स्वराज्याची तिसरी राजधानी – जिंजीचा किल्ला

-राकेश साळुंखे

मराठा साम्राज्यामध्ये जे अतिदुर्गम किल्ले होते त्यापैकी एक किल्ला म्हणजे जिंजीचा किल्ला होय. राजगड, रायगडानंतर मराठ्यांची तिसरी राजधानी म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. संभाजी महाराजांनातर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने स्वराज्याची पुनःप्रतिष्ठापना केली होती.

         इ.स.९ व्या शतकात चोल राजांनी हा किल्ला बांधला . पुढे कुरुंबरांनी चोलांकडून किल्ला जिंकून त्यात सुधारणा केल्या . त्यानंतर १३ व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा किल्ला गेला . एका मतप्रवाहानुसार १५ – १६ व्या शतकात विजयनगरचा सरदार जिंजी नायक याने हा किल्ला बांधला आहे .१६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सुलतानाकडून तो जिंकून घेतला .  मुघलांनी हा किल्ला जिंकायचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना तो जिंकता आला नाही . संताजी घोरपडेसारख्या शूर सरदारांनी त्यांचा हल्ला परतवून लावला .

अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ल्याला भेट देण्याचा योग काही वर्षांपूर्वी आला. कर्नाटक – तामिळनाडू ट्रीपचे नियोजन करताना जिंजीला जाण्याचेही ठरले. आमचा ८ ते १० जणांचा ग्रुप होता, त्यात सर्व वयोगटातील सहकाऱ्यांचा समावेश होता. अगदी माझ्या वडिलांपासून ते माझ्या १४ वर्षाच्या मुलापर्यंत आणि त्याच्या सोबतीला आमच्यातीलच एकाचा ९ वर्षाचा छोटाही सहभागी होता. मोठ्या उत्साहात आमची ट्रीप सुरू होती. नोव्हेंबर महिना असल्याने वातावरणही आल्हाददायक होते. १० दिवसांच्या ट्रीपमध्ये आमचे शेवटचे पर्यटन स्थळ जिंजी होते. तेथून चेन्नईमार्गे विमानप्रवास करून घरी जायचे, असे ठरले होते. आमच्यातील माझे वडील वगळता  इतरांचा  पहिलाच विमानप्रवास असल्याने आम्ही सर्वच उत्साहित होतो.

मदुराई बघून पुढे जिंजीकडे निघालो, वाटेत तिरुवनमलाई येथे मुक्काम केला. जिंजी चढायला लवकर सुरुवात करायची होती. त्यामुळे पहाटे लवकरच  जिंजीकडे निघालो. या किल्ल्याच्या दुर्गमतेबद्दल बरेच ऐकून होतो . चढायला खूप अवघड असल्याचे बऱ्याच जणांनी सांगितले होते . परंतु आमच्या सर्वांच्या मनात मात्र जिंजी  सर करायचीच हे पक्के होते, अगदी माझ्या 68 वर्षांच्या वडिलांच्यादेखील मनात हेच होते.

हा किल्ला तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यात येतो. मदुराईपासून ५ तासांच्या अंतरावर ( ३३२ किमी )  तर चेन्नई पासून ३ तासांच्या अंतरावर (१५४ किमी)  आहे. तीन टेकड्यांनी  मिळून हा किल्ला बनला आहे. या टेकड्या म्हणजेच त्याचे बालेकिल्ले होत. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून जाडजूड दगडी तटबंदी आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट आहेत. या तीन टेकड्या प्रचंड आकाराच्या दगडांनी बनलेल्या आहेत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण या नावांनी या टेकड्या ओळखल्या जातात . यापैकी राजगिरी नावाची टेकडी सर्वात उंच आहे.

किल्ल्यामध्ये आम्ही सकाळी सहाच्या दरम्यान पोहोचलो. खाली सपाटीला अनेक प्राचीन इमारती आहेत. धान्यकोठारे, तालीमखाना, निवासमहल पाहून पुढे कल्याणमहाल पाहिला. याच्या पुढेच राजगिरीवर जाणारा पायऱ्यांचा रस्ता लागतो. आपण तीनही बालेकिल्ले पाहू शकतो, पण आम्ही राजगिरी या सर्वात उंच बालेकिल्ल्यावर जायचे ठरविले होते.

आम्ही सकाळी लवकरच राजगिरी चढण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांना मनोमन वंदन करून, वर चढू लागलो. या टेकडीच्या तीनही बाजूंनी उंच तुटलेले कडे आहेत. वर जायला एक छोटीशी अरुंद पण मजबूत वाट आहे . खालून जर या टेकडीकडे पाहिले तर फक्त दगडच दिसतात. वर जायची वाट दिसत नाही. पायऱ्यांचा दगडी रस्ता चढताना जीव चांगलाच मेटाकुटीला येत होता . दोन पायऱ्यांमधील अंतरही जरा जास्त असल्याने दमायला होत होते. चढण चढत असताना मध्ये मध्ये छोटी वळणे व पुन्हा चढ अशी रचना येथे आहे. वाटेत काही ठिकाणी झाडी लागते. याठिकाणी माकडांपासून मात्र सावध राहावे लागते. हातातील किंवा खांद्यावरील सामान कधी गायब होईल कळतही नाही. येथे आमच्या सोबत माकडांवरून दोन मजेदार गोष्टी घडल्या. आम्ही जेव्हा चढण चढत होतो तेव्हा माकडांचा एक घोळका आमच्यावर  हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. कितीही हुसकावले तरी ते मागेच लागले होते, मग लक्षात आले की आमच्यापैकी एका व्यक्तीकडे खाद्यपदार्थांची पिशवी होती. ती पिशवी पळवायचा ते प्रयत्न करत होते. शेवटी ती पिशवी  त्यांच्या दिशेने टाकल्यावर मगच त्यांनी आमचा पिच्छा सोडला. दुसरी एक गंमत म्हणजे आम्ही आमची गाडी खाली पार्क केली होती, महत्त्वाचे सामान गाडीतच ठेवले होते. परंतु ड्रायव्हर गाडीत असल्याने आम्ही बिनधास्त होतो. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा ड्रायव्हर झोपला होता आणि गाडीतील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसत होते. ड्रायव्हरला उठवून विचारले तर त्याला काहीच सांगता येत नव्हते, मग आमच्या असे लक्षात आले की सामानातील खाण्याच्या पिशव्याच फक्त गायब झाल्या होत्या. हा माकडांचाच उद्योग होता.

      थोड्या चढणीनंतर दम लागायला सुरुवात झाली, मग मधेमधे थांबत, पाण्याचा एकएक घोट घेत पुन्हा चालणे असे सुरू झाले. सर्वांना घामाच्या धारा लागल्या होत्या. तेवढ्यात वरुण राजा आमच्या मदतीला आला .  घामाने निथळलेल्या आम्हा सर्वांना दिलासा मिळाला. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही, पावसानेसुद्धा घाम यायचे काही थांबले नाही. हळूहळू एकेकाचे शर्ट अंगावरून हातामध्ये येऊ लागले. आम्ही खूप दमलो होतो, पण माझ्या वडिलांचा उत्साह पाहून आम्हाला पण हुरूप येत होता. हा रस्ता सात दगडी दरवाज्यातून जातो. याचा वरचा भाग एका महाप्रचंड दगडावर वसलेला आहे, तेथे जाण्यासाठी सरळसोट दगडी जिना लागला, तो चढून आम्ही एक पुलावर आलो, हा पूल मुख्य बालेकिल्याला जोडणारा होता. पुलाच्या खाली खोल खंदक आहे . पूर्वी हा पूल लाकडी होता.

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आम्ही एकदाचे माथ्यावर पोहोचलो. येथे वर महाल, अन्न धान्याची कोठारे यांचे अवशेष आहेत तसेच येथे एक मंदिरही आहे. थोड्या अंतरावर एक भली मोठी तोफ इतिहासाची साक्ष देत उभी आहे. वरुन  सभोवतालचे विहंगम दृश्य नजरेस पडते. वर थोडी भटकंती व थोडी विश्रांती घेऊन पुन्हा किल्ला उतरण्यास सुरुवात केली. उतरताना आम्हाला सोपे जाईल असे वाटले होते पण तसे काही नव्हते. मोठ्या उंचीच्या पायऱ्या उतरताना गुडघे चांगलेच बोलत होते व तोलही सांभाळताना कसरत करावी लागत होती. जवळजवळ चार तासांनी खाली गाडीपाशी आलो .  त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. एका इतिहासाला  मुजरा करून आल्याचा तो आनंद होता.

  जिंजी  पाहायला दोन दिवस तरी आवश्यक आहेत, कारण तीनही बालेकिल्ले प्रेक्षणीय व ट्रेकचा आनंद देणारे आहेत. येथे किल्ल्याच्या परिसरात संध्याकाळी ५ नंतर फिरता येत नाही तर राजगिरीवर दुपारी ३ नंतर प्रवेश बंद आहे. या ठिकाणी गावात रहायची सोय आहे . तुमची शारीरिक क्षमता आजमावणारा , तुम्हाला ट्रेकचा आनंद देणारा व दैदिप्यमान इतिहासाची  सफर घडवणाऱ्या जिंजीला  नक्की भेट द्या .

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleकोरोना लस:आपत्कालीन वापराची परवानगी कशी मिळते ?
Next articleगोष्टीवेल्हाळ नानीची नात : म्होनबेनी एजुंग (नागालँड)
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here