डिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो

– शेखर पाटील

विश्‍वविख्यात लेखक पाऊलो कोएलो यांचा काल वाढदिवस होता. पृथ्वीतलावर सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखकांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती आहे. किंबहुना जीवंत असतानाच दंतकथा बनण्याचे भाग्य लाभलेल्या मोजक्या मान्यवरांमध्ये त्यांचा समावेश असून त्यांच्या चाहत्यांचा स्वतंत्र कल्टदेखील बनला आहे. खरं तर त्यांना दैवदुर्लभ लोकप्रियताही लाभली आहे. विशेष करून, ‘द अल्केमिस्ट’ हे पुस्तक न वाचलेला रसिक विरळाच. उच्च अभिरूची, अफाट बुध्दीमत्ता व ग्रहणशक्ती असणार्‍यांपासून ते कधीही वाचन न केलेल्यांनाही हे पुस्तक भावते. माझ्या काही मित्र-मैत्रीणींनी तर आयुष्यात ( अभ्यासाची पुस्तके वगळता !) ‘द अल्केमिस्ट’ हे एकमेव पुस्तक वाचलेले आहे. तर दुसरीकडे याचे शेकडो वेळेस पारायण करणारेदेखील मला माहित आहेत. याचे कारण एकच….अल्केमिस्ट हे प्रत्येकाला आपल्या आयुष्याशी निगडीत वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्ने आहेत….याचा पाठपुरावा करण्याची धमकदेखील आहे. या लघु कादंबरीतही स्वप्नपूर्तीचा प्रवास आहे. मात्र, बाह्य जगात भटकंती करूनदेखील जेव्हा हाती काहीच लागत नाही, तेव्हा आयुष्यात किमया घडत असल्याचे यात दर्शविण्यात आले आहे. वास्तविक पहता, तुझे आहे तुजपाशी…तू जागा चुकलाशी या पंक्ती म्हणजे द अल्केमिस्टचा सार होय. मात्र स्वत्वाची जाणीव होण्यासाठी आयुष्यातील भुलभुलैयातून जाणे अनिवार्य असते हेदेखील तितकेच सत्य असून याला विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीत रेखाटण्याचे कौशल्य पाऊलो कोएलो यांच्या लेखणीत आहे.

पाऊलो कोएलो यांच्या लिखाणातून अनेकदा नियती, दैववाद, चमत्कार, गुढ योगायोग, शकुन-अपशकुन, प्रार्थना, दिव्य शक्ती, सुष्ट-दुष्टातील संघर्ष या बाबी आढळून येतात. यामुळे त्यांचे लिखाण हे वास्तवापासून कोसो दूर असल्याची प्रखर टीका होते. याचप्रमाणे कोएलो यांचे लिखाण हे माणसाला दैववादी बनविते आणि ते अंधश्रध्देला खतपाणी घालते असे आरोप होतात. यात तथ्यदेखील नक्कीच आहे. तथापि, त्यांची लिखाण शैली आणि कथानकांची निवड जगावेगळी आहे. कोणत्याही साध्या-सोप्या प्रसंगाला अतिशय चित्तथरारक आणि रसाळ पध्दतीत रेखाटण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. ‘द अल्केमिस्ट’ची कथा (खरं तर रूपककथा) ही अरेबियन नाईटमधील एका कथानकाशी मिळती-जुळती आहे. तथापि, याला सादर करण्याची पध्दत ही लोकविलक्षण अशीच आहे. त्यांचा हाच परिसस्पर्श अल्केमिस्ट नंतरच्या बहुतांश रचनांमध्ये आढळून येतो. या सर्वांचे मूळ दस्तुरखुद्द कोएलो यांच्या वैयक्तीक आयुष्यातील घटनांशी निगडीत आहे हे विशेष !

ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या महानगरात जन्मलेल्या पाऊलो कोएलो यांना जेव्हापासून समज आली तेव्हाच आपण लेखक बनणार असा संकल्प त्यांनी घेतला. मात्र त्यांच्या पालकांना हे मान्य नसल्याने खूप अडचणी आल्या. यातच बालपणी वेड्यांच्या रूग्णालयात असह्य उपचारांना सामोरे जावे लागले होते. तर त्यांच्या उमलत्या वयात ते वाहवत गेले. आयुष्यातील निरर्थकतेची जाणीव झाल्यामुळे आध्यात्मिक शोध, अंमली पदार्थांचे सेवन, कामुकता यांच्या आहारी गेले. अर्थात, साध्या सोप्या शब्दात सांगावयाचे तर हिप्पी बनले. सत्तरच्या दशकात त्यांनी ब्राझीलमधील रॉक संगीतात आपल्या मित्राच्या मदतीने क्रांती केली. त्यांनी अनेक लोकप्रिय रॉक गाणी लिहली. येथे त्यांना अमाप लोकप्रियता व रग्गड पैसा मिळाला तरी तत्कालीन हुकुमशाही सरकारने त्यांचा छळ केला. यानंतर अत्यंत कोलाहलपूर्ण जीवन जगत असतांना पाऊलो कोएलो ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर सेंट जेम्स चर्चच्या वारी साठी गेले. फ्रान्स व स्पेनमधील दोन धार्मिक स्थळांना जोडणार्‍या या सुमारे ५०० मैलांच्या आसपासच्या पदयात्रेत त्यांना गहन आध्यात्मिक अनुभूती आली. या यात्रेने त्यांचे जीवन बदलून टाकले. येथेच त्यांनी गीतकार म्हणून स्थिरावलेल्या आयुष्याचा त्याग करून पूर्ण वेळ लिखाणाचा धाडसी निर्णय घेतला. यानंतर काय झाले तो इतिहास जगासमोर असल्यामुळे याला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ही पायी वारी आणि यातील अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये उमटले आहे. मला त्यांचे लिखाणच नव्हे तर हा माणूसदेखील खूप आवडतो. दुर्दैवाने अल्केमिस्टसह ब्रीडा, इलेव्हन मिनिटस् आदींसारख्या फार थोड्या पुस्तकांना मी वाचलेले आहे. उर्वरित पुस्तके वाचण्याचा संकल्प कधीपासूनच केला असला तरी यात अनेक अडथळे येत आहेत. मात्र त्यांच्या अन्य रचना व विशेष करून त्यांचे ‘अ वॉरीअर्स लाईफ’ हे चरीत्र वाचण्याचा संकल्प केला असून तो लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

मला पाऊलो कोएलो आवडण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे ते डिजीटल माध्यमाचा अतिशय उत्तम वापर करत आहेत. वास्तविक पाहता सत्तरी पार केल्यानंतरही सोशल मीडियातील त्यांचा उत्साह हा एखाद्या तरूणाला लाजवणारा आहे. सोशल मीडिया अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून ते याचा वापर करत आहेत. ते ब्लॉग, फेसबुक, युट्युब, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा मनमुराद वापर करतात, दैनंदिन घटनांवर भाष्य करतात आणि अर्थातच, आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. त्यांच्याशी विविध विषय तसेच आपल्या पुस्तकांबाबत चर्चा करतात. एवढेच नव्हे तर ते सोशल मीडियातील चाहत्यांना प्रत्यक्षातही भेटतात. अनेक लेखक हे जगापासून अंतर राखून असल्याने सोशल मीडियात फारसे सक्रीय नसतात. मात्र कोएलो हे याच्या अगदी विरूध्द आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्ञान हे मुक्तपणे उपलब्ध असावे असे त्यांचे ठाम मत आहे. यामुळे जगाच्या कान्याकोपर्‍यात आपली कोट्यवधी पुस्तके विकली जात असतांनाही कोएलो यांनी यातील काही पुस्तकांच्या पीडीएफ प्रति आपल्या संकेतस्थळावरून मोफत उपलब्ध करून दिल्याची बाब लक्षणीय अशीच आहे. अर्थात, यामुळे त्यांच्या पुस्तकांच्या खपावर कोणताही परिणाम झाला नाही. किंबहुना मोफत ई-बुक्स उपलब्ध असूनही रशियासह अनेक देशांमध्ये त्यांच्या पुस्तकांना विक्रमी प्रतिसाद लाभल्याची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. अर्थात प्रिंट आणि डिजीटल या दोन्ही माध्यमांना त्यांनी अतिशय सहजपणे हाताळले आहे. यामुळे त्यांना ‘डिजीटल अल्केमिस्ट’ ही उपाधीदेखील मिळाली आहे.

पाऊलो कोएलो यांनी आपल्या लिखाणातून मानवी जीवनातील गुंतागुंतीवर भाष्य केलेले नाही. त्यांना आपण अभिजात लेखक देखील म्हणू शकत नाही. तथापि, त्यांच्या मनमोहक सृजनाला वाचक मान्यता लाभल्याचे नाकारता येणार नाही. कोएलो यांच्या लिखाणात विलक्षण सकारात्मकता आहे. जीवनात चमत्कार घडतात असा विश्‍वासदेखील आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वप्नपूर्तीचा आशावाददेखील आहे. यामुळे त्यांना निव्वळ लेखक म्हणून नव्हे तर नवयुगातील आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणूनही ख्याती मिळाली आहे. यामुळेच बहुतांश ‘सेल्फ-हेल्प’ या प्रकारातील पुस्तकांपेक्षा त्यांचे लिखाण लोकप्रिय झाले आहे. खरं तर ‘सेल्फ हेल्प’ प्रकारातील पुस्तकांमधून मिळालेल्या प्रेरणेला मर्यादा असतात. मात्र आपली मनोदशा सकारात्मक करण्यासाठी याचा काही प्रमाणातच उपयोग होतो. तर पाऊलो कोएलो यांच्या लिखाणाचा परिणाम हा यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होत असल्याची अनुभूती अनेकांना आलेली आहे. यामुळे देश, भाषा, संस्कृती, वर्ण, वर्ग आदींच्या पलीकडे जात त्यांच्या वाट्याला अलोट लोकप्रियता आलेली आहे. तर, लोकांशी सहजपणे कनेक्ट राहण्याच्या त्यांच्या स्वभावाने त्यांच्या व्यक्तीमत्वाला नवीन उंची प्रदान केली आहे.

  पाऊलो कोएलो यांच्या जीवन कार्यावरील डॉक्युमेंटरी.

 

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

9226217770

https://shekharpatil.com

Previous articleरोगापेक्षा इलाज भयंकर
Next articleचिदंबरमनी गमावलं अन राज ठाकरेंनी कमावलं !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.