-“झिम्मा”-प्रत्येक स्त्रीने पाहायलाच हवा असा चित्रपट

-सानिया भालेराव

तसं खरं तर या चित्रपटावर लिहायला जरा उशीरच झाला आहे कारण चित्रपट रिलीज होऊन तसे दोन एक आठवडे झाले आहेत पण आयुष्यातल्या कित्येक गोष्टींना कधीकधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होतो आणि हीच काहीशी या चित्रपटाची थीम असल्याने उशीर झाला तरीही चलता है असं मानून आज लिहायला घेते आहे. हेमंत ढोमे हा अत्यंत गुणी नट आणि त्याने दिग्दर्शित केलेला “झिम्मा” हा चित्रपट पाहत असतांना प्रत्येक स्त्रीला एखाद्या तरी सीनला, बिटला आपल्या खुर्चीवरून उठून एकदा तरी झिम्मा खेळून घ्यावा असं वाटलं नसेल तर नवल… हेच दिग्दर्शकाचं यश..

चित्रपटाची गोष्ट फिरते सात वेगवेगळ्या वयातल्या, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विसावलेल्या, अडकलेल्या, गुंतलेल्या सात स्त्रियांवर.. ज्या फॉरेन टूरसाठी एका टुरिंग कंपनीसोबत सफर करायला निघतात. त्यांचा गाईड म्हणजे सिद्धार्थ चांदेकर.. त्याच्या घरी असते आई, आजी आणि बहीण.. सो घरी सतत बायकांच्या कटकटीने त्रस्त आणि आता पहिल्या इंटरनॅशनल टूरसाठी पण बायकांच्या घोळक्यात अडकेलला नव्या पिढीचा सो कॉल्ड कुल ड्युड असा टुरिंग गाईड सिद्धार्थ…ही भूमिका त्याने परफेक्ट पकडली आहे..तो दिसतो छान, हसतो गोड आणि या सगळ्यांसोबत त्याचा स्वतःचा असा एक इंटर्नल प्रवास सुद्धा घडतो, जो फार गोड आहे.. तसंच त्याच्या सोबत असलेल्या या सात स्त्रियांचा अनोळखी शहरातला ओळखीचा वाटणारा लोभस प्रवास..

झिम्माची गोष्ट सांगत बसण्यासारखी नाहीये.. ती अनुभवायची आहे.. तुम्हाला जर वाटत असेल की सात बायका ज्या एकमेकींना ओळखत नाही त्या परदेशात प्रवासाला जातात म्हणजे यात टिपिकल रडूबाई अलका कुबल ते फेमिनिष्ठ शबाना आझमी टाईप असे दोन टोकं असणार आणि नेहमीच्या बायकांचं आयुष्य कसं अडकलेलं असतं याच्या क्लिशेड स्टोरीज असणार तर ते तसं या चित्रपटात नाहीये. आणि यासाठी दिगदर्शकाचं कौतूक करायला पाहिजे. यातल्या प्रत्येक नायिकेला काहीतरी प्रॉब्लेम आहेत पण ते फार मेलोड्रॅमॅटिक न करता दाखवल्याने रिलेट करता येऊ शकतात.

यातल्या काही बायका खास लक्षात राहतात.. डोक्यावर पदर घेऊन राहणारी, नवऱ्याला साहेब म्हणणारी मिश्किल अशी निर्मिती सावंत, इंडिपेन्डन्ट आणि नुकतीच एंगेजमेंट झालेली, स्वतःच मत असणारी सोनाली, फॉरेनला मुलं असल्याने त्यांच्याकडे आलं की फक्त घरात मुलं सांभाळणारी एक बाई अशा काहीशा पद्धतीने वागवल्या गेल्याने खट्टू झालेली आणि अतिशय हुशार, जिंदादिल आजी सुहास जोशी व नवरा वारल्याने सैरभैर झालेली , या चित्रपटातलं सगळ्यात मला सगळ्यात जास्तं आवडलेलं करेक्टर उत्तमरीत्या निभवणारी क्षिती… या सगळ्या बायका मनात घर करणाऱ्या…

मुळात बाईला जेव्हा घरातून बाहेर पडायचं असतं नं.. मग ते कामासाठी असो, तिच्या मैत्रिणींबरोबर असो, नुसतं एकट्याने असो.. तेव्हा तिला वेगवेगळ्या पायऱ्या ओलांडून जावं लागत असतं.. अगदी लहान पोराला घरी ठेऊन कामासाठी बाहेर पडतांना मनात येणारा गिल्ट असो, मैत्रिणींसोबत काही बाहेर खात असतांना थोडं घरी पोरांना, सासू -सासऱ्यांना किंवा मग आई वडिलांना हे घेऊन जावं असं वाटणं असो, घरी परतत असतांना उशीर झाला तर छळणारा सेल्फ गिल्ट असो.. बाई या चक्रात कमी जास्त प्रमाणात अडकलेली असतेच.. त्यात जर ती मुळातच संवेदनशील असेल तर ती खपलीच म्हणून समजा कारण ती स्वतःच स्वतःवर अर्धी – अधिक बंधन लादून घेत असते.. आता यात चूक आणि बरोबर असं काहीच नसतं.. प्रत्येकीचं विश्व वेगळं असतं.. आपल्याला उडण्यासाठी किती अवकाश मोकळं आहे हे प्रत्येक स्त्रीला ठाऊक असतं आणि त्यानुसार ती आपल्या पंखांचा आकार कमी करते आणि मनाची समजूत सुद्धा घालते.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात आनंदी राहते आणि जी स्त्री पंख पसरवून उडते आहे तिला डोळे भरून पाहून तिच्या उडण्यातच ही सुद्धा आपला आनंद मानून घेते.. आणि ही थीम झिम्मा या चित्रपटात फार सुरेख पद्धतीने मांडली आहे.. यात नवऱ्या गेल्यावर साधा गुगल मॅप लावता न येणारी, टॉयलेटला जाताना सुद्धा कोणीतरी बरोबर हवं इतकी डीपेंडंट असणारी क्षिती.. पूर्णपणे आत्मविश्वास गमावलेली एक स्त्री.. हे सगळ्यात भावलेलं पात्र..परिस्थितीमुळे मानसिक खच्चीकरण झालं असल्याने दुसऱ्याला सहज वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा आपल्याला येत नाहीत..तेव्हा काय त्रास होतो हे तिने तिच्या अभिनयातून फार सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.. स्वतःचे पाय वाळूत घट्ट रोवून त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा स्पर्श.. आपणही कोणीतरी आहोत, जमू शकतं आपल्याला पाऊल पुढे घेणं.. हा तिला वाटणारा विश्वास.. तिचा स्वतःचा असा एक प्रवास.. जो आपण अनुभवतो तिच्या सोबत.. हा झिम्माचा हायपॉईंट..

एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या, पाय खेचणाऱ्या, उणीदुणी काढणाऱ्या, फक्त गॉसिप करणाऱ्या डेव्हिलिश स्त्रिया आणि त्यांची कारस्थानं यापासून एक तजेलदार ब्रिदर झिम्मा मधल्या या बायका आपल्याला देतात. इंटलेक्च्युअल, भावनिक, आर्थिक अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असली तरीही या स्त्रिया एकमेकींना समजून घेतात.. त्यातल्या काही गोष्टी यांना पटणाऱ्या नसल्या तरीही त्या एकमेकांसाठी उभ्या राहतात .. ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते.. माझंच किती खरं, मी किती स्वतंत्र किंवा मग मी किती समजूतदार हे ठसवत बसण्यापेक्षा.. तू तुझ्या आकाशात विहार कर आणि मी माझ्या.. जमेल तसं जमेल तेव्हा जमेल तिथे आपण काही वेळ बसू.. एकमेकींना समजावून घेऊ.. पुढचा प्रवास करण्यासाठी एकमेकींच्या पंखांना बळ देऊ.. असा विचार करणाऱ्या स्त्रिया ही काळाची खरी गरज आहे.. विचार वेगळे असले तरीही कोएग्झिस्ट करता येणं.. हे आजच्या घडीला स्त्रियांसाठी फार गरजेचं आहे.. आणि हा फील या चित्रपटातून येतो..

पडद्यावर दिसणाऱ्या विरोधाभासावर मनमोकळंपणे हसणाऱ्या स्त्रिया, पिक्चर संपल्यावर एकमेकींना टाळ्या देऊन आपापल्या घरट्याकडे परतत असतांना जेवायला काय करायचं पासून ते मुलीचा अभ्यास घ्यायचा आहे अजून..ही आठवण स्वतःला करून देणाऱ्या स्त्रिया, आज फारच जास्त वेळ गेला बाहेर याचा गिल्ट घेणाऱ्या पण बाहेर जाऊन बरं वाटलं याने सुखावून जाणाऱ्या.. साध्या, सोप्या , आनंदी स्त्रिया.. अशा बायका दाखवल्या गेल्या पाहिजे गोष्टींमधून कारण ‘त्या असतात’.. म्हणून झिम्मा सारखे चित्रपट यायला हवेत..

Maya Angelou यांचा एक फार आवडता कोट आहे.. “Here’s to strong women. May we know them. May we be them. May we raise them.”
यात स्ट्रॉंग म्हणजे काय तर ते प्रत्येकीसाठी वेगळं असणार.. जिथे ती सध्या आहे, तिथून ती काय करू शकते याचा समतोल विचार करून मग जेव्हा स्त्रीला पायरी ओलांडता येईल.. स्वतःसाठी, स्वतःहून घातलेल्या बंधनातून सुटका करता येईल तेव्हा ती कदाचित स्वतःला गवसू शकेल.. स्वतःशी झिम्मा खेळू शकेल..
Cheers to being a woman, finding happiness and Cheers to Jhimma..

 

[email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव – type करा आणि Search वर क्लिक करा.

Jhimma Trailer | झिम्मा |

Previous articleमीडिया वॉच: वाचकांना आनंद आणि ज्ञान-भान देणारा दिवाळी अंक
Next articleएड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.