जगावेगळा माणूस

अकोल्याचे ‘शैक्षणिक-सांस्कृतिक राजदूत’ : डॉ. गजानन नारे…

 

-उमेश अलोणे

वर्ष २००३ असेल… याच वर्षाच्या सुरूवातीच्या महिन्यातला एक असाच अस्वस्थ दिवस… त्याच्या ‘त्या’ निर्णयानं घरचे सारेच पार हादरून गेलेत. घराच्या ओसरीत बसलेल्या साहेबराव-प्रभाताईंच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. पोराच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे दोघे आई-वडीलही त्यादिवशी त्याच्यावर नाराज होते. एरव्ही प्रत्येकदा शांत असणारे वडील त्या दिवशी काहीशा मोठ्या आवाजातच म्हणालेत, ” हे बघ गजू!, तूझा निर्णय चुकतोय, एव्हढी मोठी नोकरी सोडून आता काय करशील?. निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ नको यायला तुझ्यावर”…. प्रत्येकवेळी गजूच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणारी आईही त्या दिवशी बाबांच्या आवाजात आवाज मिसळत गजूच्या निर्णयाला विरोध करीत होती… आई म्हणाली, “गजू!, मला काळजी वाटते रे तूझी. चांगला शिकलेला आहेस. एखादी नौकरी कर वाटलं तर सरकारी”…

त्यानं आई-बाबांचं सारं बोलणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं. पुढे त्याच्या बोलण्यातील आत्मविश्वासानं आई-बाबांच्या विरोधाचं ‘वादळ’ पार शांत झालं… ‘तो’ आई-बाबांना म्हणाला, “आई-बाबा!, तुमची माझ्याबद्दलची मुलगा म्हणून असणारी काळजी योग्यच आहे. परंतू, तूम्हीच तर मला लहानपणापासून सांगितलं की, यशाच्या मार्गावरचे काटे पाहून आपला मार्ग सोडू नये. माझा शाळा सुरू करण्याचा निर्णय अगदी पक्का आहे. मी याच काटेरी वाटेवर तुम्हाला यशाची सुगंधी फुलं पसरवून दाखविल्याशिवाय राहणार नाही. तुमचा मुलगा म्हणून समाजात तुम्हाला माझा नक्कीच अभिमान वाटेल असं आभाळभर काम करून दाखवेन मी!”…. गजूच्या या आत्मविश्वासानं विरोधाचे ‘काळे ढग’ कुठल्या कुठे पार निघून गेलेत. गजू आणि पत्नी वंदनानं आई-बाबांचं दर्शन घेतलं. अन दोघांचेही हात घट्ट हातात पकडलेत. चौघांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. बराचवेळ आई-वडील, मुलगा-सुन असे चौघेही नि:शब्द होत एकमेकांकडे पहात होते. सुर्याची किरणं आता त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंतून चमकत होती… सुर्य आता बराच वर आला होता. या घरातील या प्रसंगानं अकोल्याच्या शैक्षणिक विश्वातही त्या दिवशी एक नवी ‘प्रभात’ झाली होती…

आवेश, आवेगातले निर्णय पुढ आयुष्याची कसोटी पाहणारे ठरतात. हे निर्णय योग्य ठरले तर ठिक. चुकले तर आयुष्याचं म्हातेरं होण्याची भिती…. गजानन आणि वंदना या दोघांनीही आयुष्यातील अनेक परिक्षा आणि संघर्ष अगदी लिलया ‘मेरीट’मध्ये उत्तीर्ण केलेत. मात्र, या दांपत्याच्या अायुष्यातला अतिशय अवघड पेपर आला तो २००३ मध्ये त्यांच्या या निर्णयानं…. यशस्वी होण्यासाठी प्रचंड संघर्ष पुढे लिहिलेला होता. चूकून अपयश आलं तर आयुष्याचा कडेलोट होण्याची अनामिक भितीही होतीच. मात्र, दोघंही खंबिर होते अन ध्येयाप्रती तेव्हढेच प्रामाणिकही… कदाचित त्यांच्यातील याच गोष्टीनं त्यांनी या धेय्यातील प्रत्येक अडचणीला यशात रूपांतरीत केलं.

नोकरीच्या राजीनाम्यानंतर त्यांनी एका नव्या प्रवासाची सुरूवात केली. या दांपत्यानं उन्हाळी वर्ग घेण्याचं ठरवलं. ‘प्रभात उन्हाळी वर्ग’ या नावानं… १५-२० विद्यार्थी वर्गात आलेत. बरेचदा अशा वर्गांना ‘संस्कार’ या शब्दांचं गोंडस ‘लेबल’ लावलं जातं. मात्र, या वर्गात संस्कारांचं बिजारोपन तर वारशातूनच आलेलं. तर, या वर्गात मुलांच्या आवडी-निवडी, छंदानुसार त्यांना शिकवत बोलतं करण्यात आलं. या वर्गामूळं मुलं जाम खुश होती. अन यातूनच पाया घातला गेला ‘प्रभात किड्स स्कूल’ या रोपट्याचा… यावर्षी फक्त २६ विद्यार्थ्यांच्या बळावर नर्सरीचा वर्ग सुरू करण्यात अाला होता.

तेंव्हापासून फक्त सोळा वर्ष झालीत. २६ विद्यार्थ्यांपासून रूजलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. कधीकाळी २६ विद्यार्थ्यांच्या या शाळेत आज तीन हजारांवर विद्यार्थी शिकतात…. प्ले गृपपासून तर बारावीपर्यंतचं अतिशय दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्याला घडविणारी अकोल्यातील संस्था म्हणजे ‘प्रभात किड्स स्कूल’…. हे अगदी सहज घडून आलं का?, निश्चितच नाही. कारण, या यशामागं मोठा संघर्ष, समर्पन, निष्ठा, श्रद्धा, सचोटी अन नव्या सृजनाची आस दडलेली आहेय. आज अकोलाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात ‘प्रभात किड्स स्कूल’ नावाचा डेरेदार वटवृक्ष डौलानं उभा आहे. अन या डेरादार वृक्षाला जिद्द अन चिकाटीनं मोठं करणारा किमयागार म्हणजे डॉ. गजानन नारे.

डॉ. गजानन नारे यांचं गाव अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातलं विठाळी सावरगाव. साहेबराव आणि प्रभाताई या शिक्षक दांपत्याच्या अस्सल संस्काराच्या विद्यापीठात वाढलेलं हे व्यक्तीमत्व. आई-वडील शिक्षक असले तरी कमी पगारामूळे घरची परिस्थिती तशी बेताचीच गावात असतांना ग्रामीण भागातील शेती, शेतकरी यांचं दु:ख अन त्यातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी आबाळ त्यांनी अगदी जवळून पाहिली होती. त्यांच्यातील संवेदनशील माणुस घडवण्याचं काम विठाळीच्या या मातीनंच केलं, असं म्हणता येईल. प्राथमिक शिक्षण गावाकडेच पुर्ण केलेले नारे सर दहावी-बारावीत ओपन मेरीट आले होते. अकोटच्या शिवाजी महाविद्यालयात ‘बीकॉम’चं शिक्षण घेतांना ते विद्यापीठात पहिले आलेत. खेड्यातल्या एका पोरानं विद्यापीठात पहिला येत तीन सुवर्णपदकं पटकावलीत.

पुढे १९८८ मध्ये उच्चशिक्षणासाठी त्यांनी अकोल्याची वाट धरली. श्री शिवाजी महाविद्यालयातून एम. कॉम. होतांना त्यांनी गुणवत्ता यादीतलं आपलं स्थान कायम राखलं. त्यानंतर स्वकमाईतून शिकत चार्टड अकाऊंटंटचा अभ्यासक्रम पुर्ण केलाय. त्यानंतर अकोल्यातील ‘निशांत समुहा’त काम करीत पतसंस्था आणि वृत्तपत्राला शिखरावर नेण्याचं काम केलं. हे करत असतांना ते कायम अस्वस्थ होते. कारण, त्यांना त्यांच्या आवडीचं शिक्षण क्षेत्रं खुणावत होतं. कारण,आयुष्य जगतांना आपलं ज्ञान आणि तळमळीचा फायदा समाजाला व्हावा, अशी त्यांची प्रांजळ भावना त्यामागे होती. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना दर्जेदार अन माणुसकीचं शिक्षण देणारं शैक्षणिक व्यासपीठ असावं, हे त्यांचं स्वप्नं होतं.

२००३ मध्ये तोष्णीवाल ले आऊटमधील प्रभातची शाखा सुरू करतांनाचा त्यांचा संघर्ष फार मोठा होता. आपल्या नोकरीतील जमापूंजी आणि बँकांची उसनवारी करीत शाळेची प्रशस्त इमारत उभारली. हे उभारतांना बँकांकडून कर्ज मंजूर करण्याचं कठीण कामंही त्यांच्यातील संयमी माणसाला खुप काही शिकवून गेलं. शाळेतील शिकवण्याचा दर्जा, विद्यार्थ्याला सर्वार्थानं विद्यार्थी म्हणून समृद्ध करणारं शिक्षण यामूळे ‘प्रभात किड्स’नं कधी मागे वळून पाहिलंच नाही.

२००९ मध्ये शाळेच्या विस्तारीकरणासाठी नवी इमारत उभारण्याचा निर्णय नारे सरांनी घेतला. मात्र, या निर्णयासाठी त्यांना मुर्खात काढणारेच अधिक होते. कारण, अकोल्यापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर दूर पातूर रोडवर एका पडीक शेताच्या जागेची निवड त्यांनी केली. झुडपं, काटेरी बाभळींनी वेढलेल्या या १० एकरांवर शाळा उभारणीचा निर्णयच प्रत्येकाला विनोद वाटत होता. मात्र, नारे सरांचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय ठाम होता. अन सोबत पत्नी वंदनाताईंचा भक्कम आधार अन पाठबळ होतं. अाज अकोल्याच्याच नव्हे तर विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वाधिक भव्य अन सुसज्ज अशी शाळेची इमारत ‘प्रभात किड्स’ची आहे. विदर्भातलं पहिलं ‘डे-बोर्डींग स्कूल’ सुरू करणीरी शाळी अशीही ‘प्रभात’ची ओळख.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचं व्यक्तीमत्व घडवणाऱ्या गोष्टींवर नारे सरांनी ‘पी.एच.डी’. केली. या पी.एच.डी.च्या प्रबंधातील ‘थेसीस’च्या प्रयोगाची शाळा म्हणजे ‘प्रभात किड्स’.. त्यामूळेच येथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी बाहेर पडतांना एक परिपूर्ण विद्यार्थी अन एक जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडतो. मला वाटतं की, ‘प्रभात’ आधुनिक काळात ‘माणुसकीचा माणुस’ बनवणारं गुरूकुल असावं. त्यामूळेच या शाळेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळ, कला, क्रीडा या सर्व प्रकारांत देशपातळीवर अकोल्यासह महाराष्ट्राचं नाव उज्वल करीत आहेत.

वाचनसंस्क्रूती वाढविण्यासाठी ३ हजार पुस्तकांचं सुसज्ज वाचनालय, फिरतं वाचनालय, इंग्रजी माध्यमाची शाळा असतांना प्रत्येक भाषेला समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कट्टे असे उपक्रम येथील विद्यार्थ्यांना समृद्ध करून जातात. महापालिकेच्या २६ क्रमांकाच्या शाळेला दत्तक घेत झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची तुमची धडपडही शब्दांच्या पलिकडची आहे. तुमचे शालेय उपक्रम एका स्वतंत्र लेखाचा भाग आहे. त्यावर भविष्यात निश्चितच लिहिता येईलच.

सर, आदर्शवाद, विचार सांगणं म्हणजे सर्वात सोपं असतं. मात्र, तोच आदर्शवाद-विचार प्रत्यक्षात कृतीतून उतरवणं अन अमलात आणणं तेवढंच कठीण असतं. मला आजही तीन वर्षांपूर्वी तूम्ही आईच्या निधनानंतर केलेल्या देहदानाचं निर्णय आठवतो. तुम्ही आईचं देहदान करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा समाज-आप्तेष्टांचा त्याला फार मोठा विरोध होता. यावेळी बाबांसह तूमच्या कुटूंबियांनी या दु:खाच्या क्षणातही समाजासमोर आदर्श ठेवला. अन आईचं देहदान करीत त्यांचं पार्थिव अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाला दान केलतं. आयुष्य घडविणाऱ्या आईचा देह दान करतांना तूमच्यातील मुलगा आतून पुरता कोलमडलेला असेल. मात्र, या परिस्थितीतही तूम्ही समाजाला उभारी देणारा विचार अंमलात आणलात. सर, या जगावेगळ्या कृतीसमोर ‘सॅल्यूट’ हा शब्दही अगदीच फिकाच पडावा.

सर!, आपल्या गुडधीचा अनाथाश्रमाला तुम्ही अन निरज आवंडेकरांनी आपलं कुटूंब मानत त्यांचं शिक्षण, पालनपोषण करत आहात. मात्र, त्याचा तुम्ही कधीच समाजासमोर गवगवा केला नाहीत. सध्याच्या नाव, प्रसिद्धीसाठी हपापलेल्या या वातावरणात तुम्हाला असं ‘थँक्सलेस’ जगणं कसं जमतं, सर!. परंतू, या संस्काराच्या, समर्पणाच्या तुमच्या निष्ठांची बीजं कदाचित विठाळीच्या मातीतूनच तूमच्यात रूजलेली-भिनलेली असावीत. प्रगती अन यशाचा वटवृक्ष आसमंतात झेप घेत असतांना आजही तूमची मूळं त्यामूळेच जमिनीत घट्ट रूजलेली असावीत.

सर!, अलिकडच्या धावपळीच्या आयुष्यात माझ्यासह प्रत्येकाचं एकच परवलीचं वाक्य असतं, “काय वेळच मिळत नाही!”… मला या वाक्यातला फोलपणा तुम्हाला भेटल्यानंतर कळतो. अकोल्यात असं कोणतंच सामाजिक क्षेत्र नाही, ज्यात तुमचा वावर नसतो. अकोल्याचं कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक अन अनेक अनाम क्षेत्राचं आभाळ ‘ डॉ. गजानन नारे’ नावाच्या धडपडीनं, सकारात्मकतेनं भारलेल्या विचारानं व्यापलं आहे. एवढे बिझी असतांनाही या सर्वांसाठी तुम्हाला वेळ काढणं कसं जमतं, सर?. यासाठी समाजाला ‘टाईम मॅनेजमेंट’ शिकवण्यासाठी तुमच्या प्रॅक्टिकल मार्गदर्शनाची आज नक्कीच गरज आहे.

मला वाटतं तूमच्यासारखी माणसं या शहराची, राज्याची अन देशाची ‘संपत्ती’ आहे. हा ‘अनमोल ठेवा’ समाजानंही प्राणपणानं जपणं आवश्यक आहे. अलिकडे समाजावरचं सारं आकाशच अंधारून गेलं की काय अशी परिस्थिती आहे. अशावेळी या अंध:काराची भिती घालवणारे तूमच्यासारखे ‘नंदादिप’ जपून ठेवणं महत्वाचं आहे. कारण, याच अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरण्याचं काम तुमच्यासारखे ‘नंदादीप-पणत्या’ सातत्यानं करीत असतात. सर!, आजच्या शिक्षकदिनी तुमच्यासारख्या खऱ्या ‘समाजशिक्षका’चा वाढदिवस असावा, हा फारच मोठा योगायोग म्हणावा लागेल. कदाचित नियतीनं तुमच्या कर्तृत्वाला, व्यक्तीत्वाला केलेला हा सलामच असावा. अकोला शहराचं ‘शैक्षणिक-वैचारिक-सांस्कृतिक अन माणुसकी’चं विश्व समृद्ध करणाऱ्या ‘ डॉ. गजानन नारे’ नावाच्या या मानवतेच्या ‘राजदूत’ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!….

गजानन नारे यांचे स्केच – गजानन घोंगडे

-डॉ. गजानन नारे यांचा मोबाईल क्रमांक -94221 61878/97644 59799

@लेखक एबीपी माझा वृत्तवाहिनीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी आहेत 

99226 50067

Previous articleशिक्षक तोच, जो जिज्ञासा जागी करतो
Next articleमेनस्ट्रीम और TV मीडिया का ज़्यादतर हिस्सा गटर हो गया है : रवीश कुमार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.