जयपूरच्या राजा मानसिंगांची समाधी अचलपुरात  

(साभार: दैनिक दिव्य मराठी)

-अविनाश दुधे

काबूलपासून बंगाल , ओरिसा आणि उत्तर ते दक्षिण असा मुघल साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या  राजा मानसिंगांची समाधी विदर्भातील अचलपूरमध्ये आहे . सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या या मानसिंगांच्या समाधीवर पूजाअर्चा करण्यासाठी जयपूर राजघराण्याने पुजारी नियुक्त केला आहे. मात्र आपल्या पराक्रमी पूर्वजाच्या समाधीची देखभाल त्याच्या लौकिकाप्रमाणे व्हावी , असे गेल्या ४०० वर्षात कुठल्याही वंशजाला वाटले नाही .

………………………………………………………………………………………..

माणसाचं आयुष्य त्याला कुठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. पराक्रमी आणि कर्तबगार माणसंही याला अपवाद नसतात. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंगांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंगांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली, हे सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही . अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या जयपूर राजघराण्याच्या या सर्वात कर्तबगार राजाने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये ६ जुलै १६१४ मध्ये अखेरचा श्वास घेतला. शहरालगतच्या एका शेतात जवळपास तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ पडक्या अवस्थेत असलेल्या राजा मानसिंगांच्या समाधीचा शोध मागील शतकाच्या पूर्वार्धात लागला . त्यानंतर १९३५ मध्ये जयपूरचे तेव्हाचे राजे सवाई मानसिंग (दुसरे) यांनी पाठविलेल्या मदतीतून समाधीभोवती दगडी चौथरा बांधण्यात आला. पण समाधी अजूनही दुर्लक्षित अवस्थेत आहे. जयपूर राजघराणे मानसिंगांचं नाव व त्यांचा पराक्रमअतिशय अभिमानाने मिरवते. मात्र आपल्या या कर्तबगार पूर्वजाची समाधी त्यांच्या लौकिकानुसार असावी, असे गेल्या ४०० वर्षात कुठल्याही वंशजाला कधी वाटले नाही.

  काबूलपासून बंगाल, ओरिसा आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र पराक्रमाची शर्थ करून सम्राट अकबराचं साम्राज्य देशभर विस्तारलेल्या राजा मानसिंगांच्या आयुष्याची कहाणी विलक्षण आहे.  २१ डिसेंबर १५५० रोजी जन्मलेल्या या राजाचं बहुतांश आयुष्य हे रणभूमीवर गेलं. संपूर्ण आयुष्यात कुठलीही लढाई हरली नाही असा लौकिक असलेले राजा मानसिंग हे अकबराचे सर्वात पराक्रमी सेनानी होते . अकबराच्या साम्राज्याविरुद्ध कुठलाही राजा वा सेनापतीने बंड केल्यास त्याचा बिमोड करण्यासाठी मानसिंगांना पाठवले जात असे . महाराणा प्रतापांविरोधातील हल्दीघाटच्या गाजलेल्या लढाईत मुगल सैन्याचं नेतृत्व राजा मानसिंगांनीच केलं होतं. राणा प्रतापांच्या अतुलनीय शोर्याने गाजलेली ती लढाई इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाली आहे . या लढाईनंतर तीन वर्षातच मानसिंग हे जयपूरचे राजा झालेत . त्यानंतर काही काळातच काबूलमध्ये काही सरदारांनी अकबरांविरुद्ध बंड पुकारल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राजा मानसिंगांनाच पाठवण्यात आले होते.

  पुढील काळात बिहार , झारखंड, बंगाल,ओरिसा अशा अनेक मोहिमांवर राजा मानसिंगांना पाठविण्यात आले . त्यांनी प्रत्येक मोहीम यशस्वी करून दाखविली . बिहारच्या मोहिमेतील यशानंतर अबुल फझल या प्रसिद्ध इतिहासकाराने ‘बिहारमध्ये राजा मानसिंगांनी असामान्य धैर्य आणि अलौकिक क्षमता दाखवली’ , या शब्दात त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. बिहारमधील कामगिरीमुळे १५९४ मध्ये बंगालसह पूर्व भागातील चार प्रांताची सुभेदारी मानसिंगांकडे सोपविण्यात आली होती . या नियुक्तीनंतर बिहारमधील रोहतास येथे त्यांनी आपले मुख्यालय केले होते . तिथे त्यांनी राजवाडाही उभारला होता. या कालावधीत मानसिंगांचा सर्वत्र उदोउदो होत होता . गंगेच्या खोऱ्यातील संपूर्ण भूभाग व बंगाल-ओरिसात  राजा मानसिंगांचे एकछत्री साम्राज्य होते.   मुगल साम्राज्यातील सर्वात ताकतवर माणूस म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्यांच्या सैन्यात असलेल्या २० हजार कट्टर राजपूत योध्यांमुळे सगळे त्यांना वचकून असत. स्वतः सम्राट अकबर त्यांना बरोबरीने वागवत असे . १५९४ ते १६०६ असे १२ वर्ष राजा मानसिंग त्या भागाचे सुभेदार होते . या कालावधीत त्यांनी वृंदावनमध्ये भगवान कृष्णाचे सात मजली मंदिर उभारले होते . त्या काळात त्या मंदिरासाठी एक कोटी रुपये खर्चण्यात आले , अशी नोंद आहे . बनारस व अलाहाबाद येथेही त्यांनी काही मंदिरे उभारलीत.

   १६०५ मध्ये अकबराचा मृत्यू झाला . त्यानंतर जहांगीर नवीन सम्राट झाला. दरबारी राजकारणात मानसिंगांविरुद्ध अनेकांनी नवीन सम्राटाचे कान भरण्यास सुरुवात केली. मानसिंग हे बंड करून  तुमचे साम्राज्य उलथून लावू शकतात, असे सांगितल्याने जहांगीरने सुरुवातीपासूनच मानसिंगांना राजधानीपासून दूर ठेवणे पसंत केले . नवीन सम्राटाने त्यांचे प्रभावक्षेत्र कमी करण्यासोबत अनेक निर्णयही फिरविण्यास सुरुवात केली . १६०६ मध्ये त्यांची बंगालची सुभेदारी काढून घेण्यात आली  .त्यांच्या जागेवर कुतुबुद्द्दिन खानला बंगालचा सुभेदार करण्यात आले. १६११ मध्ये दक्षिणेत मलिक अंबरने मुघल साम्राज्याला आव्हान दिल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राजा मानसिंगांची रवानगी अहमदनगर आणि  खानदेशात करण्यात आली. जवळपास तीन वर्ष मलिक अंबरसोबत संघर्ष चालला . ती मोहीम फत्ते केल्यानंतर आपल्या उत्तरेतील सुभेदारीकडे परततांना विदर्भातील अचलपूर येथे मुक्कामी असतांना वयाच्या ६३ व्या वर्षी मानसिंगांचा नैसर्गिक मृत्यू झाला . मानसिंगांची छावणी ज्या ठिकाणी होती तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आठवण म्हणून तिथे समाधी स्वरुपात एक दगड रोवण्यात आला .

  त्यानंतर जवळपास ३०० वर्ष राजा मानसिंगांच्या समाधीची कोणालाही आठवण नव्हती . २० व्या शतकाच्या पूर्वाधार्त काही इतिहासप्रेमींना या समाधीची माहिती मिळताच त्यांनी जयपूर राजघराण्यासोबत पत्रव्यवहार केला . त्यानंतर तेव्हा जयपूरचे राजे असलेल्या सवाई मानसिंग (दुसरे) यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एका दूतासोबत काही रक्कम पाठवली . त्या पैशातून समाधीला दगडी चौधरा बांधण्यात आला.  त्या चौथऱ्यावर एक मंदिररूपी घुमडी उभारण्यात आली. तेव्हापासून समाधीवर नियमित दिवाबत्ती व नैवैद्य दाखविण्यासाठी जयपूर राजघराण्याकडून एका पुजाऱ्याची नेमणूक करण्यात आली. लालबहादूर ठाकूर यांनी अनेक वर्ष ही जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुरेशसिंग ठाकूर ही जबाबदारी सांभाळतो आहे. त्यांना १८०० रुपये मानधन आणि दिवाबत्ती आणि साफसफाईसाठी १५०० रुपये नियमित पाठवले जातात. मात्र दोन वर्षापासून यात अनियमितता असून कोरोनाकाळात तर एक पैसाही मिळाला नसल्याचे ते सांगतात. राजस्थानच्या इतिहासातील एका पराक्रमी राजाची समाधी अचलपुरात आहे , याची माहिती मोजके इतिहासप्रेमी सोडलेत तर कोणालाही नाही. राजस्थानातून एखादा भुलाभटका इतिहासप्रेमी कधीतरी इकडे येतो. जयपूर राजघराण्याला मात्र मानसिंगांच्या समाधीबद्दल काहीही ममत्व नाही.

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

८८८८७४४७९६

राजा मानसिंग समाधी- सोबतचा Video नक्की पाहा ( साभार: प्रा. जयंत वडतकार)

l

 

 

 

.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleटीका नको असेल तर पत्रकारिता करू नये!– शेखर गुप्ता
Next articleउटी: क्वीन ऑफ हिल स्टेशन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here