टिकटॉक सुसाट

-शेखर पाटील

काही दिवसांपुर्वीच मी शॉर्ट व्हिडीओच्या लोकप्रियतेबाबत  माहिती दिली होती. या प्रकारात असणार्‍या व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस् तसेच फेसबुक व इन्स्टाग्रामच्या स्टोरीजला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे आपण सर्वच जण अनुभवत आहोत. तथापि, या सर्व माध्यमांना मागे टाकण्याच्या स्थितीत असणार्‍या एका अ‍ॅपबाबत आज चर्चा करूया. टिकटॉक हे चीनी अ‍ॅप लवकरच फेसबुक आणि व्हाटसअ‍ॅपला मागे टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांना अक्षरश: वेड लावणार्‍या टिकटॉकने आपल्या स्पर्धकांना धडकी तर भरवलीच आहे, पण दुसरीकडे लोकांचे हेच वेड विकृतीच्या स्वरूपापर्यंत पोहचल्याच्या घटनांनी चिंतादेखील व्यक्त होऊ लागली आहे. आणि हो…लोकांच्या टिकटॉकवर उड्या पडत असल्यामुळे याचा ब्रँडींगसाठी वापर होत असल्याचा आयामदेखील विसरता येणार नाही.

टिकटॉक हे अ‍ॅप बाईट डान्स या चीनी कंपनीने विकसित केले आहे. याच्या दोन आवृत्त्या आहेत. चीनमध्ये याला दोऊयीन या नावाने तर जगातील उर्वरित देशांमध्ये याला टिकटॉक या नावाने लाँच करण्यात आले आहे. बाईट डान्स कंपनीने म्युझिकली या कंपनीला अधिग्रहीत केल्यानंतर टिकटॉक हे खर्‍या अर्थाने प्रकाश झोतात आले. तेव्हापासून या अ‍ॅपचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. आज अचूक आकडेवारी ज्ञात नसली तरी टिकटॉकचे युजर्स हे एक अब्जाच्या आसपास असल्याचे मानले जाते. याला दोऊयीनच्या युजर्सची संख्या जोडली तर हाच आकडा तब्बल १५० कोटींचा आसपास असू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुक, युट्युब, व्हाटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम व पबजी मोबाईल आदींना मागे सारून टिकटॉक हे युजर्सच्या पसंतीचे पहिले अ‍ॅप बनले आहे. हाच वेग कायम राहिल्यास काही महिने आणि फार तर वर्षभरात टिकटॉक हे जगातील पहिल्या क्रमांकाचे अ‍ॅप बनेल अशी शक्यता आहे.

जगभरातील लोकांना भुरळ घालण्यासारखी कोणती बाब टिकटॉकमध्ये आहे ? हा प्रश्‍न आपल्या मनात येऊ शकतो. याचे एका वाक्यात उत्तर देता येणार नाही. तथापि, यात युजरचा प्रत्यक्ष सहभाग असून आपल्या स्वत:ला जगासमोर अतिशय विलोभनीय स्वरूपात सादर करण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. टिकटॉकमध्ये युजरला १५ सेकंदापर्यंतचा व्हिडीओ तयार करून शेअर करण्याची सुविधा दिली आहे. यात व्हर्टीकल व्हिडीओचा वापर होतो. अर्थात, स्मार्टफोनचा कॅमेरा उभा धरून कुणीही आपल्याला हव्या असणार्‍या दृश्याला यावर शेअर करू शकतो. आता यातील गंमत लक्षात घ्या. टिकटॉकमध्ये कंटेंटचा निर्माता, सादरकर्ता आणि याचा प्रसार करणारा हा स्वत: युजरच असतो. या १५ सेकंदाच्या व्हिडीओला विविध प्रकारचे ऑडिओ व व्हिडीओ इफेक्ट देता येतात. यात चित्रपटाच्या गाण्यांपासून ते विविध प्रकारच्या र्‍हिदमचा समावेश असतो. याच्या जोडीला विविध फिल्टर्सच्या माध्यमातून व्हिडीओज हे अधिक आकर्षक बनविता येतात. याशिवाय, व्हिडीओची गती कमी-जास्त करण्याची सुविधादेखील यात दिलेली आहे. यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक अतिशय भन्नाट स्वरूपात आपल्याला स्वत:ला या मंचावरून प्रेझेंट करत आहेत.

मी आधीच म्हटल्यानुसार तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फटका हा प्रसारमाध्यमांना बसला आहे. तर टिकटॉकच्या आगमनामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा तडाखा बसणार हे निश्‍चित आहे. कारण टिव्हीवरील मेलोड्रामा पाहण्यापेक्षा कुणीही आपल्या स्वत:लाच हव्या त्या प्रकारात जगासमोर सादर करण्याची सुविधा यातून मिळवू शकतो. फक्त १५ सेकंदात फार काय दाखवता येईल असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. मात्र टिकटॉकच्या युजर्सची रचनात्मकता पाहण्यासाठी आपण एकदा तरी यावर फेरफटका मारा. लोकांची क्रियेटीव्हिटी पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जाल. सेलिब्रिटीजपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांवर टिकटॉकने गारूड केल्याचे दिसून येत आहे. याचा मार्केटींगसाठी वापरदेखील सुरू झाला आहे. शॉर्ट व्हिडीओच्या फॉर्मेटमध्ये अतिशय परिणामकारकरित्या ब्रँडचा प्रचार-प्रसार होण्यासाठी टिकटॉक हे उत्तम माध्यम असल्याचे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी याकडे मोर्चा वळविला आहे. अर्थात व्यावसायिकांना हा नवीन मंच उपलब्ध झाला आहे.

तथापि, युजर्सला आपल्या अगदी अधीन करणार्‍या या अ‍ॅपची काळी बाजूदेखील समजून घेण्याची गरज आहे. टिकटॉकवर सर्वाधीक युजर्स हे १६ ते ३० वर्षांच्या दरम्यानचे आहेत. हा वर्ग फेसबुक वा व्हाटसअ‍ॅपपासून दूर होऊन टिकटॉकचा स्वीकार करत असल्याचे दिसत आहे. तथापि, यावरून युजर्सची गोपनीय माहिती संबंधीत कंपनीकडे जात असल्याचा आरोप कधीपासूनच होत आहे. यावरून अमेरिका व इंडोनेशियात यावर बंदीदेखील घालण्यात आली होती. आपल्याकडेही एप्रिल महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांसाठी टिकटॉक बंद करण्याचे आदेश दिले होते. हा खटला अजूनही सुरू आहे. गेल्या सात दिवसांचा विचार केला असता, टिकटॉकचा व्हिडीओ तयार करतांना बंदुकीचा चाप दाबला गेल्याने देशात दोन तरूण ठार झाले. तर तामिळनाडूत टिकटॉकच्या आहारी गेलेल्या महिलेची पतीने खरडपट्टी काढल्याने तिने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटनादेखील घडली. याच प्रकारच्या विकृती भविष्यात आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे. याच्या जोडीला अल्पवयीनांसाठी टिकटॉक हे तितकेसे सुरक्षित नसल्याचा इशारादेखील तज्ज्ञांनी दिलेला आहेच. मात्र टिकटॉक हे युजरला झपाटून टाकते. किंबहुना याला याच पध्दतीत जाणीवपूर्वक विकसित करण्यात आलेले आहे. यामुळे अनेक देशांमध्ये याविरूध्द जनमत पेटू लागला आहे. तर अनेक देशांमधील सरकारेही यावर नजर ठेवून आहेत. टिकटॉकच्या आगामी वाटचालीत हाच सर्वात मोठा अडसर बनणार असल्याचे आज तरी दिसून येत आहे. अर्थात, अशा प्रकारचे ब्रेक लागण्यापर्यंत तरी टिकटॉकची आगेकुच कुणीच थांबवू शकणार नाही हेदेखील तितकेच खरे !

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

9226217770

https://shekharpatil.com

Previous articleहरवलेल्या टिळकांचा शोध
Next articleनेहरू व सुभाष
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.