तांब्याचे सोने बनवणार!


#माणसं_साधी_आणि_फोडणीची (भाग सहा)

-मिथिला सुभाष

आपण सोनं बनवायचंच असा ध्यास चंदरने घेतला. अनु काहीही बोलण्याच्या, विरोध करण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिच्यासाठी पती म्हणजे परमेश्वर होता आणि त्याचा प्रत्येक शब्द हा देवाचा शब्द होता. चंदरने अनेक जुन्या पोथ्या मिळवल्या. त्यासाठी काही मित्रांना भागीदार करून घेतलं. शुद्ध लोखंड, पितळ, काश्याची भांडी त्याने गोळा केली. तीच भांडी तो सोन्याची करणार होता! त्यासाठी गंधक, रससिंदूर, पारा, मोरचूद आणि कायकाय भलती रसायनं मिळवली. त्याचे हे प्रकार घरात कोणालाच आवडायचे नाहीत. पण मोठ्या वहिनीकडे, अनुकडे बघून सगळे गप्पं बसायचे. चंदरसमोर कोणाचं काही चालत नव्हतं. कुठेतरी सुप्त इच्छाही होती की याला सोनं बनवण्यात यश आलं तर आपलेही हात ओले होतील.. याच एका इच्छेपायी सासू काही बोलत नव्हती.  
****************

ती लग्न करून त्या घरी आली तेव्हा जेमतेम सोळा वर्षांची होती. त्याच्या घरच्यांच्या दोनच अटी होत्या. मुलगी सुंदर हवी आणि गृहकृत्यदक्ष हवी. या दोन्ही अटी अनु पूर्ण करत होती. तिचे बाबा कुठे मिलमधे नोकरी करायचे, आई लोकांच्या घरी स्वयंपाकाची कामं करायची. त्यामुळे धाकटे दोन भाऊ आणि एक बहिण अनुच्या जीवावर असायचे. शाळेचे, अभ्यासाचे बारा वाजलेले होते. पण घरकामात तरबेज. यांना अशीच सून हवी होती. चंदर पण जुजबी शिकून कुठेतरी वर्कशॉपमधे कामाला होता. त्याचं खरं नाव चंद्रकांत. घरात त्याला चंदू म्हणायचे. पण हिंदी सिनेमाच्या नादाने त्याने स्वत:ला ‘चंदर’ करून घेतलं. यारदोस्त चंदर म्हणायला लागले. हळूहळू घरातही तो चंदर झाला. घरातला मोठा मुलगा. त्याच्याहून धाकटे तीन भाऊ आणि दोघी बहिणी. सगळ्यात धाकटी जुळ्या बहिण-भावाची जोडी तर एवढी लहान होती की अनुने त्यांची ढुंगणं धुतलीयेत.. आंघोळी घातल्याएत त्यांना. आज ती दोघं…

आजचं कुठे सांगतेय मी. अनु लग्न करून आली तेव्हापासून सांगते. ती संसाराला लागली. वहिनीशिवाय घरातल्या पोराटोरांचं पान हलेना. तिच्या मागच्या दिराचं दोन वर्षात लग्न झालं आणि ती ‘मोठी वहिनी’ झाली ते मरेपर्यंत. दर दोन वर्षांनी तिच्या खोलीतला पाळणा काढला जायचा. कारण ओळीने मुली होत होत्या आणि चंदरला मुलगा हवा होता. कुठल्या गादीवर बसवायला वारसदार हवा होता कोणजाणे, पण हवा होता. चंदर विचित्रच होता. संसार वाढत होता. दोघा भावांचे संसार सुरु झाले होते. एका बहिणीचं लग्न झालं होतं. धाकटे दोन भाऊ-बहिण शिकत होते. भावांचे संसार आटोक्यात होते आणि याची संसारवेल फोफावत होती. याला पैसा पुरायचा नाही. आणि तशात याला सोनं बनवण्याबद्दल कोणीतरी सांगितलं.

त्या छोट्या घरात चंदरची खोली अगदी मागे होती आणि त्या खोलीतून मागच्या अंगणात जाण्याचा रस्ता होता. आपण सोनं बनवायचंच असा ध्यास चंदरने घेतला. अनु काहीही बोलण्याच्या, विरोध करण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिच्यासाठी पती म्हणजे परमेश्वर होता आणि त्याचा प्रत्येक शब्द हा देवाचा शब्द होता. चंदरने अनेक जुन्या पोथ्या मिळवल्या. त्यासाठी काही मित्रांना भागीदार करून घेतलं. शुद्ध लोखंड, पितळ, काश्याची भांडी त्याने गोळा केली. तीच भांडी तो सोन्याची करणार होता! त्यासाठी गंधक, रससिंदूर, पारा, मोरचूद आणि कायकाय भलती रसायनं मिळवली. त्याचे हे प्रकार घरात कोणालाच आवडायचे नाहीत. पण मोठ्या वहिनीकडे बघून सगळे गप्पं बसायचे. चंदरसमोर कोणाचं काही चालत नव्हतं. कुठेतरी सुप्त इच्छाही होती की याला सोनं बनवण्यात यश आलं तर आपलेही हात ओले होतील.. याच एका इच्छेपायी सासू काही बोलत नव्हती. सासरे निजधामास निघून गेले होते. मोठा मुलगा म्हणून चंदर तिचा लाडका होताच. आणि इतर दोघांची लग्नं झाल्यावर त्या दोन सुना आणि अनु यांची तुलना करता, चंदरने अनुला एकदम ताब्यात ठेवलंय हे सासूच्या पटकन लक्षात येत होतं. त्यामुळेही चंदर तिच्या काळजाचा तुकडा झालेला होता. अनुची वागणूक अशी होती की तिला घरातल्या कोणाकडून कणभर त्रास होत नव्हता. तिच्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता, ती शब्दच नाही काढायची तोंडातून. उलट तिने चंदरला विरोध करावा, त्याला चारचौघांसारखा संसार करायला भाग पाडावं असंच सगळ्यांना वाटायचं, पण अनुकडून हे होणं शक्य नव्हतं. त्यामुळे चंदरचं सोने बनवणे मिशन रीतसर सुरु होतं.

तो कामावरून आला की त्याची ही कामं सुरु व्हायची. मागच्या अंगणात मोठमोठी चुलाणं पेटवायची.. त्यावर भगुणी ठेवायची. अनु मदतीला.. तिची धावपळ व्हायची.. पाळण्यात एखादी, पोटात एखादी मुलगी असायची. अनुला तिसरी आणि चौथी मुलगी झाली तेव्हा चंदर त्या मुलीना हॉस्पिटलात बघायला, अनुला घरी आणायला पण गेला नाही. सगळ्यात धाकटे दीर-नणंद तिचं सगळं करायचे. ती हॉस्पिटलात असतांना तिच्या मुलांना बघायचे. सासू पण काही दुष्ट नव्हती. पण तिलाही नातू हवा होता.. मोठ्या मुलाचा मुलगा! दर दीड दोन वर्षांनी बाळंतपण.. नवऱ्याचं तऱ्हेवाईक वागणं.. सासूचा न बोलता वचक.. या सगळ्याला पुरं पडता-पडता अनुची दमछाक व्हायची. त्यात चंदरची सोनं बनवण्याची कामं. तो हातात जुनी पुस्तकं घेऊन जवळच बसायचा आणि चुलीजवळ अनु. त्या मोठमोठ्या भांड्यात कधी गंधक टाक, कधी मोरचूद टाक.. पाऱ्याचे काहीतरी.. हे सगळं मी अंदाजपंचे सांगतेय बरं.. पण ते सगळे धूर अनुच्या डोळ्यात, नाकात जायचे.. ती बेहाल व्हायची.. घरात तो धूर येऊ नये म्हणून चंदरने मागच्या अंगणात या कामासाठी प्लास्टिकचा मांडवच घातला होता. त्यामुळे सगळा धूर आतल्या आत राहायचा. दोघंही धुराने हैराण व्हायची.

चंदरच्या पगारातला बराच पैसा सोनं बनवण्याच्या खरेदीत जायचा. कधी काही केमिकल्स, कधी कुठून जुनी पुस्तकं असं काहीबाही आणत असायचा तो. त्यामुळे तो घरात फार पैसे देऊ शकायचा नाही. त्यातून त्याला मुलं पण जास्त.. म्हणजे खाणारी तोंडं वाढीव. इतर जावांना त्याचा त्रास व्हायचा. त्यामुळे अनु दिवसभर घरात गुरासारखं काम करायची. चंदर यायच्या आधी रात्रीच्या जेवणाच्या चपात्या करून ठेवायची. सगळ्या घरचं पाणी भरून ठेवायची. आणि हे सगळं करतांना ती बाळंतीण तरी असायची नाहीतर गरोदर तरी! तरी विनातक्रार सारं करायची. तिचा नवरा म्हणजे देव होता तिच्यासाठी! आणि तिचा तो देव सोन्याच्या नादापायी सोन्यासारख्या बायकोची माती करत होता!

हे असंच चालत राहिलं. चंदरचं वेड पराकोटीला गेलं होतं. घरातल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. अनुकडे बघून आणि चंदर सासूचा लाडका होता म्हणून तो त्या घरात राहिला होता. पाचव्या वेळी अनुला मुलगा झाला! चंदरने कर्ज काढून त्याचं बारसं केलं. कुलदीप नाव ठेवलं. पण त्याचं वेड काही कमी होत नव्हतं. अशात त्याला ब्रेन ट्युमर झाला. अनु हवालदिल झाली. गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं, यांना मुंबईला न्यावं लागेल. “भलभलते धूर जातात याच्या नाकात, त्यातून झालाय याला ब्रेन ट्युमर,” असं म्हणून घरातल्या सगळ्यांनी हात वर केले. आणि अनुने कंबर कसली! होते-नव्हते तेवढे दागिने विकले.. बाकीची काय करायची ती तयारी केली आणि नवऱ्याला घेऊन मुंबईला गेली. तिची पाच पोरं तिकडेच राहिली.

मुंबईत जेजे हॉस्पिटलमधे चंदरला भरती केलं. मुंबईत ओळखीचं, नात्याचं कोणी नाही. त्यामुळे अनु पण हॉस्पिटलात राहायची. नशीब त्याच्या उपचारांना पैसे लागत नव्हते. सकाळी लवकर उठून चंदर जमिनीवर चटई टाकून झोपलेल्या तिला पायाने ढोसून उठवायचा, ‘जा, संडास साफ केलाय की नाही बघून ये!’ मग ती बघायला जायची.. नसेल केलेला तर मेहतरला बोलावून संडास साफ करून घ्यायची. चंदरला हाताला धरून घेऊन जायची, धुवून द्यायची, त्याचं सगळं करायची. पैसा जपून वापरायचा म्हणून एक वेळ जेवायची. पूर्ण दिवस पाणी पिऊन काढायची. तीन महिने दोघं जेजे हॉस्पिटलमधे होती. कधी गावाहून कोणीतरी यायचं, चार पैसे अनुच्या हातावर टेकवायचं.. मुलांची खुशाली सांगायचं.. “वहिनी, आता याला घेऊन चला घरी, नाही होणार आता हा बरा” असं तिला सांगायची. पण अनुने नवऱ्याला बरं करण्याचा पक्का निश्चय केला होता. जेजेमधेच चंदरचं ऑपरेशन झालं. ट्युमर काढला गेला पण त्याचा चेहरा बिघडला, वाकडा झाला. हातातले सगळे पैसे संपलेले.. नवरा विद्रूप झालेला.. पण अनुच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. तो बरा झाला होता. धाकटा दीर त्यांना घ्यायला आला. त्याने खास गाडी केली आणि दोघांना गावी नेलं.

गावी गेल्यावर सगळं पूर्वीसारखं सुरु झालं. थोड्या दिवसांची विश्रांती घेऊन चंदरने पुन्हा मागच्या अंगणातल्या थोरल्या चुली पेटवल्या. अनु त्याला काही सांगेल अशी अपेक्षाच नव्हती. बाकी कोणाचं तो ऐकून घेणार नव्हता. तरी भावांनी, यावेळी आईनेही त्याला सांगून बघितलं. पण तो ऐकणार नव्हताच. सोन्याचा मोह विचित्र असतो! आता तर त्याला धड बोलताही येत नव्हतं. त्याच्या कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं. तो पूर्ण जोमाने सोनं बनवण्याच्या हट्टाला पेटला.. मागच्या अंगणात सकाळपासून त्या चुली ढणाणा पेटायच्या. दोन्ही भावांनी घराचे तुकडे करून घेतले आणि धुराचा त्रास नको म्हणून भिंती उभारल्या. एका घराची तीन घरं झाली. चंदर, अनु, तिची पाच मुलं आणि सासू एका घरात. बाकीचे दोघं दोन घरात. सगळ्यात धाकटी बहिण हॉस्टेलमधे गेली आणि सगळ्यात धाकटा भाऊ युएसला चालता झाला. सासू थकली होती. चंदरचं सगळं लक्ष त्याच्या प्रयोगांकडे आणि त्याला मदत करत सगळं घर सांभाळण्याची जबाबदारी अनुवर.. घरात एक पैसा येण्याची सोय नाही. दोन्ही दीर कधीतरी अनुच्या हातावर काही पैसे टेकवायचे. पण त्यातून घर चालणं कठीण होतं. चंदरची चिडचिड वाढत होती. त्याला यश येत नव्हतं, पण ते येईल याची खात्री होती.

अनुने काळजावर दगड ठेवला आणि ती लोकांच्या घरात कामाला जायला लागली. घरी सांगायची, मी फक्त स्वैपाक करते, पण ती धुणी-भांडी, केर-लादी सगळं करायची. आता तर चंदरने त्याचे प्रयोग थांबवले तरी तो कुठे नोकरी करण्याच्या लायकीचा राहिलाच नव्हता. तिचे दीर तिला सांगायचे, आता तरी त्याला हे सारे थांबवायला सांग. अनु म्हणायची, त्यांना खात्री आहे म्हणजे सोनं बनवणार ते.

आणि एक दिवस गहजब झाला. अनु जिथे कामाला जायची तिथल्या बाईंना ती म्हणाली, ताई तुम्ही बाजूबाजूला दोन टिकल्या का लावल्याएत? बाई म्हणाली, नाही ग, एकच टिकली लावलीए मी. अनुने सगळीकडे नजर फिरवली. सगळ्या वस्तू तिला डबल दिसत होत्या.

अनुच्या डोळ्यांना काहीतरी गंभीर दुखापत झाली होती. डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं, हे डोळ्यांचे नाही, न्यूरोसर्जनकडे घेऊन जा.. हे ऐकून चंदर वैतागला. म्हणाला, “माझा प्रयोग यशस्वी होणार आहे आता. मी सोनं बनवलं आहे, पण त्याला सोन्यासारखं वजन येत नाहीये. वजन तांब्याचंच राहतंय. मला त्यावर काम करायचं आहे. त्यात हे कुठे मधे.” अनु कानकोंडी झाली. पण तिच्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या. मोठ्या दोघी अनुला धरून-धरून गावातल्या हॉस्पिटलमधे घेऊन गेल्या. युएसला असलेल्या दिराने तातडीने मोठ्या वहिनीच्या उपचारासाठी पैसे पाठवले. आणि निष्कर्ष तोच निघाला… … ब्रेन ट्युमर! मुंबई किंवा नागपूरला घेऊन जा.

कोण घेऊन जाणार? युएसचा दीर पैसे पाठवायला तयार होता. दोन्ही मुली, वयवर्षे चौदा आणि सोळा! त्याहून धाकट्या दोघी आणि सगळ्यात लहान कुलदीप! मुलींनी काकांना, आजीला सांगितलं, “अमेरिकेचा काका पैसा द्यायला तयार असेल तर आम्ही दोघी नेतो आईला मुंबईला!” सगळ्यांना धडकीच भरली. मुंबईत सगळं निभावून नेण्याचं वय नव्हतं मुलींचं. स्वत: अनुला ही कल्पना पसंत नव्हती. पण तिचा आजार हळूहळू बळावत होता. चंदरला या सगळ्याशी काही करायचं नव्हतं. “घेऊन जा आणि मेलीबिली तर तिकडेच फुंकून या, मला हिच्याकडून मुलगा मिळालेला आहे.. माझा प्रयोग पण होईलच आता यशस्वी. आता मला बायकोची गरज नाही. तुम्हाला दोघींना पण कोणी भेटला तर जा पळून हात धरून.” असं सांगून तो मागच्या अंगणात निघून गेला.

फार लांबण लावत नाही. मलाच त्रास होतो लिहितांना! दोघी मुली, सीमा आणि निशा, आईला घेऊन मुंबईला आल्या. अमेरिकेचा दीर सतत त्यांच्या संपर्कात होता. पैसे पाठवत होता. जिथे पैसा भरपूर असतो तिथे कुठलेच काम अडत नाही. अनुचे नशीब चांगलं होतं. फार आधीच तिच्या आजाराबद्दल कळलं होतं. महिन्याच्या आत तिच्यावर ऑपरेशन झालं आणि दोघीजणी आईला घेऊन निघाल्या. खरं तर आणखी आठ दिवस राहायला पाहिजे होतं.. पण दोघींनी डॉक्टरला काय सांगितलं नकळे, डॉक्टरांनी त्यांच्याकडून एका फॉर्मवर सही घेतली आणि अनुला डिस्चार्ज दिला. अनु खुश होती. बरी होऊन घरी जात होती. सीमा, निशा मात्र गप्पं-गप्पं होत्या. पूर्ण प्रवासात त्या फार बोलल्या नाहीत. आईची काळजी घेत राहिल्या. अनु पण क्लांत झाली होती. पूर्ण डोक्याला बँडेज अजूनही होतं.

तिघी घरी पोचल्या! दोघींनी अनुला दोन बाजूंनी धरून ठेवलं होतं. घराच्या आत गेल्या तरी सगळी सामसूम. शेजारचे दोन्ही दीर, दोघीजणी जावा इथेच आल्या होत्या. सासू तोंड झाकून बसली होती. हे असं काय म्हणून अनु काहीतरी बोलायला जाणार तोच तिने पाहिलं, चंदरला जमिनीवर काढून ठेवलं होतं. त्याचा जीव गेलेला होता आणि हे दोघी मुलींना माहित होतं. म्हणूनच त्यांनी घाई करून आईला गावी आणलं होतं. अनु काही न कळून मागच्या अंगणात गेली.. तिथे सगळा सोनं बनवण्याचा पसारा तसाच पडला होता. ते सोनं बनवण्याची अघोरी लालसा मनात घेऊन चंदर निघून गेला होता आणि सोन्यासारखी बायको, माणिक-मोत्यासारख्या मुलींची वाट पाहत निश्चेष्ट पडला होता!

(फोटो सौजन्य:गुगल)

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………..

हे सुद्धा नक्की वाचा –‘नारायणी’ नमोस्तुते! (भाग एक) समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3Q23Cik

हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ (भाग दोन ) समोरील लिंकवर क्लिक कराhttps://bit.ly/3Q9RVqc

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते (भाग तीन ) समोरील लिंकवर क्लिक करा-  https://bit.ly/3zUMAMW

सुन सायबा सुन (भाग चार)  समोरील लिंकवर क्लिक करा https://bit.ly/3Apvo3n

दररोज मी जाते सती..(भाग पाच)  समोरील लिंकवर क्लिक करा-  https://bit.ly/3KiTPD9

Previous articleस्मार्टफोनच्या पलीकडची संपर्क क्रांती !
Next articleअशोकराव, जायचे तर खुशाल जा… 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.