धानोरकरांच्या उमेदवारीने चंद्रपूरची लढत रंगतदार

-अजिंक्य पवार
काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला आणि चंद्रपूर लोकसभा मदारसंघातील लढतीचे चित्रच बदलले. तब्बल वीस वर्षांनंतर या मतदारसंघात आता भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होत आहे .  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासमोर प्रथमच धानोरकरांच्या रूपात तगडे आव्हान उभे झाले आहे. एरवी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय राजकारणातील चेहरे आणि  मुद्यांभाेवती फिरते. चंद्रपूर मतदारसंघ सध्या तरी याला अपवाद ठरला आहे. अहीर आणि धानोरकर या दोनच चेहऱ्यांची चर्चा मतदारांमध्ये आहे. त्या मुळेच ‘कोळसा चोर‘ ते ‘दारू माफिया‘ इथपर्यंत प्रचाराचा स्तर या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी समाज माध्यम आणि चर्चांमध्ये घसरविला आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून जोरदार नाट्य रंगले.  विनायक बांगडे यांना जाहीर केलेली उमेदवारी शेवटच्या क्षणी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना मिळाली. त्यानंतर तेली समाजाची नाराजी उफाळून आली. भाजपसमर्थक तेली नेत्यांनी याला हवा दिली. परंतु बांगडे थेट मैदानात उतरले नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय नाराजीने मान्य केला. त्यामुळे सध्यातरी भाजपचा तेली-कुणबी धुव्रीकरणाचा मुद्दा मागे पडला आहे. आता भाजपने प्रचाराची रणनिती बदलविली आहे. आधी जिल्ह्यातील विकासकामांवर मते मागणारे भाजप नेते पंतप्रधान पदासाठी माेदीच सक्षम आहेत. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी अहिरांना निवडून द्या, असे मतदारांना आवाहन करीत आहेत.
    दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यापासून धानोरकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहेत. शिवसेनेतील तरुण मतदार आपल्यापासून दूर जाऊ नये, याची ते विशेष काळजी घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या सभेतसुद्धा ते शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला विसरत नाही. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया वगळता काँग्रेसचे सर्वच गट एकत्र आले आहेत. धानोरकरांना उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा एकदिलाने धानोरकरांच्या पाठीशी आहे. मनसेचे नेते त्यांच्या व्यासपीठावर जात आहेत. शिवसेनेचा धानोरकरांना छुपा पाठींबा आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत यांना मतदारसंघात मुक्कामी ठेवले आहे.
        कोणत्याही निवडणुकीत भाजप गाफील राहत नाही. यावेळी त्यांना मतांचे विभाजन करण्याची रणनिती आखायची  संधीच मिळाली नाही. आधी नागपूरच्या विशाल मुत्तेमवारांचे नाव काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर झाले. त्यानंतर विनायक बांगडेंना उमेदवारी मिळाली. या दोघांच्याही नावाने भाजप अतिशय निश्चिंत होते. हीच त्यांची चूक झाली. शेवटच्या क्षणापर्यंत धानोरकरांनी दिल्ली सोडली नाही. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता त्यांची उमेदवारी घोषित झाली. त्यामुळे मतविभाजन घडवून आणेल असा उमेदवार भाजपला रिंगणात उतरवता आला नाही.  धानोरकर दलित आणि मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करत आहेत. आंबेडकरी समदायाच्या एका प्रमुख उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली. यात धानोरकरांची भूमिका महत्त्वाची होती, अशी चर्चा आहे. एकही मुस्लिम उमेदवार रिंगणात नाही. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजेंद्र माहाडोळे  ‘माळी ‘   समाजाचे. हा समाज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे वंचित आघाडीची चिंता काँग्रेससोबत भाजपलासुद्धा आहे.
   भाजपजवळ बलाढ्य व  सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा आहे. त्यांच्याजवळ आर्थिक ताकद आहे. धानोरकर काँग्रेसमध्ये अगदीच नवखे आहेत.  जिल्ह्याभरात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर खिळखिळी झाली आहे. कार्यकत्र्यांमध्ये उत्साह आहे. परंतु, नियोजनाचा अभाव आहे. काँग्रेससमाेर हेच  माेठे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा होणार नाही. मात्र माध्यमातूृन माेदींच्या प्रचाराचा प्रभाव मतदारांवर पडू शकतो, हे लक्षात घेऊन काँग्रेस नेते मतदारांना, समर्थकांना ‘न्यूज चॅनल्स‘ बघू नका, असे आवाहन करीत आहे. या जिल्ह्यात निवडणुकीत प्रचाराचा स्तर कधीच खालावला नाही.  यावेळी मात्र खालची पातळी गाठली गेली आहे . हंसराज अहीर समर्थक धानोरकरांना ‘दारू माफिया‘  म्हणून मतदारांसमाेर नेत आहे, तर धानोरकर समर्थक अहिरांना ‘कोळसा चोर ‘   म्हणून प्रोजेक्ट करीत आहे.  अहीर आधी कोळशाचा व्यवसाय करायचे. त्यामुळे धानोरकरसुद्धा अहिरांवर कोळसा चोरीचे थेट आरोप करीत आहेत. अहिरांनी मात्र अद्याप आपला संयम सोडलेला नाही. ते केंद्र शासनाची उपलब्धीच मतदारांसमाेर माडत आहेत. अतिशय चुरशीच्या लढतीचे चित्र प्रचाराच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात हे असे आहे. येणाऱ्या दिवसात  ही लढत आणखी रंगतदार वळण घेईल, हे दिसत आहे.
(टीम मीडिया वॉच)
Previous articleमोदींचे भक्त आणि तर्क
Next articleनशिबवान धोत्रे… संघर्ष आंबेडकर, पटेलांनाच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.