तिला काय वाटत असेल?

बांगड्या विकून शिकविणाऱ्या आईला ‘कलेक्टर’ ऑफिसमध्ये नेतो तेव्हा…

रांची – झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं असून ते स्वत: खुर्चीवर बसले आहेत. तर, कलेक्टर मुलाच्या खांद्यावर आईने आपला मायेचा हात ठेवला आहे. या फोटोतील कलेक्टर मुलाचे डोळे आणि कलेक्टर मुलाचं ऑफिस पाहून भारावलेल्या आईच्या चेहऱ्यावरील भावनाच सर्वकाही सांगत आहेत.

उपायुक्तसह जिल्हा दण्डाधिकारी, कोडरमा नावाचा फलक, चकाकणारं स्वच्छ ऑफिस, ऑफिसमधील टेबलावर देशाचा तिरंगा ध्वज अन् संविधानांचं बोधचिन्ह, त्या बोधचिन्हाच्या बाजुला असलेली सुवर्णअक्षरातील नेमप्लेट रमेश घोलप, भा.प्र.से. आणि ऑफिसमधील खुर्चीवर बसलेले महाराष्ट्रपुत्र जिल्हाधिकारी रमेश घोलप अन् बाजुलाच त्यांच्या मातोश्री. तस्वीर बोलती है… असे आपण ऐकलं असेल. पण ही तस्वीर खूप काही बोलून जाते. तर, या फोटोसोबतच रमेश घोलप यांनी ”तिला काय वाटत असेल?” या टॅगलाईनने एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये आपल्या अडाणी आईने कशाप्रकारे जिल्हाधिकारी मुलगा घडवला, याच वर्णन घोलप यांनी केलं आहे. तसेच, नवरा दारुच्या आहारी गेलेला, पण या माऊलीनं दारोदारी बांगड्या विकून आपल्या दोन्ही मुलांचं डीएड शिक्षण पूर्ण केलं. मुलांना शिक्षक बनविण्याचं स्वप्न बनवणाऱ्या आईनं मुलाची शिक्षणातील गोडी लक्षात आपल्या रमूला थेट जिल्हाधिकारीचं बनवलं.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मूळ निवासी असलेल्या जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी लिहिलेली ही कथा कित्येकांचे डोळे पाणावते आहे. त्यामुळेच, अनेकांनी हा फोटो शेअर करुन साहेबांच्या कार्याला सॅल्युट केला आहे. तर, आईपुढे नतमस्तक झाल्याचं कमेंटवरुन पाहायला मिळतं. रमेश घोलप यांनी 2012 मध्ये आयएएसची परीक्षा क्रॅक केली होती. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या आयएएस अधिकाऱ्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर, कित्येक अधिकारी सोलापूर जिल्ह्यात घडले आहेत. तर, माझ्या गावाला अधिकाऱ्यांचं गाव बनवायचं हेच माझं स्वप्न असल्याचं रमेश घोलप आपल्या भाषणात नेहमी सांगतात. तसेच, आपलं आत्मचरित्र ‘इथे थांबणे नाही’ यातूनही त्यांनी मी यशाच्या मार्गावर चालत निघालोय, तिथे मला थांबायचं नाही, असेही ते वारंवार सांगतात. दरम्यान, रमेश घोलप यांच्या संवेदनशील कार्याची दखल झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही घेतली आहे. तसेच, त्यांच्या कार्याचे कौतुकही दास यांनी अनेकदा केलं आहे.

………………………………………………………………………….

-रमेश घोलप
जिल्हाधिकारी, कोडरमा (झारखंड)

आठ लेकरांमधे सर्वात ‘धाकटी लेक’ असणारी ती सर्वांची लाडकी होती. मागेल तो हट्ट पुरवायला मोठे ४ भाऊ, ३ बहिणी आणि आई-वडिल होते असं ती नेहमी अभिमानानं सांगते. मग तुला त्यावेळी शाळेत का घातलं नाही? या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडं नसतं. याबाबत तिला खंत असते मात्र ती कुणाला दोष देत नाही.
लग्नानंतर मात्र ती जवळजवळ माहेर इतकच मोठ असलेल्या कुटुंबांची ‘थोरली सुन’ होते.सासरबद्दल तक्रारीचा सुर नसला तरी नव्वदच्या दशकात जी कौटुंबिक व्यवस्था होती त्यात ‘धाकटी लेक’ आणि ‘थोरली सुन’ यातील फरक तिने नक्कीच अनुभवला होता. त्यात भर म्हणून ज्या व्यक्तीसोबत आपल्या साताजन्माच्या गाठी बांधलेत त्या व्यक्तीला दारू पिण्याचं ‘व्यसन’ आहे हे समजल्यानंतर, कित्येक वेळा त्याचे चटके सहन केल्यानंतरही जोडीदाराबद्दल माहेरच्यांकडे एक ‘ब्र’ सुद्धा न काढता, कित्येक वेळा मरणाच्या दारात पोहचून सुद्धा आपलं घर न सोडता, स्वत:चं दु:ख झाकून ठेऊन कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत ती कणखर बनली. परिस्थितीची ‘येसन’ तोडून कुटुंबाच्या गाडीचं चाक दारिद्रयाच्या चिखलात रूतू दयायचं नसेल आणि पोरांना शिक्षणाचं बाळकडू पाजायचं असेल तर आपल्याबरोबरच जोडीदाराच्या खांदयावरचा काही भार ही आपल्याला ओढावा लागेल हे वास्तव स्विकारून नातेवाईकांचा विरोध पत्करून ती ‘कासारीन’ बनली. गावोगावी फिरून बांगड्या भरल्या. दोन मुलांना घडवताना, पतीची बिघड़त जाणारी तब्येत सांभाळताना ती परिस्थितीशी दोन हात करून ‘मर्दानी’ सारखी लढली. पतिच्या निधनानंतर तिस-या दिवशी पोराला ‘बापाला तु शब्द दिलाय ना, कि माझा १२ वीचा रिझल्ट लागला कि तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशी मार्क्स असतील. ते जिथपण असतील तिथ त्यांना अभिमान वाटायला पाहिजे. तु शिकला तरच आपला संघर्ष संपेल’ म्हणत मला परीक्षेला पाठवत ‘खंबीर आई’ची भूमिका तिन निभावली.
मोठया मुलाच डी.एड. झाल्यानंतर आणि धाकट्या मुलाचं डी.एड. सुरू असताना मोठया मुलाला नोकरी लागत नाही म्हटल्यावर अनेकांनी तिला सल्ला दिला, की त्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कामाला पाठवा. पण पोराला कामाला नाही पाठवणार ‘तो करेल तर नोकरीच!’ असं म्हणत बांगड्या विकण्याबरोबरच गावी आणि परगावी दुस-यांच्या शेतात तिन मज़ूरी केली आणि थोरल्या लेकाला पण पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवलं.
मी शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर, रहायला घर नसताना सुद्धा सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेताना तिचा पूर्ण पाठिंबा होता. ‘आपला संघर्ष काय अजून थोड़े दिवस सुरू राहिल, पण तुला जे आवडतं ते कर’ असं म्हणत माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवणारी माझी ‘आक्का’ हीच अभ्यासाच्या का माझी खूप मोठी प्रेरणा होती. अभ्यास करताना कधी अभ्यासातून लक्ष विचलित होऊ लागलं की मला दुस-याच्या शेतात काबाडकष्ट करणारी माझी माय आठवायची. तिच्या विश्वासाला पात्र ठरत मी २०१२ मध्ये ‘आयएएस’ (तिच्या भाषेत ‘कलेक्टर’ झालो). काही महिण्यांपूर्वी मी दुस-या वेळी ‘कलेक्टर’ म्हणून चार्ज घेतला तेंव्हा ती ऑफिस मधे आली होती. ती खूपवेळ फक्त कुतूहलाने माझ्याकड़े बघत होती. तिच्या चेह-यावर लेकाविषयीचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता.
तिचे भरलेले डोळयांकड़े बघून मी कल्पना करत होतो की, ‘जिल्हयातील मुलींना शिक्षण मिळावे ही जबाबदारी माझ्याकड़े आहे हे समजल्यावर तिच्यातील न शिक्षण घेता आलेल्या मुलीला काय वाटत असेल? अवैध दारू उत्पादनावर आम्ही कारवाया करतों म्हटल्यावर पतिच्या दारूच्या व्यसनामुळे संसार उध्वस्त झालेल्या तिच्यातील एका स्त्री ला काय वाटत असेल? जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलच्या सर्व आरोग्य योजना लोकांपर्यंत कशा पोहचतील याच्यासंबंधी मिटींग आम्ही करतों हे सांगितल्यावर, पती आज़ारी असताना कित्येक वेळा सरकारी दवाखान्यात दुर्लक्षितपणा अनुभवलेल्या तिच्यातील पत्नीला काय वाटत असेल? संघर्षाच्या काळात घरावर छत नसताना आमचं नाव बीपीएल मधे लावा आणि आम्हाला पण ‘इंदिरा आवास’ मधून एक घरकूल मंज़ूर करा म्हणून तलाठ्याच्या ऑफिसचे उंबरठे झिजवलेल्या पण कधीही लाभार्थी न बनू शकलेल्या त्या महिलेला जेंव्हा आज आपला पोराच्या सहीने जिल्ह्यातील बेघर लोकांना घरे मिळतात हे समजल्यावर काय भावना तिच्या मनात येत असतील? पतीचं निधन झाल्यावर एक-दीड वर्ष ज्या महिलेकड़ून ‘विधवा पेंशन’ मिळवून देते म्हणून गावातील सरकारी व्यवस्थेतील एका महिला कर्मचारीने पैसे उकळले होते हा कटू अनुभव पाठिशी असताना आज आपला मुलगा कैम्प लावून जागच्या जागी लोकांना पेंशन मिळवून देतो हे समजून तिच्यातील त्या पेंशनसाठी अर्थिक शोषण झालेल्या महिलेला काय वाटत असेल?……’
आयएएस झाल्यापासून गेल्या ६ वर्षात ती खुपवेळा मला म्हटलीय, ‘रमू, जे दिवस आपण बघितलेत, भोगलेत तशी लई लोकं ईथपण आहेत. त्यांच्या अड़चणी आधी ऐकत जा. त्यांची काम करत जा. ग़रीब लोकांचे आशीर्वाद कमव फक्त. देव काहीसूद्धा कमी पडू देणार नाही!’
एक मात्र नक्की..असं संस्काराचं आणि प्रेरणेचं विद्यापीठ घरात असताना मनातील संवेदनशीलता आणि लोकांसाठी काम करण्याची तळमळ जिवंत ठेवायला अजून कशाचीच गरज नसते.

 

Previous articleफडणवीस आणि ठाकरे विरुद्ध पवार !
Next articleबलात्कार सोसताना, बलात्कार भोगताना !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.