जवाहरलाल नेहरूंचे संघाविषयक आकलन

राज कुलकर्णी

 

प्रणव मुखर्जी यांनी संघ शिबिरास दिलेल्या भेटीवर _भाष्य करताना दैनिक लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखात जवाहरलाल नेहरू ,महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील संघ शिबिरास भेट दिल्याचा उल्लेख केला गेला आहे. महात्मा गांधींच्या संघस्थानाच्या कथित भेटीबद्दल यापुर्वीच मी लिहीले असून नेहरूंनीही अशी भेट दिल्याबाबतचा मजकूर पूर्णतः चुकीचा आहे!

 

जवाहरलाल नेहरूंचे प्रमुख वैशिष्ट्यच असे की, साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधातील लढ्यासाठी सर्व भारतीयांना एकत्र करण्याचे कार्य करत असतानाही, ते कधीही कोणत्याही संघप्रशिक्षण वर्गात हजर राहीलेले नाहीत. उलट नेहरू हेच स्वातंत्र्य लढ्यादरम्यानचे असे एकमेव नेते होते ज्यांनी चुकूनही कधी संघाशी कसल्याही प्रकारचा सबंध येईल अशी कुठलीच,अगदी लहानशीही कृती केलेली नाही. कारण ‘फँसिस्ट प्रपोगंडा’ म्हणजे काय आणि कसा असतो याची त्यांना पुर्ण जाणीव होती.

 

गांधीजी, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण यांचा कुठेना कुठे संघाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क आलेला आहे. अगदी सुभाष बाबूही हिंदुत्ववादी सावरकरांना भेटले होते. पण नेहरूंनी अशी प्रत्येक गोष्ट कटाक्षाने टाळली! मोदी अथवा संघपरीवार नेहरूंवर सर्वात जास्त टिका का करतो,याचे कारण यात दडलेले आहे, हे अनेक स्वत:ला पुरोगामी म्हणवणा-या अंध नेहरूविरोधकांनाही समजत नाही!

 

नेहरूंनी संघास कोणत्याही पातळीवर समर्थन देणे वा त्यांच्या स्थळी जाणे कटाक्षाने टाळले, याचा अर्थ नेहरूं संघ कार्यकर्त्यांनाही भेटले नाहीत असा नाही! हिंदू कोड बिल , विवेकानंदाचे स्मारक निर्मिती, राष्ट्रीय कॅलेंडर निर्मिती या बाबत त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या संघ कार्यकर्त्याशी बातचीत केली परंतु ते कधीही संघस्थानी गेले नाहीत. जवाहरलाल नेहरू वगळता एकाही स्वातंत्र्य संग्रामातील नेत्याचा संघ स्वत:ची स्विकृती वाढवण्यासाठी वापर करण्याचे राहिलेला नाही. कारण संघाबाबत नेहरूंची भूमिका अगदी सुस्पष्ट होती. कारण नेहरूंनी संघाचे मुख्य ध्येय काय आहे हे खूप चाणाक्षपणे ओळखले होते.

 

नेहरूंनी संघाच्या एखाद्या शिबीरास भेट दिली असती तर ती १९३४ पुर्वीच देऊ शकतात, या शक्यतेचा विचार करता अनेक बाबी तपासून पाहता येतात. नेहरू राष्ट्रीय राजकारणात होम रूल लीगच्या माध्यमातून १९१७ साली उतरले मात्र त्यांच्या कार्याची खरी सुरूवात १९२१ च्या सविनय कायदेभंगापासून झाली. त्यांना ६ डिसेंबर १९२१ रोजी पहिला कारावास घडला. संघाची स्थापना होईपर्यंत नेहरूंनी दिड ते दोन वर्षाचा कारावास भोगला होता. सन १९२५ नंतरचा त्यांचा कालखंड हा वडील आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल नेहरूंचे स्विय सहाय्यक म्हणून आणि देश विदेशात विविध दौरे यात व्यतीत झाला आणि १९२७ सालच्या ब्रुसेल्स इथल्या साम्राज्यवाद विरोधी परीषदेतील त्यांच्या सहभागामुळे त्यांचे स्वतंत्रपणे राजकीय व्यक्तीमत्व निर्माण होऊ लागले. तो पर्यंत ना संघ उल्लेखनिय नव्हता ना नेहरू, त्यामुळे ही भेट होणे अशक्यच! त्यानंतर १९२८ मधील कलकत्ता कॉग्रेस नंतर नेहरूच १९२९ च्या रावी नदीच्या तीरावरील कॉग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांची पुढची चार वर्ष कारावासात व्यतीत झाली. कमला नेहरू आजारी असल्याच्या कारणावरून त्यांची सुटका ऑक्टोबर १९३५ झाली. तिथून ते थेट प्रथम बेडलेवर आणि नंतर लॉसेलला पोंचले जीथे फेब्रुवारी १९३६ मघे कमला नेहरूंचा मृत्यू झाला. तो पर्यंत सन १९३४ मधेच हिॆदु महासभा व लिग या पक्षाचे सदस्य असणा-यांना कॉग्रेसचे सदस्य राहता येणार नाही असा ठराव पारीत झाला होता.

 

कमला नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी ते रोम मार्गे भारतात घेऊन येत असताना त्यांनी मुसोलीनीने खूप विनंती करूनही त्याची भेट नाकारली होती, त्याचवेळी त्यांनी ‘फँसिस्ट प्रपोगंडा’ कसा असतो याबद्दल विचार करून मुसोलीनीची भेट स्पष्टपणे नाकारली. या बद्दल नेहरूंनी प्रणव मुखर्जींनी नागपुरात संदर्भ दिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडीया’ या त्यांच्या ग्रंथात आवर्जून उल्लेख केला आहे. कारण फँसिझमला गांधींजीकडून स्विकृती मिळवण्याचे स्वप्न संघाप्रमाणेच मुसोलीनीही बाळगून होता; म्हणून त्याने १९३१ मधेच गांधींनी मुसोलीनीचे कौतुक केल्याची एक ‘फेक मुलाखत’ इटलीतल्या ‘ Giornal d’ Italiaca’ या वृत्तपत्रात छापली होती. यावरून ‘फेक न्यूज’ आणि ‘फँसिझम’ यांचे नाते किती जूने आहे हे लक्षात येते!

नेहरूंनी पुढे १९३८ मधे हिटलरचे आमंत्रण देखील याच कारणास्तव धुडकावून लावले होते. याची कारणमिमांसा त्यांनी त्यांच्या वर्धा येथील १५ मार्च १९४८ च्या एका भाषणात सांगीतली आहे. ते म्हणतात ” Communalism is diametrically opposed to democracy and usually relies on Nazi and fascist methods”

 

महात्मा गांधी यांच्या हत्येपुर्वीच देशात जातीय दंगे उसळले असताना नेहरूंनी ५ जानेवारी १९४८ रोजी मुंबई प्रांताच्या मुख्यामंत्र्यांना म्हणजे बी.जी खेर यांना लिहीले होते “regarding communal disturbances, I should like to inform you that, the information has reached the RSS’s intensive part in encouraging these disturbances in various part of the country. There have been instances where RSS men have acted as agents provocater and thus brought about riot”

 

_जानेवारी महिन्याच्या ३० तारखेस गांधींची हत्त्या झाली आणि ही हत्या नेहरूंसाठी आणि पटेलांसाठी खूप मोठा आघात होती. पटेलांनी तर गांधीहत्येसाठी गृहमंत्री म्हणून स्वतःलाच जवाबदार धरले होते. त्यावेळी संविधान सभेचे सत्र चालू होते. या सभेने महात्मा गांधींना २ फेब्रुवारी १९४८ रोजी श्रद्धांजली वाहिली तेंव्हा ‘The glory that is no more’ हे भाषण करताना आणि त्याच दिवशी एका सभेत नेहरू म्हणतात “It was one of the votaries of this demand for Hindu rashtra who killed the greatest living Hindu. Was Hindu dharma protected by this foul deed ?

 

गांधी हत्येपुर्वीच्या दंगलीतील संघ कार्यकर्त्यांच्या भूमिकांबद्दल नेहरूंनी अनेकांशी पत्रव्यवहार केलेला दिसून येतो. संघ आणि हिंदुमहासभा ही दोन स्वतंत्र संगठने असले तरीही त्यांच्या आपसातील संपर्क हा सर्वश्रुत होताच ! म्हणून नेहरूंनी ४ फेब्रुवारी १९४८ रोजी शामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहून हिंदू महासभेशी असलेले संबंध तोडून टाकावे ,ज्यामुळे माझ्या पक्षाला आणि संपूर्ण देशाला आनंद होईल अशी विनंतीही केली होती. गांधी हत्येनंतर संघावर बंदी ही ४ फेब्रुवारी १९४८ ला घालण्यात आली आणि त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यांनी वल्लभ भाई पटेल यांना लिहिलेले पत्र खूप महत्वपूर्ण आहे. या पत्रात नेहरूंनी वल्लभ भाई यांना आरएसएस च्या कार्यावर राज्य सरकार तर्फे बंदी घालण्या विषयी चर्चा केली आहे. कारण १९३५ च्या कायद्यानुसार गठीत झालेल्या प्रांत सरकारांकडेच संघटनेवर प्रतिबंध घालण्याचे अधिकार होते. नेहरू म्हणतात, आरएसएसने दिल्लीत गीता शिकविण्यासाठी मुक्तशाला सुरु केल्या होत्या ,ज्या त्यांना त्यांच्यात आपसात चर्चा करण्यासाठी उपयुक्त ठरल्या. पोलिसांनी धाड मारण्यापुर्वीच त्याबाबतची माहीती संघास कशी काय समजते, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. या पत्रात नेहरूंनी केवळ संघ नव्हेतर नॅशनल मुस्लीम गार्ड, खाकसार या सारख्या जातीयवादी संघटनांवरही बंदी घालावी अशी सूचना केलेली आहे.

 

संघाच्या पाठीमागे समाजातील उच्चवर्णीय मध्यम वर्ग प्रामुख्याने होता, जो संघाच्या हिंदूराष्ट्र निर्मितीच्या उद्दिष्टामुळे भारावला गेला होता. त्यांना कॉंग्रेसचा विरोध या सबबीखाली अकाली दल आणि हिंदू महासभा यांचे समर्थन मिळाले होते. अमृतसर मध्ये संघ आणि हिंदू महासभा यांनी बंदीचे आदेश आदेश मोडून मिरवणूक काढली आणि त्याला पंजाब मधील अकाली दलाच्या सरकारनेही समर्थन दिले होते. या बातमीच्या अनुषंगाने वल्लभ भाई पटेल यांच्या सोबत पत्रव्यवहार करताना नेहरू म्हणतात की संघाचा अमृतसर येथील एक प्रमुख कार्यकर्ता राय बहादूर बद्रिदास हा व्यक्ती पूर्व पंजाब विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून नियुक्त केला जातो आहे. त्याबद्दल तुम्ही सविस्तर चौकशी करावी कारण अशी नियुक्ती ही चुकीची ठरू शकते. या वृत्ताची चौकशी करण्यात आली आणि जस्टीस तेजा सिंग यांची त्या कुलगुरू या पदावर नियुक्ती केली गेली.

 

राय बहाद्दूर बद्रिदास यांच्या बाबतची माहिती नेहरूंना गोपीचंद भार्गव यांनी दिली होती. मात्र त्यावेळी कांही जणांचे मत असे होते की राय बहाद्दूर बद्रिदास यांनी आरएसएसचा राजीनामा दिला आहे. पण नेहरू स्पष्ट म्हणतात , त्यांनी राजीनामा दिला किंवा नाही याने कांहीच फरक पडत नाही ,आरएसएसशी एवढे घनिष्ट संबंध असलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या जवाबदारीच्या पदावर नियुक्त करणे योग्य नव्हे, कारण यामुळे देशात चुकीचा संदेश जातो असा इशाराही त्यांनी दिला होता.

 

गांधीजींच्या हत्येनंतर संघाशी संबध असणारे अनेक प्रतिष्ठीत लोक स्वतःस संघापासून अलिप्त असल्याचे दर्शवत होते. कांहीजण आम्हास याचा पश्चाताप होतो असेही म्हणत होते. याविषयी गोपीचंद भार्गव यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातील ११ फेब्रुवारी १९४८ रोजीच्या पत्रात म्हणतात “ I trust, Your government will make it perfectly clear by the action it takes that any person sympathizing the RSS at this juncture will have to face the stern displeasure of government. These people have the blood of Mahatma Gandhi on their hands and pious disclaimers and dissociation have no meaning ”

 

नेहरूंनी अशी भूमिका घेण्याचे कारणही असे होते की, महात्मा गांधींच्या हत्त्येनंतर अनेक ठिकाणी हत्या झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला गेला होता तर कांही ठिकाणी मिठाई वाटल्याचे सुद्धा वृत्त होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील त्यास काळा दिन म्हणून तिरंगा ध्वजाचा अपमान करून भगवा ध्वजास वंदना दिल्याचीही पार्श्वभुमी या भुमिकेस होती. नेहरू १४ फेब्रुवारी १९४८ रोजीच्या रेडीओवरून दिलेल्या भाषणात म्हणतात “ it was even more shameful thing for the some people to celebrate this killing in various ways. Those he did so or feel that way have forfeited their right to be called Indians “

 

नुकताच स्वतंत्र झालेल्या महान देशाची जडणघडण नेहरूंना आधुनिकतेच्या पायावर करायची होती.यासाठी देशाचा पाच हजार वर्षांचा सर्वसमावेशक सांस्कृतीक वारसाच या वाटचालीचा पाया होता. परंतु या सर्वसमावेशक सांस्कृतिक वारशास उध्वस्त करू पाहणा-या प्रयत्नांना त्यांनी सर्वोतपरी रोखण्याचा प्रयत्न केला. श्री. रवि शंकर शुक्ल यांनी नेहरूंना संघ कार्यकर्ते जाहीर माफी मागण्यास तयार असल्याबाबतचे एक पत्र पाठवले होते, त्यास उत्तर देताना नेहरू २७ फेब्रुवारी १९४८ च्या पत्रात ते लिहीतात “RSS was an organization which allmost deliberately belived in saying one thing and doing another. Their apologies therefore of no value”

 

संघाच्या एकूनच कार्यपद्धतीबद्दल एवढे चपखल आकलन असणारा दुसरा कोणताही नेता आढळून येत नाही, म्हणूनच कदाचित माजी राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जींनी नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचा उल्लेख परवाच्या नागपुरच्या भाषणात केला होता!

 

संघ गांधींना प्रात:स्मरणीय म्हणू शकतो, पटेलांना व राजेंद्र प्रसादांना आमचेच म्हणू शकतो, अगदी गांधींचे राजकीय विरोधक म्हणून आंबेडकरांनाही आपले म्हणण्याचा बनाव करू शकतो तसेच तो प्रणव मुखर्जींनाही व्यासपीठावर आमंत्रण देऊ शकतो पण नेहरूंची केवळ आणि केवळ बदनामी करू शकतो हेच नेहरूंचे मोठेपण आहे!

 

© *राज कुलकर्णी*

 

संदर्भ –

1) Selected works of Jawaharlal Nehru Second Series Vol.5, JNMF Delhi 1987

 

2) Nehru- A Political Biography by Micheal Edwords, Praeger Publication, New York 1971

 

3) Freedom at Midnight by Larry Collins and Dominique Lapieree, Vikas Publishishing Co.Pvt.Ltd, New Delhi 1976

 

4) Jawaharlal Nehru by Frank Moress, Jaico Books, Dehli 1959

 

5) Discovery of India by J.Nehru, Penguin Books, Dehli, 2008.

 

6) जवाहरलाल नेहरू – आ. गोरेव आणि ब्ला.झिम्यानिन, प्रगती प्रकाशन, मॉस्को 1984

 

7) वल्लभभाई पटेल – चरित्र आणि काळ — त्र्यं. र.देवगिरीकर, भारत ग्रंथ माला प्रकाशन, पुणे 1971

Previous articleमनूचा मासा , भिडेंचा झिंगा
Next articleशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.