जोतिबा फुले यांची महती प्रबोधनकारांच्या शब्दांत

-कामिल पारखे

माझ्या पिढीतल्या लोकांना १ ऑगस्ट म्हटलं की लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आठवणार. कारण या दिवशी शाळांत टिळकांवर वक्तृत्व स्पर्धा असायची. मी सुद्धा एकदा या वक्तृत्वस्पर्धेत पहिल्यांदा (आणि अखेरीस) भाग घेतला होता. टिळकांना त्याच्या हयातीत लोकमान्यता मिळाली. त्या तुलनेत अनेक इतर सामाजिक आणि राजकीय पुढारी तसे दुलर्क्षित राहिले. टिळकांचे न. चिं. केळकर लिखित खंडात्मक चरित्र १९२१ साली म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर एका वर्षात प्रसिद्ग झाले.

महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र पंढरीनाथ सीताराम पाटील लिखित चरित्र १९२७ साली, जोतिबांच्या निधनानंतर चार दशकांनी प्रसिद्ध झाले. महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरवातीलाच लिहिले गेले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले गांधीजींचे हे चरित्र १९१८ साली प्रसिद्ध झाले होते आणि या चरित्राला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना होती.

गोव्यात मी मुंबई विद्यापिठाचा बीएचा आणि एमचा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असताना टिळकांचे गीतारहस्य ग्रंथातील भगवद्गीतेतील अठरावा आध्याय मला अभ्यासाला होता. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या माझ्या अभ्यासात जोतिबा फुले यांच्या विचारांची कधीच गाठभेट झाली नाही.

धनंजय कीर यांनी लिहिलेले जोतिबा फुले यांचे पहिले समग्र चरित्र १९६७ साली प्रसिद्ध झाले, कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला शब्द पाळून हे चरित्र लिहिले असे कीर यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लिहिले आहे. नाही तर जोतिबांचे कार्य आणि विचारधन लोकांपर्यंत पोहोचायला आणखी काळ लोटला असता. मात्र जोतिबा फुले यांना `राजकीय विचारवंत’ हा दर्जा देण्यास खुद्द कीर यांनीच आखडता हात घेतला आहे, तसे त्यांनी लिहिले आहे. जोतिबा फार तर सामाजिक कार्यकर्ते होते असा कीर यांचा सूर आहे.

महात्मा फुलेंच्या महानतेकडे दुर्लक्ष करण्याच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात त्यांच्या विचारधनाकडे दुर्लक्ष झाले आणि केवळ शहरांत आणि गावोगावी भाजीमंडईंना त्यांचे नाव देऊन, पुतळा उभारून त्यांची उपेक्षा केली गेली. जोतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या कार्याची महती जगाला पटायला खूप कालावधी लागला. अजूनही या दोन महान व्यक्तींची समग्र म्हणावी अशी चरित्रे लिहिले गेली नाहीत.

सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील सिंथिया फरारबाई आणि पुण्यात आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंना अद्यापनाचे पदवी शिक्षण देणाऱ्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांचे चरित्र अभ्यासताना ही उपेक्षा मला प्रकर्षाने जाणवली.

जोतिबा किंवा सावित्रीबाई यांची विविध चरित्रे लिहून झाली आहेत, मात्र जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे शिक्षक आणि प्रेरक असणाऱ्या स्कॉटिश मिशनतर्फे पुण्यात शाळा चालवणाऱ्या जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि त्यांचे सहकारी जॉन मरे मिचेल यांचा नामोल्लेख या चरित्रांत क्वचितच आढळतो.

असे का व्हावे. जोतिबांना एक दृष्टे विचारवंत, तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक म्हणून लोकमान्यता मिळायला इतका उशीर का लागावा ?

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा सोमवार, नोव्हेंबर २० ला पन्नासावा स्मृतिदिन आहे. महात्मा जोतिबांच्या कार्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे याबद्दल प्रबोधनकारांनी खूप आधी म्हणजे १९२५ सालीच संताप व्यक्त केला होता. धारदार लेखणी हे प्रबोधनकारांची वैशिष्ट्य होते.

महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या हरी नरके संपादित `आम्ही पाहिलेले फुले’ या ग्रंथात खालील लेख समाविष्ट आहे. त्यावरून प्रबोधनकारांच्या धारदार लेखणीचे दर्शन होते. ( महात्मा फुले यांचा पुण्यात पुतळा उभारण्याचा ठराव पुणे नगरपालिकेत फेटाळला गेला होता त्याचा संदर्भ पहिल्या वाक्यात आहे.)

“जेध्यांच्या ठरावाला हाणून पाडायला व फुल्यांची निंदा मनसोक्त करायला त्यांच्याच जातभाईपैकी काही ‘मांजराच्या डावल्या त्यांनी पुढे आणल्या. म्युनिसिपालिटीत ब्राह्मणेतरांची बहुसंख्या असताना ठराव का हो नापास होतो ? म्हणून पृच्छा करणारांपैकी बरेच अजागळ व पुष्कळ लुच्चे असतात. लुच्चांना खरी मख्खी माहीत असते. आजपर्यंत कोणत्या लहान मोठया पापात कोब्रांनी प्रत्यक्ष भाग घेतला आहे? हंडी आपण शिजववायाची, पण फोडावयाची मात्र भलत्याकडून! आपण स्वच्छ नामा निराळे !! शपथेला मोकळे!!!

खरा सुधारक हा जवळ जवळ बंडखोरच म्हणला तरी चालेल. त्याचे बंड रुढींच्या विरुध्द असते. त्याचा मारा प्रचलीत लोककल्पनांवरच असल्यामुळे लोकमान्यतेचा तो प्रथम संन्यास करून कडव्या निश्वयाने कार्यक्षेत्रात उडी घेतो, अर्थात लोकांना तो अप्रिय असतो. त्याचे सत्यशोधन लोकांच्या अनादरास पात्र होते. त्याला कर्तव्याची चाड असते, लोकजागृतीची तळमळ असते, सत्यावर त्याचा अढळ विश्वास असतो, पण तो कोणाच्या अभिप्रायाची पर्वा बाळगीत नाही. त्यामुळे ज्यांच्या कल्याणाविषयी तो झगडत असतो, तेच त्याला अतोनात विरोध करतात. त्याचा छळ करतात. वेळी त्याचा प्राणही घेतात. जोतीराव फुले या उच्च समाजसुधारक कोटीतले महात्मा होते.
ते टिळकांप्रमाणे बी.ए.एलएल. बी. नसले तरी हिंदुसमाज व धर्मात त्यांनी कितीतरी पट श्रेष्ठ कामगिरी केलेली आहे. ते लोकमान्य झाले नाहीत; हीच त्यांच्या श्रेष्ठ कर्तव्याची साक्ष आहे. लोकमान्य होणे सोपे, पण जोतीरावांचे एकादे मत नुसते प्रतिपादन करणे फार कठीण. लोकमताला वळण देण्याचे काम लोकमान्यतेच्या भरी पडणाऱ्यांच्या हातून जगात आजपर्यंत घडलेले नाही. आणि हे काम करणारे लोकहितवादी, भागवत, आगरकर, कर्वे, शिंदे, शाहू छत्रपति वगैरे सुधारक लोकक्षोभाला बळी पाडल्यावाचून राहिले नाहीत.

जोतीराव बोलून चालून कड़वा सुधारक. त्याला कसली लोकमान्यता? आणि त्याच्या अस्तित्वाची तरी कोण दाद घेतो? आपला आजा कोण होता हे नातवाला सुध्दा भाडोत्री भटजवळून शिकण्याचा प्रसंग तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहित असणार? भटांजवळून शिकण्याचा प्रसंग, तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहीत असणार?”

[`प्रबोधन’, सप्टेंबर १९२५ प्रबोधनकार ठाकरे संपादक]

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleबबनराव ढाकणे नावाचं वादळ
Next articleएव्हरग्रीनच्या पलीकडे – देव आनंद
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.