‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी

मला (बि)घडवणारे चित्रपट

– सानिया भालेराव

 

मी तीन गोष्टींशिवाय जगूच शकत नाही . संगीत , पुस्तकं आणि चित्रपट. माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणाऱ्या चित्रपटांबद्दल एक सिरीज लिहायचा विचार फार दिवसांपासून मनात होता . मी आत्तापर्यंत फ्रेंच , बंगाली भाषेपासून ते कोरियन, जपानी भाषांमधले असंख्य चित्रपट पहिले आहेत , जगले आहे .  ज्याने प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला, अशा एका चित्रपटाबद्दल आज लिहिते आहे . चित्रपट आहे “द नोटबुक”. खरंतर सो कॉल्ड रोमँटिक चित्रपटांमध्ये हा चित्रपट फार ठळक उठून येत नाही . यू हॅव गॉट मेल , व्हेन हॅरी मेट सॅली, प्रिटी वूमन , स्लीपलेस इन सिएटल , नॉटिंग हिल अश्या अनेक प्रेमकथांमध्ये मला द नोटबुक फार जवळचा वाटतो . कारण अनसेड लव्ह स्टोरीज मला जास्त आवडतात. तर जाणून घेवूया माझी आवडती लव्ह स्टोरी !

 

निकोलस स्पार्क्स ह्या लेखकाच्या “द नोटबुक” ह्या पुस्तकावर बेतलेला या  चित्रपटाची कथा वरवरून क्लिशेड लव्ह स्टोरी वाटत असली तरी जे प्रेम ह्या चित्रपटातून दाखवलं आहे , जे आपल्याला अनुभवायला मिळतं ते मन , आत्मा तृप्त करणारं आहे . ह्याहून जास्त आयडियल प्रेम असूच शकत नाही. यावरून बऱ्याच भाषांमध्ये चित्रपट बनले . आपल्या हिंदीत अजय देवगण चा ‘यू मी और हम’ हा चित्रपट देखील आला होता . पण ‘द नोटबुक’ च्या जवळपासही तो फिरकत नाही . चित्रपट सुरु होतो एका नर्सिंग होम मध्ये . ड्यूक नावाचा एक गोड म्हातारा एका गोड गोड अल्झायमर असलेल्या म्हातारीला एका पुस्तकातून एक गोष्ट वाचून दाखवत असतो या सिन पासून. ती म्हातारी ड्यूकला अजिबात ओळखत नसते आणि गोष्ट ऐकायला फार उत्सुकही नसते . तरीही ड्यूक तिला ती गोष्ट ऐकण्याचं आर्जव करतो आणि ती तयार होते . हि गोष्ट असते एका सामान्य मध्यमवर्गीय घरातून असलेल्या नोहा ( रायन गॉसलिंग )ची जो अ‍ॅलीला ( रेचल मॅकअ‍ॅडम्स ) ला एका कार्निवल मध्ये भेटतो. अ‍ॅली एका सधन कुटुंबात वाढलेली सुंदर आणि बुद्धिमान तरुणी असते . आणि मग त्यांचा जबरदस्त समर रोमान्स सुरु होतो. नोहा तिला एका जुन्या पडीक घरामध्ये घेऊन जातो. भविष्यामध्ये त्याला ते घर विकत घायचं असतं. अ‍ॅली त्याला त्या घरामध्ये काय काय हवं आहे हे सांगते आणि त्या प्रमाणे नोहा ते घर बनवणार असतो. त्यांचं प्रेम पुढची पायरी गाठणार इतक्यात नोहाचा मित्र फिन तिथे येतो आणि अ‍ॅलीच्या आई वडिलांनी तिला शोधण्यासाठी पोलिसांना बोलावलं आहे हे सांगतो . पुढे नेहेमीप्रमाणे त्यांच्या राहणीमानातल्या फरकामुळे त्यांची ताटातूट होते . अ‍ॅली  फिनकडे ती नोहावर खूप प्रेम करते असा निरोप ठेऊन निघून जाते आणि नोहा पोहोचेपर्यंत ती निघून गेलेली असते . पुढे नोहा अ‍ॅलीला दररोज एक असे ३६५ पत्र पाठवतो पण अ‍ॅलीची आई ते तिच्यापर्यंत पोहोचू देत नाही .

मग नंतर नोहा आणि फिन युद्धात भरती होतात , त्यात फिनचा मृत्यू होतो आणि काही वर्षांनी नोहा आपल्या गावात परत येतो. पण तो अ‍ॅलीला विसरलेला नसतो . इकडे अ‍ॅली एका तरुण आर्मीतल्या ऑफिसरच्या प्रेमात पडते आणि त्यांचं लग्न करण्याचं निश्चित होतं . सधन आणि प्रथितयश घराण्यातला जावई मिळाला म्हणून तिचे आई वडील खुश असतात. नोहाला एकदिवस अ‍ॅली आणि तिचा होणारा नवरा दिसतो आणि ते घर जे अ‍ॅलीला हवं असतं ते तसंच्या तसं पूर्ण करण्याचा ध्यास तो घेतो. त्याचं रूपांतर वेडात होतं कारण नोहाला असं वाटत असतं कि एकदा का अ‍ॅलीला हे घर पूर्ण झालं आहे हे कळलं कि ती त्याच्याकडे परत येईल. दिवस जातात , घर बनतं पण नोहा ते कोणालाच विकत नाही . अ‍ॅलीच्या लग्नाच्या काही दिवस आधी पेपरमध्ये ह्या घराचा फोटो बघते आणि तडक नोहाला भेटायला जाते .ते भेटतात , बोलतात. सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा पाळून गप्पा मारतात . एका क्षणी जेव्हा नोहा तिला विचारतो कि पत्रांचं उत्तर का नाही दिलं तेंव्हा अ‍ॅलीला उलगडा होतो आणि इतक्या वर्षांत साचून राहिलेलं त्यांचं प्रेम मोकळं होतं. अ‍ॅली नसताना नोहा सैन्यात मारल्या गेलेल्या एका सैनिकाच्या विधवेबरोबर संबंध ठेऊन असतो . जेव्हा ती अ‍ॅली असताना त्याला भेटायला येते आणि त्याला आणि अ‍ॅलीला एकत्र पाहून जे काही ती व्यक्त होते ते केवळ लाजवाब!

एकीकडे हे असतानाच प्रेझेंट डेला नर्सिंग होममध्ये ड्यूक त्या गोड म्हातारीला हि गोष्ट वाचून दाखवत असताना काही लोकं त्यांना भेटायला येतात . ती त्यांना भेटते. ते आपली नावं सांगतात . दोन मुली एक मुलगा त्यांचे लहान मुलं सगळे तिच्याशी प्रेमाने भेटतात. ती फॉर्मली भेटून निघून जाते . ते ड्यूकला म्हणतात, ” बाबा आता तरी घरी चला. तिला तुम्ही ओळखूही येत नाही पण आम्हाला तुमची आठवण येते”. ह्यावर तो म्हणतो कि “जिथे माझी स्वीटहार्ट असेल तेच माझं घर”. मग परत तो तिला गोष्टं सांगायला सुरवात करतो . इकडे अ‍ॅली आणि नोहा एकत्र झाल्यानंतर तिची आई तिथे येते . तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करते . ती तिला एका वखारीत घेऊन जाऊन एका मिडल एज माणसाकडे बोट दाखवून सांगते कि माझं ह्याच्यावर प्रेम होतं पण समाजाच्या दबावामुळे ते पूर्ण होऊ नाही शकलं. माझं तुझ्या वडिलांवर प्रेम आहे पण मी ह्याला विसरू नाही शकले कधी . पण असं असलं तरी जर मी ह्याच्याशी लग्न केलं असतं तर माझ्या वाटयाला काय आयुष्य आलं असतं असा विचार जरी मी केला तरी मला भीती वाटते . ( ‘बर्फी’मध्ये हा सिन अनुराग बासूने ढापला आहे ).

अ‍ॅली तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगते . त्याला तरीही ती हवी असते .येवढं वाचून ड्यूक गोष्टं थांबवतो . ती त्याला विचारते , मग अ‍ॅली कोणाला निवडते ह्यावर तो फक्त हसतो आणि तिला सगळं आठवतं . तिच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागतं . ती क्षणाचाही विलंब न करता म्हणते … नोहा… आणि त्याच्या डोळ्यात देखील पाणी तरळतं . मग ते दोघं छान नाच करतात , डिनर करतात इतक्यात तिला परत विसर पडतो आणि ती सैरभैर होते . नोहाला ओळखत नाही . त्याला दूर ढकलते आणि मग तिला शांत करण्यासाठी सिडेटिव्हस द्यावे लागतात . नोहाला हे सहन होत नाही. तो हतबल होऊन फक्त तिचं ते बेभान होणं बघतो , रडतो . आणि रात्री तिच्या खोलीत येतो . ती डोळे उघडते आणि तिला परत तो आठवतो . ती ओल्या डोळ्यांनी त्याला विचारते ” Do you think our love can take us away together ? आणि तो म्हणतो ” our love can do anything we want it to!

आणि जेव्हा नर्स सकाळी रूम मध्ये येते तेंव्हा नोहा आणि अ‍ॅली एकमेकांच्या कुशीत कायमचे विलीन झालेले असतात !

रेचल मॅकअ‍ॅडम्सच्या अ‍ॅलीला खूप वाहवा मिळाली असली तरी मला मात्र नोहाच जास्त भावला . प्रेम करावं तर असं . अगदी सुरवातीपासूनच आपल्या आणि अ‍ॅलीच्या विचारांच्या , आर्थिक स्थरातल्या असलेल्या विषमतेची जाणीव असणारा , अ‍ॅलीवर वेड्यासारखं बेभान तरीही मर्यादांची आब राखून प्रेम करणारा , ती परत यावी ह्या वेडाने झपाटून घर बनवणारा , उतार वयात अ‍ॅली आपल्याला विसरत जाणार ह्या कल्पनेने बेजार होणार तरीही रोज न हारता तिला तीच गोष्ट तितक्याच प्रेमाने सांगणारा , दिवसातून एकदा फक्त तिने नोहा ह्या नावाने आपल्याला बोलवावं अशी भाबडी अशा बाळगून जगणारा , अ‍ॅलीला त्याचा विसर पडल्यावर तिची ती अनोळखी नजर ओल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने झेलणारा आणि आपल्याप्रेमावर प्रचंड विश्वास ठेवणारा नोहा… केवळ अविश्वसनीय ! प्रेम असावं तर असं. ह्या चित्रपटातले कित्येक डायलॉग्स प्रेमाने आकंठ बुडालेले quotes होऊ शकतात . प्रेम असावं तर असं जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारं. अशा  प्रेमाला सलाम !

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

हे सुद्धा नक्की वाचा ९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleदेशद्रोहच नाही तर आणखी काही कायद्यात सुधारणा हवी
Next articleकुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.