तुषार गांधी आणि शेषराव मोरेंच्या स्फोटक मांडणीने गाजलेले ‘गांधी…’ शिबीर

प्रा . दत्ता भगत
gandhi samjun ghetannaदि. ७ आणि ८ फेब्रुवारी २०१५ रोजी ‘गांधीच्या कर्मभूमीत … गांधी समजून घेताना’ या विषयावर सेवाग्राम येथे दोन दिवसांचे शिबीर झाले. या चर्चासत्रोच संयोजक ‘आम्ही सारे’ या नावाची संस्था होती. म.गांधी यांच्या खूनामागे सुनियोजित कट होता असा निष्कर्ष ठामपणे काढत येईल एवढी सामग्री ज्यांनी जमवली आहे आणि प्रसिध्द केली आहे ते तुषार गांधी चर्चासत्राच्या एका सत्रात प्रमुख वक्ते होते. तर म.गांधी यांनी अखंड भारताची संकल्पना का नाकारली यावर अतिशय वादळी ग्रंथ लिहिणारे शेषराव मोरे याच विषयावर एका समान प्रमुख वक्ते होते. तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ते जरी हिंदीत बोलत असले तरी त्यांना मराठी भाषा उत्तम येते . शेषराव मोरे हे सावरकरांचे प्रसिध्द भाष्यकार. दोघांचीही मांडणी अत्यंत स्फोटक होती. या मांडणीतला पुरावा म्हणून वापरला गेलेला नीरस तपशील, तर्काधिष्ठीत कोरडेपणा आणि पुराव्यांची रेलचेल यामुळे दोघांचीही मांडणी पुरेशी दीर्घ होती. एखाद्या चर्चासत्रात इतक्या परस्परविरोधी दोन टोकावरचे विचारवंत एकत्र येतात, आपले अभिनिवेश बाजूला ठेऊन आपल्या मनातल्या भावनोद्रेकाला आवर घालून प्रचंड स्फोटक असे काही देऊन जातात आणि सहभागी कार्यकर्तेही कंटाळयाची फारशी पर्वा न करता शांतपणे ऐकून घेतात हे सर्व दृश्य मला तरी खूप उत्साहवर्धक वाटलं. अलीकडे सगळयांच्याच भावना इतक्या टोकदार झाल्या आहेत की समोरच्या श्रोत्यांना जे मुळातच पटलेलं आहे तेच प्रचंड हातवारे करुन टाळया मिळवत विजयी मुद्रेने सांगणारे वक्तेच सर्वत्र दिसतात. अशी एकसुरी व्याख्याने , मान्य असलेल्या मतांचे अलंकारिक स्वरुपाचे निवेदन यातून हाती मात्र काहीच लागत नाही. अशी चर्चासत्रेच खूप होतात. इथे यात तसे घडले नाही. वरील दोन्ही वक्त्यांचे वृत्तांत सामान्य माणसांपर्यंत पोचताना जे सरळीकरण झाले त्याच्या काही ब-यावाईट प्रतिक्रिया निर्माण झाल्या. या सुलभीकरणाच्या प्रवृत्तीतून अशी गंभीर मांडणी करणा-या विचारवंतांवर रेडिमेड शिक्के मारले जातात. हे शिक्के ठासून उमटले जावेत असे संदर्भ उपलब्ध असणे म्हणजे त्याच संदर्भावर विशेष प्रकाशझोत टाकला जातो आणि मूळ मांडणीच निरर्थक होऊन बसते. मला स्वत:ला तुषार गांधी बोलून गेले त्याच्या अगदी दुस -या च दिवशी ‘आता तुषार गांधी यांचीही वेळ आलेली दिसते’ अशा काही प्रतिक्रिया त्यांच्या भाषणाच्या वृतांताचे वाचन केल्यानंतर निर्माण झाल्या असे कळले. वैचारिक दहशतवाद सर्वच काळात असतो हे मी नाकारत नाही. पण तुषार गांधी यांच्या व्याख्यानातले मूळ अंत:सूत्र दुर्लक्षित होवून निर्माण झालेल्या या प्रतिक्रिया आहेत, हे मी खात्रीने सांगू शकतो. कदाचित शेषा्राव मोरे यांच्याही वृत्तपत्रीय वृत्तांतातून – मोरे म्हणजे काय, ते फक्त भाजपच्या धोरणाचीच ‘री’ ओढतील, दुसरे काय करणार?’ अशाही प्रतिक्रिया निर्माण होवू शकतात.
लोकशाही प्रशासन असणा-या देशात आणि कायद्याचे राज्य असणा-या देशातही सुप्त स्वरुपात हुकूमशाही सक्रिय असते. म्हणूनच काही खूनांमागचे सर्व धागेदोरे म्हणावे तसे उलगडे जात नसतात; हे असे का होते? कारण लोकशाही राबवणारीही माणसेच असतात. ती साधीसुधी माणसे नसतात. त्यामुळे त्यांच्याही काही ठाम भूमिका असतात; कधी या भूमिका इतिहासाच्या आकलनातून सिध्द होतात तर कधी स्वत:च्या भूमिकेमुळे कुणातरी एका गटाचे हितसंबंध धोक्यात येवू नयेत म्हणून टोकदार झालेल्या असतात, याबद्दलची एक तीव्र वेदना महात्मा गांधी यांच्या खूनाचा समाधानकारक उलगडा होत नाही असे सूत्र तुषार गांधी यांच्या विवेचनात होते. ते स्वत:च गांधींचे पणतू असल्यामुळे त्यांच्या विवेचनात करुणतेची झाक होती. पण त्यांचा विचार महात्मा गांधीचे पणतू म्हणून होता कामा नये हेही ते आग्रहपूर्वक सांगत होते. म्हणून तुषार गांधी यांचे विवेचन लोकशाहीसारख्या प्रशासन व्यवस्थेतही काही काळोख्या जागा राहत असतात, त्याबद्दल आपण जागरुक असायला हवे असा संदेश देणारे होते.
शेषराव मोरे हे माझे मित्र आहेत. पण कुणीही त्यांच्यावर एखाद्या भूमिकेचा शिक्का मारुन दुर्लक्ष करावे असे ते विचारवंत नाहीत तर त्यांच्या विवेचनात दडलेली स्फोटकता आणि भारताच्या एकात्मतेबद्दल त्यांच्या मनात असलेली तळमळ दुर्लक्षीत करावी असे ते विचारवंत नाहीत हे केव्हातरी महाराष्ट्राच्या लक्षात येईल, याची मात्र खात्री आहे. जे जे महत्वाचे असते ते श्रेष्ठ असते. आणि मला पटणारेच असते असे भ्रमही दूर झाले पाहिजेत. गांधी खूनाची घटना अतिशय महत्वाची आहे. याचा अर्थ ती श्रेष्ठही असणे मला पटणारीही आहे असा मूर्खपणाचा अर्थ कुणी काढता कामा नये. शेषराव मोरे यांनी ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ असा साडेसातशे पृष्ठांचा ग्रंथ लिहिला असून तो ‘राजहंस’ सारख्या अतिशय ख्यातनाम संस्थेने प्रकाशित केला आहे. आता या ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर असून या ग्रंथावर चर्चा करणारे वेगवेगळ्या विचारवंतांचे ‘प्रतिवाद’ हे पुस्तकही आता प्रसिध्द झाले आहे.
सामान्यपणे म.गांधी यांच्याकडे फाळणीचे गुन्हेगार म्हणून पाहिजे जाते. गांधीजींना कॉंग्रेसचे सर्वश्रेष्ठ नेतेही मानले जाते . तेव्हा देशाच्या फाळणीला कॉंग्रेस जबाबदार आहे असेच बव्हंशी जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शेषराव मोरे यांच्या या ग्रंथाच्या नावातूनच कॉंग्रेस आणि म.गांधी हे फाळणीचे गुन्हेगार नाहीत तर या देशाचे अखंडत्व नाकारणारे आणखी मोठे गुन्हेगार आहेत असाच अर्थ ध्वनीत होतो. मला ही शेषराव मोरे यांची नाव ठेवण्यातली एक चतुराई आहे असे वाटते. खरे तर त्यांनी प्रस्तुत ग्रंथात कुणाला हवा होता अखंड हिंदुस्थान? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या प्रश्नाचे त्यांचे उत्तर आहे : ‘लीग आणि राष्ट्रीय मुसलमान यांना’. त्यामुळे पहिलाच धक्का आपणाला आश्चर्यचकित करतो. पण हा धक्का ओसरल्यानंतर जो दुसरा धक्का बसतो तो मात्र चिंताजनक आणि हादरा देणारा आहे. तो हादरा देणारा असला तरी दुर्लक्ष करु नये एवढा चिंताजनक आहे आणि हे कळायचे तर त्यासाठी मोरे यांचा हा ग्रंथच अतिशय गंभीरपणे आणि स्वस्थ चित्ताने वाचायला हवा असे मला वाटते. मोरे यांनी या चर्चासत्रात जे व्याख्यान दिले त्यासाठी अनेक पुरावे सादर केले. म.गांधी आणि कॉंग्रेस हे फाळणीचे गुन्हेगार नाहीतच हे ठामपणे सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी अखंड हिंदुस्थानला विरोध केल्यामुळे आणखी मोठे गुन्हेगार ठरत नसून या देशातल्या तमाम हिंदू जनतेवर फार मोठा उपकार करणारे ते नेते आहेत अशी त्यांची मांडणी होती. पण त्यांचे व्याख्यान म.गांधी अथवा कॉंग्रेस यांना दोषमुक्त करावे यासाठी नव्हते. ते जे काही रहस्यमय पद्धतीने सुचवत होते ते अतिशय चिंताजनक होते. त्यांच्या ग्रंथाचा हिंदु मुस्लीम संबंधाच्या राष्ट्रीय धोरणावर दूरच्या काळात अतिशय दूरगामी परिणाम होवू शकतो असे मला स्वत:ला वाटते. हा परिणाम केवळ राज्य घटनेच्या आधारे थोपवता येईलच असे नाही. कारण राज्यघटनासुध्दा बदलता येणारा मसुदा आहे अशी एक मानसिक धारणासुध्दा आपल्या देशात निर्माण झाली आहे.
आपल्या देशाचा लढा सत्तांतराचा लढा आहे, असे त्याचे वरवरचे स्वरुप आहे. त्याच्या तळाशी स्वातंत्र्य, समता, न्यायाचे तात्त्विक अधिष्ठान आहे. पण लढ्याचे प्रत्यक्ष स्वरुप मात्र हिंदू -मुस्लिम ऐक्याचे आहे. त्यामुळे आपल्या या लढ्याने द्विराष्ट्रवादाचे भयंकर संकट कसे टळले या आधारे आपण हा लढा समजून घ्यावा असे शेषराव मोरे यांना वाटते आणि या लढ्यातला राजकीय ध्येयवाद निर्माण करण्यात डॉ.बाबासाहेबांचे योगदान कोणते हे समजून घेण्याचे टाळू नये असे मला वाटते. गांधी आंबेडकर यांच्यामधील संघर्ष या अंगाने समजून घेतला पाहिजे. या अंगाने या चर्चासत्रात मीही थोडाबहूत सहभाग घेतला.
या चर्चासत्रात आणखी एक आश्चर्यकारक घटना घडली. ती म्हणजे श्री आशुतोष शेवाळकर यांचा व्याख्याते म्हणून सहभाग. श्री. आशुतोष शेवाळकर हे प्रसिध्द साहित्यिक आणि वक्ते कै.प्राचार्य राम शेवाळकर यांचे चिरंजीव. ते यशस्वी अभियंता आहेत. गृहबांधणी क्षेत्रातले ते नावाजलेले विकासक आहेत. त्यांचे असे व्यासपीठीय व्याख्यान ते प्रथमच देत होते, असे त्यांनी सांगितले. तितकाच त्यांचा व्याख्यानाचा विषयसुध्दा सगळयांसाठी कुतुहलाचा विषय होता. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक वैशिष्ट्यांवर जाहीर भाषणे होतात पण त्यांच्या ‘ब्रह्मचर्य’ या विषयावरील जाहीर व्याख्यान सहसा कुणी आयोजित करीत नाही. गांधीविरोधक या विषयावर खाजगी बैठकीत गांधींची टिंगलटवाळी करण्यासाठी हा विषय हाताळतात. तर गांधीवादी दबक्या आवाजात परस्परांशी बोलून जाहीर बोलणे टाळतात. इथे मात्र आशुतोष शेवाळकरांनी प्रस्तुत विषयावर सुमारे चाळीस मिमिटांचे अतिशय (शैक्षणिक) अ‍ॅकॅडमिक भाषण दिले आणि सहभागी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तेवढीच तोल सांभाळून उत्तरे दिली.
सदर चर्चासत्रोच उद्घाटन प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या प्रभावी भाषणाने झाले. समारोप चंद्रकांत वानखडे यांनी केला. ‘ गांधी मरत का नाही?’ या विषयावरची त्यांची मांडणी सगळयांनाच अंतर्मुख करणारी होती.
चर्चासत्रात थेट मुंबई, पुणे, गोवा, संपूर्ण विदर्भ आणि काही मराठवाड्यातून मंडळी आली होती . हे सारी मंडळी कुठल्याही एकाच एका वैचारिक गटाचे नव्हेत की एकाच एका व्यवसायतले. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, चनलमधील निर्माते जसे होते तसेच कॉमे्रड, संघर्ष वाहिनी, सेवासंघ, ब्रिगेड इत्यादी संघटनेचेही कार्यकर्ते होते. फारशी प्रसिध्दी न करता अमरावती येथील अविनाश दुधे यांनी हे चर्चासत्र अतिशय परिश्रमाने यशस्वी केले हे मात्र नक्की

प्रा . दत्ता भगत
९८८१२३००८४
(लेखक हे सुप्रसिद्ध नाटककार आणि आंबेडकरी विचारवंत आहेत )

Previous articleअटळ शोकांतिका
Next articleनारायणभाई देसाई यांच्या सहवासात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.