शब्बे फुर्कत का जागा हूँ फरिश्तो…

-आशुतोष शेवाळकर

ऐन सतरा-अठरा वर्षांचा असताना ग्रेस पहिल्यांदा माझ्या हाती लागला. तेव्हा तो ‘तरुण भारत’ मध्ये ‘मितवा’ नावाचं सदर लिहीत होता. तेव्हा मला त्यातलं नेमकं काय कळत असेल देव जाणे, पण हे सदर मात्र मला खूप आवडायचं आणि झपाटल्यासारखा मी ते नियमित वाचत असे. ‘ग्रेस’ नावाचा हा कोणी फार मोठा कवी आहे, हेही तेव्हा कदाचित माझ्या गावी नव्हतं. ‘मितवा’ ने माझ्या मनाची जमीन नांगरली गेली असल्यामुळे की काय कोण जाणे, पण नंतर जीएंचं ‘काजळमाया’ जेव्हा हाती लागलं तेव्हा त्यानेही मी झपाटून गेलो होतो. लिहिणाऱ्या प्रतिभावंतांची जशी एक जातकुळी असते तशीच वाचणाऱ्या रसिकांचीही एक जातकुळी असते आणि ती बहुधा याच वयात तयार होत असावी. ग्रेसनी दिलेल्या ‘मितवा’च्या दीक्षेमुळेच कदाचित मग पुढे जीए, नेमाडे, एलकुंचवार, सुभाष अवचट, हृदयनाथ मंगेशकर हा पंथ मला भावू लागला.

त्याच्या पुढच्याच वर्षी ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकात ‘प्रतिभावंताच्या पाताळघरात’ ही अक्षयकुमार काळे यांनी घेतलेली ग्रेसची प्रदीर्घ मुलाखत आली. ती मुलाखत ग्रेसच्या विविध भावमुद्रांनी पानोपानी नटलेली होती. या मुलाखतीने तर मी पूर्णपणे भारावूनच गेलो. जवळपास महिना-दोन महिने मी ती वारंवार वाचत होतो. आणि तेव्हापासून ग्रेस आणि अक्षयकुमार काळे या दोघांचाही मी कायमचा ‘फॅन’ झालो. या मुलाखतीमधल्या फोटोंमुळे चेहऱ्यानेही मग मला त्याला ओळखता यायला लागलं. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक सुरू असताना, कडेला स्कूटर उभी करून एकाग्रपणे सिगरेट पीत, गर्दीकडे चेहरा, पण हरवलेले डोळे घेऊन उभा असलेला जो माणूस दिसतो तोच ‘ग्रेस’ आहे, हेही ओळखता यायला लागलं.

ग्रेस आणि जीए यांच्यात एक साम्य होतं : लोकांमधे न मिसळणं, फारसं व्यासपीठावर न येणं यांमुळे या दोघांभोवतीही गूढपणाचं एक वलय होतं. वाचकांना या दोघांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी प्रचंड कुतूहल होतं. ग्रेसचे निदान फोटो तरी लोकांनी पाहिलेले होते. जीएंचे फोटो तर शेवटी शेवटी सुभाष अवचटांनी काढले तेव्हाच पहिल्यांदा प्रकाशात आले. त्यांच्या पुस्तकांवरही त्यांचे फोटो नसत आणि या सगळ्यांत भर म्हणजे या दोघांची त्या काळात गाजत असलेली मैत्री. ठरवून कधीही एकमेकांना न पाहता, कधीही न भेटता, न बोलता, केवळ पत्रव्यवहाराद्वारे या दोघांमध्ये असलेलं गाढ मैत्र हा पण त्या वेळी एक कुतूहलाचा विषय होता. हे गूढपणाचं वलय, कुतूहल आणि दुर्बोधतेचा माथी लागलेला शिक्का, ही या दोघांमधली साम्यस्थळं.

गणित किंवा विज्ञान शिकल्याशिवाय कळत नाही, हे आपल्याला मान्य असतं; पण कविता मात्र तिच्याविषयी काही शिकल्याशिवायच कळावी, अशी आपली अपेक्षा असते. कथा आणि कविता हे वाङ्मयप्रकार केवळ मनोरंजनात्मकच नसून उद्बोधनात्मकही असू शकतात, त्यांना समजून घेण्याचंही शास्त्र असू शकतं व त्याकरता काही अभ्यासही आवश्यक असू शकतो, ही शक्यताच आपण गृहीत धरत नसतो. तसंच कुठल्याही कलेमधे मनोरंजनाच्या पलीकडे असलेली मानसिक उन्नयनाची सुप्त शक्तीही अशा वेळी आपल्या दृष्टिक्षेपात नसते.

ग्रेससारखे कवी हे केवळ तास-दोन तास वाचून ठेवून देण्यासारखे नाहीत, तर ते आयुष्यभर हळूहळू समजत जाणारे कवी असतात. जसं जसं आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं, त्या अनुभवांच्या अंतर्गत विश्लेषणाने आपलं चिंतन प्रगल्भ होत जातं, ‘इनसाइट्स’ नि स्पष्टता वाढत जाते तसे तसे हे कवी वा त्या त्या कविता आपल्याला अधिकाधिक समजत जातात. दोन-चार ओळी समजून आपल्याला ती कविता आवडलेली असते, मधल्या न समजलेल्या ओळी आपण तशाच दुर्लक्ष करून सोडून देत असतो. मग पुढे दोन-चार वर्षांनी आपला तेवढा प्रवास झाल्यावर मधल्या त्या ओळींचा अर्थ लागून ती कविता आपण समजत होतो त्याहीपेक्षा किती तरी अधिक प्रगल्भ आहे, हे आपल्या लक्षात येत असतं. आत्मोन्नतीच्या त्या त्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो की मग ती ती कविता आपल्याला तेव्हा तेव्हा समजायला लागते. कविता लिहिणाऱ्या प्रतिभावंताच्या प्रतिभेने तो प्रवास आधीच पार केलेला असतो.

आईनस्टाइनचं एक सुरेख वाक्य आहे : “It is foolish to try to solve a problem at a level of thinking at which it is created’. तुमची ‘level of thinking’ बदलवून वरची ‘level’ गाठणे हाच असा प्रश्न सोडवण्याचा मार्ग असतो, असं त्याला या वाक्यात सुचवायचं होतं. हे अर्थात तो विज्ञानातल्या प्रश्नाविषयी बोलला होता; पण एखादी कविता समजण्याच्या बाबतीतही हाच नियम लागू होत नाही का?

स्वत:वरच्या दुर्बोधतेच्या शिक्क्याविषयी काही वर्षांपूर्वी मंगेशकरांच्या कार्यक्रमात बोलताना ग्रेस म्हणाले होते, “वास्तवच दुर्बोध आहे त्याला मी तरी काय करू?”
खरं नाही का हे? आपण आपल्या आयुष्याभोवती, आपल्या छोट्या जगाभोवती एक चौकोन आखतो. जन्माच्या अलीकडे आणि मृत्यूच्या पलीकडे या चौकोनाचा विस्तार जात नाही आणि या चौकोनातलं वास्तव मग आपल्याला सुबोध वाटायला लागतं. या चौकोनाच्या आतल्याही अनेक गोष्टी आपल्यासाठी अनाकलनीय असतात. पण डोक्याला त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांच्याभोवती एक छोटा चौकोन आखून विचार न करण्याच्या अस्पृश्य जागा म्हणून त्यांना बंद करून ठेवत असतो आणि अशा या स्वयंघोषित सुबोध वास्तवात मग या चौकोनाबाहेर मुशाफिरी करणाऱ्यांना आपण दुर्बोध ठरवत असतो.

आपल्या स्वत:च्याच मनाचा तरी आपल्याला कुठे थांगपत्ता लागत असतो? आपल्या ‘सबकॉन्शस’पासूनच या दुर्बोधतेला सुरुवात होते आणि ‘अन्कॉन्शस’ तर आपल्याला पूर्णपणेच दुर्बोध असतं. अतर्क्य स्वप्नांमधून, प्रतीकांमधून व्यक्त होतं ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. आपली स्वत:चीच सगळी स्वप्नं तरी कुठे आपल्याला सुबोध असतात? सगळ्याच जीवमात्रांचं ‘अनकॉन्शस मन’ हे ‘ओव्हरलॅपींग’ असून आपणा सर्वांचा मिळून एक ‘collective unconscious’ किंवा ‘वैश्विक मन’ आहे अशीही एक ‘थिअरी’ आहे.

घटनाप्रधान साहित्यनिर्मितीकडून मोजक्याच घटना, पण त्या घटनासापेक्ष असा मनाचा आतला प्रवास, आतल्या सूक्ष्मतम मनोव्यापाराचं चित्रण, असा आपला प्रवास नवसाहित्यांकडे येईपर्यंत झाला. आशा बगे, मेघना पेठे, सानिया, गौरी देशपांडे या लेखिकांच्या कथांमधल्या घटनांची संख्या मोजून पाहायची म्हटली तर ती मोजकीच असते, आणि तरीही त्या दीर्घकथांनी एका मिनिटासाठीही वाचकाच्या मनावरची आपली पकड सोडलेली नसते. पण हा प्रवासही आपल्या ‘कॉन्शस’ मनातल्या भावभावनांच्या चित्रणापर्यंतचाच आहे. प्रतिभेचा या पलीकडचा टप्पा कदाचित ‘सबकॉन्शस’ किंवा ‘अनकॉन्शस’ मनातली आंदोलनं चिमटीत पकडून ती व्यक्त करण्याच्या प्रयत्नांचा असू शकतो. ग्रेससारखे प्रतिभावंत कदाचित या ‘सबकॉन्शस’ किंवा ‘वैश्विक मनात’ खोलवर सूर मारून, तिथल्या वास्तवाच्या दुर्बोधाने माखलेल्या अवस्थेतच आपल्या समोर येऊन उभे ठाकत असतील. ‘वास्तवच दुर्बोध आहे’ असं म्हणतांना ग्रेसना कदाचित हे ‘वास्तव’ अभिप्रेत असेल.

सृष्टी आणि जीवनाची जशी सतत उत्क्रांती होत असते तशीच मला वाटतं, ती कला आणि प्रतिभेच्या प्रांतातही होत असते. साहित्यातही फडके-खांडेकरांपासून आजपर्यंत घडलेल्या बदलाचे टप्पे हे अभिरुचीच्या बदलाचेच नव्हे तर प्रतिभेच्या औत्क्रांतिक विकासाचे टप्पेही दर्शवत नाहीत का? ‘ग्रॉस’पासून ‘सटल्टीज’कडे किंवा स्थूलातून सूक्ष्माकडे जाणारा हा प्रवास औत्क्रांतिक विकासाचाच द्योतक नाही का? तसा कदाचित ग्रेस हा प्रतिभेच्या विकासाचा पुढचा टप्पा, काळाच्या पुढचा प्रतिभावंत असावा असं मला वाटतं. ‘साठोत्तरी’ कवी म्हणून गणला गेला असला तरी हा खरं तर ‘शतकोत्तरी’ कवी आहे! वर्तमान शतकाची ‘साठोत्तरी’ कविता ग्रेसची पालखी खांद्यावर घेऊन मिरवताना आपल्याला दिसू शकेल, ही शक्यता नाकारता येत नाही!

दुर्बोधतेच्या खालोखाल हा लोकांच्या टीकेचं लक्ष्य व्हायचा तो त्याच्या एककल्ली, ‘एक्सेंट्रिक’, आत्मकेंद्रित आणि थोडंसं विक्षिप्तच म्हणता येईल असं वागण्या-बोलण्यामुळे. पण खरं तर कलावंताची “एक्सेंट्रिसिटी’ ही पण एक स्थलकालाबाधित गोष्ट आहे असं आपल्याला दिसून येतं. अगदी मागच्या तीनशे वर्षांचा विचार केला तरी कुठल्याही काळातल्या, कुठल्याही देशातल्या, कुठल्याही भाषेतल्या, प्रतिभावंत, कलावंत, विचारवंत, तत्त्वचिंतक, वैज्ञानिक अशा असामान्य माणसांच्या वागणुकीमध्ये अशी ‘एक्सेंट्रिसिटी’ हे एक साम्यस्थळ आपल्याला दिसून येतं. रोमन, ग्रीक, इंग्लिश, फ्रेंच अशा कुठल्याही त्या त्या काळच्या प्रगत संस्कृतींचा विचार केला तरी त्या त्या काळच्या अशा असामान्य लोकांमधे अशी वागणूक, हे साम्यस्थळ दिसून येतंच. मायकेल अँजेलो, पाब्लो पिकासो, व्हॅन गॉग किंवा प्राचीन ग्रीक तत्त्वचिंतक, वैज्ञानिक यांच्यामधे विचारांची, भूमिकेची, अभिव्यक्तीची कितीही विविधता दिसून येत असली तरी त्यांच्या सामान्य वागणुकीत हे साम्य आपल्याला सापडतंच. मग अशा वेळी या असामान्यांची अशी वागणूक आपण अपसामान्य ठरवणं कितपत योग्य आहे?

एका बाजूला टोकाची प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रतिभा किंवा कला हे अंग असताना दुसऱ्या बाजूला व्यक्तिमत्त्वात अपरिहार्यपणे काही ‘डीफॉर्मिटी’ येणं असा हा कदाचित निसर्गनियमच असावा. गुलाबाला काटे असतातच तसा हा काही निसर्गधर्मच असावा. व्यक्तिमत्त्वाच्या एका अंगाची अशी पराकोटीची वाढ होत असल्यामुळे दुसऱ्या अंगांना ऊर्जा कमी पडून ती अविकसित राहत असतील म्हणून कलावंताच्या व्यक्तिमत्त्वात हे ‘मूलपण’ कायम राहून जात असेल असंही असेल कदाचित. दहाव्या वर्षी कुणी असं वागलं तर या आत्मकेंद्रित, एककली वागण्याचं कौतुक होतं, त्याला सांभाळून घेतलं जातं, पण पन्नासाव्या वर्षी जर कुणी असं लहान मुलासारखं वागू लागलं तर तो टीकेचा किंवा हसण्याचा विषय होणं हे साहजिकच आहे.

प्रतिभावंतांच्या किंवा कलांवतांच्या विकृतीचं किंवा त्यांच्यापासून झालेल्या त्रासाचं मित्र जेव्हा रसभरित वर्णन करून सांगतात तेव्हा मी त्यांना या बाबतीत सरळ सरळ ‘कॉस्ट बेनिफिट रेशो’ या व्यवहारी पद्धतीने विचार करायला सांगतो. त्यांचा आपल्याला कितीदा आणि असा कितीसा त्रास झाला आहे आणि त्यांच्या कलाकृतींनी आपल्याला किती, कितीदा, अगदी पुढच्या सात पिढ्यांना पुरेल एवढा आनंद दिला आहे, असा विचार केला की आपल्याला आपली कृतघ्नता चटकन लक्षात येते. हे असामान्य राहत असतील त्या गावाचा, समाजाचाही विचार केला तरी त्यांच्या उण्यापुऱ्या पन्नास-साठ वर्षांच्या हयातीत काही तुरळक त्रासाच्या घटना सोडल्यात, तर त्यांनी त्या गावाला पिढ्यान पिढ्या पुरेल एवढं नाव, मान सन्मान मिळवून दिलेला असतो. आता आपण त्यांच्यापासून झालेल्या त्रासाची चर्चा करतो की त्यांच्यामुळे मिळालेल्या नाव-मान-सन्मानांची ते आपल्या ‘सुसंस्कृतते’वरच अवलंबून नसतं का?

उच्च प्रतिभेबरोबर बाकी ‘माणूस’ म्हणूनही व्यक्तिमत्त्वाचा विकास होणं शक्य नाही, असं माझं म्हणणं नाही. पण ती ‘प्रतिभे’च्या पुढची पायरी असावी. तो ‘प्रज्ञे’चा प्रांत आहे. प्रतिभावंत, प्रज्ञावंत व मग संत, असा हा ‘उत्क्रांतिक्रम’ असावा असं मला वाटतं. म्हणूनच कुठल्याही काळातल्या संतामधे प्रतिभेच्या खुणाही आढळतातच-मग तो तीनशे वर्षांपूर्वीचा सेंट ऑगस्टिन असो किंवा मीरा, कबीर, तुलसीदास हे विभिन्न काळांतले भारतीय संत असोत अथवा महाराष्ट्रातली थोर संतपरंपरा असो.
गडगंज म्हणता येईल अशा एका श्रीमंत घरात ग्रेसचा जन्म झाला. गोडघाटेंचा वाडाच नव्हे, तर भाडेकरूंची ‘गोडघाटे चाळ’ही होती. अत्यंत संवेदनशील अशा गेलेल्या बालपणाच्या खुणा आपल्याला त्याच्या कवितेत ठायीठायी सापडतात. त्याची आई गेल्यावर त्यांच्या वडिलांनी चौथं लग्न करण्याची तयारी सुरू केली तेव्हा याने कडाडून विरोध केला. त्या वेळी वडिलांनी याच्या आईची निर्भर्त्सना करत याचं पितृत्वही नाकारलं. अत्यंत तरल संवेदनेच्या माणसासाठी आई नुकतीच गेलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर त्या कोवळ्या वयात हा काय आघात असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्याच क्षणी त्यानं ते घर व इस्टेट सोडली आणि त्यानंतर आयुष्यभर त्या घरात पायही ठेवला नाही-वडील गेल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठीसुद्धा नाही!

काळाचा हिशोब करून हा आरोप कदाचित त्याला पटलेलाही असावा. अनाथत्वाच्या या आत्मशोधाचा पीळ हा त्याच्या अंत:करणातील सगळ्यांत पिळवटलेला पीळ होता असं मला वाटतं. हा पीळ त्याच्यामधल्या ‘ग्रेस’मधून जेव्हा जेव्हा व्यक्त होत असे तेव्हा तो प्रतीकांच्या, रूपकांच्या मागे लपत असे. वाचकाला अनुभवाच्या मुळाशी असलेल्या सत्याशी पोचू न देण्याचे हेतुपुरस्सर प्रयत्न कदाचित त्याच्याकडून या पिळाची अगतिकता व्यक्त करणाऱ्या कवितांमधूनच फक्त झाले असतील. त्याच्यावरचा दुर्बोधतेचा आरोप या अशा कवितांच्या बाबतीत फक्त क्षम्य आहे. त्याचा नैराश्याचा प्रवास आईच्या जाण्याच्या दिवसापासून सुरू झाला असेल आणि मन उद्ध्वस्त करणाऱ्या या आरोपानंतर त्यावर आयुष्यभराचं शिक्कामोर्तब झालं असेल. अश्वत्थामाच्या सदा वाहणाऱ्या आणि चिघळत असलेल्या जखमेसारखी ही जखम कपाळावर घेऊनच मग तो जन्मभर जगत राहिला.
त्याचा हा आत्मशोध त्याला कुठल्या पडक्या देवळातल्या संन्याशापाशी घेऊन जातो, असं मला नेहमी वाटायचं. म्हणून त्याच्या कवितेत मातृप्रतिमेच्या खालोखाल ‘भगवा’ आणि ‘संन्यासी’ही सतत येत राहिले.

एका दिवसात घर आणि संपत्ती सोडल्यावर भणंग अवस्था त्याच्या नशिबी आली. शिक्षणही त्या वेळेस अपुरं होतं. त्याने डीएजीपीटीमध्ये कारकुनाची नोकरी धरली. त्याच काळात त्याचा लीलाबाईंशी संबंध आला. त्या वेळेस त्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांनीच आग्रह करून त्याला एम०ए० करायला भाग पाडलं. डीएजीपीटीच्या ऑफिसला मधे चाट मारून तो युनिव्हर्सिटी कँम्पसला जाऊन एम०ए०चे क्लासेस करायचा आणि संध्याकाळी ‘तरुण भारता’त दोन तास प्रूफरीडरची नोकरी. अशा तिहेरी व्यवस्थेने त्याने त्या काळात आपलं पोट चालवलं. एम.ए.चे क्लासेस करायला जावं लागल्यामुळे ऑफिसच्या वेळातलं त्याचं जे काम खोळंबत असे ते तो आपल्या सहकाऱ्यांकडून करवून घेत असे व त्याचा मोबदला म्हणून पगाराच्या दिवशी आपला अर्धा पगार त्यांना वाटून टाकत असे आणि उरलेल्या तुटपुंज्या पैशांवर मग पुढील महिन्याचा गाडा रेटत असे.

त्या काळात तो अत्यंत नैराश्यात असे व केवळ भाऊसाहेब सांबरेंनी त्याला तेव्हा आत्महत्येपासून वाचवलं, असं त्या वेळचे त्याचे सहकारी सांगतात. त्या वेळेस तो रामदासांच्या ‘करुणाष्टकां’नी फार भारावलेला होता. ‘जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी’ या ओळी तो नेहमी म्हणायचा. ‘राघव’ हा शब्द मला वाटतं त्याला तेव्हापासूनच भावला असावा. आपल्या मुलाचं नाव त्याने राघव तर ठेवलंच, पण ‘राघववेळा’, ‘राघवशेला’ असा तो शब्द त्याच्या कवितेतून नंतरही वारंवार येतच राहिला. महालमधल्या सुखसांडे टोपीवालेंच्या दुकानासमोरच्या पाटीवर त्या वेळेस या मंडळींचं संमेलन रंगत असे. तिथे तो रामदासांच्या ‘करुणाष्टकां’वरच त्याचं विश्लेषण आणि स्वत:च्या कविता ऐकवायचा. ‘तुझ्या कविता कानाला अतिशय गोड लागतात, पण समजत आम्हांला काहीच नाहीत!’ असे हे लोक त्या वेळी त्याला म्हणायचे. ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे, बाळासाहेब मासोदकर, मधुकरराव देशमुख, द.भी.कुळकर्णी ही मातब्बर मंडळीही त्या वेळी या कट्ट्याची सभासद होती.

‘छंद’ आणि ‘सत्यकथा’मधे त्याच्या कविता येऊ लागल्यावर मग त्याचं थोडं नाव होऊ लागलं. ‘तरुण भारता’त ‘करुण रसा’वरचा त्याचा एक लेखही त्या वेळी गाजला आणि ग.त्र्यं. देशपांड्यांनी घरी बोलावून त्यासाठी त्याचं कौतुकही केलं होतं. नंतरच्या काळात तो एकदा दीर्घकाळासाठी आजारी पडला. त्यामुळे रजा बिनपगारी होऊन खाण्याची व औषधांच्या पैशाचीही मारामार झाली. पु.शि.रेगे आणि त्याचा पत्रसंवाद त्या काळात जरा गाजला होता. पु.शि.रेग्यांच्या ‘छंद’मध्ये तेव्हा हा नियमित लिहायला लागला होता. पु.शि.रेग्यांनी ‘ग्रेस’ म्हणजे कुणी स्त्री असावी अशा समजुतीने लिहिलेली ती पत्रं होती. ‘हा पत्रव्यवहार आम्हांला दे, आम्ही तुझ्या आजारपणाचा पूर्ण खर्च करतो,’ अशी ‘ऑफर’ही त्या वेळी त्याला आली होती. पण त्या वेळी याने पुन्हा आपल्या मानी स्वभावाचा परिचय देत कणखरपणे, “ही पत्रं म्हणजेही एक कलाविष्कार आहे. ती विकून मी त्या कलावंताशी बेइमानी करणार नाही. मला तुमचे पैसे तर नकोतच, पण आजपासून तुमची नोकरीही सोडली!” असं सांगून ती पत्रं देण्यास नकार दिला होता.

एम.ए. झाल्यावर मात्र याला ‘मॉरीस मधे प्राध्यापकाची नोकरी लागली. पण त्यानंतरही डीएजीपीटीमध्ये सरकारी नोकरी असताना दुसऱ्या सरकारी कॉलेजमध्ये त्याच वेळात एम.ए.चे क्लासेस केलेतच कसे, असं बालंट याच्यावर आणून याची एम.ए.ची डिग्री व नोकरीवरही गदा आणण्याचे प्रयत्न झालेत. त्यातून त्या वेळेस हा कसाबसा बचावला. हा ‘दुःखाचा महाकवी’ तर मग हे ‘दुःख’ असं कोणतं?’ असंही काही लोक उत्तरार्धातल्या त्याच्या आयुष्याकडे पाहून म्हणतात. ‘नैराश्या’चा ज्यांनी अनुभव घेतलेला नाही त्यांनी असं म्हणणं साहजिकच आहे. शारीरिक अपंगत्वाला निदान समाजाची सहानुभूती तरी मिळते, पण मनाचं अपंगत्व कोणाच्या लक्षातही येत नसतं. वैऱ्यालाही भोगावा लागू नये इतका भयंकर हा ‘नैराश्या’चा रोग असतो. ज्याच्या तो थोडासाही अनुभवाला आलेला नाही, त्याच्यासाठी हे दु:खही दुर्बोध असणं साहजिकच आहे!

तसंही आयुष्याच्या उत्तरार्धातही सुख म्हणावं असं फारसं लौकिक सुख त्याच्या वाट्याला काही आलंच नाही. ‘ग्रेस’ म्हणून तो घेत असलेल्या निर्मितीच्या आनंदापलीकडे कुठलाच आनंद त्याच्या आयुष्यात आलेला फारसा मला दिसत नाही! मला त्याच्याविषयी विचार करताना, ‘ग्रेस’ व ‘माणिक गोडघाटे’ अशी दोन माणसं त्याच्यात एकाच वेळी वसती करून राहतात असं नेहमी वाटायचं. अशी दोन वेगळी माणसं आपल्यात आहेत याची त्यालाही पुरेपूर कल्पना होती. ‘मी आयुष्यभर ‘ग्रेस’वर कधीच अन्याय होऊ दिला नाही, ‘ग्रेस’ ला कधी एवढंसंही ‘कॉम्प्रमाइज’ केलं नाही,’ असं तो नेहमी म्हणायचा. सगळ्यांचं स्वत:वर असतं तसं त्याचंही ‘माणिक गोडघाटे’वर प्रेम होतंच, पण ‘ग्रेस’ हा त्याच्या श्रद्धेचा विषय होता. ‘माणिक गोडघाटे’ हा एक अतिशय तरल संवेदनेचा, कुटुंबवत्सल, कर्तव्यतत्पर, स्वाभिमानी, असुरक्षित व निराशेने ग्रासलेला माणूस होता; पण त्याच्यातून ‘ग्रेस’ वर आला की तो पकडून ठेवायला त्याला जे व्यक्त करायचं असेल ते बाहेर पडेपर्यंत ती तंद्री धरून ठेवायला ‘माणिक गोडघाटे’शी तो बेदरकारपणे वागत राहिला.

‘ग्रेस’ची ही तंद्री धरून ठेवण्यासाठी त्याच्याकडून मग अपरिहार्यपणे ‘माणिक गोडघाटे’वर नेहमीच अन्याय होत राहिले. कुटुंबवत्सल असूनही लेकरांवर, लीलाबाईंवरही अन्याय झाले. पण या अन्यायांची पीडा त्यांच्याइतकीच, किंबहुना त्यांच्यापेक्षा कधी काकणभर जास्तच ‘माणिक गोडघाटे’ला होत होती. कारण ते तर त्याच्या पोटचे गोळे होते. लीलाबाई गेल्यावर तर स्वयंपाकापासून सगळं करत त्याने आई व वडील अशा दोन्ही भूमिका निभावत मुलांना मोठं केलं.
वडिलांच्या आरोपाने आलेला न्यूनगंड, ग्रेसच्या ‘तंद्री’ पायी मुलांवर, बायकोवर होणाऱ्या अन्यायाचा अपराधगंड, हे त्याचं नैराश्य वाढवत असे व त्याच्यामधल्या ‘ग्रेस’चा पीळही. या अपराधगंडांपायी तो  झोपेतून उठून, ‘लीलाबाई, मला माफ करा. तुम्ही मला माफ केलं नाही नं अजून?’ असं लहान मुलासारखं म्हणत असे.

अशी दोन व्यक्तिमत्त्वं एकाच देहात घेऊन जगणं म्हणजे थोडाही पाय घसरला तर हा ‘स्कीझोफ्रेनिया’कडे नेणारा प्रवास असतो. ही दोन्ही व्यक्तिमत्त्व एकसंध राखण्याचा समतोल थोडाही बिघडला तरी ते ‘दुभंगलेलं’ व्यक्तिमत्त्व व्हायला काहीच वेळ लागत नाही. पण त्याने हा दोरीवर चालण्याचा प्रवास आयुष्यभर लीलया पेलला. ‘स्कीझोफ्रेनिया’ ही ‘अॅबनॉर्मलिटी’ नसून ‘Transition towards Super Normality’ आहे, असंही मानण्याचा एक प्रवाह मानसशास्त्रात आहे. वर अजून हात पोचलेला नसतो आणि खालून पाय तर सुटलेले असतात अशी ही Transitory Phase, अधांतरी, टांगती अवस्था असते, असं हा प्रवाह मानतो. याचं जगणं म्हणजे मला या ‘School of Thought’चा पुरावा वाटतो.

ना.घ.देशपांडे दिवसा गीता, उपनिषदं यांची मराठीत भाषांतरं करत बसत व रात्री ती फाडून टाकत असत. याला ते ‘प्लग’ लावून बसणं असं म्हणत. ‘करंट’ कधी येईल ते आपल्या हाती नसतं, आपण फक्त ‘प्लग’ लावून बसायचं; ‘करंट’ आला की कविता होते, असं ते म्हणायचे. ग्रेसच्या बाबतीत तर याचं सगळं जगणंच हे ‘प्लग’ लावून बसल्यासारखं ‘तंद्री’चं असे आणि ‘करंट’ आल्यावर भुताने पछाडल्यासारखं ‘ग्रेस’ने याला पछाडलं की याच्याकडून निर्मिती होत असे. सदैव तंद्रीत जगणारा असा हा एक मनस्वी कलावंत होता.

कुठलीही कविता त्याच्या अंगात भिनायला लागली की तो ‘डिप्रेशन’ मध्ये जायचा. Pre-Tension of Creativity म्हणजे काय प्रकार असतो तो मला याच्याच बाबतीत पाहायला मिळाला. कुठलीही निर्मिती मला वाटतं, प्रसूतिकळांच्या वेदनांशिवाय संभवतच नसते. ही सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या जगन्नियंत्याने त्या वेळेस काय कळा भोगल्या असतील हे त्याचं त्यालाच ठाऊक! व्यासपीठावर जायच्या कुठल्याही कार्यक्रमाआधी दोन-तीन दिवसांपासून तो ‘डिप्रेशन मध्ये जायचा. एका खोलीत डोकं दोन्ही हातांत धरून तो एकटा बसलेला असे. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत ‘मी कार्यक्रमाला जात नाही’, असंच म्हणत असे. मग ऐन वेळी तयार होऊन, अंगात संचारल्यासारखा व्यासपीठावर येऊन तो धबधब्यासारखा कोसळत असे.

त्याचं एरवीचं बोलणंही असंच धबधब्यासारखं ‘मोनोलॉग’च असे. प्रत्येक दोनचार वाक्यांमागे एखादं वाक्य किंवा एखादा शब्द अत्यंत उंचीचा असे. त्याच्याकडून उठून आलं की हे सगळं डायरीत लिहून ठेवायला पाहिजे, याचं सगळंच बोलणं ‘टेप’ करून ठेवायला पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं. पण ते करणं काही माझ्याकडून झालं नाही. ही ‘वैखरी’ अशी ओसंडून वाया गेली! परवा राघव मला त्याचा तळपाय दाखवून म्हणाला, “आम्हां सगळ्या भावंडांचा हा ‘मार्क’ आहे!” आपल्या तळपायाला मागे शेवटी थोडं वळण असतं. ते त्याच्या पायाला नाहीच. त्याचं कारण त्याने सांगितलं की, वडील त्यांना शाळेत पोहोचवायला न्यायचे. लेडीज सायकल असल्यामुळे समोर दांडा नसायचा. मागे कॅरिअरवर बसलेल्या मुलांचा पाय स्पोकमधे जायचा आणि वडील तंद्रीत सायकल रेटत असायचे. मग जखम, दोन-तीन टाके. हे प्रत्येकच मुलांच्या बाबतीत दोनतीनदा झालं असल्यामुळे माधवी आणि मिथिलाचेही पाय असेच आहेत. मिथिला सांगते की, आजकाल आता पालक मुलांच्या परीक्षांच्या वेळी सुट्ट्या घेतात; दादा त्या काळात आमच्या परीक्षांसाठी महिना-दीड महिना सुट्टी घ्यायचे. माधवी परीक्षेच्या दिवशी आंघोळीला जायची तेव्हा बाथरूमबाहेर उभे राहून वडिलांना पुस्तक वाचायला लावायची आणि तिची आंघोळ होईपर्यंत ग्रेस ते मेडिकलचं जाडजूड पुस्तक तिच्यासाठी मोठ्याने वाचत असायचे.

जी मुलगी आपल्या वडिलांमध्ये खूप गुंतलेली असते व यदाकदाचित लहानपणी वा ऐन पौंगडावस्थेत असताना तिला वडिलांना मुकावं लागलं असलं, तर ती आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या किंवा विवाहित माणसाच्या प्रेमात पडते, असं दिसून येतं. कारण ती त्या पुरुषामधे कदाचित आपल्या वडिलांना शोधत असावी. तिच्या पतीशी पुरुष म्हणून असलेल्या नात्यामधे वडिलांची छटा अधिक असते. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लीलाबाईंच्या प्रेमात पडण्यामागे याची ही मानसिकता तर नसावी? लीलाबाईंमध्ये तो आपली हरवलेली आई शोधत असावा का?

व्यसनांच्या बाबतीतही टोकाचा विरोधाभास मला त्याच्यात दिसतो. व्यसन करायचा तेव्हा त्यांच्या पूर्ण आहारी जायचा, पण सोडलं तेव्हा प्रचंड आत्मसंयमाचा दाखलाही त्याने दिला. प्यायचा तेव्हा प्यायला लागला की हा खूप पीत असे. कॉलेजमधून पाच वाजता परतताना ‘पंचशील चौकात’ल्या बारसमोर त्याची स्कूटर उभी राहत असे. तिथे ‘काउंटर’वरच उभा राहून ग्लास हातात घेऊन तो त्यात एक, दोन, तीन असे तीन पेग एकदम टाकायला लावायचा. मग ती ग्लास भरून दारू कोरीच एका दमात रिती करायचा. नंतर दोनतीन ग्लास थंड सोडा हळू हळू पीत बसायचा. यावर त्याचं स्पष्टीकरण असं की, विषच प्यायचं तर शंकरासारखं गटागट पिऊन टाकायचं, मग डोकं थंड करायला त्याने डोक्यावर गंगा धरली तसा थंड सोडा हळूहळू प्यायचा. हे पिऊन झालं की घरी येऊन तो स्वयंपाक करायचा आणि तिन्ही लेकरांना जेवू घालायचा. स्वयंपाकही तो अतिशय सुरेख करत असे. जास्ती तिखट, तेल, मसाले नसलेले सात्त्विक जेवण अशीच त्याची आवड होती. स्वत: स्वयंपाकही तो तसाच करत असे. त्याच्या हातची पीठ लावून केलेली मेथीची सुकी भाजी तर अप्रतिम असायची.

अक्षरही त्याचं कॅलिग्राफीसारखं. सुंदर, सुबक, कलाकुसरीचं. तो जे जे काही मन लावून करायचा ते उत्तमच करायचा. पुढे मुलं मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर शेवटच्या दशकात एकटा राहायचा तेव्हा वेळ घालवायला तो भाजी सोलणे, चिरणं, मोजकीच असलेली भांडी, चमचे, कपबश्या, घासून, पुसून, मोजून नीट लावून ठेवणं असं काहीबाही करत असायचा. “माझ्या लिखाणातला प्रत्येक शब्द ‘सोलीव’ असतो’ असं तो म्हणायचा. भाजीदेखील तो शब्दांइतकीच नाजूकपणे सोलायचा. वस्तूंमध्ये गुंतणं हाही त्याचा पिंडच होता. मोजक्याच असलेल्या भांड्यांपैकी एक जरी दिसेनासं झालं तरी तो अस्वस्थ व्हायचा. नोकरीत असताना आयुष्यभर राहिलेल्या ‘नॉर्मल स्कूल क्वार्टर्स’मधलं घर सोडताना त्याला अतिशय त्रास झाला. त्या घरासमोरचं औदुंबराचं झाड हा त्याच्या मनाचा हळवा भाग होता. स्वत:च्या नवीन घरात राहायला गेल्यावर कधी रात्री दोनतीन वाजेपर्यत घरी आला नाही की मिथिला आणि माधवी जेव्हा त्याला शोधायला निघायच्या तेव्हा त्यांना हा जुन्या घरासमोर औदुंबराच्या झाडाकडे पाहत तंद्रीत बसलेला सापडायचा.

त्याला दारू सोडायची होती तेव्हा दहा दिवस तो अभय बंगांकडे गडचिरोलीला जाऊन राहिला. पण त्याच्यातल्या स्वाभिमान्याला अशी कोणाची मदत घेऊन व्यसन सोडणं शक्यच नव्हतं. तिथल्या तांत्रिक गोष्टी त्याने सगळ्या समजावून घेतल्या. नागपूरला परतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच एक पेग प्यायला आणि मग जी दारू सोडून दिली तर आयुष्यात पुन्हा तिला हातसुद्धा लावला नाही!
सिगारेट सोडतानाही असंच. एके दिवशी सिगारेट सोडायची असं त्याने ठरवलं. त्या वेळी घरात पाचसहा पाकिटं पडली होती. कष्टाच्या कमाईने विकत घेतलेली पाकिटं वाया कशाला घालवायची म्हणून त्याने एक सिगारेट पेटवली आणि एकावर दुसरी पेटवत त्या दिवशी संध्याकाळपर्यत सिगारेट पीत राहिला. शेवटची सिगारेट विझवली आणि त्यानंतर आयुष्यभर सिगारेटला हातही लावला नाही!
हा आस्तिकही होता. पण त्याची आस्तिकता विचारपूर्वक काढलेल्या काही निष्कर्षांनी किंवा काही प्रत्यंतरांतून आलेली आहे की केवळ असुरक्षिततेपोटी, हे मला कधीच समजलं नाही. लहानपणी आईसोबत ताजुद्दीनबाबांकडे गेला असताना बाबांनी आपला झगा याच्या आईच्या अंगावर फेकला होता, ही आठवण तो नेहमी सांगत असे. ताजुद्दीनबाबा व दत्त ही त्याची श्रद्धास्थानं होती. मृत्यूच्या पंधरा दिवस आधी हॉस्पिटलमधून अचानक गायब होऊन तो तीन-चार दिवस नरसोबाच्या वाडीला जाऊन राहून आला होता. शेवटी शेवटी चेहरावटीवरून तो शंकर महाराजांशी स्वत:ला ‘आयडेंटिफाय’ करायचा. त्याच्या गाडीला अॅक्सिडेंट झाला त्या दिवशी नेमकी शंकर महाराजांची मृत्युतिथी होती! शेवटी शेवटी तर शंकर महाराजांचा फोटो हॉस्पिटलमध्ये त्यांने आपल्या उशाशीच ठेवला होता!

शिक्षक म्हणूनही त्याने नावलौकिक कमावला. त्याच्या वर्गात विद्यार्थी तासभर पाठीचा कणा ताठ करून, तोंडाचा ‘आ’ वासून, अवाक होऊन बसलेले असत, अशा आख्यायिका होत्या. ‘मॉरीस’ हे सरकारी कॉलेज होतं. त्या काळी अनेक नामवंतांनी, साहित्यिकांनी कॉलेजची खास परवानगी काढून त्याचा एखाददुसरा क्लास अटेंड करून पाहिला आहे. पण त-हेवाईकपणा हा त्याचा प्रोफेसर म्हणूनही होताच. एखादी कविता पूर्ण तासभर समजावून सांगितल्यावर शेवटी तो म्हणे, “परीक्षेत लिहिताना गाइडमधलंच वाचून अर्थ लिहा. मी जो आत्ता तुम्हांला सांगितला तो अर्थ तुम्हांला ती कविता समजावी म्हणून. परीक्षेत तुम्ही परीक्षकांना जो समजतो तोच अर्थ लिहा, नाहीतर नापास व्हाल!”

ग्रेस याचं संपादक म्हणून कार्य फारसं उल्लेखलं गेलेलं नाही, पण तो उत्तम संपादकही होता. ‘युगवाणी’चं संपादन करताना त्याचा नेहमीचा ताठा सोडून, स्वत: एवढा मोठा लेखक असतानाही नमतं घेऊन त्याने अनेक नवोदितांना लिहितं केल्याच्या आठवणी अनेक लोक सांगतात.
‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाचं त्याने काही वर्षांपूर्वी संपादन केलं ते मला वाटतं त्याचं शेवटचं संपादनकार्य. तेव्हा मला स्वत:लाही हा अनुभव आला. आळसामुळे मी टाळाटाळ करत होतो तेव्हा अत्यंत मारकुंड्या शिक्षकासारखा त्याने माझा पाठपुरावा केला आणि एकदा कबूल केल्यावर मग ग्रेस संपादित करणार असा ऐतिहासिक महत्त्वाचा अंक, त्यात असणारं थोरामोठ्यांचं लेखन आणि लेखनाविषयी आधीपासूनच असलेला न्यूनगंड या सर्वांमुळे ‘डीफिडन्स’ येऊन माझ्या हातून काही उतरेना. वडील ज्या क्षेत्रात मोठे असतील त्या क्षेत्रात मोठं होणं ही मुलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. एक तर सावलीतल्या बीजाला अकुर हळूहळू फुटत असतो आणि नुकताच अंकुर धरायला येतो तोपर्यंत याला फळ धरत नाही म्हणून लोकांनी त्याला मोडीतही काढून टाकलेलं असतं. ग्रेसची मिथिला आणि सरेश भटांचा चित्तरंजन यांनी सुरवातीच्या काळात चांगलं लेखन केलं. स्वत:ला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात चांगलं उभं करू शकले नसते तर ते लेखक म्हणूनही पुढे मोठे झाले असते, असं मला वाटतं. मला आलेला ‘डीफिडन्स’ अत्यंत समंजसपणे ओळखून तेव्हा त्यांनी मायाळूपणे ‘तू नुसतं बोल, मी लिहून घेतो’ अशी तयारीही दाखवली. ग्रेससारख्या माणसाला आपल्यासाठी लेखनिकासारखं काम करायचं म्हणावं लागतं आहे याची मला इतकी लाज वाटली की त्या लाजेखातरच मग माझ्याकडून तेव्हा लिहून झालं.

लोकांना काय समजतं, काय आवडतं याची त्याला जाण नव्हती असं नाही. उलट, ती जाण पण त्याची अत्यंत प्रगल्भ होती. संपादनात ती दिसून यायची. पण लोकांना आवडावं, समजावं म्हणून आपल्या कलाकृतीत काही बदल करणं त्याला मान्य नव्हतं. तो म्हणायचा, “I can become small for you but not simple!” मी काही वर्षांपूर्वी १ जानेवारीला नवीन वर्षाचा नमस्कार करायला फोन केला आणि त्या वर्षीपासून ‘सकाळ’ वृत्तपत्रात सदर लिहायचा संकल्पही सांगितला. ‘जगता जगता’ आणि ‘आत्मसंवाद’ अशी दोन नावं त्या सदरासाठी माझ्या मनात होती. कठीण नाव ठेवलं तर लोक खालचं वाचतच नाहीत, असं म्हणून त्याने मला ‘जगता जगता’ नाव नक्की करायला सांगितलं.

त्याला सिनेमाचीही प्रचंड आवड होती. जुने हिंदी, इंग्लिश सिनेमे तर त्याने त्या काळी आवडीने पाहिलेच, पण तो आताआत्तापर्यंतही मूड आला की कुठल्याही सिनेमाला जाऊन बसत असे. तसंच जुन्या हिंदी सिनेमांची गाणीही त्याच्यावर पगडा धरून होती. साध्या बोलण्यात वा भाषणातही तो कुठल्या तरी गाण्याच्या मधल्या ओळी अचानक ‘कोट’करत असे. साधं हॉटेलला जेवायला गेलं असताना भाजी तिखट आली तर तो ‘हमने मांगी थी सुरमेदानी, जालीम ले आया बनारस का जर्दा..’ असं म्हणत असे. इनग्रिड बर्गमन ही त्याची प्रचंड आवडती नायिका. तिच्या ‘Inn of the Sixth Happiness’ या १९५८ साली आलेल्या सिनेमाने तो त्या काळात पछाडला गेला होता. या सिनेमात तिचं नाव ‘ग्रेस’ होतं म्हणून याने मग स्वत:साठी ‘ग्रेस’ हे नाव निवडलं. त्याआधी तो ‘माणिक’ नावाने कविता लिहीत असे. संध्याकाळच्या कविता हे पुस्तकही त्याने तिलाच अर्पण केलेलं आहे.

देखणा म्हणता येईल असं याच्या चेहऱ्यात काहीच नव्हतं. अत्यंत बोलके डोळे सोडले तर चेहऱ्यात विशेष असं काहीच नव्हतं. पण तरीही हा प्रचंड ‘फोटोजेनिक’ होता. याच्याइतका ‘फोटोजेनिक’ जगभरातल्या साहित्यिकांपैकी कुठलाही दुसरा साहित्यिक माझ्या पाहण्यात नाही! म्हणूनच बहुतेक सगळेच फोटोग्राफर्स, चित्रकार, शिल्पकार यांना याचे फोटो. चित्रं. स्केचेस काढण्याचं. शिल्प करण्याचं वेडच लागलेलं असायचं आणि याच्या घरी फोटोज आणि पेंटिंग्जचा खच पडत असे.
याचा ‘ड्रेसिंग सेन्स’ही जबरदस्त होता. साधेच कपडे पण त्यांची निवड अशी काही असे की हा नेहमी अत्यंत ‘ग्रेसफुल’च दिसायचा. शेवटच्या दिवसांत ‘केमोथेरेपीने’ याचे केस व दाढी दोन्ही गेल्यावर हा आयाळ कापलेल्या सिंहासारखा बोडका दिसायचा. पण त्याही स्थितीत गोल फेल्ट हॅटसारखी टोपी आणि इंग्लिशमनसारखा ओव्हरकोट घालून हा ‘ग्रेसफुल’च दिसे. अगदी शेवटच्या आठवड्यात बेशुद्धीतून एक दिवस शुद्धीत आला तेव्हाही त्याने गुलजारच्या भेटीसाठी अक्षरं असलेला बिनकॉलरचा शर्ट घातला होता. त्या खस्तावलेल्या स्थितीतही तो ‘ग्रेसफुल’च दिसला!

पिणं सोडल्यावर त्याची जागरणं बंद झाली. मग तो पहाटे तीन वाजता उठत असे आणि डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही बरोबर चारच्या ठोक्याला त्याची उडी शासकीय स्वीमिंगपूलच्या थंड पाण्यात पडत असे. दुसरं कुणी पोहायला यायच्या आत तो बाहेर पडायचा. पूर्ण ‘पूल’मध्ये एकट्याला पोहायला त्याला आवडायचं आणि या शिरस्त्यात एक दिवसही खंड पडत नसे.
अशा अपरात्री तीन वाजता पोहायला जाण्यामुळे एके दिवशी रिझर्व बँक चौकात त्याला एका हवालदाराने अडवलं. त्याच्या प्रश्नांना उत्तरंही याच्या नेहमीच्या त-हेवाईकपणे मिळाल्यामुळे हवालदाराचा संशय आणखी वाढला. समोरच असलेल्या मॉरीस कॉलेजमध्ये आपण शिकवतो या बोलण्यावरही मग त्याचा विश्वास बसेना. त्याने याला बर्डी ठाण्यात नेऊन सकाळपर्यंत बसवलं. सुदैवाने अरविंद इनामदार तेव्हा नागपूरचे पोलीस कमिश्नर होते. सकाळी नऊनंतर ड्यूटीवर आलेल्या तिथल्या इन्स्पेक्टरने फोन लावून दिल्यावर मग याची सुटका झाली. त्या हवालदाराची मग इतकी कानउघाडणी झाली की तो हवालदिल झाला! त्यानंतर तो हवालदार दोनतीन दिवसांनी याला भेटायला घरी आला व त्याच्या मुलाची पोलीसभरतीसाठी इनामदारांकडे शिफारस करायला विनंती करू लागला. याने तशी शिफारस करून त्याच्या मुलाला नोकरीला लावूनही दिलं.
त्यानंतर याने अरविंद इनामदारांसोबत स्वत:चा एक फोटो काढून घेतला होता व तो नेहमी खिशात बाळगत असे. पुन्हा कुणी हवालदाराने अडवलं तर त्याला तो दाखवून स्वत:ची सुटका करून घ्यायला म्हणून.

त्याचं आणि माझ नातं काय होतं, हा प्रश्न मला बऱ्याचदा पडला आहे. १९८८-८९ साली आमची पहिली प्रत्यक्ष ओळख झाली. तसं वयाने मी त्याच्या मुलांपेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा आणि तो बाबांपेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान. पण मला तो पहिल्यांदा भेटला तेव्हापासून मित्रासारखाच भेटत आला. कधी कधी तर मला त्याचा बाप व्हावं लागलं. गेली पंचवीस वर्ष हे संबंध सलग कायम राहिलेत असं नाही. मधे दुरावा, रुसव्या-फुगव्यांचाही काळ आला, पण उभयपक्षी पुढाकाराने पुन्हा आम्ही जवळ येत गेलो. ९०-९१ सालानंतर एकदा तर तो सलग दोनतीन वर्षे माझ्याशी बोललाच नव्हता. अचानक एक दिवशी एका रेस्टॉरन्टमधे थोड्या दूरवरच्या टेबलावरून मला त्याचा आवाज ऐकू आला. नंतर मला पाहूनही दुर्लक्ष करून तो जातानाही दिसला. अचानक काही तरी वाटून मीच त्याला मोठ्याने ‘राम रामऽऽ गुरुजी’ असा आवाज दिला. त्याला बरं वाटल्यासारखं दिसलं. तो माझ्या टेबलाजवळ आला, पण माझ्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळून आमच्या टेबलावरच्या सगळ्यांशी बोलावं तसं औपचारिक, स्वत:च्या नवीन कविता ऐकवणं वगैरे असं काही तरी बोलू लागला. त्याला मधेचं थांबवून “अरे हट! इसको क्या कविता बोलते क्या? ये मेरी नयी सुनो.” असं मी म्हणालो. तो एकदम हबकलाच. मग स्तब्ध झाला. मग ‘‘सुनाओ’ म्हणाला. मी त्याला ‘दूर कुठून तरी किरमिजी रंगाचा पाऊस येतो…’ या त्याच्याच कवितेतल्या ओळी ऐकवल्या. त्या ओळींचा शेवट ‘हृदय सजविणारा मित्र नाही रे उशाशी…घरभर घन आले आत ये ना जराशी’ असा होता. एका क्षणासाठी तो सुन्न झाला. मग त्याने मला एकदम मिठीच मारली आणि क्षणार्धात आमच्यातला दुरावा संपला!

मे २००९ मध्ये बाबा गेल्यापासून मात्र एका दिवसात आमच्यातल्या नात्याचं पोतच एकदम बदललं. त्या दिवशीपासून त्याने मला पोटाशीच घेतलं. तेव्हापासून शेवटपर्यंत तर तो माझा बापच झाला होता!
बाबा गेले त्या दिवशी तो आला. मला छातीशी धरत म्हणाला, “माझ्या आयुष्याला तोरणा व मरणाचा डाग नाही. मी आतापर्यंत कुठल्याही लग्नाला आणि मरणाला गेलेलो नाही. माझ्या वडिलांच्याही नाही. पण रामभाऊ गेल्याचं कळलं आणि राहवलंच नाही, तसाच उठून आलो.” त्या दिवशी आणि नंतर वर्षभर तो मला सतत धीर देत, सावरत राहिला. तो जाण्याच्या अगोदरच्या पाचसहा वर्षांत मृत्यू त्याच्या हात धुवून मागेच लागला होता असं वाटतं. आधी त्याला घशाच्या कर्करोगाने गाठलं. हिमतीने आणि चिवट लढा देऊन तो त्यातून बाहेर आला. ‘केमोथेरेपीने’ त्याचे पूर्ण केस गेले. नंतर पुन्हा आले तर ते आधीच्या पांढऱ्याऐवजी पुन्हा काळेभोर आले. त्याला तो पुनर्जन्म वाटला. बरा होऊन आल्यावर त्याने आयुष्यातली पहिली चार चाकी गाडी घेतली. ती चालवायलाही पहिल्यांदा शिकला. त्या गाडीचं, तिच्या रंगाचं त्याला प्रचंड कौतुक होतं. पहिल्या वर्षातच एके दिवशी पहाटे पोहून परत येताना तिला ड्रायव्हरच्या बाजूलाच ट्रक घासून गेला. उखडन फेकल्या गेलेल्या दरवाजाची ती गाडी नंतर कोणी पाहिली असती तर ड्रायव्हर वाचला यावर त्याचा सुतराम विश्वास बसला नसता-पण हा वाचला!
सगळं पुन्हा नीट सुरू असताना अचानकच एक दिवस याच्या पोटात कॅन्सर पसरला असल्याचं निदान बाहेर आलं. पुन्हा जवळपास नऊ महिने हा पुण्याला मंगेशकर इस्पितळात मुक्कामी राहिला. पुन्हा केमोथेरेपी. पुन्हा सगळे केस जाणं. नंतर डॉक्टरांनी हा शंभर टक्के बरा झाल्याचा निर्वाळा दिला.

२ मार्चला बाबांच्या जन्मदिनी तो एकावर्षी एका ऐनवेळच्या योगायोगाने हजर राहणार होता. तो पुण्याहून येणार त्या एक तास आधीचं विमान मी मुंबईहून घेतलं होतं. पण त्याला उशीर होऊन दोन्ही विमानं एकत्रच लॅन्ड झाली. “एरोब्रिज’ ओलांडल्यावर कॉरिडारमध्येच मला तो दिसला. त्याला व्हिलचेअरने वर बसलेला पाहिल्याबरोबर मला धक्काच बसला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. माझी छोटी बॅग त्याच्या मांडीवर ठेवून मी व्हीलचेअरचा ताबा भारती मंगेशकरांकडून घेतला. घरी आल्यावर तो थकला होता म्हणून त्याला वरच्या गेस्टरूममध्ये नेऊन झोपवलं. पण मंगेशकरांच्या छोटेखानी कौटुंबिक सत्काराच्या वेळी उठून तो खाली आला, “मी बोलेन” म्हणाला आणि बोललाही.

४ मार्चला यवतमाळला त्याचा कार्यक्रम होता. काही वेळ बोलल्यावर अचानक खूप धावल्यावर दम लागावा तशी त्याला धाप लागली. तो थांबला. माइकवर फक्त त्याच्या श्वासाचे उसासे ऐकायला येत होते. “या श्वासांचेच उद्गार होतात” असं तू म्हणायचास ना मित्रा? त्याला जास्त बोलू न देता मंगेशकरांनी जास्ती गायचं, हे आम्ही आधीच ठरवलेलं होत. ही लक्षणं पाहून मंगेशकर समारोपाच्या उद्देशाने माईककडे झुकले. पण याने हाताने माईक पुन्हा जवळ घेतला. दोन-चार वाक्यांनंतर त्याला पुन्हा तशीच धाप लागली आणि तो पुन्हा थांबला, माईकवर पुन्हा तसेच उसासे. पण पुन्हा त्याने माईक जवळ घेतला आणि मग फक्त एकच वाक्य म्हणाला, “शब्बे फुर्कत का जागा हूँ फरिश्तो… अब तो सोने दो…कभी फुरसत में कर लेना हिसाब…आहिस्ता आहिस्ता…” हे त्याचं या जन्मातलं शेवटचं जाहीर वाक्य!

 पुण्याला परत जाताना तो “मला आतून काही बरं वाटत नाही आहे” असं म्हणतच होता. त्याला एअरपोर्टवर सोडायला त्याच्या घरी घ्यायला गेलो. हे आपलं आपल्या घरातून शेवटचं निघणं आहे याची काही कल्पना त्याच्या मनात आली होती की काय कोण जाणे; पण निघताना घरातल्या एका खांबाला मिठी मारून तो काही वेळ स्तब्ध उभा राहिला. मग “चलो…” म्हणाला. एअरपोर्टवर त्याची व्हीलचेअर एका खुर्चीच्या बाजूला लावून मी त्या खुर्चीवर बसलो. उजव्या हाताची बोटं व अंगठा एकमेकांवर घासत त्याच्या नेहमीच्या शैलीने तो म्हणाला, I want few more years, माझं अजून काही काम राहिलं आहे. मी म्हणालो, “मला तुमच्याशी तीनचार दिवस गप्पा मारायला यायचं आहे. मृत्यू, पुनर्जन्म, लोकशाही, स्त्री-पुरुष संबंध, नियती, नशीब या विषयांवर तुमच्या प्रवासात तुम्ही कुठपर्यंत पोचलात हे मला जाणून घ्यायचं आहे आणि हे सगळं मला ‘टेप’ करून घ्यायचं आहे.” तो म्हणाला, “थोडक्यात तुला ‘डॉक्युमेंटेशन’ करून घ्यायचं आहे.” मी म्हणालो, “नाही. मी हे कुठेही वापरणार नाही. माझ्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही पोचलात ते टप्पे मला समजावून घ्यायचे आहेत आणि माझ्या पुढच्या जगण्यासाठी आधार म्हणून तुमच्या आवाजात ते पुन्हा पुन्हा ऐकायची सोय करून ठेवायची आहे.” तो म्हणाला, “ठीक आहे. ये. माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं मी तुला देऊन जायला तयार आहे.”

मात्र त्यादरम्यान इस्पितळात झालेल्या टेस्टमध्ये त्याला लिव्हरचा कॅन्सर व तोही इतका पसरलेला निघाला की तोपर्यंत अत्यंत चिकाटीने प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या मंगेशकर इस्पितळाच्या डॉक्टरांनीही हात टेकले. त्यानंतर चारपाच दिवसांतच तो बेशुद्धीत गेला. काही वेळेसाठी शुद्धीवर येऊन पुन्हा भरमसाठ बोलण्याचा अपवाद फक्त एकाच दिवशी झाला-गुलजार त्याला भेटायला आले तेव्हा. आयुष्यातल्या शेवटच्या संवादासाठी गुलजारांसारखा प्रतिभावंत त्याला लाभला ही फार भाग्याची गोष्ट आहे!

हेही वाचायला विसरू नका सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!!-https://bit.ly/2UaEPOshttps://bit.ly/2UaEPOs

२४ मार्चला रात्री १० वाजता पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळात मी त्याच्या जवळ होतो. त्याला कशाचंच भान, शुद्ध नव्हती. त्याच्या कपाळावर हात ठेवून मी बराच वेळ उभा राहिलो. चटका लागेल इतकं त्याचं अंग गरम होतं. मला पुन्हा आशा वाटली. शरीराने प्रतिकार करणं थांबवलं की ते थंड पडत जातं. टेंपरेचर आहे त्या अर्थी शरीर अजून लढतं आहे असं वाटलं. ओरल केमोथेरेपी सुरूच होती. मी राघवला म्हटलं, “He may bounce back.” त्यालाही आशा वाटली. एक आवाज देऊन रिस्पॉन्स येतो का ते पाहायचं ठरवलं. मी त्याच्या कानाशी जाऊन जोरात म्हटलं, ‘चलते क्या गुरूजी नागपूर..?’ त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषादेखील हालली नाही. ऑक्सिजन मास्कच्या आजूबाजूचा दिसू शकणारा त्यांचा चेहरा समाधिस्थ असल्यासारखा शांत होता. पुण्याहून परतल्यावर एअरपोर्टवरूनच मी सरळ वणीला गेलो. त्या रात्रीच हृदयनाथांचा फोन आला, “आज रात्रीचीही खात्री नाही, तुम्ही मनाची तयारी करा!” म्हणाले. सकाळी मंगेशकर हॉस्पिटलच्या फोननेच जाग आली : “पाच मिनिटांपूर्वी ग्रेस सर गेले…” या वाक्यानीच माझे डोळे उघडले.

त्याला नागपूरला आणण्याचा निर्णय, बॉडी विमानात घ्यायची व्यवस्था, अंत्यसंस्काराची व्यवस्था, हे सगळं गाडीतून फोनवरच करत मी नागपूरला पोचलो. एअरपोर्टवर याचं कॉफिन घेताना माझ्या मनात आलं : हे उघडून यातला याचा निष्प्राण देह आपल्याच्याने पाहणं होईल का? देव आनंदला त्याचा निष्प्राण देह कुणी पाहू नये असं वाटत असे. त्याने तसं लिहूनही ठेवलं होतं. यालाही त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे असं वाटणं खरं तर अगदी स्वाभाविक होतं. पण याने असं काहीच, कधीच, कुणाजवळच बोलून ठेवलेलं नव्हतं. याचं कॉफिन उघडायचं की त्याच्यासकटच याचा अंत्यसंस्कार करावा हा गोंधळ तेव्हा मनाचा झाला होता. घरी आणल्यावर कॉफिन आधी पार्किंगमध्ये ठेवलं. काही माणसं आधीपासूनच वाट पाहत होती. गर्दी वाढू लागली. त्या इमारतीची माणसं पार्किंग रिकामं करून द्यायलाही तयार होईनात. आपल्या इमारतीत एवढा मोठा माणूस राहतो याची तोपर्यंत कदाचित त्यांना कल्पनाही नसावी. लाल दिव्याच्या गाड्या धडाधड येऊन धडकायला लागल्यावर मग मात्र त्यांनी निमूटपणे पार्किंग रिकामं करून दिलं.

दुसऱ्या दिवशीचे पेपर याच्या फोटोंनीच भरलेले होते, ते पाहून त्या चौकातला पान-टपरीवाला म्हणाला, “अरे ये बावाजी तो यहीसे जाना आना करता था. इतना बड़ा आदमी था क्या…?”
घरभर भिंतीवर चिटकवलेले याचे फोटो आणि ठिकठिकाणी ठेवलेल्या छोट्या छोट्या वस्तू हे त्याच्या राहत्या घराचं नेहमीचं वैशिष्ट्य राहिलं आहे. मग ते ‘नॉर्मल स्कूल क्वार्टर’मधलं घर असो की शेवटचं राहतं घर. या वस्तू दोन-तीन इंचही इकडे तिकडे हाललेल्या त्याला चालत नसत. त्या पुन्हा तो त्यांच्या जागेवर ठेवायचा. कॉफिन खूप मोठं असल्याने जिन्यातून त्याच्या घरापर्यंत चढवायला अत्यंत कठीण गेलं. दारातून आत नेल्यावर ते पलटवताना धक्का लागून समोरच्या रॅकवरच्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू खाली पडल्या व फरशीभर विखुरल्या. माझ्या काळजात एकदम कालवाकालव झाली.
त्याचं कॉफिन ठेवायला तो नेहमी जिथे बसून बोलायचा तो दिवाण, त्याच्यासमोर टेबल, त्यावरच्या छोट्या छोट्या वस्तू उचलाव्या लागल्या. दिवाणावरची गादी उचलली तेव्हा त्याखाली त्याने जपून ठेवलेले काही जुने, पिवळे पडलेले कागद आणि नवीन पांढऱ्याशुभ्र कागदावर दोन नवीन कविता निघाल्या. या सगळ्या वस्तूंना हात लावताना, तिथून उचलताना गलबलल्यासारखं होत होतं, हात थरथरत होते.

त्याच्या अंत्यदर्शनाला खूप गर्दी झाली. मला ‘संगमाजवळ गर्दी असते, उगम नेहमी एकला असतो’ हे त्याचं वाक्य आठवलं. त्याच्या घरच्या अंगणातून त्याला ट्रकवर ठेवण्यासाठी उचलण्यात आलं तेव्हा मात्र मला अचानक एकदम अनावर भडभडून आलं. माझ्या डोळ्यांपुढे त्याची आई गेल्यावर अंगणात गमले मजला संपले बालपण माझे…’ म्हणणारा फताड्या चड्डीतला ग्रेस आला. तो ग्रेस आता चालला होता. अंगावरची झूल उतरून मला एका क्षणासाठी चड्डीतल्या पोरासारखं पोरकं वाटलं. त्या अंगणातल्या त्या पोरक्या मुलाला आज या अंगणात राष्ट्राने आपला ध्वज गुंडाळला होता. ‘खिडकीवर धुरकटं तेव्हा कंदील एकटा’ नव्हता, खचाखच भरलेल्या गर्दीत पोलीसबँड त्याला सलामी देत होता. ‘मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित नव्हता’, तर उलट आज सहस्र हातांनी मेघांना बाजूला करून याच्या स्वागतासाठी बाहू पसरून भगभगत होता. त्याला चितेवर ठेवल्यावर बंदुकींच्या फैरी सलामीसाठी झाडल्या गेल्या. मनात आलं : अव्यक्ताच्या सफरी करून तू आमच्या मनात असाच बंदुकीच्या फैरीसारखा घुसायचास. आता नेहमीसाठी त्या अव्यक्तात मिसळायला निघाला आहेस त्या फैरी त्या अव्यक्ताला, तुझ्या स्वागतासाठी सतर्क, सिद्ध करायला. अलविदा ग्रेस…!

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत )

9822466401

पूर्वप्रसिद्धी ‘मौज’ दिवाळी अंक -२०१२

Previous articleसरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!!
Next articleएक ‘राऊत’ हवाच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.