तेवढंच फक्त उरलंय..!

-नीलांबरी जोशी

हार्वर्ड विद्यापीठातल्या बी. एफ. स्किनर या बिहेविअरिस्ट मानसशास्त्रज्ञानं १९३० मध्ये उंदरांवर एक प्रयोग केला होता. स्किनरनं एका खोक्यात उपाशी उंदीर ठेवला. त्यात एक कळ होती. उंदीर इकडंतिकडं फिरताना अचानक कळ दाबली गेली तर अन्नाचे कण त्यात पडायचे. भूक लागल्यावर कळ दाबायला उंदीर लगेचच शिकला. पण याच्या दुसऱ्या टप्प्यात उंदरानं कळ दाबल्यावर त्याला थोडंसं अन्न देणं, जास्त अन्न देणं किंवा काहीवेळा अजिबात अन्न न देणं असे प्रयोग स्किनरनं केले. आधी फक्त भूक लागल्यावर ती कळ दाबणारा उंदीर आता सारखीच कळ दाबायला लागला.

सेलिब्रिटिजच्या बाबतीत या उंदरासारखी अवस्था फार सहज येते. २४ x ७ x ३६५ ते प्रसिध्दीच्या झोतात असतात. वर्तमानपत्रं, मासिकं, टीव्ही चॅनेल्स, समाजमाध्यमं त्यांचा उदो उदो करत असतात. त्यांच्या एका कटाक्षासाठी फॅन्स झुरतात. आपलं त्या सेलिब्रिटीवरचं प्रेम व्यक्त करायला लोक वाट्टेल ते करत असतात. प्रसिध्दी कोणाला आवडत नाही? तिची चटक सहज लागते. मग ती मिळवताना अन्न मिळवण्यासाठी उंदीर जशी सतत कळ दाबायचा तसं आपल्याकडे लक्ष खेचून घ्यायला सेलिब्रिटीही वाट्टेल ते करतात.

कोरोनाकाळात याच कारणानं फेसबुक लाईव्ह, झूम, युट्यूब लाईव्ह हे प्रकार किती वाढले ते आपण अनुभवतो आहोतच.

याचं टोकाचं उदाहरण म्हणजे “हिरॉईन” चित्रपटात करिना कपूरनं काम केलेली हिरॉईन पडत्या काळात आपला नवीन चित्रपट चालावा यासाठी अगदी खाजगी पोर्नोग्राफिक व्हिडिओ देखील व्हायरल करते.

पण ही प्रसिध्दी, फॅन फॉलोईंग कमी होऊ शकतं असं किंचित जाणवलं तरी मग अस्वस्थता येते. निराशेकडे मन सहज झुकतं. हे “सेलिब्रिटी स्टेटस सोडून आपल्याला साधंसुधं आनंदी आयुष्य असू शकतं” हा पर्याय लक्षात सुध्दा येत नाही. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांत सिंगनं आत्महत्या केली याची कारणं अजून पूर्ण समजलेली नाहीत.

पण आत्महत्या करणार््यात माणसाला कोणताच पर्याय समोर दिसत नसतो हे आत्महत्येचं महत्वाचं कारण असतं. भोवतालच्या सर्व माणसांना ते पर्याय दिसतात.. पण त्याच्या / तिच्या दृष्टीनं जग संपलेलं असतं. त्यांच्यापुरता तरी स्वत:ला संपवण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नसतो. सगळं जग काळोखं, भग्न दिसत असतं.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आडवा येणारा इगो. आयुष्याच्या वाटेवर चालताना एखादा निर्णय चुकतो. तो निर्णय चुकला तर आर्थिक, सामाजिक, मानसिक फटका बसू शकतो. अशावेळी आपलं चुकलं, आता चूक सुधारु हा एक मार्ग असतो. पण बुध्दिमान माणसांना आपल्या अहंकारावर झालेला घाव सोसता येत नाही. त्यांना चूक स्वत:शीदेखील मान्य करणं कमीपणाचं वाटतं. त्यापेक्षा आयुष्य संपवणं जास्त सोपं वाटतं.

या दोन्ही कारणांचा सुशांत सिंगच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला पुढे कोणते चित्रपट मिळणार आहेत याबद्दल त्याच्या मनात साशंकता असू शकते. सेलिब्रिटी म्हणून उंचावलेलं रहाणीमान, स्टेटस कमी होणार ही भीती भेडसावलेली असू शकते. दुसरं म्हणजे, इंजिनिअरिंग त्यानं मध्येच सोडलं होतं. शिक्षण पूर्ण न करता (दुसरा पर्याय उभा न करता) आपण चित्रपटक्षेत्राच्या मोहजालात अडकलो याबद्दल मनात अपराधी भावना असू शकते.

वयाच्या ३४व्या वर्षी केलेली आत्महत्या यातला ३४ हा आकडा एका दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. कारण तेव्हा पुढे लवकरच येणारी चाळिशी दिसत असते. अशा वयात वेगळंच कोणतंतरी करिअर करायचं ठरवलं तरी करिअर स्विच करताना आप्तेष्ट, समाज जे काय म्हणेल ते सहन करायची तयारी नसते.

या दोन्हीचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत सिंगला असलेला नैराश्य हा मनोविकार उद्वभलेला असू शकतो. आत्महत्या करणार््याि निम्म्यापेक्षा जास्त लोकांना नैराश्य हा मनोविकार असतो.

त्यातच कोरोनाच्या काळात त्याला पुढचा मार्ग दिसणं बंद झालं. सुशांत सिंग एकटा रहात होता हे नैराश्यात भर घालणारं मोठं कारण आहे. आजूबाजूच्या लोकांशी सोशल डिस्टन्सिंगमुळे सगळ्यांसारखेच त्याचेही संबंध मर्यादित झाले असणार. जवळच्या माणसांशी तो फोनवर बोलत असेल. पण माणसाची मन:स्थिती फोनवरच्या बोलण्यातून कळणं अवघड. त्यातही तो अंतर्मुख प्रवृत्तीचा असेल तर आत्महत्येच्या विचारांकडे तुलनेनं लवकर जाऊ शकतो. अशी माणसं आपलं दु:ख, वेदना लपवतात. त्यांना भावनिक मदत मागणं कमीपणाचं, जवळपास अशक्य वाटतं. आपल्याला समोरच्यानं समजून घ्यावं, त्यात काय सांगायचं अशीही प्रवृत्ती अनेकदा असते.

मुळात अंतर्मुख स्वभावाची माणसं बहिर्मुख स्वभावाच्या माणसांपेक्षा जगाकडे तुलनेनं नकारात्मक दृष्टिकोनातून पहातात. उदाहरणार्थ, बहिर्मुख प्रवृत्तीची माणसं सहज कोणाच्याही पाठीवर थाप मारुन गप्पा छाटतात, फिरायला जातात.. तेव्हा अंतर्मुख प्रवृत्तीची माणसं “त्यांना हे कसं काय बुवा जमतं?” असा विचार करत असतात. आतल्या आत भावना साठवून ठेवणं, लोकांशी कमी बोलणं हे अंतर्मुख लोकांचं महत्वाचं लक्षण आहे. अंतर्मुख लोक जास्त संवेदनाशील असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी, संवादांमधल्या बारीक छटांनी, कोणाच्यातरी एका फोन कॉलवरच्या एखाद्या शब्दानं ते दुखावले जातात. त्यांना नैराश्य लवकर येऊ शकतं. आत्महत्येच्या विचारांकडे संवेदनाशील माणसं लवकर वळतात. जवळचा मित्र किंवा प्रियकर / प्रेयसी यांच्याबरोबरचं नातं संपणं, नोकरी गेल्यानं आर्थिक स्त्रोत संपणं, इतर आर्थिक समस्या भेडसावत असणं, समाजात आपली पत रहाणार नाही याची भीती वाटणं, आपलं रहाणीमानाचा दर्जा खालावेल याची भीती वाटणं, शिक्षणातलं अपयश ही आत्महत्येची काही कारणं आहेत.

अशा वेळी खूप घुसमट, उलघाल होते. आत्महत्या कशी करावी यावर फार विचार न करता एकदम कृती केली जाते…! तशी सुशांत सिंगनं काल आत्महत्या केली. तो गेल्यावर त्यानं काय करायला हवं होतं याच्या चर्चा व्यर्थ आहेत.

पण कोरोनाच्या काळात पैसा फेकून काहीही मिळतं या (गैर)समजाला छेद गेला आहे. समाजात असलेली पत, आपल्याकडचा पैसा, प्रसिध्दी हे किती क्षणभंगुर आहे याची जाणीव समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला या काळात झाली असेल.

माणसाला कशामुळे आनंद होतो? या प्रश्नाची उत्तरं – उत्तम शारिरिक आणि मानसिक आरोग्य, स्वत:शी, नातेवाईकांशी आणि समाजाशी असलेले स्नेहसंबंध, समृध्द करणारे अनुभव – अशी आहेत.. आणि हे सगळं पैशानं विकत घेता येत नाही.. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर आपल्याला विचार करायला तेवढंच फक्त उरलंय..!

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

(नीलांबरी जोशी यांच्या Facebook Wall वरून साभार)

हे सुद्धा नक्की वाचा-रडा, भेका, मरणाची बडबड करा…पण जगा!-https://bit.ly/2UOLTRd

Previous articleकदाचित शास्त्रीय संगीतच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल
Next articleरडा, भेका, मरणाची बडबड करा… पण जगा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.