नागपूरच्या लढतीकडे देशाचे लक्ष

-अजिंक्य पवार
भाजपचे हेवीवेट केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोणालाही उभे करणे म्हणजे बळीचा बकरा बनविणे समजले जाते. परंतु हे आव्हान २०१४च्या भंडारा लोकसभा निवडणुकीत  राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करणारे  नेते  नाना पटोले पटोले यांनी स्वीकारले आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष असणार आहे . गडकरींचा सर्वव्यापी संपर्क आणि त्यांनी नागपूरचा केलेला कायापालट यामुळे गडकरी पराभूत झाल्यास तो चमत्कार घडेल . मात्र नाना पटोले यांनी दलित , मुस्लीम व कुणबी अशी मोट बांधून गडकरींना सहजासहजी विजय मिळवू द्यायचा नाही , अशी योजना आखली आहे . निवडणुकीच्या प्रारंभिक टप्यात तरी पटोले आणि त्यांचे समर्थक उत्साहात आहे . दुसरीकडे गडकरी  आपल्या मताधिक्यात यावेळी विक्रमी वाढ होईल , असे सांगत आहे .  असे असले तरी ते बेफिकीर मात्र नाहीत . ते आणि त्यांची टीम मायक्रो प्लानिंग करून प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची आखणी करत आहेत
      नागपुरात काँग्रेसमधील गटबाजीवर उपाय म्हणून नाना पटोले यांना मैदानात उतरविण्यात आलेले आहे. त्यांचा स्वभाव संघर्षशील आहे. त्यांनी २०१४  मध्ये  भंडाऱ्यात जो चमत्कार घडविला होता ती बाब आणि पटोलेंची जात लक्षात घेवून  काँग्रेसने त्यांचा पत्ता फेकला आहे . नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे कुणबी -मराठा असल्याचे सांगितले जाते .  ही संख्या लक्षात घेऊन काँग्रेसने नागपुरात कुणबी कार्डचा वापर केला आहे. पटोले यांची उमेदवारी जाहीर होताच नागपूरमध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सर्व शाखीय कुणबी समाज महामेळावा घेण्यात आला. त्यात कुणबी मतदारांना एकजुटीने पटोले यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले .  कुणबीपाठोपाठ नागपुरात  बौद्ध,  तेली, व मुस्लीम  मतदारांची संख्या निर्णायक आहे . या सर्व घटकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत . त्यामुळेच बाहेरील राजकीय जाणकार समजतात तशी नागपूरची लढाई एकतर्फी होण्याची शक्यता नाही, असे स्थानिक पत्रकार सांगतात .बौद्ध समाजाला  पटोलेंविरोधात चिथाविण्याकरिता खैरलांजी प्रकरणात नाना पटोलेंनी आरोपींना सहकार्य करण्याचा मुद्दा काही वेळेपुरता चर्चेत आणण्यात आला होता. मात्र त्याचा अजिबात  प्रभाव पडला नाही. . स्थानिक दलित नेते पटोलेंसाठी  मैदानात उतरले आहेत.  कुणबी ,दलित व मुस्लीम मतांचे एकत्रिकरण करण्याचा पुरोगामी मंडळींचा प्रयत्न आहे .
     मात्र गडकरी यांना पराभूत करणे सोपे नाही याची जाणीव सगळ्यांनाच आहे .गेल्या पाच गडकरी यांनी खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून  अब्जावधी रूपयांचा निधी नागपूरसाठी खेचून आणला आहे. जे आजपर्यंत घडले नव्हते, ती सर्व कामे नागपुरात सुरू आहेत, नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होत आहे . गडकरींसाठी ही सर्वात मोठी  जमेची बाजू आहे. मात्र आपल्याकडे केवळ विकास कामांवर निवडणुका जिंकल्या जात नाही , याचीही त्यांना जाणीव आहे . त्यामुळे कामे करताना सर्व जाती -धर्मात त्यांनी आपले मित्र , सहानुभूतीदार तयार केले आहे  पाच वर्षांत त्यांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग आश्चर्यचकीत करणारे आहे. क्रीडा मंडळे, देवी-देवतांची  मंदिरे, बुद्ध विहारे, दोन्ही ताजबाग, विविध सामाजिक , सांस्कृतिक धार्मिक संस्थांना  कुठलाही भेदभाव न करता त्यांनी भरघोस मदत केली आहे . नागपुरातील गडकरींच्या बंगल्यावर  आढळणारी दलित व मुस्लीम जनता व कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती अनेकांना चकित करून जाते .
  गडकरी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहोत, हे अभिमानाने सांगत असले तरी त्यांनी येथे कधीही जातीय राजकारण केले नाही , ही गोष्ट कबूल करावी लागते .  २०१४ मध्ये देशात मोदींची लाट असताना आणि हिंदुत्वाचे राजकारण जोरात असताना गडकरींनी त्या वातावरणाचा वारा नागपूरला लागणार नाही याची त्यांच्या परीने काळजी घेतली . नागपुरातील सामाजिक समीकरण गडकरींना व्यवस्थित माहीत आहे . त्यामुळे अतिरेकी हिंदुत्व येथे महागात पडू शकते , हे ते समजून आहेत . नागपूरच्या विरोधी पक्षातही गडकरींनी आपले पॉकेट्स तयार केले आहेत . काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना , बसपा साऱ्याच पक्षांत गडकरींची माणसं आहेत . वैयक्तिक कामे करताना राजकीय पक्ष, विचारधारा ,जात – धर्म या गोष्टींचा विचार गडकरी करत नसल्याने सर्व पक्षात – संघटनांत त्यांचे चाहते आहेत . हे सगळं असताना आपला मूळ आधार कमजोर पडणार नाही , याकडेही त्त्यांनी लक्ष पुरविले . जनसंघ-भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे , त्यांची कामे करणे , परिवारातील मंडळींसोबत सोबत ऋणानुबंध जपणे याकडेही त्यांची टीम लक्ष ठेवून असते . यामुळे गडकरींना कार्यकर्त्यांची अजिबात कमी नाही . नागपूरच्या प्रत्येक वस्तीत त्यांची माणस आढळतात .
   संघटनात्मक पातळीवर काँग्रेस नागपुरात भाजप वा गडकरींची कुठेच बरोबरी करू शकत नाही . त्यामुळे उत्साह जोरात असला तरी नाना पटोलेंना मेहनत भरपूर घ्यावी लागणार आहे . कॉंग्रेसचे दिवस वाईट असले तरी कार्यकर्त्यांची आपसातील गटबाजी व जुन्या सवयी कायम आहेत . पैसे मिळाल्याशिवाय कार्यकर्ते बाहेर पडत नाही . अशा परिस्थितीत पटोलेंची भिस्त कुणबी -दलित -मुस्लीम- आदिवासी  या समीकरणावर आहे . हे  घटक एकत्रित येवून चमत्कार घडवतील अशी आशा त्यांचे समर्थकांना आहे . सोशल इंजिनिअरिंग  कामी येते की जात -धर्माची अस्मिता चमत्कार घडवून आणते याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे .
(टीम मीडिया वॉच)
Previous articleदारिद्र्याच्या शोधयात्रेत चालताना ………..
Next articleभावनाताई व माणिकरावांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.