डॉक्टरांनो, तुम्ही सहानुभूती गमावून बसला आहात!

अमरावतीतील डॉ. योगेश व ऋषिकेष या सावदेकर बंधूंना झालेली मारहाण, त्यानंतर शिवसेनेकडून धडा शिकविण्याचा, तर ‘प्रहार’ कडून मुंडन करण्याचा मिळालेला इशारा, हे सारे प्रकार डॉक्टरांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत, असं दिसताहेत. त्यामुळे आपल्या वातानुकूलीत चेंबरमधून बाहेर पडून अमरावतीचे डॉक्टर्स रस्त्यावर उतरले. एरवी एकमेकांसोबत गळेकापू स्पर्धा करणारे हे डॉक्टर्स स्वत:च्या कपड्यांची इस्त्री विस्कटणार नाही, याची काळजी घेत सरंक्षण मिळण्याची मागणी करत हातात फलक घेऊन एकजुटीने रस्त्यावर उतरल्याचे पाहून हसायला येत होतं. 

 
एरवी समाजात काय घडते आहे, याबाबत वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा दुसरी कुठलीही तसदी न घेणार्‍या डॉक्टरांचं हितसंबंध धोक्यात आल्याबरोबर एकत्र येणं मोठं मनोरंजक होतं. वर्षोनुवर्ष रुग्णांच्या अधिकांराची, हक्कांची आपण पायमल्ली करतो आहे, डॉक्टर म्हणून कुठल्याही नैतिक कर्तव्याचं पालन करत नाही, याचं अजिबात भान नसणारे डॉक्टर किमान स्वत:चे अधिकार व सरंक्षणाबाबत सजग आहेत, हे पाहून बरं वाटलं. परवाच्या प्रकरणात डॉ. सावदेकरांची चूक नाही, हे या डॉक्टरांनी पुराव्यासहित जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडलं. ते कदाचित खरंही असेल. पण खेदाची गोष्ट म्हणजे, तरीही या विषयात डॉक्टरांना सहानुभूती नाही.

हे मारहाण प्रकरण घडल्यापासून गेल्या तीन-चार दिवसात ज्या काही प्रतिक्रिया उमटल्यात त्यापैकी बहुतांश प्रतिक्रिया डॉक्टरांबद्दल चीड व्यक्त करणार्‍याच आहेत. डॉक्टर हे लुटारु आहेत आणि त्यांना धडा शिकवायलाच हवा, ही सुप्त भावना जनमाणसांत आहे. अलीकडे प्रत्येक काही महिन्याआड कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये गोंधळ वा राडा होतो, तो याच भावनेतून. हे प्रकार वारंवार का घडतात? एकेकाळी डॉक्टरला देव मानणारा पेशंट आज त्याला ‘लुटारु’ का मानायला लागला? देव आणि भक्ताचं भक्तिभावाचं नातं दुभंगून त्याला दुकानदार व ग्राहकाच्या नात्याचं स्वरुप का आलं? परस्परांच्या विश्‍वासावर आधारलेल्या या नात्याला नेमका तडा कुठे बसला? असे प्रश्न अशा घटनांच्या निमित्ताने वारंवार उपस्थित होतात. सामान्य माणसाच्या मनात डॉक्टरांची प्रतिमा कधी नव्हे एवढी खालावली आहे. पोलीस आणि वकिलांप्रमाणेच डॉक्टरांकडेही शक्यतो जायची पाळी येऊ नये, त्यांच्याप्रमाणे हा सुद्धा आपल्याला लुटून खाईल,असंच त्याला वाटतं असतं. सर्वसामान्य माणसांच्या मनात डॉक्टरांबद्दल किती तीव्र भावना खदखदत असतात, याची त्यांना कल्पना आहे की नाही, माहीत नाही. नसेल, तर ते त्यांच्यासाठी धोकादायक आहे. एक काळ असा होता, जेव्हा विश्‍वासार्हता, प्रामाणिकता, सच्चाई हे शब्द डॉक्टरांसाठी समानार्थी शब्द मानले जात. डॉक्टरांना देवाचा दर्जा होता. तेव्हा त्यांचे वर्तनही तसेच असे. डॉक्टर हा केवळ डॉक्टर नसायचा. तो प्रत्येक पेशंटचा, कुटुंबाचा केवळ मित्रच नाही, तर गाइड, फिलॉसाफर सारं काही असायचा. रुग्णांच्या मुलांनी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला पाहिजे, मुलीचं लग्न त्याने कुठे जुळवायला हवं, अशा अनेक निर्णयात डॉक्टरांचा मोठा वाटा असायचा. (डॉक्टरला केवळ रुग्णचं नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची कुंडली तोंडपाठ असायची. त्यातूनच फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आकारात आली होती.)

गेल्या काही वर्षात मात्र सारंच बदललं. नैतिकता, मूल्यं, तत्वं या गोष्टी थट्टेचा विषय झाल्या. प्रत्येक क्षेत्रातील माणसांचं पतन व्हायला लागलं. तरीही आता-आतापर्यंत वैद्यकीय व शिक्षण क्षेत्राबद्दल आतापर्यत एक विश्‍वास होता. या क्षेत्रातील माणसं आपल्याला फसविणार नाहीत, असं सर्वसामान्य माणसाला वाटायचं. मात्र या क्षेत्रातील माणसांनीही बुद्धी व ज्ञानाचा वापर करुन आपली ‘दुकानदारी’ थाटली आहे, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो आधी अवाक झाला. नंतर खिन्न झाला आणि आता संतापायला लागला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये वारंवार होणारे गोंधळ हेच सांगून जातात. सद्या कोणत्याही शहरातील डॉक्टरांबद्दल जे किस्से ऐकायला मिळतात, ते भयचकित करणारे आहेत. कारण नसताना अँडमिट करुन घेणे, शस्त्रक्रियेची आवश्यकता नसतानाही शस्त्रक्रिया करणे, नैसर्गिक प्रसुती होण्याची स्थिती असतानाही सिझेरियन करणे, मृत झालेल्या व्यक्तीला व्हेन्टिलेटरवर ठेवणे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बिल पेड करेपर्यंत मृतदेह नातेवाईकांना न देणे, असे अनेक प्रकार कानावर पडतात. गेल्या काही वर्षात मोठय़ा शहरांमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नावाचा प्रकार वाढत चाललाय. इर्मजन्सीमुळे डॉक्टरांची रात्र खराब होऊ नये, म्हणून त्यांनी स्वत:च्या सोयीसाठी उघडलेला हा गोरखधंदा आहे. यवतमाळ, अकोला या शहरांमध्ये आता डॉक्टर कुठल्याही रुग्णाला आपल्याकडे अँडमिट करुन घेण्याच्या भानगडीत पडत नाही. सरळ त्याला मल्टी स्पेशालिटी नावाच्या वैद्यकीय मॉलमध्ये रवाना करतात. अशा मॉलमध्ये रुग्णाला अँडमिट करण्याअगोदरच काऊंटरवर भली मोठी रक्कम अँडव्हान्स म्हणून जमा करावी लागते. त्यानंतर रुग्णाची रवानगी थेट आयसीयूत होते. प्रश्न भावनांचा असल्याने रुग्णांचे नातेवाईक वाद घालण्याचा मन:स्थितीत नसतात. अशा मल्टिस्पेशालिटीमध्ये प्रत्येक दोन-चार दिवसाआड पैशाचा भरणा करत राहावा लागतो. दिवसाला किमान आठ-दहा हजार रुपये या हिशोबाने तिथे मीटर सुरू असतं. अशा पद्धतीने कमाविलेले करोडो रुपये डॉक्टर कम संचालक आपसात वाटून घेतात. अर्थात सारेच डॉक्टर असे दुकानदार झालेत आणि सारेच आपल्या आपल्या व्यवसायाशी प्रतारणा करतात, असे मानायचे कारण नाही. मात्र रुग्णांचा विश्‍वास आपण गमाविला आहे, ही गोष्ट डॉक्टरांनी आता स्वीकारायला हवी. डॉक्टर मंडळी आपल्या सर्मथनार्थ नेहमी दोनतीन मुद्दे समोर करतात. ‘पेशंट व त्याच्या नातेवाईकांना शास्त्रीय वैद्यकीय ज्ञान नसते. त्यामुळे काही विपरीत घडल्यास ते डॉक्टरवर ठपका ठेवून मोकळे होतात. दुसरी गोष्ट म्हणजे, ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट’ ही अतिशय महागडी गोष्ट झाली आहे. पेशंटला आधुनिक सोयीसुविधा व उपचार देताना त्याचे शुल्कही तसेच राहणे स्वाभाविक आहे. पेशंटवर उपचार सुरु असताना नातेवाईक हवे ते उपचार करण्याची मुभा देतात. कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, अशी त्यांची भाषा असते. मात्र तो दगावला आणि त्यानंतर बिल मागितले, तर आम्ही खलनायक ठरतो. पेशंटच्या नातेवाईकांना शंभर टक्के यशाची खात्री हवी असते. मात्र ते हे विसरतात की, आम्ही देव नाही. त्याच्यासारखीच हाडामासाची माणसं आहोत. त्यांनी आमच्यावर विश्‍वास ठेवायला हवा. पुन्हा विषय विश्‍वासाचाच. डॉक्टरांनी हे समजून घेतलं पाहिजे की, हा विश्‍वास एका रात्रीतून गेला नाही. पूर्वी आजच्याइतकी आधुनिक साधनं नव्हती आणि रुग्णसुद्धा आजच्यापेक्षा जास्त मरायचे, तरी डॉक्टरांना कोणी मारायला जायचं नाही. कारण तेव्हा विश्‍वास असायचा की, डॉक्टरने प्रामाणिक प्रय▪केले असतील. आता मात्र डॉक्टर धोपटले जाताहेत, त्याला त्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. आपण रुग्णांसोबत कसं वागतो, यावर डॉक्टरांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आज कोणत्याही डॉक्टरला वेळ नाही. रुग्ण जेवढा वेळ डॉक्टरसमोर असतो, केवळ तेवढाच वेळ डॉक्टर त्याचा विचार करतात. समोर वेगवेगळय़ा पॅथालॉजी टेस्टचे जे रिपोर्ट येतात त्यावरुन ट्रिटमेंट ठरविली जाते. पेशंटसोबत आपुलकीने बोलणं, त्याला विश्‍वासात घेणं, असा प्रकारच उरला नाही. खरं तर वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की, ९0 टक्के आजार हे सायकोसोमॅटीक म्हणजे मानसिक असतात. डॉक्टरांनी दिलासा दिला, आत्मविश्‍वास वाढविला, तर रुग्णांचं अर्ध दुखणं पळतं. पण स्थिती अशी आहे की, डॉक्टरांचं बोलणं आज विकत घ्यावं लागतं. डॉक्टरांना वेळ व पेशंटबद्दल जिव्हाळा नाही, हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंटचा विचार करुन रोज किती पेशंट तपासले पाहिजे, किती जणांना अँडमिट करुन घेतलं पाहिजे, किती ऑपरेशन केली पाहिजेत, याची गणित निश्‍चित केली असतात. त्यातून रुग्ण हे त्यांच्यासाठी केवळ पैसे कमाविण्याचं साधनं झालं असतं. कटू आहे, पण हे वास्तव आहे. वैद्यकीय व्यवसायातील ही अपप्रवृत्ती हा एक स्वतंत्र विषय आहे. परवाच दिवंगत झालेल्या अनंत तिबिले या मराठी कादंबरीकाराने या विषयावर एक कादंबरीच लिहिली आहे. डॉक्टर्स ‘कट’ प्रॅक्टीस कसे करतात, औषध उत्पादक कंपन्यांकडून त्यांना कसे ‘कमिशन’ मिळते, त्यांचे परदेश दौरे कसे घडवून आणले जातात, याच्या अनेक सुरस कथा त्या कादंबरीत आहेत. कादंबरीतल्या प्रमाणे बहुतांश डॉक्टरांच्या कुंडल्या बाहेर काढल्यात, तर पांढर्‍या कपड्यातील ही माणसं किती काळीकुट्ट आहेत, हे जगासमोर येईल. अमरावतीसह प्रत्येक शहरातील किती डॉक्टर इन्कमटॅक्स चुकवितात., टॅक्स चुकविण्यासाठी दलाली, सावकारी करणार्‍यांकडे पैसे कसे देतात, प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवसायात कसे पैसे गुंतवितात, याच्याही खूप सुरस कथा आहेत. शेवटी येथे एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. सगळे डॉक्टर वाईट नाहीत. सेवाभाव व नैतिकता या वैद्यकीय व्यवसायाच्या मूलतत्वांशी प्रामाणिक असलेल्या डॉक्टरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी का असेना, पण आहे. ते आपल्या व्यवसायासोबत कमिटेड आहेत. मात्र सडक्या डॉक्टरांची संख्या आता चिंता वाटावी एवढी वाढली आहे. याबाबत आयएएमसारख्या डॉक्टरांच्या संघटना काही भूमिका घेतात का? (त्यासाठी कधी मोर्चे काढतील का?) या व्यवसायात जी माल प्रॅक्टीस चालते, त्याबद्दल आचारसंहिता निश्‍चित करणे त्यांना आवश्यक वाटते का? यावर बरेच काही अवलंबून आहे. नाहीतर हे असे प्रकार वारंवार घडत राहतील. सामान्य माणूस आपल्या पद्धतीने संतापाला वाट करुन देईल. निष्ठा कोणासोबत ठेवायची? पैशासोबत की रुग्णांसोबत ? विचार डॉक्टरांना करायचा आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleएक सज्जन खलनायक
Next articleधंदेवाईक डॉक्टरांना जाब विचारण्याची वेळ आली आहे
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here