेट आणि वारंवार कस्टमरला कमी विकल्या जात असल्याने ॲमेझॉनचा उत्तम टेक्नॉलॉजीची कंपनी म्हणून पुरेसा बोलबाला झालेला नाही. बेझोस हा सोशल मीडियावर फारसा ॲक्टिव्ह नसतो. टि्वटरवर तो काही बोललाच, तर त्या फक्त कंपनीच्या अपडेट्‌स असतात. त्यामुळे त्याची विधाने कधी हेडलाईन बनत नाहीत किंवा त्याच्या कोट्‌सचे इन्सिपिरेशनल व्हाट्‌सॲप स्टेटसही दिसत नाहीत.

…………………………………………..

‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच या कंपनीचे सीईओपद सोडले व एका अर्थाने निवृत्ती घेतली.  ‘ॲमेझॉन’च्या  स्थापनेपासून जवळपास 27 वर्षे बेझोस हा या कंपनीचा नेतृत्व करत होता; मात्र जेवढी क्रेझ टेस्लाच्या इलॉन मस्कची, मार्क झुकेरबर्गची अथवा स्टीव्ह जॉब्जची आहे तेवढी जेफ बेझोस यांची नाही. नेटफ्लिक्स किंवा त्यांच्या स्वतःच्याच ॲमेझॉन प्राइमवर त्यांच्यावर आधारित कोणते सिनेमे नाहीत, फारशा डॉक्युमेंट्रीज नाहीत. इतकेच काय, तर  नुकतेच आलेले ‘ॲमेझॉन अनबाऊंड’ हे पुस्तक सोडल्यास बेझोसच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी  पुस्तकेदेखील नाहीत. त्याला फार कोणी नवउद्यमी आपला आयडॉल मनात असतील, असे वाटत नाही आणि तोसुद्धा मिळेल त्या ठिकाणी जाऊन भाषणे ठोकत आहे, असेही दिसत नाही. असे जरी असले तरी ॲमेझॉन ही आज जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिचे आजचे बाजारमूल्य एक ट्रिलियन डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 74 लाख कोटी रुपये इतके आहे, तर बेझोस हा जगातील सर्वांत श्रीमंत माणूस आहे.

‘बेझोसबद्दल आपल्याला एवढी कमी माहिती का?’ याचे कारण कदाचित तो खराखुरा व्यावसायिक असण्यामध्ये दडलेले असावे असे वाटते. ‘बिल्ड टू लास्ट’ या व्यवसाय-जगतातील प्रख्यात पुस्तकात लिहिल्याप्रमाणे- व्यक्तीपेक्षा कंपनी मोठी झाली पाहिजे, कारण कंपनी कित्येक पिढ्या राहते तर व्यक्ती एकाच पिढीसाठी असते. त्यांचा मालक, नेता हा विश्वस्ताच्या भूमिकेतून कंपनी चालवत राहतो व पक्क्या व्यावसायिकाप्रमाणे अत्यंत श्रूड पद्धतीने व्यवसाय करून जास्तीत जास्त संपत्ती निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. याच कारणामुळे कदाचित आपल्याला बेझोसबद्दल माहिती नाही आहे. पण ऑनलाईन पुस्तक विक्री करण्यापासून सुरुवात करून जेव्हा एखादी कंपनी एवढी बलाढ्य होते की अमेरिकेन सरकारला ती कदाचित आपल्याहून मोठी झाली आहे की काय, असे वाटते; तेव्हा तिच्याबद्दल समजून घ्यायलाच हवे.

5 जुलै 1994 रोजी सिएटल या अमेरिकेतील एका शहरात छोट्या गॅरेजमध्ये ॲमेझॉन या कंपनीची सुरुवात झाली. पेशाने इंजिनिअर असणारा व त्याआधी वॉल स्ट्रीटवर काम करत असणारा जेफ बेझोस त्या वेळी अवघा तिशीचा होता. ॲमेझॉनचे काम काय, तर ऑनलाईन पुस्तके विकायची. तत्कालीन अमेरिकेत एकूण चलनात असलेल्या पुस्तकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्के पुस्तके दुकानात उपलब्ध असायची. सर्वांना सर्व पुस्तके एकाच छताखाली मिळण्याची सोय नव्हती. तेव्हा प्रत्येकाला त्याच्या मागणीनुसार पुस्तके घरीच मिळाली, तर ते ग्राहकांच्या सोईचे ठरेल व त्यातून उत्तम व्यवसायसंधी निर्माण होईल, या संकल्पनेतून ॲमेझॉनचा जन्म झाला. पहिली काही वर्षे फक्त पुस्तके विकल्यानंतर ते सीडी विकायला लागले आणि मग एक-एक गोष्ट वाढवत त्यांचा हा प्रवास आज ‘आमच्याकडे सर्व काही मिळते’, इथपर्यंत येऊन पोहोचलाय. ॲमेझॉनच्या लोगोमधील ‘ए टू झेड’ला जोडणारा बाण हा त्यांच्या ‘द एव्हरीथिंग स्टोअर’ या प्रतिमेला साजेसा आहे. आज जगातील एकूण ऑनलाईन विक्रीपैकी सर्वांत जास्त विक्री ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवरून होते. सध्या एकट्या अमेरिकेत ऑनलाईन विक्रीपैकी 50 टक्क्यांहून अधिक विक्री केवळ ॲमेझॉनवरून होते.

नक्की पहाAmazon Empire: The Rise and Reign of Jeff Bezos

ॲमेझॉनच्या यशामागे वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या हे जरी खरे असले तरी  या यशाचे गमक शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन-तीन गोष्टी आपल्याला दिसतात.  पहिली म्हणजे- ‘कस्टमर फर्स्ट पॉलिसी’. याचा अर्थ- आपल्या ग्राहकाला सर्वोच्च सेवा कायमच मिळाली पाहिजे, हा अट्टहास. जगभरातील कोणत्याही देशात ग्राहकांना योग्य दरात वस्तू उपलब्ध करून देणे आणि ग्राहकापर्यंत तत्परतेने पोहोचणे हे ॲमेझॉनचे वेगळेपण. जी गोष्ट 15 मिनिटात शेजारच्या दुकानात मिळू शकते, ती ऑनलाईन मागवायची आणि त्यासाठी दोन-चार दिवस थांबायचे- हे जरा विचित्रच. पण गेली कित्येक वर्षे मोठा वर्ग या गोष्टीला सरावलाय आणि इतकेच काय तर वेळेवर डिलिव्हरी यावी म्हणून वर्षाला 1000 रुपये अधिकचे भरतोय.  ग्राहकाचे समाधान या गोष्टीला कायमच प्राधान्य दिल्यामुळे लोकांच्या वागण्यात हा बदल झाला आहे, यात काही शंका नाही. बेझोस आपल्या मुलाखतीत कायम असे म्हणतो की- ग्राहकांचा विश्वास संपादन करणे व तो टिकवणे, ही त्याच्या दृष्टीने टॉप प्रायॉरिटी आहे आणि त्याची सगळी टीम त्याच दिशेने काम करते. हा विश्वास आता इतका तयार झाला आहे की, ॲमेझॉन हे फक्त खरेदी-विक्रीचे ऑनलाईन दुकान न राहता एक रेप्युटेशन मॅनेजमेंट इंजिन झाले आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू घ्यायची का नाही किंवा ती वस्तू बनवणारे दोन निर्माते असल्यास त्यातील कोणाचे प्रॉडक्ट घ्यावे, हे सगळे निर्णय ॲमेझॉनवरील रिव्ह्यू वाचून करू लागलो आहेत. ॲमेझॉनवरील ग्राहकांची एक स्वतःची कम्युनिटी तयार झाली आहे आणि ह्या ‘डेडिकेटेड फॅन बेस’नेच ॲमेझॉनला आजवर तारले आहे. याबद्दल एक किस्सा सांगितलं जातो की, 2000 मध्ये त्या वेळच्या अमेरिकेतील सर्वांत मोठ्या पुस्तकांच्या दुकानाच्या चेननेसुद्धा स्वतःचे ऑनलाईन पुस्तकविक्रीचे दुकान चालू केले. ही चेन ॲमेझॉनच्या वीसपट मोठी होती. परिणामी, ॲमेझॉन आता बुडणार, असे प्रत्येकाला वाटत होते. एका वृत्तपत्राने तर त्या अर्थाची हेडलाईनसुद्धा छापली होती. पण  त्या वेळी जेफ बोझेस असे म्हणाला  होता की- आम्हाला तयार होणाऱ्या स्पर्धकांची चिंता नाही, तर ग्राहकांची चिंता आहे. जोपर्यंत आपले ग्राहक आपल्या कामावर खूश आहेत तोपर्यंत आपली स्पर्धा किती मोठी आहे, याची चिंता करण्याची गरज नाही. आज ती मोठी चेन बंद पडली आहे, तर ॲमेझॉन यशोशिखरावर आहे. ‘ग्राहक हाच देव’ याचं हे चपखल उदाहरण आहे.

ग्राहकाला खूश ठेवण्यासाठी ॲमेझॉनने वेळोवेळी तांत्रिक इनोव्हेशनसुद्धा केली. जागतिक वाचकविश्वाला ॲमेझॉनने दिलेली देणगी म्हणजे ‘किंडल’. पुस्तकाचा अनुभव डिजिटलमध्ये यावा आणि वाचकाच्या दृष्टीने सोईचे व्हावे, जेणेकरून कोठेही कितीही पुस्तके सोबत घेऊन फिरता येईल; यासाठीचे इनोव्हेशन म्हणजे ॲमेझॉन किंडल. आज जगभरातील जवळपास सर्वच पुस्तके किंडल स्वरूपात उपलब्ध आहेत. भारतातदेखील भारतीय पुस्तके किंडल स्वरूपात आहेत. (आता साधना प्रकाशनाची पुस्तकेही किंडल स्वरूपात उपलब्ध आहेत.) लोकांसाठी वाचनाचा हा नवा अनुभव आहे, तरी तो आता रुळला आहे. स्टॅटिस्टिकाच्या माहितीनुसार, आजवर अंदाजे 9 कोटी किंडल विकले गेले आहेत. लोकांच्या सवयी बदलवणाऱ्या संकल्पनेत मोठी गुंतवणूक करणं आणि अशा अफलातून गोष्टी जगाला देणे- हे ॲमेझॉनचे वेगळेपण.

त्यांच्या यशाचे दुसरे गमक बेझोसच्या व्यक्तिमत्त्वात जाणवते. ते म्हणजे, संकटाला संधी मानणं.  कदाचित तुम्ही आजपर्यंत एकही वस्तू ॲमेझॉनवरून मागवली नसेल  आणि त्या अर्थाने तुम्ही ॲमेझॉनचे ग्राहक नसाल, पण तरीसुद्धा तुम्ही ॲमेझॉनचे अप्रत्यक्ष ग्राहक आहात. याचे कारण म्हणजे, ॲमेझॉन वेबसर्व्हर. तुम्ही ज्या वेळी कोणतीही एखादी वेबसाईट किंवा अगदी ॲप उघडता, त्या वेळी त्यात येणारी माहिती ही इंटरनेटद्वारे कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून तुमच्यापर्यंत पोहोचत असते. ही अशी माहिती जिथे स्टोअर केली जाते, त्यांना ‘सर्व्हर’ म्हणतात. या सर्व्हरवरून ही माहिती तुमच्या-माझ्या मोबाईलवर पोहोचते. कोणतीही वेबसाईट किंवा ॲपचा सर्वांत मोठा खर्च हा असे सर्व्हर वापरणे व त्यावर माहिती साठवणे यात होत असतो. आणि या सर्व्हर क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे ती म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस. आज जगभरातील साईट्‌सपैकी सर्वाधिक साईट्‌स या ॲमेझॉनच्या सर्व्हर्सवर आहेत. या क्षेत्रातील जवळपास 32 टक्के मार्केट हे एकट्या ॲमेझॉनच्या कंपनीने व्यापलेले आहे. सो… जर का तुम्ही एखादी वेबसाईट- विशेषतः न्यूज पोर्टल- उघडून पाहत असाल, तर नकळत तुम्ही ॲमेझॉनचीच सर्व्हिस वापरत आहात.

या अमेझॉन वेब सर्व्हिसचा उगमदेखील गमतीशीर आहे. सन 2000 ते 2002 दरम्यान  डॉट.कॉम बूमचा फुगा फुटला आणि बऱ्याचशा वेबसाईट बंद पडल्या. त्या वेळी ॲमेझॉन पण बंद पडणार, असे वाटत होते. ही कंपनी टिकवायची असेल तर खर्चात कपात करणे आवश्यक होते. आणि, कोणत्याही ऑनलाईन कंपनीप्रमाणे ॲमेझॉनचा सर्वांत मोठा खर्च हा सर्व्हर विकत घेणे हाच होता. जितके ग्राहक जास्त तितका सर्व्हर मोठा. त्यामुळे ॲमेझॉन मोठ-मोठ्या कंपन्यांचा सर्व्हर घेण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करत होती. अशा वेळी डॉट कॉम क्रॅशनंतर टिकायचे असेल, तर सर्व्हरची साईज कमी करून (आणि त्याचा खर्च कमी करून) कंपनी चालवावी लागणार होती. पण ॲमेझॉनच्या कस्टमर  फर्स्ट  पॉलिसीनुसार हे करणे शक्य होणार नव्हते. त्यातही एक वेगळा पॅटर्न असा होता की, नाताळ आणि डिसेंबर महिन्यात अमेरिकेत मोठी ऑनलाईन खरेदी होत असते. म्हणजे, इतर वेळेला होणाऱ्या खरेदीच्या 10 पट खरेदी ह्या एकाच महिन्यात होते आणि तेवढी मोठी खरेदी होऊ शकेल, अशी क्षमता असणारे सर्व्हर घ्यावे लागतात. असे जर का नाही केले तर साईट क्रॅश होणे, उत्तम सेवा न देता येणे असे प्रकार घडतात. मात्र इतर अकरा महिने या सर्व्हरची बरीचशी क्षमता वापरली जात नाही, मात्र त्याचे पैसे भरावे लागतात. याला उत्तर म्हणून ॲमेझॉनने स्वतःची सर्व्हर फर्म उभा केली त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली. फक्त डिसेंबरमध्ये सर्व्हर पूर्ण क्षमतेने वापरात येत असल्याने इतर वेळी तो वापरात नसल्याने तेव्हा तो सर्व्हर भाड्याने द्यावा, असा विचार आला; जेणेकरून त्यातून पैसे मिळतील. असे भाड्याने देण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान त्यांनी स्वतः उभे केले आणि ॲमेझॉन वेब्‌  सर्व्हिसेस या कंपनीचा जन्म झाला.

आज आर्टिफिशल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग हे जे नवे तंत्रज्ञान आले आहे, त्याचा बेस हा  महाप्रचंड  डेटा साठवणे हा आहे. आणि हे डेटा साठवण्याचे सर्व्हर कमीत कमी किमतीत उपल्बध होऊ शकले,  फक्त ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस  या कंपनीमुळे.  त्यामुळे अप्रत्यक्षपणे ॲमेझॉनने स्वत:ला वाचवताना जगातील एका मोठ्या टेक्निकल रेव्होल्युशनला मदत केली. एखाद्या संकटाचे संधीत कसे रूपांतर करावे याचा याहून उत्तम नमुना काय असू शकतो?

खरे तर जेफ बेझोस याचा एकूणच प्रवास हा ‘संकटातून संधीकडे’ असा राहिला आहे. कारण 2002 चे  डॉट.कॉम संकट, 2008 ची जागतिक मंदी आणि आताचे 2020 मधील कोरोनाचे संकट- हे तीनही त्याच्या नेतृत्वाखाली ॲमेझॉनने यशस्वीपणे परतवून लावले आहे. आज अशा संकटातदेखील ही कंपनी टॉपला आहे. याचा अर्थ, त्यांनी उत्तम व्यवसाय केला आहे. ॲमेझॉन वेबसर्व्हर, किंडल आणि ॲलेक्सा व्हॉइस असिस्टंट- अशा गोष्टी या त्यांनी निर्माण केलेल्या उत्तम तंत्रज्ञानाची प्रतीके आहेत. ह्या सर्व तांत्रिक गोष्टी या जागतिक दर्जाच्या असल्या, तरी त्या ॲपल किंवा फेसबुकसारख्या थेट आणि वारंवार कस्टमरला कमी विकल्या जात असल्याने ॲमेझॉनचा उत्तम टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून पुरेसा बोलबाला झालेला नाही.

बेझोस हा सोशल मीडियावर फारसा ॲक्टिव्ह नसतो. टि्वटरवर तो काही बोललाच तर त्या फक्त कंपनीच्या अपडेट्‌स असतात. त्यामुळे त्याची विधाने कधी हेडलाईन बनत नाहीत किंवा त्याच्या कोट्‌सचे इन्सिपिरेशनल व्हाट्‌सॲप स्टेटसही दिसत नाहीत. यातला विरोधाभास असा की ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ हे अमेरिकेतील प्रख्यात वृत्तपत्र बेझोसच्या मालकीचे आहे. तोट्यात गेलेले वॉशिंग्टन पोस्ट त्याने गेल्या सात वर्षांत नफ्यात आणून दाखवले आहे- इतकेच काय, तर तिथे एकापेक्षा एक मीडिया इनोव्हेशन केलेली आहेत. स्वत:च्या मालकीचा माध्यमसमूह असूनही त्याने म्हणावा तसा स्वत:चा पीआर मात्र केलेला नाही. त्यामुळेच कदाचित जेफ बेझोस हा अजूनही माणसातला वाटतो. त्याने स्वतःला देव होऊ दिलेलं नाही. त्याची चूक झालेली असेल, तर तो स्वतःहून मान्य करतो. होणारी टीका तो स्वीकारतो. तो खराखुरा व्यवसायिक आहे, हे वारंवार दिसून येते. अमेरिका सरकार व त्याच्यात कित्येक वाद झाले आहेत. ॲमेझॉनने त्याच्या कामगारांना अधिक पगार दिला पाहिजे, अशीही मागणी झाली. ट्रम्पला ॲमेझॉन आवडत नसे, असे म्हणतात. पण या सगळ्याला तो पक्क्या (कदाचित मुरब्बी) व्यावसायिकांसारखे तोंड देतो. त्याचसोबत वेगवेगळ्या इतर व्यवसायांत गुंतवणूक करतो. त्यालासुद्धा अंतराळात जायची इच्छा आहे. नुकताच त्याचा डायव्होर्स झाला आहे. एक माणूस म्हणून तो त्याच्या भल्या-बुऱ्या गुणांसह जगत आहे, एवढे नक्की.

ॲमेझॉन या कंपनीचा भारतावर झालेला परिमाणदेखील मोठा आहे. भारतात फ्लिपकार्ट ही कंपनी सचिन बन्सल व बिनी बन्सल या द्वयीने चालू केली. हे दोघेही आधी ॲमेझॉनमध्येच कामाला होते. तिथेच त्यांनी हा व्यवसाय समजून घेतला आणि भारतात येऊन हा व्यवसाय सुरू केला. परिणामी, दुकानात जाऊन खरेदी करणेच आता काही लोकांकडून बंद होऊ लागले. फ्लिपकार्टने ॲमेझॉनचे मॉडेल वापरताना त्यात कॅश ऑन डिलिव्हरीसारखे बदल करून त्याला  भारतीय टच दिला. एकूणच, यातून ग्राहकांचा फायदा झाला.

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांचा भारतातील पाया मजबूत होऊन नवी बाजारपेठ हळूहळू आकार घेऊ लागली. उत्पादकाकडून थेट ग्राहकाला माल मिळू लागल्याने ग्राहकाला तो कमी किमतीत मिळू लागला व त्याने त्याचा आर्थिक फायदा होऊ लागला. आज भारतात ई-कॉमर्स इतके स्थिरावले आहे की, त्याच्यावर कायदा येऊ घातला आहे. ज्याप्रमाणे ॲमेझॉनमधून फ्लिपकार्ट जन्मले, तसे फ्लिपकार्टमधून आता 10 एक इतर कंपन्या  जन्मल्या आहेत व त्याही आता मोठ्या झाल्या आहेत. शिवाय आजकालच्या स्टार्टअपच्या जगात कंपन्या काढून फक्त विकायच्या नसतात, तर कित्येक दशके ती कंपनी चालवता येते आणि त्यातून संपत्ती निर्माण करता येते, हा पायंडासुद्धा ॲमेझॉनने घालून दिलेला आहे. त्यामुळे ॲमेझॉनच्या पावलावर पाऊल टाकून कित्येक वर्षे टिकतील अशा कंपन्या भारतात तयार होतील, हे नक्की.

मध्यंतरी एक जोक सोशल मीडियावर फिरत होता. तुम्हाला जर का श्रीमंत व्हायचे असेल, तर पुस्तकाला पर्याय नाही. जेफ बेझोस पुस्तक विकून मोठा झाला, तर वॉरन बफे पुस्तके वाचून. पुस्तकांच्यात जादू असते, हे समजायला पुस्तकविक्याची ही गोष्ट पुरेशी आहे; नाही का?

नक्की पहा- How Amazon’s Jeff Bezos Changed The World