नशिबवान धोत्रे… संघर्ष आंबेडकर, पटेलांनाच !

(अजिंक्य पवार)
अकोल्यात राजकीय सारीपाटावर जुन्याच सोंगटया 
 भााजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये जळगाव व नगरमध्ये खासदार माघारल्याने त्यांना भाजपाने तिकीट दिले नाही.  याच सर्वेक्षणामध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही समावेश होता. मात्र त्यांना नशिबाने साथ दिली व त्यांना उमेदवारी मिळाली. धोत्रेंचे नशिब हे कवेळ उमेदवारी मिळवण्यापूरतेच नाही तर प्रत्येक वेळी मतविभाजनाचा फायदा त्यांना आपोआप मिळाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. अकोला परिसरात फेरफटका मारला तर तुम्हाला संजुभाऊ नशीब घेऊनच आले असे म्हणणारे सर्व पक्षातील कार्यकर्ते आढळतील. कदाचित त्यामुळेच का होईना पण अकोल्याच्या निवडणुकीत  विकास हा मुद्दाच नाही.
    काँग्रेस, भाजपा व अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर अशीच लढत गेल्या पंधरा वर्षापासून होत असून यावेळी तर २०१४ च्या निवडणुकीचीच झेरॉक्स कॉपी आहे. त्यामुळे निकालही झेरॉक्सच राहिल यात सध्या तरी कोणाला शंका नाही मात्र राजकारणात काहीही होऊ शकते यावर सर्वाचाच विश्वास असल्याने प्रत्येक जण आपला क्रमांक एक होण्यासाठी कामाला लागला आहे. काँग्रेसने हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली. काँगे्सच्या सर्वच नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते की, मुस्लीमेतर समाजाला उमेदवारी द्या. पण नेत्यांनी राज्यात कुठेतरी  एक मुस्लीम उमेदवार द्यायचा म्हणून  म्हणून औरंगाबाद, भिवंडीची चाचपणी केली अन् अखेर अकोल्यात मुस्लीम उमेदवार बसवला.
       पटेल यांची उमेदवारी जाहिर झाल्याबरोबर अकोल्यातील काँग्रेस जणू काही सुतकात गेली असे चित्र होते. कुठेही उमेदवारीचा जल्लोष नव्हता ना स्वागत.  दूसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जय्यत तयारीत असलेल्या भाजपाने हिदायत पटेलांचे नाव येताच सर्व तयारी रद्द करून केवळ पाच ते सहा हजार खर्च करून एक रॅली काढून  व कार्यकर्त्यांना नाश्ता देत अर्ज दाखल केला. (हा खर्च भाजपाचे संजय धोत्रे यांनीच निवडणूक आयोगाला सादर केला आहे) यावरून धोत्रेंच्या गोटात किती बिनधास्त आहे ,हे लक्षात येते. दुसरीकडे  वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरसह अकोला लोकसभा मतदारसंघातुन अर्ज दाखल केल्यामुळे आता त्यांना सोलापूर ते अकोला व्हाया उभा महाराष्ट्र  असा प्रवास निवडणूक होईपर्यंत करावा लागणार असल्याने अकोल्यात त्यांचे लक्ष नाही म्हटले, तरी कमीच असणार आहे .यावेळी अ‍ॅड.आंबेडकर  वंचित बहुजन  आघाडीचा नवा पॅर्टन घेऊन मतदारांना सामोरे जात असल्याने त्यांना आपली व्होट बँक विस्तारल्याचे वाटत आहे.  पण प्रत्यक्षात ते होईल का याबाबत त्यांच्या चाहत्यांनाही शंका आहे . १९८४ पासून अकोल्यात दाखल झालेल्या अ‍ॅड.आंबेडकरांनी आतापर्यंत नऊ लोकसभा निवडणुका लढविल्यात. त्यपैकी  १९९८ व १९९९ या  निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळाला होता. मात्र त्यावेळी साथ काँग्रेसची होती, हे लक्षात घ्यावे लागते .आता ते  पुन्हा काँग्रेसविना मैदानाात आहेत, त्यामुळे अकोल्यात तिरंगी लढत होऊ घातली आहे.
 आंबेडकराचा पराभव हा आतापर्यंत  मतविभाजनामध्ये झाल्याचे दिसून येते. त्यामुळेचे काँग्रेसकडे असलेला मतदार विशेषत: भाजपाकडे न वळणारा मुस्लीम मतदार आंबेडकरांना मिळू नये म्हणून   त्यांची कोंडी करण्यासाठी अकोल्यात मुस्लीम उमेदवार टाकण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. एमआयएमचे ओवेसी यांची एक सभा अकोल्यात लावून मुस्लीम समाजाची मते आपल्याकडे वळवून आंबेडकांरांना गेल्या वेळच्या तिसऱ्या क्रमांकावरून पहिला क्रमांक गाठायचा आहे  ते आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. पण हा मतदारसंघ जुन्याच वळणावर जाईल , असे दिसत आहे . भाजपाचे धोत्रे आपले मताधिक्य टिकविण्याच्या तर पटेल हे आपली आहे ती मते सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना अ‍ॅड.आंबेडकरांचा ‘नवा पॅर्टन’ धोत्रेंच्या नशीबात खोडा घालते की पुन्हा एकदा  धोत्रेंचे नशीब बलवत्तर आहे ,हे कळेलच.
(टीम मीडिया वॉच)
Previous articleधानोरकरांच्या उमेदवारीने चंद्रपूरची लढत रंगतदार
Next articleसुरंगीचे मादक रूप
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.