तीर्थराज कापगते यांची ‘तळपाय’ : कष्टकरी ख्रिस्ताला मागितलेले पसायदान !

तीर्थराज कापगते यांच्या ‘तळपाय ‘ या कवितेची सध्या बरीच चर्चा आहे. या कवितेचे माझे आकलन मी येथे मांडत आहे

-प्रा.हेमंत खडके

तीर्थराज कापगते यांची तळपाय ही कविता वाचली आणि अंतर्बाह्य हादरून गेलो .संवेदना बधीर होणे, भावना कुंठित होणे, काळीज चिरत जाणे — म्हणजे नेमके काय ,याचा अनुभव या कवितेने दिला .

ज्या विषयावर कवीने ही कविता लिहिली तो आज जगभरातला ज्वलंत विषय आहे. तो आहे कोरोना महामारीची साथ आणि तिचे भयावह परिणाम ! या महामारीची झळ सर्वांनाच पोचते आहे ,पण तिची खरी झळ पोचते आहे ती सामान्य कष्टकरी वर्गाला. त्यातही भारतासारख्या विकसनशील(?) देशात वाढत्या शहरांमध्ये जो कष्टकरी वर्ग रहायला आला, त्याची परिस्थिती सध्या फार भयंकर आहे. आधी लॉकडॉऊनमुळे त्याला शहरात आहे तिथेच डांबून घ्यावे लागले. काम बंद झालेले. पगार थांबलेले .गावी जायला वाहने नाहीत .आहे तिथे खायची सोय नाही. अशा कोंडीत सापडलेल्या या वर्गाचा, पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या मुदतीनंतर, स्फोट झाला ;आणि लॉकडाऊनची सर्व बंधने झुगारून हा वर्ग रस्त्यावर आला. मग अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हज्जारो किलोमीटरचा त्यांचा गावाकडचा जीवघेणा प्रवास सुरू झाला .यानिमित्ताने देशभरातल्या रस्त्यांवर उघड्या डोळ्यांनी आणि माध्यमांच्या डोळ्यांनी जे वास्तव आपण पाहतो आहोत, त्याचे वर्णन करायला भीषण,भयंकर ,
अमानुष, स्फोटक,असह्य — यातले एकही विशेषण समर्थ नाही!

हेच वास्तव ,त्याच्या सूक्ष्म छटांसह कवीने आपल्या ‘तळपाय’ कवितेत उतरवले आहे. हे वास्तव आपल्यापैकी कोणालाच नवे नाही .रोज ते आपण पाहतोच आहोत. मग कवीचे वेगळेपण काय ? कवीचे वेगळेपण हेच की ,रोज ,रोज पाहून परिचयाच्या झालेल्या या वास्तवाकडे कवी आपल्याला त्याच्या ‘खास’ दृष्टीतून आणि ‘विशिष्ट ‘भावजाणिवेतून पाहायला भाग पाडतो ;आणि त्या वास्तवाच्या अनेकविध सूक्ष्म परिमाणांचे प्रत्ययकारी दर्शन घडवतो !तेही विलक्षण कलात्मकतेने ! ! ‘रोज मरे त्याला कोण रडे ? ‘ असे म्हणतात खरे; पण कवी वाचणार्‍याला त्या रोजच्या मरणावरही पुन्हा नव्याने रडायला लावतो. त्यामुळे वाचकाचे डोळे अधिक स्वच्छ होतात , दृष्टी अधिक निर्मळ होते.त्याला सत्याचे उत्कट भावदर्शन घडते .

“किती तडफडलास” या सुरुवातीच्या आर्त संबोधनाने कवी या रस्त्यावर आलेल्या कष्टकऱ्याला मैत्रीच्या आत्मीय वर्तुळात ओढतो ;आणि या वर्गाचे कोरोना काळातील सर्व भोग ‘तडफडलास’ या एका क्रियापदाने वाचकाच्या मनात उभे करतो. ओळख पटवण्यासाठी कामगाराला भाराभर पुरावे मागणारी यंत्रणा कवीला अमानुष वाटते. छटाकभर मदत करून किलोभर प्रसिद्धी मिळवणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि ‘नाखून काटकर शहीद’ होणार्‍या संस्थांच्या बेगडी मदत कार्याने या स्वाभिमानी आणि सोशीक कामगाराला भिकारी ठरवले ,याची व्यथा कवीच्या शब्दाशब्दांतून पाझरते.यांच्या तुलनेत स्वतः व्यथा वेदनांना बळी पडलेल्या या कष्टकऱ्यांमध्ये एक उपजत शहाणपण आहे. “मालक भी क्या करेगा साहब !उनकी भी तो आमदनी बंद है !!”या वाक्यात या कामगारांची क्षमाशीलता दिसून येते .

आपापल्या कुटुंबांना घेऊन शहरांतील रस्त्यांवरून गावांकडे निघालेला हा लोंढा उन्हा -पावसाला आणि वादळ -वाऱ्याला तोंड देत घरापर्यंत कसा पोहोचणार ,याची चिंता कवीला आहे.या वर्गावर ही परिस्थिती कोणी आणली? पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी या कष्टकऱ्यांना आपली गावे सोडून हजारो किलोमीटर दूरच्या शहरांमध्ये (स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही !) का जावे लागले ? या प्रश्नांची उत्तरे कवीने फार मार्मिक शब्दांत दिली आहेत. कवी लिहितो:

“डाव्या बाजूला गरिबीचे दाट जंगल
उजव्या बाजूला विकासाचा भरधाव ट्रक”

किती सौम्य ;पण सूचक आणि मवाळ; पण भेदक शब्दांमध्ये कवीने येथे एका सनातन सत्यावर ,भाष्य केले आहे !आजवर डाव्या किंवा उजव्या अशा कोणत्याही विचारप्रणालीने या कष्टकऱ्यांची हलाखी दूर केली नाही. मग त्यांचा ‘गरीबी हटाव’चा किंवा ‘सबका विकास’ चा नारा कितीही बुलंद असो!! जॉ पॉल सार्त्र म्हणायचा,” कविता ही कवीची राजकीय कृतीच असते ” या कवितेच्या साक्षीने सार्त्रच्या विधानाचा अर्थ अधिकच पटत जातो. समाजातील उच्च वर्ग ‘आपापले हिशेबी लक्ष्य गाठत’ जिथे पोचले तिथे हा मजूर वर्ग केव्हा पोचणार ? असा आर्त प्रश्न कवी या वर्गाला उद्देशून विचारतो आहे. खरे म्हणजे हा त्याने व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे.

या कवितेने जशी उच्च आणि निम्न आर्थिक वर्गांतील तफावत टिपली आहे तशी शहर विरुद्ध खेडे अशी विभागणीही अधोरेखित केली आहे. ‘कोरोनाच्या भीतीने घरात लपून बसलेले हे अप्पलपोटे शहर’ या प्रतिमेतून संकुचित स्वार्थी शहरी मानसिकतेवर कवीने केलेला आघात वाचकाला हलवून टाकणारा आहे .खरे म्हणजे या कामगारांनीच शहरे उभी केली .तेथील कष्टाची कामे करून शहराचा गाडा समर्थपणे हाकला .उच्च वर्गाचे जगणे सुखाचे करून ठेवले. या कष्टाचा अल्प मोबदला घेऊन स्वावलंबी वृत्तीने जगणे ही या कष्टकऱ्यांची आजवरच्या जगण्याची शैली होती. या जीवनशैलीने त्या वर्गाची तारुण्यातील स्वप्ने चिणून टाकली. त्यांचे पौरुष ठेचले. तरीही त्यांच्या जगण्याला अविरत आणि स्वाभिमानी कष्टांचा बलदंड आधार होता .कोरोना महामारीने त्यांचा हा आधारच काढून घेतला. त्यांच्या हसण्यातील माधुर्य नष्ट केले. शहरगाडा हाकणारी त्यांची यंत्रे, अवजारे जप्त केली ;आणि अशा भयंकर परिस्थितीत या स्वार्थी शहराने त्यांना जवळ न घेता एका रात्रीत निर्वासित करून ,उपासमारीच्या खाईत ढकलले .कवीचे हे ‘शहर विरुद्ध खेडे’ या द्वंद्वाचे उद्विग्न आकलन चुकीचे आहे, असे कोण म्हणू शकेल ?

कोरोनाच्या या क्रूर काळात रस्त्यांवर चालणाऱ्या कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदनांच्या ज्या करुण कथा छायाचित्रांसह सर्वत्र पसरल्या, त्या सर्वांचे जणू सार या कवितेत कवीने एकवटले आहे. जणू येथे कवीने या व्यथा- वेदनांचा कोलाज केला आहे. या वेदना भोगताना ज्यांना जीव गमवावे लागले त्यांच्या मरणावर भेदक भाष्य करताना कवी काळाला त्वेषाने बजावतो:

” हे वर्तमाना ! जपून ठेव
देशभर इतस्ततः पसरलेल्या
छिन्नविच्छिन्न तुटलेल्या देहांसोबत
हे अगणित तळपाय; आणि
प्रत्येक हातात घट्ट धरलेली भाकर
साठवून ठेव डोळ्यात तुझ्या
सामूहिक आत्महत्येची
ही ख्रिस्तव्याकुळ भयभीषण मरणशैली”

‘सामूहिक आत्महत्येची ख्रिस्तव्याकूळ भयभीषण मरणशैली’ ही या दीर्घ कवितेतील केंद्रीय प्रतिमा आहे .ख्रिस्ताला समूहासमोरच सूळावर चढविण्यात आले होते. त्याच्या हातापायात खिळे ठोकून त्याचे शरीर रक्तबंबाळ आणि हातपाय विदीर्ण केले गेले होते . ख्रिस्ताला सूळावर चढवण्यापूर्वी
” याची सुटका करायची का ? “असा प्रश्न अधिकाऱ्याने लोकांना विचारला, तेव्हा लोकांनी एका दरोडेखोराची सुटका केली ;पण त्यांनी ख्रिस्ताला वाचवले नाही ;आणि तरीही ख्रिस्ताच्या मनातील कारुण्याचा झरा अखंड वाहाताच होता ! “हे आकाशातील बापा ,या सर्वांना माफ कर. हे काय करत आहेत, ते त्यांना कळत नाही ! “असेच तो ईश्वराला उद्देशून म्हणाला. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे पुनरुत्थान (रिसरेक्शन )झाले तेव्हाही त्याने, पश्चाताप आणि पापक्षमा यांचा संदेश सर्वदूर पोचवण्याचा उपदेश अनुयायांना केला.
युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहील ,असे आश्वासनही त्याने सर्वांना दिले

ख्रिस्तसूळाच्या या केंद्रीय प्रतिमेच्या प्रकाशात या कवितेतील शब्दांचे आणि प्रतिमांचे अर्थ कसे सूचक आणि विस्तारित (यालाच व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यर्थ म्हणतात ) होत जातात ,हे पाहण्यासारखे आहे .येथे कष्टकऱ्यांच्या मरणाला कवीने ख्रिस्तमरणाच्या पातळीवर आणले आहे .स्थळ आणि काळाचे संदर्भ वेगळे असले तरी या दोन्ही घटनांमधील मरणवेदना कवीला सारखीच व्यथित करते. ‘कसा तडफडलास’ या कवितेच्या सुरुवातीच्या चरणातच हे साम्य जाणवायला लागते . (ख्रिस्ताला सूळावर चढण्यापूर्वी फटके मारून रक्तबंबाळ करून तडफडायला लावले होते )’खांद्यावर भुकेली मुलगी /वृद्ध आई पाठीवर घेऊन’ (ख्रिस्ताला स्वतःचा क्रूस स्वतःच्या खांद्या-पाठीवर वाहावा लागला) ‘आणि इतके कठीण असते कामगारांना ओळखणे ? ‘(ख्रिस्ताला सूळावर जाण्यापूर्वी जवळच्या अनुयायानेही ओळख दाखवली नव्हती ) ‘मालक भी क्या करेगा साहेब ‘(देवा यांना क्षमा कर )’आठवत असतील येथील सुखवस्तू जगाच्या पायव्यात चिणली गेलेली सारी स्वप्ने'( ख्रिस्तानेही आपले सर्व तारुण्य सेवाकार्याला दिले होते . सूळावर जाताना त्याच्यातल्या निदान मानवी अंशाला, क्षणभर तरी ,तारुण्यातील स्वप्नांचा पराभव आठवला असेलच )’व्यवस्थेच्या हिंस्रपणाचे क्रूर दर्शन घडवणारी ट्रेन ‘(ख्रिस्ताच्या बाबतीत ट्रेनची जागा क्रूर क्रूसाने घेतली होती, एवढाच काय तो फरक)’

तुटलेल्या देहांसोबतचे अगणित तळपाय ‘( सूळावर चढवताना खिळे ठोकल्याने विदीर्ण झालेले ख्रिस्ताचे हात-पाय) ‘कळू देत तुझ्या पृथ्वी तोलून धरलेल्या तळहाताचे मोल ‘(ख्रिस्ताने करुणेच्या बळावर पृथ्वी तोलली होती , तर कष्टकरी स्वकष्टाच्या बळावर ती तोलत आहेत )’प्रत्येक हातात घट्ट धरलेली भाकर ‘(ख्रिस्ताच्या जीवनात भाकर या प्रतीकाला फार महत्त्व आहे .त्याला एकदा सैतानाने “भाकर की स्वातंत्र्य ? “अशी निवड विचारली होती. ख्रिस्ताने भाकर न निवडता स्वातंत्र्य या मूल्याची निवड केली . ख्रिस्ताचे बलिदान स्वातंत्र्य या उन्नत तत्त्वासाठी झाल्याने त्याला उदात्तता तरी प्राप्त झाली ; पण या कष्टकरी ख्रिस्ताचा मृत्यू तर भाकरीसारख्या प्राथमिक गरजेसाठी होत आहे ! ( माणसाला माणसांची दुःखे भोगू द्या – मार्क्स ! )म्हणजे व्यवस्थेने त्याचे जगणे तर किरकोळ ठरवलेच ; पण त्याचे मरणेही चिल्लर करून सोडले !! येथे कवीने ख्रिस्तबलिदानाची ‘उदात्तता’ आणि कष्टकऱ्यांच्या मरणाची व्यवस्थाप्रणीत ‘स्वस्तता’ यांच्यातील विरोध सूचकतेने अधोरेखित केला आहे )

या दीर्घ कवितेच्या शेवटी कवी या कष्टकरी ख्रिस्ताकडे एक पसायदान मागतो आहे. त्यात श्रमिक विश्वाविषयीचे सारे आर्त प्रकटले आहे . या पसायदानाला अपराधगंडाचे एक अस्तरही लाभले आहे. साधारणतः निम्न आर्थिक वर्गात ज्यांचे बालपण गेले; आणि पुढे जे स्वबळावर उच्च मध्यम वर्गात पोचले, त्यांपैकी थोडीतरी संवेदनशीलता शिल्लक असलेल्या माणसांमध्ये, आढळणारा हा दुर्मिळ समाजशील अपराधगंड आहे ! कवीही अशाच वर्गाचा प्रतिनिधी आहे .म्हणूनच त्याच्या या कवितेत आत्मटीकेचा प्रखर सूर दिसून येतो. (विश्वविख्यात रशियन कादंबरीकार फ्योदर डॉस्टोव्हस्की याचे या अपराधगंडाच्या संदर्भात फार वेगळे म्हणणे आहे .त्याच्या मते “…मोठ्या लेखकाचे मन ,निदान अपराधगंडाने व्याकुळ असले पाहिजे …”)म्हणूनच कवीला त्याची करुणा बेगडी, कळवळा निरर्थक; आणि संवेदना मुर्दाड वाटतात. म्हणूनच तो या विश्‍वात्मक कष्टकरी देवाकडे पसायदान मागतो :
आता किमान माझ्या मनातली
वेदना तरी जिवंत राहू दे

दररोज पोटभर जेवताना
ते वायजाळलेले बथ्थड हात
ते वाळलेले निर्जीव डोळे
ते खप्पड गाल अन्
ते भेगाळलेले तळपाय
सतत आठवण्याचा
शाप मला दे

या मानवी संकटातून अगतिक
‘आपण सारे’ मुक्त झाल्यावर
उद्या तू परत येशील तेव्हा
शोषणाचे नवनवे संदर्भ अन्
उपेक्षेचे सूक्ष्मार्थ सर्वांना कळू देत
कळू दे तुझ्या पृथ्वी तोलून धरलेल्या
तळहाताचे मोल

तू परत आल्यावर
स्वच्छ धुतलेल्या नजरेने
तुझ्या सुखदुःखांकडे
पाहू शकेन मी
असे तुझ्याएवढे
माणूसपण मला दे
अन् तुझ्या स्वाभिमानाचे
खरे मूल्य कळेल असे तुझ्यासारखे
शहाणपण मला दे

या पसायदानामध्येही ख्रिस्तप्रतिमेचे प्रसरणशील अर्थ वाचकाच्या मनात विस्तारत जातात .येथे ‘मजुरांचे शहरात पुन्हा परत येणे’ हे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासारखे असावे, अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे. ख्रिस्ताला सूळावरून खाली काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले ,अशी ख्रिस्ती बांधवांची श्रद्धा आहे .या पुनरुत्थानाचे –नव्याने जन्माला येणे ,अस्तित्व अधिक शक्तिमान होणे , उन्नयन होणे –असे अनेक अर्थ घेतले जातात . कवीला कष्टकऱ्यांचे उन्नयन तर अपेक्षित आहेच ;पण संपूर्ण व्यवस्थेचे पुनरुत्थान झाल्याशिवाय हे शक्य नाही ,याची जाणही त्याला आहे .या उत्थानासाठी केवळ व्यक्तिगत सहानुभूती पुरेशी नाही याचे प्रगल्भ भानही त्याला आहे. म्हणूनच कष्टकऱ्यांच्या उन्नयनाच्या विचारप्रणालीतील (आयडिऑलॉजी ) पायऱ्या गांभीर्याने समजून घेण्याची आणि त्याचे सार्वत्रिक उपयोजन होण्याची तळमळ त्याला लागून राहिली आहे .
संपूर्ण कविताच संवादरूपात असून हा संवाद कधी कष्टकऱ्यांशी ,कधी व्यवस्थेशी, कधी वाचकांशी तर कधी स्वतःशीच असल्याने कवितेला एका जिवंत बोलक्या वातावरणाची पार्श्वभूमी मिळाली आहे .सामाजिक जाणिवा जेव्हा कवीच्या अंत :करणाशी एकरूप होतात, तेव्हा सामाजिक आशयाची कविताही किती सशक्त कलारूप धारण करते ,याचा प्रत्यय ही कविता देते.
मराठी कवितेच्या क्षेत्रात प्राचीन -मध्ययुगीन काळात ज्ञानेश्वरांचे (पसायदान ) आणि तुकारामांचे (हेचि दान देगा देवा ) पसायदान गाजले. अर्वाचीन काळात मर्ढेकर (भंगू दे काठिन्य माझे ) म. म. देशपांडे (सारा अंधारची प्यावा )दासू वैद्य (मागणं ) यांची पसायदाने लक्षणीय ठरली .याच परंपरेत तीर्थराज कापगते यांचे वर्तमान परिस्थितीवर भेदक भाष्य करणारे आणि प्रत्यक्ष कष्टकरी ख्रिस्ताला मागितलेले हे पसायदानही महत्त्वाचे मानले जाईल ,एवढे निश्चित!
कवीने कष्टकरी ख्रिस्ताकडे शहाणीवेचे पसायदान मागितले आहे .कष्टकऱ्यांच्या आजवरच्या ऋणातून मुक्त होऊन त्यांच्याशी मैत्र स्थापन करण्याचा तोच खरा मार्ग आहे. हे पसायदान कवीला लवकर प्राप्त होवो.मात्र तोवर
….कोरोनाच्या या महाभयंकर काळात कष्टकऱ्यांना सामूहिकरीत्या सूळावर चढवण्याची आठवण म्हणून ,कवीच्या ‘काळीजतळात असलेल्या लाल जखमेची ठसठस वाचकांच्या मनातही सलत राहो… आमेन !

तीर्थराज कापगते यांची संपूर्ण कविता वाचण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/tirtharaj.kapgate/posts/1746903825449845

(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत)
 ९८२२८ ४११९०

Previous articleचक्रीवादळांची निर्मिती कशी होते?
Next articleआठवणी : नवेगावबांध आणि मारुती चितमपल्ली
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.