धर्म:तारक कि मारक?

संजय सोनवणी
१) धर्माबाबत भारतात गेली सात महिने ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती religionपाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष.

२) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो भटकत असे. निसर्गातील अनाकलनीय घडामोडी, असुरक्षा व भय या जाणीवांतून त्याने सुष्ट आणि दुष्ट शक्तींची आपापल्या कल्पनांप्रमाणे विभागणी केली. काही टोळ्यांसाठी जे दुष्ट होते ते काही टोळ्यांसाठी सृष्ट होते. उदा. झरथुष्ट्राच्या धर्मात असूर पुजनीय तर वैदिकांच्या धर्मात असूर अपुजनीय-दुष्ट. देवतांचा व दानवांचा जन्म त्या कल्पनांतुन झाला. वर्चस्वाचे लढे पुरातन आहेत, त्यातुन देवता व नैतिक संकल्पना पसरवण्याचे/लादण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यातुन हिंसाचारही घडला आहे.

३) जगात पुरातन काळी अनेक बलाढ्य संस्कृत्या अस्तित्वात आल्या. अस्सीरियन/इजिप्शियन या महत्वाच्या संस्कृत्या. त्यांचेही देव होते, धर्म होते. पण या संस्कृत्या नष्ट झाल्या. त्यांचे देव त्या संस्कृत्या वाचवु शकल्या नाहीत. ्म्हणजे देव हा सर्वशक्तीमान असतो हे सत्य नाही. ती सदाचरणासाठी एक नैतिक बळ म्हणून चांगली संकल्पना असली तरी तिला प्रत्यक्ष असा कसलाही आधार नाही.

४) धर्मामुळे जगभर जेवढी हिंसा झाली आहे तेवढी राजकीय युद्धांत झालेली नाही. किंबहुना धर्म हा बहुतेक युद्धांत कळीचा मुद्दा होता व आहे. ज्यु विरुद्ध इजिप्शियन, नंतर ज्यु विरुद्ध ख्रिस्ती आणि नंतर इस्लामच्या जन्मानंतर ज्यु-ख्रिस्ती-इस्लाम अशा वर्चस्वाच्या तिरंगी रक्तरंजित सामन्याची सुरुवात झाली. क्रुसेडस्ने त्यात भरच पडली. आता मुस्लिम विरुद्ध मुस्लिम अशीही भर पडली आहे. हे धर्म कृषीसंस्कृतीतुन निर्माण झालेले नाहीत, स्वाभाविकच टोळी (कबिला) जीवनाचे असणारे वेगळेच आक्रमक तत्वज्ञान त्यात आहे. वैदिक धर्मही टोळीजीवनातुन निर्माण झाल्याने त्यातही युद्धखोरपणा, आक्रमकता याचे तत्वज्ञान आहे. पण अहिंसक तत्वज्ञानाचे गायन करणारे धर्मही हिंसक/दहशतवादी बनु शकतात हे म्यानमारमधील घटनांनी सिद्ध केलेले आहे.

५) भारतीय धर्म हे कृषी संस्कृतीचे, स्थिर संस्कृतीचे आहेत. सुफलताविधी, सृजन हा त्यामुळेच येथील धर्माचा भाग आहे. सारे सणही कृषी संस्कृतीशी निगडित आहेत ते यामुळेच. थोडक्यात धर्म म्हणजे त्या त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतीक व त्याला बळ देणारे तत्वज्ञान. प्रत्येक धर्म आपला धर्म श्रेष्ठ आणि पुरातन हे सांगतो. या श्रेष्ठतावादाच्या संघर्षात “माणुस” मात्र दुर्लक्षित राहिला आहे. धर्म हेच अधर्म बनत आहेत.

६) माणसाला धर्माने काहीही दिलेले नाही. जे दिले आहे ते विज्ञानाने व विकासवादाने दिले आहे. तेथे मग न्युटन ख्रिस्ती होता, आईन्स्टाईन ज्यु होता, मध्ययुगातील शेकडो ते अलीकडचे फारुक-उल-अबाझ असे अनेक शास्त्रज्ञ मुस्लिम होते. ते विज्ञान धर्मांचे नव्हे तर मानवतेचे होते. मग धर्म राहिले कोठे? धर्मांनी माणसाला जे दिले नाही ते विज्ञानाने दिले व आज त्याचाच उपयोग करत धर्मांध लोक आपली वर्चस्वतावादी तत्वज्ञानांना, मिथ्या-विज्ञानांना पसरवण्यासाठी वापरत आहेत. भारतातील वैदिक धर्मीय हिंदू नांवाखाली हा उद्योग अहर्निशपणे करत आले आहेत. आता तर त्यात दिवसेंदिवस उन्मादी भर पडत आहे. त्यामुळे बहुजनांत न्युनगंड वाढवला जातो. आपल्याच धर्म/देवता याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आणि धर्माच्या दास्यातच रहावे असाही नकळत संदेश दिला जातो. परमेश्वर नाही पण ती एक संकल्पना आहे. तिच्यावर प्रेम अवश्य करा, पण त्यासाठी हे बुवा-बापू ते मंदिरांची गरज काय याचाही विचार करा.आताच तुम्ही सरस्वतीपुजन केले. मुळात ही तुमची देवता नाही. विद्येचे देवता असलाच तर गणेश आहे. आणि खरे दैवत मानायचे तर बहुजनांसाठी ते सावित्रीमाई आणि म. फुले आहेत. प्रतीके सारीच चांगली असली तरी वर्चस्वतावादासाठी निर्माण केली गेलेली प्रतीके नाकारायला शिकले पाहिजे.

७) धर्म तारक आहे कि मारक? धर्म हा मुळात माणसाने नीतिमान होण्यासाठी निर्माण केला गेलेला एक मार्ग आहे. जोवर माणुसकीचा कळवळा आहे तोवर धर्म आहे, मग त्याला काहीही नांव द्या. तुकोबारायांनी “जे का रंजले-गांजले-त्याशी म्हणे जो आपुले…” म्हणून ठेवलय तेच ख-या धर्मांचे सार आहे. याप्रमाणे जगत राहिलो तर धर्म नक्कीच तारक ठरेल. आणि याविरुद्ध गेलात तर मग मुळात तेथे धर्मच राहत नसल्याने धर्म मारक ठरेल. शेवटी धरमातील लोक कसे वागतात-विचार करतात त्यावर धर्म चांगला कि वाईट हे ठरते. तुम्ही स्वत: कोण आहात हे शोधा…मग धर्म उपयुक्त कि अनुपयुक्त याचे उत्तर तुम्हाला मिळेल.

संजय सोनवणी
(लेखक नामवंत संशोधक आणि विचारवंत आहे)
9860991205

Previous articleचोहीकडे? आनंद गडे!!
Next articleभुजबळ अडकले, पवार, तटकरेंचं काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.