डिप्रेशन आणि बायका !

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

“डिप्रेशन” हा फक्त बायकांनाच होतो असं नसलं, तरी डिप्रेशन हे पुरुषांच्या तुलनेत ‘बायकांना’ जास्त होतो, हे सत्य आहे. पण बायकांनाच का ?
त्याचं एकमेव कारण म्हणजे बायकांच्यातले ‘हॉर्मोनल बदल’.

पण निसर्गाने असं का करावं ? निसर्गाने हा अन्याय का केला ?
कारण, ‘आपलं शरीर हे निसर्गाने आपल्या गरजेनुसार घडवलंय’, कोण्या देवाने नाही. आपलं शरीर परफेक्ट नाही. आपल्या शरीरात कितीतरी अशा गोष्टी आहेत, ज्या तशा असण्याला काही कारण नाही. उदारहर्णार्थ – आपल्या ‘दातांचं इनॅमल’. ते एकदा गेलं की गेलं, ते नैसर्गिकदृष्ट्या परत मिळत नाही. पण का ? कारण हेच, निसर्गाने फक्त वर्तमानाचा विचार करून गोष्टी दिल्या, निसर्गाला भविष्य माहित नाही. आणि त्यामुळे त्यानेच निर्माण केलेल्या गोष्टी काही वेगळं रूप धारण करू शकतात, याची त्याला सुतरामही कल्पना नाही.

पण मग बायकांना हॉर्मोन्सचा गुंता का दिलाय ?
कारण निसर्ग प्रचंड स्वार्थी आहे. आणि त्याच्या स्वार्थी असण्याने बायकांना बकरा बनवलंय. त्याने स्वतःचे जीन्स पुढे ट्रॅव्हल करण्यासाठी पिल्लं-मुलं जन्माला घालण्याचं प्रयोजन केलं. आणि ती जवाबदारी बायकांवर धाडली. आणि जसं जसं हवंय तसं त्याने बायकांचं (आणि पुरुषांचं देखील) यंत्र बनवलं. त्यात वेळेनुसार बदलही केले. तर बायकांच्या अंडी घालण्याच्या प्रकारांमुळे बायकांच्यात अतिरिक्त हॉर्मोनल झोल दिलाय.

पण एकमेव सत्य काय आहे ?
तर आपलं शरीर आहे तसं स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

मग आता हा हॉर्मोनल झोल कुठे वर-खाली होतो ?
तर बायकांची मासिक पाळी येणार तेव्हा,
कोंबड्या बनून अंडी जन्माला घालताना, आणि
मेनोपॉज येतो तेव्हा…. हे मेजर बदल.

आपल्या प्रत्येक भावनेचा या हॉर्मोन्सशी गहिरा नाता है. म्हणजे ह्या हॉर्मोन्सवरून आपल्या भावना कशा असायला हव्यात हे ठरतं. आपला मूड ह्या हॉर्मोन्सवरून ठरतात. त्यात ‘मुडवाले’ महत्त्वाचे रेग्युलर हॉर्मोन्स म्हणजे – उदा – Serotonin आणि Dopamine. आपल्याला नॉर्मल राहण्यासाठी म्हणजे ना सुखी- ना दुःखी, न्युट्रल राहण्यासाठी, आपल्या मेंदूतलं हे केमिकल बॅलन्स ठेवावं लागतं. ते जर बॅलन्स नसेल तर मग आपले मुड तसतसे बदलत राहतात. आपल्या प्रत्येकात ते होत असतं, नॉर्मल आहे.

आता बायकांची गळती दर महिन्याला आहेच. त्यामुळे त्यांच्यात होणारा ‘केमिकल लोचा’ हा टाळता येत नाही. कारण ह्या केमिकल लॉच्यामुळे त्यांचे हॉर्मोन्स लेव्हल वर-खाली-पुढे-मागे-इकडे-तिकडे भरकटत असतात. त्यामुळे मूड-स्विंग हा प्रकार बायकांच्यात जास्त आढळतो.
पण याचा डिप्रेशनशी काय संबंध ?

आता डिप्रेशन हा आजार कधी मानायचा ?
डिप्रेशन हा आजार तेव्हाच मानला जातो, जेव्हा ते जास्त काळ टिकतं आणि त्यामुळे इतर गोष्टी बिनसतात. म्हणजे भूक न लागणं, किंवा जास्त भूक लागणं, झोप न येणं.. वगैरे. मुडस्विंग म्हणजे डिप्रेशन नाही.

बऱ्याच वेळा जर तुम्ही नोटीस केलं असेल तर, आपला मूड सॅड असेल, तर आपल्याला खावंसं वाटतं, स्पेशली जे आपल्याला आवडतं, गोड-धाड वगैरे. किंवा मग दारू पिणं, सिगारेटी ओढणं, ड्रग्स घेणं.. इत्यादी.
असं का ?

कारण आपण सॅड असणं म्हणजेच आपल्या शरीरातले केमिकल्स इम्बॅलन्स असणं. आणि त्यामुळे आपल्याला मिळत नाही आहे ते ‘हैप्पी हॉर्मोन’, म्हणजेच आपलं फेवरेट ‘OXYTOCIN’. म्हणजेच काय तर, शरीर ते बॅलन्स करण्यासाठी तुमच्याकडून बाहेरून हैप्पी-हॉर्मोन्स मागवतंय. तुमचं आवडतं खाणं-पिणं वगैरे मिळाल्यावर शरीराला OXYTOCIN मिळणार.

तर हे एक कारण झालं डिप्रेशनचं. या डिप्रेशनचे बरेच प्रकार आहेत, असू शकतात. आपण जे वर सांगतोय, तो ‘केमिकल लोच्यामुळे’ येणारं डिप्रेशन.

——————-

दुसरं आहे ते सायकॉलॉजिकल.

बायकांच्या एकंदर शारीरिक आणि मेंदूतल्या केमिकल लोच्यामुळे त्यांच्या भावनिक होण्यापासून त्यांची सुटका नाही. बायका आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा फार विचार करत असतात. हे जेनेटिकलीच आलं असावं. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्टीची चिंता करण्याची प्रवृत्ती घडत जाते. मग पोरं, नवरा/पार्टनर.. अशा नात्यांभोवती त्यांच्या भावना गुरफटत जातात आणि तिथे काही बिनसलं की मग चिंतेचा विषय होऊन जातो. बऱ्याच बायका, नाती तुटल्यामुळे डिप्रेशन मोड मध्ये जातात.

थोडक्यात आपण असं म्हणू, की ‘ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, त्या मिळाल्या नाहीत, तरी त्याचं डिप्रेशन येऊ शकतं. त्या डिप्रेशनची तीव्रता, ह्या त्या त्या गोष्टींच्या प्रायोरिटीवरून ठरणार.

———————-

अजून एक आहे ते, समाजाने-समाजामुळे येणारं डिप्रेशन.                           

बायकांवर समाजाने लादलेल्या अपेक्षांचं ओझं काही बायकांना हॅण्डल करता येत नाही, म्हणजेच झुगारून टाकता येत नाही. तिने उत्तम आई-बहीण-बायको-सून सगळं काही असावं ही समाजाची अपेक्षा बायका घेऊन जगतात. आणि जाहीर आहे, त्याच्यामुळे होणारी दगदग आणि स्ट्रेस, ह्याचा परिणाम होऊन त्या डिप्रेशन मोडमध्ये जातात.

सोशल बिहेव्हिअरमध्ये बायकांनी बऱ्याच गोष्टी आपल्यावर लादून घेतल्यात असं मला वाटतं. जरी त्या समाजाने त्यांच्यावर लादल्या असल्या तरी, कोणी लादल्या म्हणून आपण त्या लादून घेऊ नये, याची जाणीव बायकांना होत नाही, याची खंत आहे. त्यामुळे लादून घेणारी व्यक्ती, लादणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ठरते (माझ्या नजरेत).

——————————-

अजून एक इंटरेस्टिंग प्रकार असतो, तो म्हणजे SAD. त्याचा फुल फॉर्म आहे – Seasonal affective disorder. आपण बहुतांश लोकं थोड्या-बहुत फरकाने यामुळे Affect होत असतो. ह्यात ऋतूच्या बदलण्याने तो परिणाम होतो. म्हणजे हे LIGHT च्या Exposure मुळे परिणाम घडवत असतं. कधीकधी ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला डाऊन वाटतं. हिवाळ्यात बऱ्याचवेळा हे जाणवतं. आणि लक्ख प्रकाश असेल तर, एकदम उत्साह येतो. दुसऱ्या भाषेत असं म्हणू की आपल्याला SUN मिळणं, म्हणजेच व्हिटॅमिन डी मिळणं फार गरजेचं आहे आणि त्यावर देखील मुड स्विंग किंवा डिप्रेशन अवलंबून असू शकतं.

——————-

डिप्रेशनला कमी लेखू नका. कारण हेच डिप्रेशन पुढे आत्महत्या किंवा स्ट्रोक्ससाठी घातक ठरतं.

आता हे सगळं डिप्रेशन किंवा हा केमीकल लोचा, शोधण्यासाठी काही पर्याय आहेत का ?
तर नाही.

अशा कुठल्या जनरल मेडिकल टेस्ट नाहीत, जेणेकरून आपल्या शरीरातील केमीकल बॅलन्स ढासळलाय की नाही, हे पाहता येईल. त्यावर अजून संशोधन चालू आहे. जरी रक्त-लघवी-व्हिटॅमिन्स वगैरे चेकअप आपण करत असलो, तरी ते एक बेसिक आराखडा बांधण्यासाठीच उपयोगी पडतात. त्यावरून तुमचा GP तुम्हाला मानसोपचारतज्ञाकडे पाठवायचं की नाही हा विचार करतो.

मग आता मानसोपचारतज्ञ काय करतो ?
तर तो तुम्हाला लाख प्रश्न विचारतो, तुमच्या उत्तरांवर तो तुमच्या सायकॉलॉजीचा अभ्यास करतो. आणि त्यानुसार तो तशी औषधं लिहून देतो. कधीकधी ती औषधं, औषधं नसून ती फक्त तुमच्या मानसिक समाधानासाठी दिली जातात. ज्याला आपण PLACEBO Effect म्हणू.

डिप्रेशनवर बऱ्याच वेळा मेडिकेशन हाच उपाय असतो. तुम्हाला तुमच्या मेंदूतलं रसायन जागेवर आणण्यासाठी बाहेरून केमिकल्स घ्यावे लागतात.

पण पण पण,

यात पुन्हा त्याचे साईड-इफेक्ट्स असू शकतातच. त्यामुळे तुमचा डॉकटर कोण आहे, यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. स्पेशली भारतात, जो कोणी उठतो तो दवाखाना टाकतो. भारताकडे कचरा डॉक्टर बरेच आहे. त्यामुळे सर्वात जास्त इथे काळजी घ्यावी लागते. भारतात डॉक्टर निवडणं हे गॅम्बलिंग होऊन जातं.

———————————————

आता हे सगळं झालं बाहेरचे उपाय. आपण काय उपाय करू शकतो ?
यावर एकमेव आणि सर्वात उपायकारक असा एकच उपाय, तो म्हणजे – ‘इच्छाशक्ती’.

तुम्हाला यातून बाहेर पडायचंय का ? हे स्वतःला विचारावं लागेल.
आपलं मानसिकरीत्या स्ट्रॉंग राहणं तर गरजेचं आहेच, पण आपला शारीरिक फिटनेसही फार महत्त्वाचा आहे.

तुम्ही भांडी घासलेत का, कपडे धुतलेत का, स्वयंपाक केलाय का, सासू सासऱ्यांना खुश ठेवलंय का, नवरा सुखी आहे का ….
हे सगळं कचरा आहे. तुम्ही बायको-आई-सून या सगळ्याची जवाबदारी झेलण्याआधी तुम्ही स्वतःची जवाबदारी व्यवस्थित पेललेय का ?
ह्या सर्वांआधी तुमचं स्वतःबद्दल काही कर्तव्य नाही का वाटत ?
तुम्ही ‘पहिले’, की ही ओझं लादणारी नाती ?

पण असा विचार करून डिप्रेशन जाईल का ?
हो. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, ती व्यक्ती क्वचितच या डिप्रेशनच्या जाळ्यात अडकते.

डिप्रेशन असणाऱ्यानेच काळजी घ्यावी असं नाही. डिप्रेशन कोणालाही येऊ शकतं.
डिप्रेशन येऊ नये म्हणून आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. –

१. शारीरिक
२. मानसिक

शारीरिक मध्ये, तुमचा फिटनेस महत्तवाचा आहे. तुम्ही काय खाताय, कधी-किती झोपताय, रोज व्यायाम करताय का.. हे सगळं महत्त्वाचं आहे.
कारणं देणं हे, ‘आम्हाला रडण्यातच इंटरेस्ट आहे’, म्हणण्यासारखं आहे. तुम्हाला जगातला कुठलाही डॉक्टर वाचवू शकणार नाही.
दिवसातून केवळ ३० मिनिटं व्यायाम देखील पुरेसा आहे फिटनेससाठी.

शारीरिक मध्ये आहार देखील फार महत्त्वाचा आहे –

आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हटलं जातं, की सुखी सुखी जेवावं, उदास मनाने जेवू नये. त्याचंही कारण तेच आहे. आपल्या उदास राहिल्याने, आपल्या शरीरातले हॉर्मोन्स, आपल्या शरीराला मिळणारं जेवण जास्त उपायकारक करत नाही. स्ट्रेस आपल्या Digestion वर देखील परिणाम घडवत असतं. यात एक काळजी घ्यायची, की जर आपल्याला Sad वाटत असेल, तर शक्यतो पुढचे १५-२० मिनिटं जेवण टाळायचं. आणि या १५-२० मिनिटांत मेंदूतला लोचा कंट्रोल करायचा. मी अशावेळी गाण्यांचा आधार घेतो. शांत-गोड-उत्साहवर्धक वगैरे गाणी ऐकायची, आपण बऱ्यापैकी नॉर्मलवर येतो.

कारण आपला जन्म हा खाणं आणि ते कष्टाने मिळवणं यातच जातो. मग जे जेवण आपण येवढया कष्टाने कमवलंय, ते असं उदास मनाने आत घालणं, हे जेवण टाकणं दिल्यासारखं आहे, तो जेवणाचा अपमान मानावा.

चला, हे कदाचित जमलेही. पण पुढे ?

इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘माईंड गेम’. तुम्ही तुमच्या मेंदूला जे सांगाल ते मेंदू ऐकेल, पण ते वरवरचं सांगणं नकोय.
प्लासिबो इफेक्ट होण्यामागे आपल्या मेंदूची जादू ओळखायला हवी. आपण जे मानून चालू, ते ते आपला मेंदू ग्राह्य धरून तसतसे इफेक्ट आपल्या शरीरावर करत जाईल. म्हणजे काय ?

आपल्याला एकदा का गोष्टी कशा घडतात, याची माहिती मिळाली, की आपल्याला आपला मेंदू आपल्या ताब्यात ठेवता येतो.
किंवा इथे बॉससारखं वागायचं – ‘माझ्या परवानगीशिवाय हा सॅड होतोच कसा’, म्हणून मेंदूला आपलं गुलाम करता यायला हवं.

या सर्वापलीकडे,
मेंदूत एक गोष्ट फिट करून घ्यायला हवी. प्रतिज्ञाच म्हणा हवं तर.

”मला एकदाच आयुष्य मिळणार आहे. आणि जे आयुष्य मिळालंय, ते मला उत्तमरित्या घालवता येण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. माझा कोणावर अधिकार नसेल आणि माझ्यावर मी कोणाचा अधिकार बाळगू देणार नाही. कर्तव्यांची पूर्ती करताना, मी जवाबदाऱ्यांचं ओझं वागवणार नाही. माझ्या हातून चुका होणारच नाही, असं नाही, पण त्या प्रत्येक चुकांतून काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. माझ्या प्रत्येक दुःखाचं कारण फक्त मीच असेन, कारण कोणी मला दुःखी करावं एवढा मी समोरच्याला अधिकार आणि किंमत देणार नाही. त्यामुळे माझ्या सुखाची जवाबदारी ही सर्वस्वी माझी असेल, आणि ती कमीतकमी कोणावर अवलंबून असेल, यासाठी मी प्रयत्न करेन. आई-बाप-मुलगा-नवरा-बायको या सर्वांआधी माझं नातं माझ्याशी आहे. मी रडत-खुडत बसणार नाही. मला आनंदी ठेवण्याची एकमेव मोठी जवाबदारी माझ्यावर आहे. माझ्यावर फक्त मला पटणाऱ्या आणि माझ्याच मर्यादा असतील. मी माझ्याशी सदैव प्रामाणिक असेन, कारण जोपर्यंत मी माझ्याशी प्रामाणिक आहे, तोपर्यंतच मी जिवंत आहे… हे सर्व करताना माझ्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, याची काळजी मी घेईनच, पण कोणाच्या सुखासाठी मी माझंही नुकसान करून घेणार नाही. …. ”

कारण,

“”” आयुष्य सुंदर आहे “”””

– मंगेश सपकाळ

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात  )

Previous articleपहिला माणूस आला कुठून?
Next articleलोकशाहीच्या संरक्षणासाठी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.