दोन ध्रुवांवर लोंबकळणारी फुलपाखरं

लेखक  – शशी डंभारे

तीन दिवसांपूर्वी  माझ्या  बहिणीच्या १९ वर्षाच्या मुलीने, नेहाने आत्महत्या केली.
फॅमिली जनरल. आई – वडील फारसे शिकलेले नसल्याने हिच्याकडून त्यांच्या फारशा  शैक्षणिक अपेक्षा वगैरे नव्हत्या. सध्या १२ वीची परिक्षा दुस-यांदा दिली होती. त्यापूर्वी  ८ वी १० वीत  नापास होण्याचा अनुभव होताच.
आई, वडील भाऊ आणि ही अशी चौकोनी फॅमिली असली तरी गावातच आजी, काका, वडिलांचे मामा,  मावश्या, त्यांची मुलं अशी खुप माणसं रोजच भेटणारी बोलणारी. त्यामुळे एकाकीपणा वगैरे नाहीच.
मूळ स्वभाव उत्सवप्रिय.  कुणाच्याही लग्नात मनमुराद नाचणारी. नवरात्रात रात्रभर नाचणे- फिरणे enjoy करणारी.
मनाने निर्मळ. म्हणजे जरा भेाळसटच.
प्रत्येक नातेवाईकाबद्दल अपार आस्था असणारी,  सगळ्यांवर प्रेम करणारी.
शाळा कॉलेजात ढीगभर मैत्रिणी. आदल्या  रात्री १२ पर्यन्त मैत्रिणींशी मस्तीभरा चाट करणारी.

सकाळी उठली तीही स्वत:हून नाही.  सोफ्यावरच झोपली होती.  आईचा चुकून तिच्या पायाला धक्का लागला त्यामुळे हिला जाग आलेली.
मग आई बरोबर नॉर्मल सकाळच्या गप्पा.  टीव्हीवर गाणी सुरु. समोरच दार उघडे असलेल्या  बेडरूम मधे मोठा भाऊ झोपलेला.
आई तिला ब्रश कर, आंघोळ कर म्हणाली तर, तू आंघोळ कर मी केर काढते असं हीच  आईला म्हणाली म्हणून आई अंघोळीला गेली. जास्तीतजास्त ८-९ मिनिटांची गैप. आंघोळ करुन आई बाहेर आली तर ही हॉलमधल्या झुंबराच्या हुकला ओढणी बांधून लटकलेली.  टेबलवर बोटभर चिठ्ठी.
” मी फेल आहे सगळ्याच बाबतीत , मम्मी मला माफ़ कर , I am sorry . Mummy pappa I love u ”
बस्स इतकेच .

तिच्या आईला वेडच लागायचे बाकी राहिले. आईने तिचे पाय वरच्या वर धरले. भावाला ओरडून उठवले. भाऊ उठला. दोघांनी तिला खाली कसे उतरवले हे आजही दोघांना नीटस आठवत नाही. प्रचंड शॉकमधे दोघेही. अँब्यूलन्स आणली. दवाखान्यात नेले. ती त्या 8-9 मिनीटातच संपलेली.
तिची जीभ अर्धवट बाहेर येऊन टाळयाला चिपकलेली. तशीच भावाची जीभ आज टाळयाला चिटकलीय. तीन दिवस झालेत तरी कंठातून  शब्द फुटत नाहीत त्याच्या.
आणि जसे तिचे डोळे सताड उघडे होते तसे, तितकेच तिच्या आईचे डोळे आजही सताड उघडे आहेत एकच प्रश्न घेऊन की, का ? का ? का ?

आमचे सारे कुटूंब या भयंकर घटनेने हादरुन गेले. कुणाचाच विश्वास बसत नाही. की नेहाने असे का केले ? नेहा अशी का वागली ? असे कोणते दु:ख होते ? असा कोणता त्रास ? जो तिने आमच्याशी शेअर नाही केला. तिच्या आईवडीलांच्याच नाही तर आख्ख्या अलीबाग शहराच्याच चेह-यावर एक प्रश्नचिन्ह.

मी तिची मोठी मावशी. जबर मानसिक धक्क्यातही नेहाची आई म्हणजे माझी लहान बहीण माझ्याकडे सतत एका वेडया अपेक्षेने बघतेय की काहीतरी उत्तर दे . मुलगी गेल्याचे दु:ख तर आयुष्यभरच पुरणार आहे आता तिला पण ती का गेली, कशाने गेली  हे कुठूनतरी , कसेतरी समजव. ही अस्वस्थता, तगमग आम्हा सर्वांतच .  पण तिच्यात अत्यंतिक.

     नेहाला मी जितकी ओळखत होते, तिचा माझा जो काही आजवरचा संवाद होता त्यातला एक एक धागा मी तपासत होते मनातल्या मनात. पण कुठेच काही ठोस सबब हाती लागत नव्हती.

तरुण मुला -मुलींच्या आत्महत्येमागे बहुधा प्रेमप्रकरण हे कारण असतं. त्या दृष्टीनेही खूप चौकशी केली. आई, वडील, भाऊ, बहिणी, मित्र, मैत्रिणींची त्या अर्थाने खोल तपासणी केली.

नेहा जरा चंचल स्वभावाची होती. दिसायला  देखणी. त्यामुळे गावातली  मुले मागे लागल्याची एक दोन किरकोळ उदाहरणे मिळाली तपासणीत. पण त्यात हिने फारसा प्रतिसाद दिलेला आढळला नाही.
त्यामुळे  तोही अंदाज जुळत नव्हता.

सारी भिस्त रात्री उशीरापर्यंत ती ज्या मैत्रिणीशी बोलत होती त्या मैत्रिणीच्या मोबाईलवर उरलेली. ती बाहेरगावी असल्याने यायला उशीर झाला. पण जेव्हा आली आणि दोघींचे chatting चेक केले तेव्हा त्यात ती मानसिक तणावात असल्याची एकही निशाणी नाही. कुठेच काही नाही. उलट तू कधी येणार आहेस, आपण कधी भेटू , भेटल्यावर  काय करु अशा सगळया मौज मस्तीच्या सकारात्मकच गोष्टी.

मग नेहा का मेली ?  हा प्रश्न अधिकच टोकाचा होत गेला.
गावातल्या लोकांचे बरे असते. भूत – प्रेत, बाधा – बिधा अशी उत्तरे ठरवून घेऊन ते मोकळे होतात.

मला तसे करुन चालणार नव्हते. मला माझ्या बहिणीच्या नजरेला सामोरे जायचे होते.

म्हणून  मी माझे प्रश्न घेऊन दोन प्रख्यात मानसोपचार तज्ञांकडे गेले.

१. डॉ. स्वाती धर्माधिकारी , Clinical Psychologist, Medical and Psychiatric social worker .

२. डॉ. शामल बबन सराडकर, Psychiatrist at Consultant Psychiatrist संवेदना Mind & Brain  clinic,  Director and consultant Psychiatrist

आणि या दोन डॉक्टरांनी नेहाच्या  आत्महत्येचा जो उलगडा केला तो प्रचंड हादरवणारा आहे मला. तुम्हालाही हादरवेल.
अशा दुर्घटना कुणाच्याही उंबरठयावर येऊन ठेपलेल्या असू शकतात. कधी कोणते कुटूंब या अशा स्थितीचा बळी होईल हे सांगता येत नाही इतकं तोंडावर आलेलं हे संकट आहे म्हणून डॉक्टरांनी मला जे सांगितले ते इथे जमेल तसे मांडण्याचा मी प्रयत्न करतेय.
डॉ. स्वातीशी व्हॉटसअप आणि  डॉ. सराडकरांशी मी फेसबुक मॅसेंजरवर एकाच वेळी संवाद करत होते. वर लिहलेली नेहाबद्दलची सगळी  माहिती मी दोघांनाही एकाच वेळी msg केली आणि सुदैवाने दोघेही त्यावेळी उपलब्ध असल्याने दोघांनीही ती एकाच वेळी वाचली.
दोघांचेही उत्तरही एकाच वेळी माझया मोबाईलवर उमटले
Bipolar / Borderline personality
दोघांनीही मला काही प्रश्न विचारले. नेहाच्या स्वभावाबद्दल. दुदैंवाने त्यांनी विचारलेल्या साध्या साध्या गोष्टी ज्या मला, तिच्या आजुबाजूच्या कुणालाही नॉर्मल किंवा तिचा नादानपणा, बालीशपणा वाटत होत्या त्या एका गंभीर आजाराच्या खुणा होत्या.
दोन्ही मानसोपचारतज्ञांनी Bipolar / Borderline personality ची जी लक्षणे सांगितली ती दुर्दैवाने नेहाच्या बाबतीत तंतोतंत जुळत होती.

नेहाच्या वागण्यात काही  disorders होत्या ज्या त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवल्या म्हणजे आठवल्या.

मोबाईलचे तिला प्रचंड वेड. अगदी  ६-७ वीत असल्यापासूनच .
आई, वडील, भाऊ त्यावरून रागवायचे.  छोटे मोठे वाद व्हायचे घरात. कधी तिच्या अती उत्साही चंचल वागण्यावरुन, तर कधी  मित्र मैत्रिणीवरून.  पण तेही अगदी कमी. मुळात ती घरात सगळयांची  लाडकीच. पण,

असे असूनही तिने आजवर २-३ वेळा  suicide attempt  केले होते. साध्या साध्या कारणांवरुन. ती एकदा घर सोडून निघून गेलेली. समुद्रावर.  समुद्राला ओहोटी असल्याने किल्ल्यात अडकली. मग कुणीतरी ओळखीचे दिसले. ते तिला घरी घेऊन आले.

एकदा असंच काही तरी कारण तर बाथरुम मधे जाऊन फिनाईल प्यायचा प्रयत्न केला. म्हणजे तोंडाला लावली फिनाईलची बाटली तेवढयात आई आली.

असेच कशावरुन तरी एकदा ब्लेड मारलेले मनगटावर  ( हे सगळे  मला आता बहिणीकडून समजले )

ती तापट होत चाललीय, जराजराशाने चिडते, असे काही वेगळेच करते रागवल्यावर म्हणून घरातलेच तिच्याशी इतक्यात जपून वागत. ती चिडणार नाही असे बघत.

आणाखीही काही वेगळी लक्षणे, जसे की
छोट्या छोटया  चो-या करायची मागच्या काही वर्षात. विनाकारणच.  म्हणजे बहिणीची लिपस्टिक,  मामीची नेलपॉलिश.  जे की मागूनही सहज मिळाले असते तिला.
एकदा पप्पांच्या खिशातले पैसेही काढलेले.
पण प्रत्येक वेळी ती सापडली गेली, तिची चोरी पकडली गेली  कारण चोरी लपवण्यात ती तितकीशी स्मार्ट  नव्हती किंवा त्यात तिला इंटरेस्ट नव्हता.
लहान आहे , मोठी झाली की सुधरेल असे वाटून सगळ्यांनी तिच्या या छोटया मोठया चुका  समजून घेतलेल्या.

हे सगळे ऐकल्यावर दोन्ही डॉक्टरांनी नेहा दोनेक वर्षांपासून मानसिक रुग्ण होती आणि तिला
Bipolar / Borderline personality हा आजार होता असा निष्कर्ष काढला.

माझ्या कुटूंबावर या आजाराची वीज कोसळलीय. पण अशी वीज आणखी कुणा कुटूंबावर कोसळू नये म्हणून मी या आजाराची डॉक्टरांनी सांगितलेली काही प्रमुख लक्षणे इथे देतेय.

1. या आजाराचे शिकार होण्याचे वय आहे १७ ते२७

२. यामध्ये मुख्यत: मूड स्वींग होतात मुलांचे. Moods Ups and Down ( आपण हॉर्मन्स इंबॅलन्स समजून     दूर्लक्ष करतो )

३. Suicidal Tendencies .

४.  Excitement and  Sudden Depression.

५.  Impulsive Anger.

६. रडणे, ओरडणे, मारणे, जोरजोरात मोबाईल आपटणे, फोडणे, अचानक रडणे. ही लक्षणे आजार जास्त  प्रभाव दाखवत असल्याचा संदेश देतात असे डॉक्टर म्हणाले.

घटना घडण्यापूर्वी ३ दिवसांपूर्वी घरात रेंज मिळत नाही, नीट कनेक्ट होत नाही या कारणावरुन नेहाने तिचा मोबाईल आपटून आपटून फोडला होता. मोबाईल खूपच जुन्या मॉडलचा होता. तिलाच कुठेतरी सापडलेला आणि घरात रेंजचा खरोखरच अत्यंत प्रॉब्लेम, तिची चिडचिड व्हायचीच, त्यामुळे आम्ही काही म्हणालो नाही फारसं….असं बहीण म्हणाली.

याचा अर्थ  ३ दिवसांपूर्वी ती या  आजाराच्या चरमसीमेवर पोहचलेली होती. आणि लाडात वाढल्यानेच अशी वाया चाललीय, चिडकी  झालीय असं समजून तिच्या वागण्याकडे दूर्लक्ष केले गेले होते.
दोन्ही डॉक्टरांशी केलेल्या चर्चेवरुन मी माझ्या घरातल्या प्रश्नचिन्हांचा छडा लावू शकलेय हे खरेय पण Bipolar / Borderline personality या सर्वसामान्य माणसांना अनभिज्ञ असलेल्या  आजाराने आज आजूबाजूच्या सर्वसामान्य घरांत किती आक्राळविक्राळ रुप धारण केलेय या विचाराने मी हादरलेय.

Bipolar म्हणजे दोन वेगवेगळया पोलवर जगणारा माणूस. जो एकतर या पोलवर असतो किंवा त्या पोलवर. वरवर नॉर्मल सर्वसाधारण रुटीन  जगत असल्याचे दिसणा-या या माणसाच्या मनाचे, विचारांचे, निर्णयांचे आणि वागण्याचे झोके वेगाने या पोलवरुन त्या पोलवर होत असतात. झोक्याचा वेग इतका असतो की दोन झोक्यांच्या मधल्या काही क्षणांच्या खोल दरीत  आत्महत्येचा निर्णय नुसता घेतलाच जात नाही तर पूर्णत्वास ही नेला जातो.

नेहाने आत्महत्या का केली याचे उत्तर या झोक्यात, दोन झोक्यांतल्या ८-९ मिनिटांच्या वेगाच्या दरीत सापडले.

नेहा आवडती होतीच तरी  तिच्या आत्महत्येने तिने अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित केले असल्याने  तिच्याबद्दल निर्माण झालेली रागाची एक हलकी सूक्ष्म रेषा विरुन तिची जागा आता तिच्या बद्दलच्या निव्वळ करुणेने घेतलीय.

फुलपाखरासारखी आम्हा सर्वांच्या आजूबाजूला भिरभिरणारी नेहा कैक महिने किंवा वर्षांपासून एका भीषण आजाराची रोगी होती हे कळल्याने तिच्या बाबतीत मनात आलेल्या सर्वच विचारांबद्दल एक अपराधीपण दाटून आलंय आता मनात.

आपल्या देशात, आपल्या समाजात  अजूनही मानसिक आजारांबाबत शुन्य साक्षरता / सतर्कता आहे. शारीरीक आजारासारखेच मानसिक आजारही असतात, ते जीवघेणे ठरु शकतात,  त्यावर औषधेापचार उपलब्ध  आहेत आणि ते घेणे आवश्यक आहे या गोष्टी अजूनही वरकरणी सुशिक्षीत दिसणा-या आपल्या शहरी समाजात पोहचलेल्या नाहीत. अलीबाग तर त्यामानाने छोटे शहर.  या शहरातल्या एका छोटया गावात राहणा-या माझ्या बहिणीला तिच्या कुटूंबियांना, जिथे की आजूबाजूला समुद्रावर मासे पकडणे हा व्यवसाय करणारे  अशिक्षित कोळी बांधवच मोठया प्रमाणात राहतात अशा शेजा-यांना तिच्या  या आजाराबद्दल जाणिव  होण्याची अपेक्षा करणे चूकच.

नेहासारखे १७ ते २७ वयोगटातली आणखीही कितीतरी मुलं या आजाराने घेरलेली असतील आणि कुटूंबीयांना त्याचा पत्ताही नसेल हा विचार करुन अंगावर काटा उभा राहतोय.

नेहाने २७ऑगस्टला सकाळी नऊ ते सव्वा नऊ या दरम्याने आत्महत्या केली. त्याच दिवशी माणगावच्या गोल्ड मेडलीस्ट वेट लिफ्टर मुलीच्या आत्महत्येची बातमी आली. एकटया रायगड जिल्हयातल्या त्या दिवशीच्या आत्महत्यांचा आकडा डोळे विस्फारणारा होता.

आजचा समाज  एका प्रचंड मानसिक उलथापालथीच्या  संक्रमणातून चाललाय. मोबाईल, सोशल साईटची उपलब्धता हे भौतिक सुख नसून गरजेच्या बाबी बनल्या आहेत. या बाबींमुळे उपलब्ध होणारा माहितीचा प्रचंड स्त्रोत पेलण्याची ताकद सगळयाच माणसांच्या  मेंदूमधे आहे का  हे तपासण्याची वेळ आलीय. १७ ते २७ या वयातल्या मुलांच्या तरी. या वयात मेंदूमधे प्रचंड केमिकल लोचे असतात, असे डॉक्टर म्हणाले.

मित्रांनो,
आमचं नेहा नावाचं फुलपाखरु आम्हाला चटका देऊन उडालंय. ही जखम आता आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. पण तुमच्या आजूबाजूला वावरणा-या फुलपाखरांना  Bipolar / Borderline personality आजाराचा भूंगा चिकटलेला नाही ना यावर लक्ष पुरवा. वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

-सौ. शशी डंभारे, मुंबई

(लेखिका शासकीय सेवेत कार्यरत आहेत )

Previous articleएकटेपण !
Next articleभुतांची पूजा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.