जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा -‘कास्ट अवे’!

– सानिया भालेराव

काही चित्रपट असे असतात कि त्यांची स्टोरी सांगायची झाली तर अगदीच दोन ओळींमध्येही सांगता येते पण आपल्याला जे त्या चित्रपटातून गवसतं ना जर ते सांगायचं झालं तर त्यातून PhD चा एक थिसीस सहज पूर्ण होऊ शकतो. जे आपल्यापर्यंत पोहोचतं , जे आपण अनुभवतो आणि चित्रपट पाहिल्यानंतरही कित्येक वर्ष ते आपण बरोबर घेऊन जगतो. असा चित्रपट जो आयुष्यभर पुरतो … फार क्वचित बनतात असे चित्रपट … त्यातलाच हा एक ” कास्ट अवे “!

टॉम हँक्स हा माझ्या अत्यंत आवडता अभिनेता . यू हॅव गॉट मेल, टर्मिनल, सेविंग प्रायव्हेट रायन, डॅन ब्राऊन ची सिरीज असे त्याचे कित्येक बेहेतरीन चित्रपट आहेत. माझ्या अत्यंत आवडते म्हणजे कास्ट अवे आणि फॉरेस्ट गम्प . ह्यातला आज लिहिण्यासाठी कुठला चित्रपट निवडावा ह्याबद्दल कन्फ्युज्ड होते . पण जे वर लिहिलंय त्याला सार्थ ठरतो तो म्हणजे कास्ट अवे. माझा मित्र वैभव ह्याची मी कायम ऋणी राहीन कारण त्याच्यामुळे टॉम हँक्स च्या चित्रपटांच्या ह्या जादुई दुनियेत मला प्रवेश करता आला .

कास्ट अवे ची गोष्ट एकदम छोटी आहे . चक् ( “च” चा उच्चार चाय मधल्या “चं” सारखा करावा ) नोलँड नावाचा एक फेडेक्स मध्ये काम करणारा इंजिनियर कामानिमित्त मलेशिया ला जात असताना त्याचं प्लेन पॅसिफिक समुद्राजवळ क्रॅश होतं आणि तो एका निर्मनुष्य आयलंड वर येऊन पोहोचतो . तिथून आपल्या घरी पोहोचण्याचा त्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट! काही कुरिअर ची खोकी हाच त्याचा ठेवा . त्यात सापडलेले स्केट्स शूज , एक फुटबॉल आणि एक नेट चा ड्रेस ह्या काय त्या वस्तू . मग पुढची चार ते पाच वर्ष तो ह्या बेटावर राहण्यासाठी कसा adapt होतो , तिथून बाहेर पडण्यासाठी कशी धडपड करतो आणि मनुष्यांच्या मध्ये आपल्या घरी परतल्यानंतर त्याला काय अनुभव होतो ह्याचीही गोष्ट .

संपूर्ण चित्रपटात एका एक्स्ट्रा ऑर्डीनरी सिचुएशन मध्ये हा हिरो फसला असताना देखील आपण त्याच्या बरोबर प्रत्येक क्षण जगतो आणि इथेच हा चित्रपट बाजी मारतो . पहिल्या काही दिवसात नवीन परिस्थितीशी जुळवू बघणाऱ्या चक् चे होणारे हाल बघून आपण जर अश्या परिस्थिती अडकलो असतो तर आपलीही हीच अवस्था झाली असती असं वाटल्याखेरीच रहावत नाही . त्याचे मासे पकडण्याचे फोल प्रयत्न, चालताना ठिकठिकाणी झालेल्या जखमा त्यावर जे सापडेल त्याने केलेला उपाय आणि अगदी प्यायचं पाणी ते एखादा छोटासा आडोसा तयार करण्यासाठी , मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड हे सगळं सगळं आपणही त्याच्याबरोबर अनुभवतो . चित्रपटात लक्षात राहण्यासारखे अनेक प्रसंग आहेत . त्यातला एक म्हणजे जेंव्हा त्याच्या लक्षात येतं कि खेकडे , छोटे मासे जर खायचे असतील तर ते शिजवायला आपल्याला आग लागेल आणि मग त्याची आग निर्माण करायची खटपट सुरु होते . दहा ते बारा तास सतत प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नाही उलट त्याच्या हाताला खूप मोठी जखम होते. रागाच्या भरात तो जवळ असलेला फुटबॉलला फेकून देतो. ह्या सगळ्या मध्ये त्या फुटबॉलवर त्याच्या रक्त लागलेल्या हाताचा ठसा उमटतो आणि मग त्याच्यावर तो डोळे , तोंड काढून त्याचं नाव विलसन ठेवतो . हा विलसन जणू कोणी माणूस आहे असं समजनू तो त्याच्याशी संवाद साधायला लागतो . हा विलसन आणि त्याच्या गर्लफ्रेंडची केली चा फोटो ह्या दोन गोष्टी त्याला जिवंत ठेवतात .
मग चार वर्ष सरलेली दाखवली आहेत आणि एका फटक्यात माशाला पकडणारा दाढी केस वाढ्लेलाला आणि संपूर्ण शरीयष्टीच बदलेला चक् बघून आपल्याला नवल वाटतं . चक् ने आपली एक छोटोशी दुनिया बनवली आहे . त्याच्या गुहेत त्याने महिने कळावे ह्यासाठी एक सन डायल बनवलं आहे , त्याची गर्लफ्रेंड केलीचा फोटो टांगला आहे , विलसन देखील आहेच सोबतीला पण आता आपल्याला वापस जाता येईल हि आशा त्याने सोडून दिली आहे . आणि अशाच मानसिकतेत तो असताना एक दिवस पोर्टेबल टॉयलेटचा काही भाग किनाऱ्यावर वाहून येतो आणि मग जर ह्याची एक छोटीशी बोट बनवू शकलो तर आपल्याला घरी जाता येईल अशी आशा त्याच्या मनात जागी होते.

पावसाळा सुरु व्हायला थोडाच काळ असल्याने विलसन बरोबर तो एक छोटी बोट करतो आणि अतिशय निकराने तो हा प्रवास करतो . त्या बेटापासून दूर जाताना आलेलं रडू , पहिल्या लाटेवर जेंव्हा बोट स्वार होते तेंव्हा झालेला आनंद , अचानक पाऊस लागल्यामुळे प्रवासाच्या मध्यावर त्याची बोट तुटते तरीही जिद्दीने तसाच पुढे जाणारा चक् केवळ कमाल वाटतो . एका प्रसंगामध्ये त्याची आणि विल्सनची ताटातूट होते . विलसन वाहून जातो पण जर तो त्याच्यामागे गेला तर बोट हातची जाणार असते म्हणून तो विल्सनला वाचवू शकत नाही आणि अगदी हमसून हमसून तो रडतो, मला माफ कर असं ओरडत राहतो . आपल्याही डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही . सरतेशेवटी एका मोठ्या जहाजामुळे त्याला वाचवण्यात येतं आणि तो आपल्या घरी परत येतो .

इकडे सगळे तो ह्या जगात नाहीये असं मानून आपलं आपलं आयुष्य जगत आहेत . केली ने लग्न केलं आहे , तिला मुलगी आहे . एका झटक्यात पेटणारं लायटर , तऱ्हे तऱ्हेचे अन्नप्रकार , सोई सुविधा अश्या कित्येक गोष्टींकडे बघणारा चक … त्याची नजर आपल्याला अस्वस्थ करते . केलीचं अजूनही त्याच्यावर प्रेम असतं पण नवऱ्याला , मुलीला सोडून ती त्याच्याकडे येऊ इच्छित नसते . हे सर्व तो समजून घेतो . आपण परत येऊन काय मिळवलं असा विचार करतो . त्या बेटावर घालवलेल्या पाच वर्षाच्या काळात त्याने एक पार्सल जपून ठेवलेलं असतं . ते त्या पत्त्यावर तो द्यायला जातो . ते घर बंद असतं म्हणून एक चिठ्ठी लिहितो कि ह्या पार्सलने माझा जीव वाचवला आणि परतीच्या वाटेवर एका चौकात येऊन थांबतो . एक बाई वाहन थांबवून त्याला ते चारही रस्ते कोठे जातात ते सांगते आणि ती जाताना त्याला तिच्या गाडीच्या मागे ते चिन्ह दिसतं जे त्या पार्सल वरही असतं आणि मग चौकाच्या मध्यभागी थांबून तो तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बघतो आणि हसतो … इथे चित्रपट संपतो .

ह्या चित्रपटातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्याचा शेवट. डायरेक्टर रॉबर्ट झेमेकीस ने आपल्या सेन्सिबिलिटीवर हा शेवट सोडून दिला आहे . ह्यातून दोन अर्थ मी घेतले . एक म्हणजे इतकं खडतर आयुष्य जगल्यानंतर आता आपला हिरो कोणताही रस्ता निवडू शकतो कारण आनंदी जगण्यासाठी किती कमी गोष्टी लागतात हे त्याने अनुभवलं आहे आणि नव्याने आयुष्य जगायला तो सज्ज आहे. दुसरा कि ज्या दिशेने ती बाई गेली ती दिशा आपला हिरो निवडतो आणि कदाचित तिच्यात त्याला आपला संभाव्य जीवनसाथी दिसतो . आपण आपल्या परीने अर्थ काढायचा आणि जगायचं. कितीही वाचलं तरीही ह्या चित्रपटातल्या असंख्य गोष्टी केवळ अनुभवण्यासारख्या आहेत . शब्दांच्या पलिकडे घेऊन जाणाऱ्या आहेत . आपण कशासाठी जगतो , आपल्या जगण्याचा हेतू काय इथपासून ते चांगलं, प्रसन्न आयुष्य जगण्यासाठी किती (कमी ) गोष्टी लागतात अगदी इथपर्यंतचे मूलभूत प्रश्न आपल्या मनात निर्माण करणारा आणि आपापल्यापरीने त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो . मला तर कायम वाटतं कि हा चित्रपट जणूकाही आत्मशोधच आहे . आपण त्याच्याकडे कुठल्या दृष्टीकोनातून बघतो त्यावर हे अवलंबून आहे . मला तरी असंख्य गोष्टी शिकवून गेला हा चित्रपट . बिकट परिस्थितीत असताना, आयुष्यात एखाद्या वळणावर अचानकपणे थांबवं लागल्यास, स्वतः वरचा आत्मविश्वास कमी झालेला असताना हा चित्रपट बळ देतो. फार फार कमी चित्रपट असतात असे जे आयुष्य समृद्ध करतात , त्यातलाच हा एक . जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा . किनारा दूर असला तरी प्रयत्न करणं सोडू नका , निराशेचे डोंगर जरी समोर उभे ठाकले तरी आशेचा किरण नक्की दिसेल असं सांगणारा आणि जसं आयुष्य आहे , ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यासाठी निर्मिकाचे आभारी राहा …Just keep breathing असं सांगणारा हा चित्रपट एकदा तरी अनुभवावा असाच आहे… Cheers to spirit of life and Cheers to unsinkable soul!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

‘कास्ट अवे’ चित्रपटाची link-  https://www.youtube.com/watch?v=4my8ocwfU44

हे सुद्धा नक्की वाचा ‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी-  http://bit.ly/2UAWW2m

हे सुद्धा नक्की वाचा ९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleराज ठाकरेंच्या छायेत…
Next articleबे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.