नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे

मला (बि)घडवणारे चित्रपट-४

– सानिया भालेराव

बंगाली भाषा मला येत नाही ह्याचं कायमच दुःख होतं. रवीन्द्रनाथ,सरतचंद्र,आशापूर्णा देवी,सत्यजित रे ह्यांचं लिखाण भारावून टाकतं मला. मी बरेच बंगाली चित्रपट पहिले आहेत पण त्यातला जर एक चित्रपट निवडायचा असेल तर मी “बेलाशेषे ” निवडेन . Belaseshe means Autumn of life… मराठीत सांगायचे झाले तर आयुष्याच्या शेवटाला ( उतारवय ) असा काहीसा त्याचा अर्थ होतो. खूप आधी ह्या चित्रपटावर एक इटुकली पोस्ट मी लिहिली होती पण ह्या सिरीजमध्ये हा चित्रपट सामील न करणं तर चालणारच नव्हतं. मी रोमँटिक चित्रपट फारसे बघत नाही कारण ते फारच स्टिरिओटीपीकल असतात. पण प्रेमाचा आणि एकूणच नात्यांचा जो रंग बेलाशेषे मधून दाखवला आहे ना तो अद्भुत आहे . जनरली चित्रपट प्रेमावर, मैत्रीवर, आई वडील , भाऊ बहीण अश्या कित्येक नातेसंबंधांवर भाष्य करतात . पण लग्न आणि नवरा – बायको मधल्या नात्यावर इतक्या सेन्सीबली आणि इफेक्टीव्हली भाष्य करणारे चित्रपट विरळाच ! सौमित्र चॅटर्जी आणि स्वातीलेखा सेनगुप्ता ह्या जोडीने बऱ्याच वर्षांनंतर ह्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे . त्या दोघांमधली chemistry केवळ लाजवाब . शिबोप्रसाद मुखर्जी आणि नंदिता रॉय दिग्दर्शित बेलाशेषे हा नक्कीच आगळा वेगळा अनुभव आहे!

चित्रपटची कथा बिस्वनाथ मजुमदार आणि आरती मजुमदार हे वयस्क जोडपं आणि त्यांचा एक मुलगा आणि तीन मुली यांच्या आयुष्याभोवती गुंफलेली आहे . त्यांच्या लग्नाला ५० वर्षं पूर्ण होणार असतात आणि त्या निमित्ताने सर्व कुटुंबाला एकत्र बोलावण्याचा त्यांचा विचार असतो . ते फक्त फोनवर एवढंच सांगतात कि मला एक महत्वाची घोषणा करायची आहे . घरातले सगळे जण आपापल्यापरीने तर्क लावतात पण जेंव्हा बिस्वनाथ मजुमदार ती गोष्ट सांगतात तेंव्हा त्यांचा परिवारच नाही तर त्यांची बायको आरती ला सुद्धा धक्का बसतो . असं काय सांगतात ते ? बिस्वनाथ मजुमदार सगळ्यांसमोर म्हणतात कि मला आरतीपासून घटस्फोट हवा आहे! ही ह्या चित्रपटाची सुरवात आहे . क्षणभर आपल्यालाही समजत नाही कि नक्की रिऍक्ट कसं करायचं. लग्नाला ५० वर्ष होत असताना , एवढा काळ एकत्र घालवल्यावरही, उतार वयात आजोबांना हे काय सुचतंय असं आपल्यालाही वाटल्याशिवाय राहत नाही .
त्यांना सगळेच आडून आडून कारण विचारता पण ते कुणाला ताकास तूर लागू देत नाहींत . ते आपल्या बायकोलाही एक वकील करण्यास सांगतात आणि मग कोर्टासमोर त्यांची केस उभी राहते . हा सिन माझ्या आवडता आहे . त्यांचा वकील कोर्टात त्यांची बाजू मांडत असतो . तो म्हणतो बिस्वनाथ मजुमदार ह्यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे निभावली आहे . आता त्यांना लग्नातून सुटका हवी आहे . ५० वर्षांच्या ह्या लग्नामध्ये आपल्याला फसवलं गेलं असं त्यांना वाटतं आहे . त्यांना ह्या लग्नामध्ये काही बदल होईल अशी आशा वाटतं नाही,त्यांना हे नातं मृत वाटतंय. त्यांचं एकमेकांबरोबर काहीही भांडण नाही. त्यांना कोणावरही दोष दयायचा नाही . ह्यात कोणाचीही चूक नाही . Infact no fault is itself a fault in marriage! हे ऐकून जज त्या दोघांशीही बोलतात . बिस्वनाथ मजुमदार म्हणतात काळानुसार आमचं लग्न म्हणजे जवाबदाऱ्यांचं ओझं होत गेलं. मी कामात आणि माझ्या बायकोने मुलं , नातवंड आणि टीव्ही वरच्या सिरीयल ह्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. मला ह्या सर्वांपासून सुटका हवी आहे . मग आरतीला जज विचारतात कि तुझ्या नवऱ्याला घटस्फोट हवा आहे ह्यावर तुझं काय मत आहे ? ती म्हणते, आतपर्यंत जे त्यांना हवं मी तेच करत गेले. जर घटस्फोटामुळे त्यांना आनंद वाटणार असेल तर मला तेही मंजूर आहे .

हे ऐकून बिस्वनाथ मजुमदार चिडतात आणि म्हणतात कि हीच खरी अडचण आहे . ही मलाच सर्व गोष्टींसाठी जवाबदार ठरवते . मला ह्या कर्तव्यापासून सुटका हवी आहे . हे सर्व ऐकून जज म्हणतात कि irretrievable ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज हे कारण घटस्फोटासाठी भारतात देता येत नाही . पण तुम्हाला mutual divorce मिळू शकतो . जज त्यांना विचारतो .. कि तुम्हाला आठवतंय का कि तुम्ही दोघं .. फक्त दोघंच कधी बाहेर जेवायला गेला होता ? शेवटचं सकाळी किंवा संध्याकाळी एकत्र कधी चालायला गेला होता? तुम्ही तिला साधा स्पर्श कधी केला होता ? जसेकी तिचा हात हातात घेणं? ह्या वयात असा नुसता स्पर्शही खूप गरजेचा असतो. ह्यावर बिस्वनाथ मजुमदारांकडे उत्तर नसतं . मग तो जज त्या दोघांना म्हणतो कि तुम्ही नवरा बायको पंधरा दिवसांसाठी ट्रिप ला जा . फक्त दोघेच . परतल्यानंतर जर तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर तो मिळेलच पण तुमचं मन बदललं तर तुमच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाला मी स्वतःच स्वतःला आमंत्रित करेन.. पुढे मग हे नवरा बायको दोघेच न जाता सगळ्या कुटुंबाबरोबर बाहेर जातात . त्यांना प्रायव्हर्सी मिळावी म्हणून घरचे काळजी घेतात. नक्की काय कारण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लहान पिढीला खूप असल्यामुळे ते ह्यांच्या रूममध्ये त्यांच्या नकळत कॅमेरा , माईक वगैरे लावून ठेवतात आणि त्याचं संभाषण ऐकतात. इथे चित्रपट आपल्यावर पूर्णतः पकड घेतो.

बिस्वनाथ मजुमदार त्यांच्या बायकोला विचारतात, आपल्या ५० वर्षाच्या लग्नात प्रेम होतं ते किती की फक्त सवय झाली आपली एकमेकांना? लग्नानंतर तू आमच्या घरात आलीस, माझ्या वडिलांची जवाबदारी तू घेतलीस. सगळं घर सांभाळलस. आपल्याला मुलं झाली आणि हळूहळू तू माझ्यापासून दूर जायला लागलीस. आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तू त्यांच्या बरोबरच झोपायला लागलीस. मग असाच काळ सरत गेला. मुलांना मुलं झाली. मग तू मला अजून कमी मिळायला लागलीस. कित्येकदा मी तुझ्या स्पर्शाला आसुसलेला असायचो, तुझ्या सहवासाला आसुसलेला असायचो. पण तो मला मिळायचा नाही. ह्या ५० वर्षाच्या काळात फक्त तू अशी मला कितीकशी मिळालीस? म्हणून मला वाटत की प्रेम नव्हतंच ते… फक्त सवय आणि सवय होती आपली एकमेकांना!
यावर मंद हसून आरती उत्तरते जेव्हा तुम्ही अंघोळीहून आल्यावर तुमचा ओला टॉवेल पलंगावर ठेवता, मी तो ओला टॉवेल तसाच वापरते कारण त्यामधून येणार तुमचा वास मला तुम्ही माझ्या जवळ असल्याचं भासवतो, ही माझी सवय! तुमच्या जेवणातल्या ताटातलं उष्टं अन्न मी फेकून नाही देत , मी ते खाते ही माझी सवय ! आताशा जेव्हा तुम्ही टॉयलेट ला जाता तेव्हा दुर्गंध येतो.. आपल्या सुनेला त्याचा त्रास होतो म्हणून मी प्रत्येक वेळेस बाथरूम साफ करते . तो वासही मला आवडतो . ही देखील माझी सवय ! माझ्यासाठी माझ्या ह्या सर्व सवयी म्हणजेच प्रेम आहे ! आपलेही नकळत अश्रू वाहायला लागतात .

चित्रपटाची पुढची गोष्ट उलगडून सांगण्यात अर्थ नाही कारण तो बघण्यातच खरी मजा आहे . त्यांचं लग्न टिकतं कि नाही , बिस्वनाथ मजुमदार असं का वागतात अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात . नवरा बायकोच्या नात्याचे कित्येक सुंदर पदर ह्या चित्रपटात उलगडून दाखवले आहेत.

मुळात सर्वात बेसिक प्रश्न हाच आहे कि लग्नाला वर्षानुवर्षे झाली तरी नवरा बायको खरंच एकमेकांमध्ये समरसून गेलेली असतात का? बिस्वनाथ यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हवं असलेलं प्रेम त्यांना मिळतंच नाही याउलट आरती मात्र त्यांच्या उष्ट्या अन्नालाही गोड मानून खाते हेच तिच्या लेखी प्रेम! एका सीनमध्ये बिस्वनाथ मजुमदार आरतीला म्हणतात तू माझ्यावर नाही तुझ्या संसारावर प्रेम केलंस. यावर आरती म्हणते, तुम्ही आणि संसार माझ्यासाठी वेगळे नाहीच. सुरवातीला स्वार्थी वाटणाऱ्या बिस्वनाथ मजुमदारांची बाजू नंतर नंतर पटायला लागते. आरतीसाठी जीव थोडा थोडा होतोच पण बिस्वनाथांसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. तसं पाहिलं तर कित्येक संसारामध्ये स्त्री स्वतःला मुलं , घर ह्या भोवती गुरफटून घेते. तेवढंच काय ते तिचं जग बनतं आणि नवरा हा फक्त आपल्या मुलांचा बाबा एवढाच काय तो उरतो. आपण बायको आहोत, प्रेयसी आहोत हे ती विसरूनच जाते. अश्या परिस्थितीत त्या पुरुषाची काय बरं अवस्था होत असेल? पुरुष काय बाईनेही एका वयानंतर मुलांमध्ये फार अडकू नये. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं आणि आपल्या नवऱ्याबरोबर छान आयुष्य जगावं.

लग्न ,संसार ह्यामध्ये मतभेद, अहंकार ह्यांना जागा नसते. संसाराची गाडी नीट चालावी यासाठी एकाला शहाणं, समंजस बनावंच लागतं. दोन्हीही चाकं जर दोन दिशांना चालायला लागली तर अशक्य होऊन जाईल. म्हणूनच एकाला नमतं घ्यावंच लागतं. आणि म्हणुनच प्रेम असणं महत्वाचं ठरतं. भांडणं होतात पण डोकं शांत झालं कि कसलं भांडलो आपण असं म्हणत एकत्र हसायलाही येतं, एकाच्या मनाला जरासं खरचटलं तरी दुसरा लगेचच त्यावर हळुवार फुंकर घालतो, एकाची पडती बाजू दुसरा सांभाळून घेतो, लागतं एकाला तळमळतो दुसरा!आणि मग लग्नाची वर्ष नुसती वाढत नाहीत तर जगणं , प्रेम समृद्ध करतात. लग्न बेडी न वाटता ब्लिस वाटायला लागतं. असा साथीदार असावा जो आयुष्याच्या शेवटापर्यंत तितक्याच प्रेमाने आणि आदराने साथ देईल, ज्याच्या बरोबर घालवलेले वर्षं मिनिटांप्रमाणे भासतील, ज्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून अख्खं आयुष्य सहज जगता येईल, ज्याच्या कुशीत शिरल्यावर सगळी दु;ख , ताण एका क्षणात गायब होतील, ज्याच्या एका हलक्याश्या स्पर्शानेदेखील अंगभर शहारे येतील, ज्याच्याशी तासनतास कुठल्याही विषयावर गप्पा मारता येतील आणि जो कुठल्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही! असा जोडीदार असला की मग लग्नाची वर्ष जशी जशी सरतील तसं तसं प्रेम अधिकाधिक गहिरं होत जाईल मुरलेल्या आंब्याच्या लोणच्यासारखं! नातेसंबंधांचा वेगळ्या छटा अनुभवायच्या असतील तर बेलाशेषे पहा, प्रेमावर आणि लग्नावर विश्वास ठेवण्याची खूप कारणं मिळतील तुम्हाला!

‘बेलाशेषे’ नक्की पाहायचाय ना. करा लगेच क्लिक मग- https://www.youtube.com/watch?v=F1e2om-yhnI 

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

 

हे सुद्धा नक्की वाचा- जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’! http://bit.ly/2VVvmcR

हे सुद्धा नक्की वाचा ‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

हे सुद्धा नक्की वाचा ९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleमोदींची ‘अराजकीय’ मुलाखत!
Next articleकुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.