जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. !

-विजय चोरमारे

शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण लढाई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी कष्टक-यांच्या बळावर एकट्यानं लढवली. लढाई सुरू झाली तेव्हा ती जिंकण्यासाठी नव्हतीच मुळी, ती केवळ अस्तित्वासाठी होती. परंतु हरणारी लढाईसुद्धा कशी जिंकायची असते आणि जिंकल्यानंतरही किती संयमानं आगेकूच करायची असते याचा वस्तुपाठच पवारांनी घालून दिला. मर्यादित साधनसामुग्रीत आणि प्रतिकूल परिस्थितीतही लढाई कशी लढायची असते, हेही पवारांनी दाखवून दिलं. राजकारणातले नवे भिडू, भविष्यात राजकारणात येण्याची स्वप्नं पाहणारे तरुण, राजकीय कार्यकर्ते, राजकारणाचे अभ्यासक, पत्रकार अशा सगळ्यांचं प्रशिक्षण करणारा हा कालखंड होता. अर्थात या कालखंडातले समारोपाचे धडे अजून बाकी आहेत. आणि शरद पवार तेही नीटपणे घटवून घेतील, यात शंका वाटत नाही.

महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं, अशी बहुतेक प्रसारमाध्यमांची, त्यांच्या धुरिणांची इच्छा होती. अजूनही ती असावी. त्यामुळंच होऊ घातलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडीत बिघाडी निर्माण होतेय, अशी वातावरणनिर्मिती करणा-या बातम्या बारा तासात किंमान पंधरा वेळा दाखवल्या जातात. माध्यमातल्या माणसांनी जे राजकारण घडतंय त्यावर आपलं मतप्रदर्शन करायचं असतं. घडणा-या घटनांवरून भविष्यातल्या घटनांचे अंदाज बांधायचे असतात, परंतु भविष्यकथन करायचं नसतं. माध्यमांत काम करणारीही माणसंच असतात, त्यामुळं हे अंदाज बांधताना त्यामध्ये `विशफुल थिंकिंग`चा भाग असणं स्वाभाविक असतं. परंतु आपण राजकारणाला वळण देऊ शकतो, असा जो काही अविर्भाव असतो त्याच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या `मी पुन्हा येईन`च्या आरोळीत गुणात्मक फरक काहीच नसतो.

यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण आहे. यशवंतराव चव्हाण पुन्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये परत जाण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. यशवंतरावांचा निर्णय असल्यामुळं राज्यातलं वातावरण गरम होतं. वृत्तपत्रांतून त्याची चर्चा होत होती. अग्रलेख लिहिले जात होते. एक नामवंत संपादक यशवंतरावांच्या काँग्रेस प्रवेशाच्या खूपच विरोधात होते. कोल्हापुरात सर्किट हाऊसवरच्या खोलीतल्या बैठकीत एका कार्यकर्त्यानं यशवंतरावांचं त्याकडं लक्ष वेधलं. तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये, असं अमूक अमूक संपादकांचं म्हणणं आहे, ते त्यावरून तुमच्यावर टीका करताहेत वगैरे वगैरे. त्यावर उसळून यशवंतराव म्हणाले होते, `ते संपादक जे काही लिहितात त्यानुसार मी राजकारण करीत नाही, तर मी जे राजकारण करतो त्यावर त्यांनी लिहायचं असतं.` ही घटना सुमारे पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची. त्यावेळी चार-दोन संपादक असतील. आज फिल्डवरचे दोन डझन पत्रकार, डझनभर राजकीय विश्लेषक, तेवढेच संपादक अशी सगळी मंडळी राजकारणाला वळण देणा-याच्या भूमिकेत असल्यासारखी वावरत असतात. अनेकांना घडलेल्या घटनांचा अर्थ नीट उलगडत नाही,
ब-याचजणांना आपल्या सोयीनुसार घटनांची मांडणी करून गोंधळ उडवून द्यायचा असतो तर काहींचे हितसंबंधांचे राजकारण सुरू असते. काहीही असले तरी यातल्या बहुतेकांची इच्छा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशीच होती आणि आजही आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या इच्छेनुसार आजचे राजकारण चाललेले नाही. विधानसभेच्या निकालापर्यंत ब-यापैकी त्यांच्या इच्छेप्रमाणं चाललं होतं. पण भारतीय जनता पक्ष शंभरच्या पुढेमागे रेंगाळला, काँग्रेस आघाडीनं शंभरीकडं झेप घेतली तिथून पुढं सारं बिघडत गेलं.

भाजपनं शिवसेनेचा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा दावा झिडकारल्यानंतर तर अनेकांची घालमेल वाढली. एरव्ही नेत्यांच्या खरेखोटेपणासाठी बाईट्सचा आधार घेणा-या मंडळींनी `पद आणि जबाबदा-यांचे समान वाटप करण्याची` ग्वाही देणारा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओच दाबून टाकला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारपरिषदेतही कुणी त्यांना `पद आणि जबाबदा-यांचे समान वाटप` या विधानाचा अर्थ विचारला नाही. अर्थात भाजप आणि शिवसेनेने परस्पर सामंजस्याने सत्तावाटप केले असते तर काहीच प्रश्न नव्हता. उलट महाराष्ट्राला अधिक स्थिर सरकार मिळू शकले असते. दुर्दैवाने अहंकार आड आले. आपल्या तीस वर्षांच्या सहकारी पक्षाचा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा हट्ट भाजप पुरवू शकला नाही. परिणामी युतीचे फाटले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीची चर्चा पुढे निघाली आहे. आजच्या घडीला आघाडी बनण्याची शक्यता ठळक बनली आहे. सत्तास्थापनेपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होतो, हे पाहणेही कुतुहलाचे आहे.
या सगळ्या प्रक्रियेत दिसून आलेली ठळक बाब म्हणजे काँग्रेस हा एकाचवेळी संन्याशांचा आणि लोभीजनांचाही पक्ष आहे. महाराष्ट्रात निवडणूक प्रचार सुरू होता, तेव्हा दिल्लीतून काळे कुत्रे महाराष्ट्रात फिरकले नव्हते. कुणालाच निवडणुकीचे आणि महाराष्ट्राचेही देणेघेणे नव्हते. निवडणुकीनंतर अजून त्यांनी विधिमंडळ पक्षनेता निवडलेला नाही यावरून त्यांच्या निष्क्रियतेची कल्पना येते. एरव्ही ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नव्हती, परंतु सत्तेत जायचे म्हटल्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी लगबग सुरू झाली आहे, त्यांचा स्वाभिमानी बाणा जागा झाला आहे आणि आपल्या पक्षाच्या राष्ट्रीयत्वाचा अभिमान वाटू लागला आहे त्याला तोड नाही. एकीकडे असा पक्ष आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्ववादाचा उथळ खळखळाट यांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याची कसरत शरद पवार यांना करायची आहे. पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे, कारण त्यांना ठाऊक आहे की हीच ती वेळ आहे आणि हीच महाराष्ट्राची इच्छा आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली, त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचाच अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तो मान्यही केला असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक आमदार असल्यामुळेही शिवसेनेचा दावा बळकट ठरतो. शिवसेनेने प्रस्ताव पाच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा मांडला असला तरी तडजोड अडीच वर्षांवरच करावी लागेल. कारण १०५ विरुद्ध ५६ असे आकडे असताना अडीच वर्षांचा दावा करणा-या शिवसेनेला ५६ विरुद्ध ५४ अशा आकडेवारीमध्ये ५४ वाल्यांचा दावा नाकारता येणार नाही. शिवाय ही सरकारची सर्कसही या ५४ वाल्यांमुळेच आकाराला आली आहे, तेव्हा ते आपला न्याय्य वाटा सोडणार नाहीत. तिन्ही पक्षांना परस्परांचा विश्वास मिळवत, एकमेकांना विश्वास देत, भूमिकांचा सन्मान राखत पुढे जावे लागणार आहे. त्यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळू शकेल. परस्पर अविश्वासाची भावना आणि फालतू अहंकार कुरवाळत राहिले तर त्यातून मनोरंजनाशिवाय काहीही साध्य होणार नाही.

हे सगळे सुरू असताना माध्यमांतील चर्चांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे जावे लागणार आहे. कारण आजच्या घडीला तिन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे, अविश्वासाची भावना वाढीस लावण्याचे काम प्रसारमाध्यमांच्याकडून निश्चितपणे केले जाईल. हे सगळे घडत असताना ज्या काही बातम्या येत आहेत, त्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस समर्थकांची चिंता वाढवणा-या आहेत. सरकार भाजपशिवाय बनू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कालपासून सांगत आहेत. त्यांच्यामागून `जिओ मेरे लाल` असा आवाज येऊ लागला आहे. उद्योगक्षेत्रातील काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे आणि युतीचे सरकार सत्तेत यावे यासाठी या शक्तींनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेला विचलित करण्यासाठी प्राप्तिकर विभाग सक्रीय झाल्याच्या बातम्या येत आहेत. सगळे नीट जुळून येईल, असे वाटणा-यांच्या मनातसुद्धा या बातम्या धाकधूक निर्माण करीत आहेत. आणि अशा परिस्थितीत सगळ्यांच्या नजरा पुन्हा शरद पवार यांच्याकडे लागल्या आहेत. ईडीच्या प्रकरणात नाव आल्यानंतर महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, असे आव्हान शरद पवार यांनी दिले होते. आणि उद्धव ठाकरे यांनीही युती तोडताना त्याचाच पुनरुच्चार केला होता. त्याअर्थाने पाहिले तर स्वाभिमानी महाराष्ट्राची दिल्लीच्या सत्तेच्या विरोधातली ही निकराची लढाई आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही, हे जसे ठणकावून सांगितले त्याचप्रमाणे कुठल्या धनदांडग्या शक्तीपुढेही महाराष्ट्र झुकणार नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आर्थिक हितसंबंध कस्पटासमान असतात हे सांगण्याची ही वेळ आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर यावे, हीच आजची महाराष्ट्राची इच्छा आहे आणि शरद पवारच हे घडवू शकतात यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. सरकार बनवणे सोपे असले तरी ते चालवणे तेवढे सोपे नाही हे शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला ठावूक आहे. त्याचमुळे कोणतीही घाई न करता ते शांतपणे पावले टाकत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून त्यांनी जो प्रवास सुरू केला, त्याचा अत्त्युच्च अविष्कार घडल्याचे अनेकदा वाटले. परंतु शरद पवार यांच्यादृष्टीने कोणत्याही भावनिक गोष्टीपेक्षा हा अविष्कार निर्णायक स्वरुपातील असायला हवा. आणि सत्तेची स्थापना होण्याएवढे निर्णायक दुसरे काही असू शकत नाही. तीन वेगवेगळे पक्ष एकत्र येत असल्यामुळे आणि त्यातही काँग्रेस व शिवसेना हे भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येत असल्यामुळे सगळ्या गोष्टी नीटपणे ठरवायला वेळ लागणार आहे. आणि आधी जेवढा अधिक वेळ लागेल तेवढे भविष्यात सरकार चालवणे सोपे जाणार आहे.

मधल्या काळात ग्रामीण महाराष्ट्राची घडी विस्कटून गेली आहे. शेतक-याला दिलासा वाटेल किंवा जगण्याला आधार वाटेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. शिक्षण, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये गोंधळ घालून ठेवले आहेत. सत्तेशिवाय ही परिस्थिती दुरुस्त करता येणार नाही याची जाणीव शरद पवारांना आहे.

वयाच्या ७९ व्या वर्षी पवारांनी स्वतःला पणाला लावून, अथक परिश्रमातून जे मिळवलं आहे ते त्याच दिमाखानं टिकवण्याची आणि त्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याची, महाराष्ट्राच्या कल्याणाची जबाबदारी अनुयायांची आहे. सत्ता राबवणा-या आघाडीतील सहका-यांची आहे.
व्यक्तिशः शरद पवार यांना कमावण्यासारखे काहीच राहिलेले नाही. जे आहे ते फक्त गमावण्यासारखे आहे आणि तेच कसोशीने जपण्याची गरज आहे.

(लेखक महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

95949 99456

Previous articleबात सजदो की नही …
Next articleसत्तेच्या साठमारीत जनहित ही अफवा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.