डिजीटल गर्लफ्रेंड : आभास हा नवा !

-शेखर पाटील 

काही वेळेस अचानक नवीन विषय समोर आल्याने लिखाणाचे नियोजन कोलमडून पडते. मला आता खरं तर,  लेखक व पत्रकारांची जागा कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त असणारे प्रोग्रॅम कसे घेत आहेत  व याचे परिणाम काय होतांना दिसताहेत ?  यावर लिहायचे होते. तथापि, दोन नाविन्यपूर्ण विषय समोर आल्याने याबाबत आजच दोन शब्द सांगावेसे वाटतात.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा विचार करता, डॉट कॉम बूम आणि नंतरच्या कालखंडातील सोशल मीडियाची लाट मी जाणीवपूर्वक अनुभवली. या कालखंडात खूप मोठे हॅपनिंग्ज होत असे. तथापि, यापेक्षा किती तरी पटीने घडामोडी या अलीकडच्या काळात होत आहे. विशेष करून गत डिसेंबरच्या प्रारंभी ‘चॅट-जीपीटी’चे आगमन झाल्यानंतर विविध एआय टुल्सचे अक्षरश: पेव फुटले आहे. प्रत्येक दिवसाला एखादे तरी नवीन टुलचे आगमन वा महत्वपूर्ण घोषणा ठरलेलीच असल्याचे दिसून येत आहे. यातील दोन घटना या मला अतिशय वेचक आणि वेधक अशाच वाटल्याने आज याबाबत विवेचन करावेसे वाटत आहे.

https://twitter.com/shekhar243

केरीन मार्जोरी या स्नॅपचॅटवर सेलिब्रिटी म्हणून ख्यात असणार्‍या तरूणीने कृत्रिम बुध्दीमत्तेच्या मदतीने स्वत:चा डिजीटल अवतार तयार केला आहे. https://caryn.ai ही जगातील पहिली ‘डिजीटल गर्लफ्रेंड’ असून तिची सेवा कुणीही घेऊ शकतो. अर्थात, यासाठी एक डॉलर प्रति मिनिट इतकी आकारणी मोजावी लागते. याच्या बदल्यात संबंधीत व्यक्ती केरी मार्जोरीच्या डिजीटल रूपासोबत (केरी एआय ) आपल्या प्रेयसी सारख्या गप्पा मारू शकतो. यातून केरी ही अगदी खर्‍याखुर्‍या रूपात त्या व्यक्तीशी संवाद साधू शकते. यासाठी केरी मार्जोरी हिच्या सुमारे दोन हजार तासांच्या व्हिडीओजच्या डेटाबेसवर ‘प्रोसेसींग’ करण्यात आली असून याला ‘चॅट-जीपीटी ४’ या टुलची जोड देण्यात आलेली आहे. ‘फॉरएव्हर व्हॉईसेस’ या कंपनीने तिच्या आवाजाचे क्लोन तयार केल्याने अगदी खर्‍याखुर्‍या केरीच्याच आवाजात तिची डिजीटल आवृत्ती ही समोरच्याशी संवाद साधते. सध्या तरी ही सेवा टेलीग्राम बॉटच्या माध्यमातून उपलब्ध असली तरी लवकरच याची वेब व स्वतंत्र ऍपच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहे.

आता एखादी आभासी प्रेयसी ही कुणाला हवी असेल ? याचा आपल्याला प्रश्‍न पडू शकतो. तर, आपल्याला हे जाणून धक्का बसेल की पहिल्याच आठवड्यात ‘केरी एआय गर्लफ्रेंड’ने तब्बल ७२,६१० डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणजे इतक्याच मिनिटांची सेवा तिच्या चाहत्यांनी घेतली आहे. पहिल्याच आठवड्यात तिला १० हजार प्रियकर मिळाले आहेत. केरी मार्जोरीचे स्नॅपचॅटवर १८ लाख फॉलोअर्स आहेत. यापैकी २० हजार फॅन्सची जरी तिच्या डिजीटल आवृत्तीला पसंती मिळाली तरी आपण महिन्याला पाच दशलक्ष डॉलर्स इतकी कमाई करू असा तिचा अंदाज आहे. ही रक्कम स्नॅपचॅट इन्फ्लुएन्सर म्हणून मिळत असलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक राहणार आहे.

आता केरी मार्जोरीच्या या अभिनव व्यवसायाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे कुतुहल निर्माण झाले असून यात भविष्यात नेमके काय-काय प्रकार समोर येणार याबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे. केरी प्रमाणे अन्य सेलिब्रिटीज हे देखील त्यांच्या डिजीटल आवृत्त्या काढून त्या प्रेयसी वा प्रियकर म्हणून जगासमोर उपलब्ध करू शकतात. यात चित्रपट कलावंत, खेळाडू, मॉडेल्स आदींना व्यवसायाची मोठी संधी मिळणार आहे. आज फक्त कुणीही चॅटबॉटच्या माध्यमातून आभासी प्रेयसीची सेवा घेऊ शकत असलो तरी लवकरच मेटाव्हर्समध्ये कुणीही व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत आभासी विश्‍वात वावरू शकेल. अर्थात, वास्तविक जीवनाला समांतर असणारी व्हर्च्युअल दुनिया आपल्या समोर साकार होणार असून यात केरी मार्जोरीसारखे सेलिब्रिटी हे त्यांच्या लोकप्रियतेची पुरेपूर किंमत मोजून घेणार यात शंकाच नाही. याबाबत नैतिक-अनैतिकता आणि अर्थातच मानसिकतेवर होणार परिणाम या बाबींचे आयाम देखील आहेच. मात्र तूर्तास सध्या सायबर विश्‍वात ‘डिजीटल गर्लफ्रेंड’ची धुम सुरू असल्याची बाब उघड आहे. याबाबतचे काही अपडेट असेल तर मी नक्कीच आपल्याला देईल.

याचसोबत दुसरी महत्वाची घटना म्हणजे-अँथ्रॉपिक या कंपनीने https://www.anthropic.com/product ‘क्लाऊडी’ नावाने नवीन टुल लॉंच केले असून ते एकाच वेळेस तब्बल ७५ हजार शब्दांवर प्रोसेस करू शकते. अर्थात, आपण यावर एखादा मोठा ग्रंथ अपलोड केल्यास हे टुल त्यातील शब्द आणि शब्द पाठ करून यावर आधारित कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकते. यावर ७२ हजार शब्द संख्या असणार्‍या ‘द ग्रेट गॅटसबी’ या ख्यातनाम पुस्तकाचे इनपुट देण्यात आले असता फक्त २२ सेकंदात या टुलने यातील संपूर्ण सार आत्मसात केल्याची बाब ही अतिशय विलक्षण असून या माध्यमातून एक मोठे दालन खुले होणार आहे.

सध्या टेक्स्ट, इमेज, व्हिडीओ, ऑडिओ आदी इनपुटच्या माध्यमातून त्यावर प्रोसेसिंग करणारे अनेक टुल्स आहेत. यात कुणीही युजर प्रॉप्म्टच्या मदतीने ( प्रॉम्प्ट म्हणजे काय ? याची माहिती हवे असेल तर माझा या आधीचा लेख https://bit.ly/42D58OI या लिंकवर क्लिक करून वाचा ) याचा वापर करू शकतो. तथापि, यात शब्दमर्यादा आहेत. ‘चॅटजीपीटी-४’ या प्रिमीयम आवृत्तीत एकदा २५ हजार शब्दांचे इनपुट देता येते. क्लाऊडीवर याच्या तिप्पट शब्दसंख्या वापरता येत असल्याची बाब लक्षणीय असून याच मुळे हे टुल आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.

‘क्लाऊडी टुल’च्या मदतीने आपण विविध डेटाबेसचे विश्‍लेषण करून यातील सार अथवा आपल्याला हवे असणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळवू शकतो. याचे अनेक प्रॅक्टीकल उपयोग देखील करता येतील. उदाहरणार्थ कुणीही कुणीही लेखक वा पत्रकाराच्या  मुद्रीत, ध्वनी वा व्हिडीओच्या माध्यमातून कंटेंटचे इनपुट यात टाकले तर या संपूर्ण माहितीवर प्रोसेस करून कोणत्याही विषयावर संबंधीत व्यक्तीचे मत हे आपण मिळवू शकतो. याचा सर्वात महत्वाचा उपयोग हा शेअर बाजाराच्या अध्ययनात कंपन्यांची विविधांगी माहिती आणि विश्‍लेषणासाठी होऊ शकतो. याच्या मदतीने अनेक तासांचे काम हे अवघ्या काही सेकंदात होणार असल्याने हे टुल अतिशय क्रांतीकारी ठरू शकते यात शंकाच नाही. तर विधीच्या क्षेत्रातील कोणताही संदर्भ हा याद्वारे क्षणार्धात मिळू शकतो. रिसर्च पेपर्ससाठी हे टुल क्रांतीकारी ठरणार आहे. अर्थात, या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या नोकर्‍यांवर गदा येणार असल्याची बाब सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाहीच !

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)

9226217770

[email protected]

Previous articleकर्नाटकामुळे लोकशाही मजबूत!
Next articleपवारसाहेब, सुरुवात तर छान झाली…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here