जेव्हा महाराष्ट्र महाराजांचाच पराभव करतो

-माणिक बालाजी मुंढे
… ……………………………………
काल महाराष्ट्रानं स्वत:चा आत्मघात करून घेतला. म्हणजे हे सरकार कायम इलेक्शन मोडवर असतं, त्यांना लोकांच्या सोयीसुविधांचा काही पडलेलं नाही अशी टिका केली जाते, त्यानं एक चांगला निर्णय घेतला पण काही मुठभर ठेकेदारांनी त्यालाही हरताळ फासला. त्यात माध्यमातल्या इतिहासकारांनी तलवारी हाती घेतल्या. मग तर आगडोंब उसळला. नंतर नंतर तर काही संघटना, नेत्यांनी तो जातीय मुद्दा केला.

काही टवाळखोर तर फडणवीसांच्या बायकोचे फोटो फेसबुकवर टाकून ‘भाड्याने देऊन’ मोकळे झाले. शिवभक्त जे काही सोशल मीडियावर बोलत होते ते जर शिवाजी महाराजांनी ऐकलं असतं तर ह्यांच्या जीभेवर कोळसा ठेवला असता. अमोल कोल्हेंसारख्या ‘पडद्या’वरच्या महाराजांनी स्वराज्याचा अंगरखा कधी उतरला आणि राष्ट्रवादीच्या मतांचा सदरा कधी चढवला हेही कळू दिलं नाही. खासदार संभाजीराजे भोसले तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. शेवटी सरकार होरपळलं. बॅकफुटवर गेलं. हे सगळं करत असताना आपण महाराजांचाच पराभव करतोय, त्यांनी निर्माण केलेल्या वैभवाला अडगळीतून काढण्याची संधी गमावतोय असं कुणालाच वाटलं नसेल? नक्की वाटलं असणार पण तटस्थ, शांत राहाणं हे काहींना शहाणपणाचं वाटतं जे कायम लुटारूंच्या पथ्यावर पडलेलं आहे.

सरकारचा निर्णय काय होता? राज्यातले अ गटातले किल्ले वगळता इतर सगळे किल्ले हॉटेल्स, लग्नसमारंभ अशा विधींसाठी भाडेतत्वावर द्यायचे. पहिल्या गटात पंचवीस एक किल्ले आहेत जे शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होते. इतर 300 किल्ले आहेत जे राज्याच्या इतर भागात पसरलेले आहेत ज्यांचा याच्याशी संबंध नाही. सरकारनं उशिरा स्पष्ट केलं की मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांना ‘नख’ही लावलं जाणार नाही. मला वाईट ह्याचं नाही वाटलं की सरकारनं असा कसा निर्णय घेतला, ह्याचं वाईट वाटलं की त्यांनी शिवरायांचे किल्ले ह्यातून वगळले. हे म्हणजे आधीच वार्धक्यानं जरजर झालेल्याला हॉस्पिटलला नेण्याऐवजी मरायला सोडून दिल्यासारखं.

फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा होता? कसा ? तथाकथित शिवभक्तांचं म्हणनं असं की महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गड किल्ल्यांवर लग्न, पार्ट्या, हॉटेल्स कशी? हे म्हणजे ‘पेशवे’ असलेल्या फडणवीसांची ‘अपवित्र’ मोहीम आहे. आमच्या भावन त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. ठिकंय. पण हे सगळं का नको? महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेस तिथंही त्यांचा पदस्पर्श झाला असणार, 4 दिवस सुरत लुटली जात होती, शेवटी महाराजांकडे 9 हजार घोडी होती म्हणतात, तेव्हा आता सुरत शहरच सगळं बंद करावं का? मोदींना सांगावं तिथं एकही हॉटेल झालं नाही पाहिजे, लग्नसमारंभ नको, बार वगैरेचं तर नावच नको. का तर महाराजांची पावलं इथं फिरलेली आहेत. चालेल ? तेवढ्या एका मागणीसाठी संभाजीराजे भोसले मोदींनी दिलेली खासदारकी सोडतील? शिवाजी महाराजांचा तुळजापूर, पुणे, रायगड, सिंधूदुर्ग अशा ठिकाणीही पदस्पर्श झाला असणार, तिथंही यातलं काहीच नको असं आपण म्हणू?

गड किल्ल्यावर लग्न वगैरे करणं एवढंच ‘पाप’ अपवित्र असेल तर मग मंदिरात, देवासमोर आपण हे सगळे विधी करतोत, खुद्द नवऱ्याला नवर’देव’ म्हणतो त्याचं काय करायचं? गडकिल्यावर हॉटेलिंग, दारू पार्ट्या करणं एवढच वाईट असेल तर मग कायम ‘घोड्या’वर असणाऱ्या खुद्द उदयनराजेंचं काय करायचं? आपण त्यांना एवढी वर्षे निवडून देऊन खुद्द शिवाजी महाराजांचा तर अपमान करत नाहीत ना?

कुणी तरी म्हटलंय की सरकारनं ह्या सगळ्या किल्ल्यांचा बाजार मांडलाय. अगदी बरोबर. पण बाजार वाईट असतो? तसं असेल तर शिवरायांच्या काळातही अनेक किल्ल्यावर बाजार भरायचा, रायगडावरही तो असायचा. सूर्यास्ताला तो बंद व्हायचा. म्हणूनच तर हिरकणीला स्वत:च्या लेकरासाठी गड उतरून जावं लागलं ना?आपल्याकडे गावा गावात भरणारे आठवडी बाजार वाईट आहेत?

मी महाराष्ट्रातले बहुतांश महत्वाचे किल्ले पाहिलेत. त्यात शिवनेरी, सिंहगडाची तर किती तरी वेळा ट्रेकिंग झालीय. महाराष्ट्रात जर सगळ्यात वाईट हालत कशाची असेल तर ह्या ऐतिहासिक वास्तुंची. सगळीकडे झालेली पडझड, कुठे पाण्याची सोय नाही, शौचालय नाही, असेल तर पाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही, काही ठिकाणी तर दिवसा कुणी वाटमारी करून लुटून जाईल याचा भरोसा नाही अशी स्थिती. रात्री तर भुताटकी. ठिकठिकाणी दारू-बिअरच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच. ही अवस्था पुणे-मुंबई-नाशिक अशा महानगराजवळच्या किल्ल्यांची.

जे 300 किल्ले सरकार म्हणतंय ब गटातले, त्यांची अवस्था तर विचारूच नका. आमच्याकडे धर्मापुरीचा किल्ला आहे. त्यात सैराटपेक्षा भारी अशी विहीर आहे, जवळच भव्यदिव्य असं हेमाडपंथी मंदीर आहे. पण स्थिती काय आहे माहितीय? अख्ख्या गावाची घाण कुठं असेल तर ती किल्ल्याच्या आसपास. मंदीराची पडझड झालीय. अहो, पानिपतच्या लढाईला जिथून मराठे मोहीमेवर निघाले त्या उदगिरच्या किल्ल्याची काय अवस्था आहे माहितीय? मी गेलो होतो त्यावेळेस लोकांनी तिकडं जागोजागी केस काढून टाकलेले होते. अशीच स्थिती थोड्या फार प्रमाणात इतर गड किल्ल्यांची आहे. प्रश्न असाय की सरकारला हे दिसत नसेल का? म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवार, विलासराव देशमुखांपर्यंत एकालाही याचं वाईट वाटत नसेल ? मला खात्रीय सगळ्यांनाच हे कळत होतं. त्यांनाही वाईट वाटत असणार पण करणार काय? ह्या अडगळीत पडलेल्या वास्तू पोसणं वाटतं तेवढं सोप्पं आहे?

एका घराचं मेन्टन्स दर महिन्याला द्यायचं तर जीव मेटाकुटीला येतो हे एवढे किल्ले सरकार व्यवस्थित कसे सांभाळणार? हे सगळं सरकारनं करावं असं म्हणनं सोप्पं आहे. बरं असं म्हणणारे स्वत:चा पिढीजात आलेला चिरेबंदी वाडा तरी सांभाळू शकलेत का? साधा ग्रामपंचायतचा घराचा कर द्यायला काचकुच करणार आणि सरकारला म्हणणार की हे किल्ले सांभाळा ? कसं काय? बरं सरकार म्हणजे कोण? ते काय नोटा छापणार आहेत का? शेवटी ते उठतील आणि आपल्या मानगुटीवर आणखी एक सेस लावतील. म्हणतील सांभाळा किल्ले?

मग पर्याय काय? पर्याय एकच. ह्या किल्ल्यांना पर्यटनस्थळं बनवनं. काही वर्षापुर्वीपर्यंत ह्या किल्ल्यांना बघणं जिथं जाणं वगैरे इथपर्यंतच लोकांचा अपेक्षा होत्या. त्या पूर्णही झाल्या. आताचं पर्यटनही बदलून गेलंय. लोकांना फक्त बघायचं नाही तर जगायचंही आहे. त्यासाठी लोकं दुबई, थायलंड, सिंगापूर, मालदीवच्या पुढं जात आता फ्रान्स, इटली, यूरोप असं सगळीकडे फिरतायत. जगतायत. त्यासाठी लाखो रूपये खर्च करतायत. अंबानीच्या लेकरांचं लग्न असो की विराट-अनुष्का, दिपीका-रणवीरचं लग्न हा त्याचाच भाग. किंवा प्रियंकानं राजस्थानच्या किल्ल्यावर निकशी गाठ बांधणं सगळं नव्या जगण्याचा भाग आहे. ह्या लोकांनी कोट्यवधी रूपये खर्चून हे सगळे उद्योग केले. तो पैसा कुठे गेला? तिकडच्या ऐतिहासिक वास्तूवरच ना ? पृथ्वीराज चौहानांच्या वंशजांना ऐतिहासिक वास्तू हॉटेल, वेडींग डेस्टिनेशनसाठी देताना फार आनंद झाला असेल? पण काळाची पावलं त्यांनी ओळखले, त्यांना झळाळीच मिळाली ना?

अनेकांनी काल म्हटलं की, सरकारने तिकडे शौचालयाची व्यवस्था करावी, इतिहासाची माहिती फलक लावावे, वीज-पाण्याची व्यवस्था असावी. काहीही हरकत नाही. हे सगळं व्हायलाच हवं. एक वेळा ते उभं राहिलही पण चालणार कसं ? अहो उन्हाळ्यात सार्वजनिक शौचालयानं तीन रूपयांऐवजी पाच रूपये केले तर कचकच करणारे आपणच ना? माहिती फलक वाचायचाय का ? महाराजांची मुळ पत्रं, दस्ताऐवज तर सोडाच पण साधा अभ्यासक्रमातला त्यांचा धडा किती शहाण्यांनी वाचला आणि लक्षात ठेवला? हे सगळं शाळेतल्या पोरांना शिकवायचं म्हणून ठिक आहे पण वास्तव वाटतं तेवढं सोप्प नाही. उद्या जर सरकारनं सांगितलं ना आतापासून हा सिंहगड तुमच्या मालकीचा. आपण काय करू?

बरं एकीकडे म्हणायचं तरूणांनो उद्योग धंदे करा आणि दुसरीकडे उद्योग धंद्यांच्या शक्यता अशा मारून टाकणार? गड किल्ल्यांवर लग्न लागली, हॉटेल्स झाली, रहाण्याची, खाण्याची सोय झाली तरच आपण तिकडं मुक्कामाला जाऊ-राहाऊ ना ? नाही तर सगळे लोक गोव्याला कशाला गेले असते? गोव्याला जातात कारण तिकडं वाईन, हॉटेल्स, पार्ट्या सगळं उपलब्ध आहे म्हणून ना? तिथंही शेकडो वर्ष जुनी चर्च आहेत, त्यांनी म्हटलं असतं की हे देवाचं घर आहे, प्रवेश मिळणार नाही, अपवित्र होईल तर तुम्ही तिकडे गेला असता? पैसा खर्च केला असता? ती वास्तू आता जशी सुस्थितीत आहे तशीच राहीली असती? तिकडे लाईट, रस्ते, सुखसुविधा असं सगळं असतं? आपल्या अशाच अगाध ज्ञानामुळे तर कोकणाचा साधा आपल्याला गोवासुद्धा करता आलेला नाही ना ? बरं त्या राजस्थानमध्ये किल्ले म्हणजे प्रचंड मोठ्या वास्तू तरी आहेत, आपल्याकडे देवगिरीचा किल्ला आणि इतर काही समुद्र किल्ले वगळता आपले किल्ले म्हणजे उंच उचं डोंगर त्यावर एखादच छोटसं बांधकाम ह्या पलिकडे काय आहे? फक्त महाराजांच्या थरारक मोहीमांची पुण्याईच ना?

फक्त राजस्थान, गुजरात इथलेच नाहीत तर जगभरातल्या ऐतिहासिक वास्तू ह्या फक्त टिकून आहेत त्याचं कारणच त्या उद्योग, पर्यटन, हॉटेलिंगसाठी उघड्या केल्या म्हणून. खुद्द ब्रिटनच्या राणीनं, जिच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता तिनं तिचा महाल पब्लिकसाठी उघडा केला तेव्हाच तो लोकांपर्यंत पोहोचला. सीएसएमटीच्या वास्तूत लोकल आहे, बीएमसीच्या इमारतीत महापालिका म्हणूनच तर टिकून आहेत ना ? काँग्रेसनं काल सरकारवर टीका केली पण त्यांचेच आमदार मधूकर चव्हाण यांच्या प्रयत्नानं नळदुर्गचा किल्ला प्रायव्हेटला दिला गेलाय. बघा त्याचा कायापालट झालाय की नाही? नाही तर तिथं लोकांना नेऊन खपवण्यासाठी चांगली जागाय म्हणायचे. माझं असं म्हणनं नाही की लगेच उद्यापासून किल्ल्यांवर उन्माद होऊ द्या पण काही योजना आखून त्यांना जीवदान देण्यासाठी हे सगळं करायला काय हरकत आहे?

हे सगळं सोडा, जर आपले पूर्वज अशाच पवित्र, अपवित्रतेच्या, दांभिक नैतिकतांच्या सोवळ्या ओवळ्यात अडकले असते तर त्यांचं साम्राज्य अफगाण-पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेल्या अटकपासून ते पूर्व भारतातल्या कटक आणि खाली दक्षिण भारतात तंजावूरपर्यंत पसरलं असतं का? एवढ्या भिन्न जाती, धर्म, भाषा, खान-पान, धारणा, प्रेरणा अशा सगळ्यावर मात करत ते वेळेनुसार बदलत राहीले नसते तर काळावर नाव कोरू शकले असते? श्रद्धा ठिक आहे पण अंधश्रद्धा माणसाला आंधळी बनवते. लक्षात असू द्या न बदलणाऱ्यांना काळ पोटात तर घेतोच पण त्याची कळही तो येऊ देत नाही.

(लेखक TV 9 मराठीचे कार्यकारी संपादक असून त्यांच्या ह्या लेखाचा चॅनलशी संबंध नाही)

98339 26704

Previous articleअरे, ते मोदी कुठे आणि तुम्ही कुठे!
Next article‘चांद्रयान-2’ मोहीम-Journalism vs Jingoism (अंधराष्ट्रवाद)
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.