नथुरामला नाहक फाशी दिले, गांधी तर सुखरूप बचावले!

– संजय आवटे

ही सगळ्यात मोठी अफवा निघाली तर! ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या ‘माथेफिरु’ने मोहनदास करमचंद गांधी नावाच्या ७८ वर्षांच्या एका वयोवृद्धाची हत्या केली. त्यामुळे नथुराम फासावर चढला. पण, प्रत्यक्षात तर हा सारा बनाव निघाला! नथुरामने हल्ला केला हे खरे, पण मोहनदास करमचंद गांधी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेच नाहीत. ते बचावले. तरीही बापड्या नथुरामला फासावर दिले गेले. आणि, इकडे गांधी मात्र आजतागायत जिवंत आहेत. न केलेल्या खुनासाठी नथुराम फासावर चढला, त्याचे काय करायचे? कोणत्या न्यायालयात त्यासाठी दाद मागायची?

नथुरामने केलेल्या हल्ल्यातून गांधी वाचले नसते, तर पुन्हा त्यांचा खून करण्याची वेळ का आली असती? हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या एका महिलेने ३० जानेवारी २०१९ ला गांधींचा खून करण्याचा पुन्हा प्रयत्न केला.

असा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागतो, तरी गांधी मरत नाही. हे काय प्रकरण आहे? गांधींना ना कोणती सुरक्षा व्यवस्था ना खास काही, तरी गांधींना मारता का येत नाही? अनवाणी पायांनी थेट गर्दीत घुसणारा हा लहान चणीचा, उघडा, वयोवृद्ध माणूस खून करण्यासाठी किती सोपा! कोणी यावे आणि त्याच्या विरोधात हवे ते बोलावे. वाटेल तसे वाह्यात जोक्स करावेत. नाटक- सिनेमांतून मस्त बदनाम करावे. एवढे सारे सोपे. तरी तो मरत नाही आणि बदनामही होत नाही. आता तर ‘गांधी- १५०’ नावाने मस्त सेलेब्रेशनच सुरू झाले आहे. तिकडे नथुराम नाहक फासावर चढला आणि इकडे हा माणूस मात्र महात्मा म्हणून मिरवतोच आहे. पूर्वी ‘गांधी जिथे असतील तिथे’ अशा पत्त्यावर पत्रं जायची आणि गांधींना ती मिळायची. अवघा देश पिंजून काढणारा हा मांणूस आजही देशभर फिरतो आहे. ऐन तारुण्यात फासावर गेलेला नथुराम नाहक मारला जातो आणि इथे हा वयोवृद्ध माणूस तर आणखी ‘तरुण’ होत जगभर भटकताना दिसतो.

असाच एक हल्ला झाल्यावर गांधी म्हणाले होते, ‘मला मारुन कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही. पण, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी काही मरणार नाही. मी किमान १२५ वर्षे जगणार आहे.’ आणि, अखेर हे शब्द खरेच झाले तर. १५० वर्षे झाली तरी गांधी आहेतच. ते मरत नाहीत. कितीही हल्ले झाले तरी कोणताही नथुराम गांधींचा खून करू शकत नाही!

गांधी नावाचं हे प्रकरण आहे तरी काय? मला विचाराल तर, गांधी विचार ही काही पोथी वा आज्ञावली नाही, अथवा ती ‘रेडिमेड ब्लू प्रिंट’ही नाही. ती दृष्टी आहे. पण, गांधींना एकरेषीय पद्धतीने सादर करणा-या गांधीवाद्यांनी गांधींचं रुपांतर ‘खडूस म्हाता-या’त करून टाकलं. समकालीन सामान्य माणसांपासून गांधी दुरावले असतीलच, तर ते नथुरामांमुळे नाही. ते श्रेय गांधींची मालकी सांगणा-या अशा गांधीवाद्यांकडे जाते!

आफ्रिकेत वकिली करणारे गांधीजी भारतात आले तेव्हा ४६ वर्षांचे होते. आफ्रिकेतील कामाचे वलय त्यांच्यासोबत होते. तरीही राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व गांधीजींकडे जाणे एवढे सोपे नव्हते. पण महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाची जादूच काही वेगळी होती. गांधीजींपेक्षा अधिक बुद्धिमान, प्रतिभावंत लोक काँग्रेसमध्ये होते. गांधी तसे प्रभावी नव्हते. फर्डे वक्ते तर कधीच नव्हते. तरीही अल्पावधीतच गांधीजींकडे देशाचे नेतृत्व आले. गांधीजींच्या या ‘कम्युनिकेशन’चे आजही सर्वांना आश्चर्य वाटते. तेव्हाचा देश- म्हणजे, त्यात पाकिस्तान आणि बांग्लादेशही होते. एवढा दुर्गम, महाकाय आणि दळणवळणाची साधनं नसलेला देश. अशा देशातील घराघरापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नव्हती. ‘गांधीजी येऊन गेले’, असं आजही गावागावांतले लोक सांगत असतात. सर्व वयोगटातल्या स्त्री- पुरुषांना गांधीजींनी या लढ्यामध्ये सहभागी करुन घेतलं. त्यांच्यासोबत फाटका माणूस जसा होता, तसे बिर्ला नि टाटाही होते. या सगळ्यांसोबत गांधींनी वेगवेगळ्या आश्रमांचं आणि प्रकल्पांचं देशभर जाळ विणलं. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम उभं केलं.

आम्ही ‘मास कम्युनिकेशन’चे अभ्यासक गांधींच्या या संवाद शैलीला ‘मासलाइन कम्युनिकेशन’ असं म्हणतो. संवादाची कोणतीही साधनं तेव्हा नव्हती. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सॲप तर सोडाच, पण कोणाला पत्र लिहिलं तर कधी पोहोचेल, पोहोचेलच का, याविषयी खात्री नव्हती. टीव्ही, रेडिओ तर सोडून द्या. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी वर्तमानपत्रं होती, पण फेसबुकवरच्या एखाद्याच्या फ्रेंड्सलिस्टइतकेही वाचक नसतील त्यांचे. आजच्यासारखी पायाभूत संरचना नसताना गांधीजींनी आपला संदेश नेमकेपणाने देशभर पोहोचवला. एका पत्रकाराने गांधींना विचारले, ‘तुमच्या या ‘कम्युनिकेशन’चे सूत्र काय आहे?’ तेव्हा ते म्हणाले, ‘सामान्य माणसाच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे.’ सर्वसामान्य माणसाला उपदेशाचे डोस देणाऱ्या इतर नेत्यांपेक्षा गांधीचं वेगळेपण इथं दिसतं. महात्मा गांधी हे स्वत:च सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे प्रवास करणारे प्रवासी असल्याने सामान्य माणसाचे शहाणपण त्यांना नीटपणे ठाऊक होते. त्यामुळेच कोणत्याही अलंकारिक, क्लिष्ट शब्दयोजनेशिवाय सहजपणे लोकांना भिडणारा संवाद ते करु शकले.

सामान्य माणसाच्या शहाणपणावरील विश्वासामुळेच गांधींनी परंपरेची स्पेस वापरली. अनेकदा आधुनिकतेच्या नादात परंपरेचं संचित आपण गमावतो. परंपरेचे हे संचित आपण विसरलो की नको त्या हातात ते जाते. गांधींच्या प्रार्थनेतील राम भलत्याच रथावर आरूढ झाल्यावर काय घडते, हे आपण पाहिले आहे. गांधींच्या आश्रमातील गाय चुकीच्या गोठ्यात गेल्यावर किती हिंसक होते, हेही आपण पाहात आहोत! धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्म, देव अथवा लोकांच्या श्रद्धांची थट्टा करण्याची काहीच गरज नसते. कोणी मंदिरात वा मशिदीत जात असेल, कोणी एकादशीचा उपवास करत असेल अथवा कोणी ‘बायबल’ वाचत असेल, तर त्या उपासनेचे त्याचे स्वातंत्र्य मान्यच करायला हवे. कोणताही धर्म अंतिमतः सत्य, चारित्र्य, अहिंसा हीच शिकवण देत असेल, तर खरे धर्मश्रद्ध लोक नीतीमानच असतात. प्रेम हा संस्कृतीचा सारांश असेल, तर परंपरेतील हा सारांश गांधी अधोरेखित करत असतात. बुद्धाला विष्णूचा अवतार करणारी मंडळी या वारशावर डाका घालण्यासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज असताना, परंपरेची आणि धर्माची ही स्पेस गांधीजींनी वापरली. कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या हातात हिंदू धर्म त्यामुळेच गेला नाही. तेव्हाच्याही सगळ्या नथुरामांना खरा त्रास होता तो हा!

महत्त्वाचं म्हणजे, पारंपरिक प्रतीकं वापरल्यानं सामान्य माणसाशी नातं जोडणं गांधीजींना आणखी सोपं गेलं. संवाद हा फक्त शब्दांनी होत नसतो, हे त्यांना नीटपणे समजले होते. ‘कम्युनिकेशन सायन्स’ आता सांगते की शब्दावाटे होणाऱ्या संवादापेक्षा शब्दाशिवाय होणारा संवाद अधिक प्रभावी असतो. हे ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ गांधीजींना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले होते. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कृती हा एक संवादच तर होता.

तुम्ही कल्पना करा. गांधीजींना असेही म्हणता आले असते की, आपण सगळे मिळून या ख्रिश्चनांना बाहेर काढू. तसे ते म्हणाले नाहीत. अर्थात, त्याचवेळी हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या लेखीदेखील हे धर्मयुद्ध वगैरे नव्हते. इतिहासकार बिपिनचंद्र म्हणतात त्याप्रमाणे, तशी भूमिका मुघल सम्राटांचीही नव्हती. ‘प्लन्डर’ आणि ‘पावर’ म्हणजे लूट आणि सत्ता यासाठीची ही लढाई होती. मुद्दा असा की, स्वातंत्र्यचळवळीला धार्मिक आयाम देणे गांधीजींना शक्य झाले असते. कदाचित अशा संकुचित पायावर लोक अधिक आक्रमकपणे एकत्र आले असते. पण, गांधीजींनी नकळतही असा मेसेज दिला नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये इंग्रजांबद्दल राग निर्माण करण्यापेक्षाही नवा देश घडवण्याकडे गांधीजींचा कल होता. या लढ्याला जातीय, धार्मिक वळण लागणार नाही, असा प्रयत्न ते जाणीवपूर्वक करत होते. खरे तर गांधी स्वत:ला पारंपारिक हिंदू मानत. आजच्या हिंदुत्ववाद्यांनीही हिंदू धर्माचे जेवढे परिशीलन केले नसेल तेवढे गांधीजींनी केले होते. पण, देशाचा म्हणून कोणताही धर्म असणार नाही, याबद्दल ते ठाम होते.

मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस इथपर्यंत पोहोचला, ते एवढ्या अल्पावधीत, असं समजण्याचं कारण नाही. गांधी हा मुक्काम नाही. गांधी हा प्रवास आहे. गांधी हे अव्याहत ‘Becoming’ आहे. स्वतःवर एवढे प्रयोग करणारा आणि सतत बदलत गेलेला गांधी समजण्यात आपली फसगत होते तीच मुळी आपण गांधींना ‘स्थितप्रज्ञ’ मानतो म्हणून. ‘परिवर्तनवादी’ या शब्दाला आज जो ‘स्थितीवादी’ अर्थ आला आहे, त्या व्याख्येमुळे आपल्याला गांधी परिवर्तनवादी वाटत नाहीत. विद्रोहीही वाटत नाहीत. गांधींचा मठ करुन टाकणारे गांधीवादी तर या पर्सेप्शनला सर्वात आधी जबाबदार आहेत. प्रत्यक्षात गांधी हे अत्यंत सळसळते, चैतन्यमय असे प्रकरण. बावीस वर्षांनी धाकटे असलेल्या बाबासाहेबांना भेटल्यानंतर, ‘आंतरजातीय लग्नाशिवाय अन्य लग्नाला जाणार नाही’, अशी प्रतिज्ञा करणारे आणि अर्थातच आजन्म ती पाळणारे गांधी.

गांधी हे ‘ओरिजिनल थिंकर’. एखाद्या लहानग्याच्या कुतुहलानं प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा. मग त्यावर आपली अशी मांडणी विकसित करायची. आणि, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सारं चिंतन कृतीशी जोडायचं. कृतीशी जोडायचं म्हणजे किती…! अगदी टोकच गाठायचं. एरव्ही ‘नेहमी खरे बोलावे’ या सुविचारात नवं ते काय? पण, गांधींच्या हातात असा सुविचार येतो आणि त्यांची अवघी आत्मकथा म्हणजे ‘सत्याचे प्रयोग’ होऊन जाते. या साध्या साध्या विचारांना महानपण आले ते त्या विचारांच्या प्रत्यक्ष प्रयोगाने. मग सत्याग्रह हे शास्त्र होऊन गेले आणि तेच शस्त्रही झाले. ही सगळी शस्त्रं आणि शास्त्रं त्यांनी विकसित केली, त्यात कोणतंही ‘रॉकेट सायन्स’ नव्हतं. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या सामान्य माणसानं, त्याच्या साध्या आकलनातून विकसित केलेलं हे विज्ञान होतं. गांधी हा काही ‘थोर’ वगैरे माणूस नव्हता. तो कोणताही ईश्वरी अवतार वा प्रेषित नव्हता. त्याचं असामान्यत्व हेच की तो निखळ, निरागस, प्रामाणिक असा सामान्य माणूस होता. आपण सकाळी खातो काय इथपासून ते सकाळच्या शौचापर्यंत आणि आपल्या मनातील प्रेमापासून ते विखार- वासनेपर्यंत सगळ्याकडं तो नवजात कुतुहलानं पाहू शकत होता. प्रामाणिकपणे हे सारं नोंदवत होता आणि स्वतःचं शास्त्र, स्वतःची शस्त्रं घडवत होता. सर्वसामान्य माणसाकडं जे अंगभूत शहाणपण असतं आणि संस्कृती- परंपरेनं त्याला जे ज्ञान दिलेलं असतं, तेवढंच होतं या माणसाकडं. पण, चारित्र्य आणि सत्याचा आग्रह, अपार करुणा आणि प्रेम यामुळं हा माणूस निर्भय झाला. मानवी मूल्यांवरील निष्ठेमुळे अखंड चालत राहिला. विचार आणि कृतीतील अद्वैतामुळे संग्रामाचा सेनानी झाला.

‘गांधी मजबूरी का नहीं, मजबूती का नाम है’, एवढा तो बुलंद होत गेला. त्याला कोणापेक्षा मोठं व्हायचं नव्हतं. त्याला सतत मोठं व्हायचं होतं. उंच व्हायचं होतं. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत राहिला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटन यांनी तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतात, ‘प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडं ५५ हजार सैनिक आहेत. आणि, तरीही दंगल आटोक्यात येत नाहीए. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे. आणि, तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या ‘वन मॅन बाउंड्री फोर्स’बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करु शकतो का?’

‘One Little Man of India’ अशी ज्याची ओळख परदेशात करुन दिली जात असे, त्या चिमुकल्या माणसानं जग घडवलं. गांधी नावाचा माणूस असा पुन्हा पुन्हा भेटत राहतो. नव्या नव्या प्रदेशात, नव्या नव्या रुपात त्याचं पुनरुत्थान होत असतं. कधी तो मार्टिन ल्युथर किंगच्या रुपात भेटतो आणि सांगतो, ‘आय हॅव अ ड्रिम’! कधी खान अब्दुल गफारखानच्या रुपानं ‘सरहद गांधी’ म्हणून भेटतो. कधी नेल्सन मंडेलांच्या वज्रमुठी उंचावत वर्णभेदाविरुध्द आरोळी ठोकतो. कधी गांधींचेच शब्द घेऊन उसने, आमचा ओबामा म्हणतो, Be the change, you believe in… Yes, we can!

गांधी इथं तिथं नसतोच मुळी. सरकारी भिंतीवर तो दिसला तरी त्याचा पत्ता आपल्या अंतःकरणात असतो. प्रश्न विचारण्यावर बंदी असणा-या जमान्यातही व्यवस्थेला सुनावणा-या तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसातही गांधी असतोच! न घाबरता सत्तेला प्रश्न विचारणा-या प्रत्येकामध्ये तो असतो. कधी कधी आपण त्याला टाळतो, त्याची भेट नाकारतो, चुकीच्या वाटेने चालू लागतो, तेव्हा तो आपली वाट रोखून उभा राहतो आणि मिस्किल हसत विचारतो, ‘काय, इकडं कुठं?’ ‘लगे रहो मुन्नाभाई’तल्या बापूसारखं तो हे विचारतो आणि आपण अंतर्बाहय चटपटतो.

गांधी आडवा येतो, आजही.

गांधींवर हल्ला करणं ते थांबवत नाहीत आणि गांधी काही मरत नाही!
***
लेखक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत

 

Previous articleदीनबंधूंनी उघडलंय मजुरांसाठी अन्नछत्र
Next article‘कोरोना’नंतरचे जग कसे असेल? कसे असावे??
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.