नागपूरची आगळीवेगळी परंपरा – काळी आणि पिवळी मारबत

नागपूर- दरवर्षी साजरा होणारा ऐतिहासिक मारबत उत्सव यावर्षीही उत्साहात पार पडला. यावेळी ‘घेवून जा गे मारबत, रोगराई घेऊन जा गे’ म्हणत या मारबत उत्सवात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. जुन्या नागपूरातून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काळी मारबत आणि पिवळी मारबत सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरले.
 
बैल पोळ्याच्या दुस-या दिवशी शहरात पारंपारिक पद्धतीने आणि वाजत गाजत चौकाचौकात मिरवणूक काढली जाते. यातही वेगवेगळ्या प्रकारच्या मारबती असतात. त्यातील काळी मारबत आणि पिवळी मारबत प्रसिद्ध आहे. काळ्या मारबतीला १३५ आणि पिवळ्या मारबतीला १३० वर्षाचा इतिहास आहे.
 
‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पूर्वी भोसले घराण्यातील  बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळ्याची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणूक काढण्यात येते आणि नंतर त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.
 बांकाबाईच्या नवर्‍याने या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून त्याचीही तिच्यासोबतच मिरवणुक काढतात. तिच्या नव-याच्या पुतळ्याला ‘बडग्या’ म्हणतात.
 
श्रावण अमावस्येच्या दुस-या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोक नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे, खेळणी व अन्य वस्तु विकतात. या वेळेस पावसाळ्याच्या जोर कमी झालेला असतो. शेतीची कामेही झालेली असतात. त्यामुळे शेतक-यांना एक विरंगुळा मिळतो.
 
इंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परिसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजून भळभळतेच आहे.
Previous articleदोन शतकांचा तान्हा पोळा
Next articleमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.