नाझी समर्थक महिलांचे क्रौर्य…

-राज कुलकर्णी

मानव आणि क्रौर्य ,याचा संबंध तसा प्रगैहातिसिक काळापासून आहे. त्यामुळे आजही मानसात क्रौर्य आहेच! मानवात लिंगभेद चुकीचा तसा क्रौर्यातही लिंगभेद गैरच! पुरूषांबरोबर महिलांतही क्रौर्य असते! प्रमाण कमी अधिक असू शकेल! पण सोशल मेडियात महिलाही एकमेकींचे अत्यंत गलिच्छ शब्दांत चारित्र्यहनन करताना किंवा शिवीगाळ करताना दिसून येतात. अर्थात हा त्यांचा दोष नव्हे कारण पुरूषसत्ताक व्यवस्थेतील त्याही एक व्यवस्था समर्थक घटक असतात!

भारतात प्रागतिक पत्रकार गौरी लंकेशची हत्या झाल्यावर त्यावर उन्माद,आनंद व्यक्त करणा-यामध्ये महिलांचे प्रमाण उल्लेखनीय होते! मानवी षडरिपुपीसून महिलाही अलिप्त नाहीत, कारण त्याही मानव आहेत. त्यातून कधी कधी काही महिला विशिष्ट जातीच्या वा धर्माच्या महिलांवर होणारे अत्याचाराचे , अगदी बलात्काराचे समर्थन करताना आढळून येतात!

आपल्याला जी विचारधारा आवडत नाही,त्या विचारधारेच्या लोकांच्या कत्तली करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलाही त्यांच्या सोशल मीडियातील कॉमेंटस् व लेखातून दिसून येतात. ही हिंसा, हे क्रौर्य, काहीचे केवळ शाब्दिक अभिव्यक्ती पुरती मर्यादित राहते, आणि हे क्रौर्य प्रत्यक्षात करायला मिळण्याचा विकृत आनंद सर्वांना मिळत नाही. मात्र जर्मनीच्या इतिहासात अनेक कट्टर धार्मिक आणि अत्यंत क्रूर आणि विकृत महिलांना परपीडणाचा आनंद प्रत्यक्ष स्वरुपात मिळण्याची सोय हिटलरने केली होती !

हिटलरची जर्मन महिलांवर जबरदस्त मोहिनी होती. हिटलरवरून जीव ओवाळून टाकायला अशा अल्पबुद्धी महिला कमबुद्धी जर्मन पुरूषांप्रमाणे सज्ज होत्या! त्यात कांही फक्त अल्पशिक्षित होत्या असे नव्हे तर अत्यंत सुशिक्षित देखील होत्या. ज्यू द्वेष, हा त्यांना ‘हिरोईझम’ वाटत असे. ज्यूंच्या कत्तलींचा त्यांनाही आनंद होत असे! अगदी ज्यांना मुलेबाळे आहेत अशा जर्मन स्त्रिया देखील ज्यूंच्या लहान मुलांचा ,त्यांच्या आईचा क्रूर अंत होताना आनंदून जात असत.

इरमा ग्रीस नावाची एक महिला नाझी अधिकारी पुरुषाला लाजवेल असा ज्यूद्वेष मनात बाळगून होती! ती अल्पशिक्षित होती मात्र तिची वयाच्या १९ व्या वर्षी गार्ड म्हणून आउशवित्झ छळछावणीत १९४३ साली नियुक्ती झाली. बढती मिळण्याचा एकमेव आधार म्हणजे सर्वात जास्त ज्यूंचा जो छळ करेल तो कार्यक्षम अधिकारी ! मग यातून लवकरच ती सुपरवायझर पदापर्यंत पोचली. तीस हजार हंगेरियन आणि पोलिश ज्यू स्त्रियांना मारण्याचे जर्मन राष्ट्रकार्य तिच्यावर सोपवले गेले होते. इतक्या लहान वयात मिळालेला हा परवाना म्हणजे तिच्या जहरी आनंदाची इच्छापूर्तीच होती. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत विविध शक्कली काढून हतबल ज्यू स्त्रियांना छळणे आणि त्याचा आनंद घेणे हा तिचा रोजचा शिरस्ता होता.

इरमा शिकारी कुत्री सोबत घेवून निघायची . ती त्यांना उपाशी ठेवत असे. छावणीत तान्ह्या मुलाला घेवून बसलेल्या स्त्रीला ती लाथेने धुडकावून लावत असे. कोणी मदतीला आले तर त्यांच्या अंगावर ती ही भुकेले कुत्रे सोडायची. मानवी मांसाला चटावलेले भुकेले कुत्रे आणि आधीच अर्धमेल्या झालेल्या ज्यू स्त्रिया ! कांही मिनिटात ती कुत्रे केवळ स्त्रीचा सांगाडा शिल्लक ठेवत असत.

इरमा हिला मानवी कातड्यापासून टेबल लॅंम्प्स करण्याचा छंद जडला होता! एखाद्या सुंदर ज्यू स्त्रीची कातडी तिला टेबल लँपसाठी आवडली की, ती तिची कातडी सोलून मारत असे. तिने एकदा एका ज्यू स्त्रीच्या शरीरावर एक ‘टॅटू’ पहिला आणि तीला तो खूप आवडला. तिने अशा ‘टॅटू’वाल्या ज्यू स्त्रीया एकत्र केल्या आणि स्वतःच्या घरातील लँप शेड साठी त्यांना कातडी सोलून ठार मारून टाकले ! त्या ज्यू स्त्रीयांना मारायचीच जवाबदारी आहे म्हटल्यावर, आनंद घेत घेत मारायला काय हरकत आहे, असा तिचा विचार असावा !

जुवाना बोर्मन देखील अशीच एक अधिकारी ! जंगली कुत्री घेवून तीही छावणीत फिरायची आणि ज्यू स्त्रियांना मारण्यासाठी त्यांचा वापर करायची. विशेष म्हणजे तिला कुत्र्यांनी स्त्रियांना फाडताना पाहायला खूप आवडायचे !

मारिया मंडेल नावाची प्रचंड राष्ट्रभक्त अशी नाझी महिला अधिकारी! तिला शास्त्रीय संगीताची आवड होती. छळ छावणीतील ज्या स्त्रियांना नाचता अथवा गाता येत असे अशांना ती मुद्दाम ,कोणाला तरी ठार मारल्यावर आनंदाने गाणे म्हणायला किंवा नाचायला लावत असे! ज्यू स्त्रियांवर ती सतत अघोरी प्रयोग करत असे ! ज्यू स्त्रीयांना मारायचे तर होतेच पण या कामात ती जॉब सॅटिशफँक्सन शोधत आनंदाने काम करायची!

डॉ. हेर्टा ओबेरहेझूर ही नाझी महिला अधिकारी प्रयोगशील संशोधक होती. तिने अनेक प्रयोग लहान तान्ह्या ज्यू मुलांवर केले! अनेक मुलांना भूल न देता तिने त्यांचे अवयव नि कातडी काढली! पाच मिनीटाला एक तान्हे मुल मारणे असा तिचा वेग होता. या मुलांना आणखी कशा यातना देता येईल यावर ती सतत चिंतन आणि संशोधन करत असे.

इरमा ,जुआना, हेर्टा, मारीया, डॉ.हेर्टा ओबेरहेझुर या ज्यू द्वेषाने मनोरूग्ण झाल्या होत्या! विकृत आनंद घेऊन जीवनाचे इतिकर्तव्य पार पाडल्यामुऴे त्यांना जेव्हा मृत्यूदंड मिळाला तेव्हा त्यातील अनेक जणी रडत, पडत, आक्रोश करता फासावर गेल्या!

इल्स कोच नावाची एक महिला नाझी अधिकारी! हिंस्त्र पशू अशीच तिची ओळख बुचेनवाल्ड छळ छावणीत होती. तिला ज्यूंना मारून त्यांच्या कात़डीपासून पुस्तकांचे वेष्टन बनविण्याचा नाद होता! तिला  मेलेल्या ज्यूंच्या कवट्या दिवाणखाण्यात ठेवण्यात खूप आनंद मिळायचा! ज्यू स्त्रीयांची कातडी सोलून ठार मारून त्या कातडीपासून बनवलेल्या पर्स ती दिमाखात मिरवायची! विशेष म्हणजे अशा पर्स तिच्या कडे आहेत याचा तिला  प्रचंड अभिमान होता.

अशा छळ छावणीच्याभोवती, खरे म्हणजे ज्यू सैनिकाचाच पहारा असायचा पण त्यांना आत काय चालले आहे, याची माहितीच नसायची! ही अवस्था आउशवित्झ, बुचेनवाल्ड, डाखाउ या सर्च छळ छावण्यांची होती!

सर्वच जर्मन महिला अशा होत्या असे नव्हे, पण क्रौर्याला शौर्य मानून आपण गौरवास्पद राष्ट्रकार्य करत आहोत असे समजणा-या शुर राष्ट्रभक्त महिला  युद्ध समाप्तीनंतर केविलवाण्या होत ढसढसा रडत फासावर गेल्या! यातील अनेकींनी असे सांगीतले की आम्ही ते केले नसते तर आमचीही तिच अवस्था हिटलरने केली असती!

नाझी आणि फँसिस्ट विचारांच्या महिलांची संख्या जगातील अनेक देशात वाढत आहे! ज्या देशात हे घडत आहे, त्या देशातील त्या सर्वांनी याचा विचार करावा अशी अपरिहार्य स्थिती आज मानवजातीसमोर निर्माण झाली आहे!

 

टीप- हा लेख भारतीय महिलांबाबत नसून पूर्व जर्मनीतील नाझी विचारांच्या महिलांबाबत आहे!

(हा लेख कुमार नवाथे यांच्या ‘नाझी नरसंहार आउशवित्झ छळ छावणी’ या ग्रंथालीने प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील माहितीवर आधारित आहे)

(लेखक अभ्यासक व वक्ते आहेत)

Previous articleमी आणि गांधीजी
Next articleबाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.