नाफेरवादी नेहरू

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ८

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

गांधीजींच्या दीर्घकालीन शिक्षेचा परिणाम हा की तिने काँग्रेसमध्येच दोन भिन्न तट पाडले. एक त्यांच्या असहकाराच्या चळवळीच्या बाजूचा आणि सरकारशी कोणत्याही तर्‍हेचे सहकार्य न करण्याची भूमिका घेणारा तर दुसरा येणार्‍या निवडणुकीत भाग घेऊन विधीमंडळे ताब्यात घेऊ इच्छिणार्‍यांचा. पहिला नाफेरवादी तर दुसरा फेरवादी म्हणून ओळखला जाणारा. नाफेरवाद्यांचे नेतृत्व राजगोपालाचारी यांच्याकडे तर फेरवाद्यांचे मोतीलालजी आणि देशबंधू दास यांच्याकडे होते. जवाहरलाल मात्र आपल्या वडिलांच्या विरुद्ध अहकाराच्या बाजूने व नाफेरवाद्यांच्या गटात होते.

फेरवाद्यांची बाजू ही की स्वातंत्र्यांचा लढा विधिमंडळाच्या कक्षेतही लढविता येईल व त्या व्यासपीठावर त्या लढ्याला अधिक मोठी प्रसिद्धी व मान्यताही मिळेल. शिवाय त्याला कायदेशीर अर्थाने राष्ट्रीय स्वरूप येईल. विधिमंडळातील पदे आम्ही स्वत:साठी वा आमच्या स्वार्थासाठी घेणार नसून स्वदेशाच्या लढ्यासाठी घेत आहोत. ही पदे त्या लढ्याच्या मार्गात येताना जेव्हा दिसतील तेव्हा आम्ही ती तात्काळ सोडू. या फेरवाद्यांच्या बाजूला वल्लभभाई पटेलांचे वडीलबंधू बॅरि. विठ्ठलभाई पटेल येऊन मिळाल्याने ती आणखी भक्कम झाली. वल्लभभाई मात्र नेहरूंसारखे नाफेरवाद्यांच्या बाजूने राहिले. नाफेरवाद्यांचे म्हणणे असे की निवडणुकीतील सहभागामुळे  देशाचे स्वातंत्र्याच्या लढ्यावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होईल. सत्तेची पदे मिळविण्याच्या आकांक्षेने लोक पछाडले जातील वा आपला लढा केवळ सत्तेसाठी आहे अशी वृत्ती पक्षात निर्माण होईल.

नेहरूंनी त्यावर मध्यम मार्ग काढला. त्यांच्या मते काँग्रेसने निवडणूक लढवावी, ती जिंकावी पण सत्तेची पदे मात्र स्वीकारू नयेत. गांधींना हा पर्याय मान्य नव्हता. त्यामुळे जनतेत जास्तीचा गोंधळ माजेल व आपल्या उद्दिष्टांविषयी संशय निर्माण होईल असे त्यांचे म्हणणे होते. हा वाद बराच चालला व अखेर मौलाना आझादांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या विशेष सभेत त्यावर तोडगा शोधला गेला. काँग्रेसने फेरवाद्यांना वेगळ्या नावावर निवडणूक लढविण्याची परवानगी दिली. परिणामी मोतीलालजी व दास यांनी स्वराज्य पक्ष हे नाव घेऊन निवडणुका लढवण्याचे ठरविले. यावेळी देशबंधू दास यांनी जवाहरलालांचे मन वळविण्याचा व त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला. पण नेहरूंनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.

हा काळ नेहरूंसाठीही निराशेचा होता. देशात आंदोलने होत होती. नागपुरात मोठा झेंडा सत्याग्रह होऊन त्यात हजारोंना अटक झाली होती. अमृतसरमधील गुरूंच्या अत्याचारांविरुद्ध तेथील शिखांनी शांततामय आंदोलन चालविले होते. त्यावर पोलिसांनी केलेला निर्दय लाठीमार शांततामय निदर्शकांनी मुकाट्याने सहन केला होता. आपले आंदोलन पाहायला त्यांनी नेहरूंना बोलावले, तेव्हा ते तेथे गेलेही. मात्र जाताच त्यांच्यावर स्थानबद्धतेचा हुकूम बजावला गेला.

त्याचवेळी पंजाबातल्या नभा या संस्थानाच्या राजप्रमुखाला इंग्रजांनी बाजूला हटवून त्याच्या गादीवर आपला प्रशासक बसविला. त्याविरुद्ध तिथल्या जनतेने केलेले आंदोलन बघायला नेहरू गेले. मात्र नभाच्या पोलिसांनी त्यांना अटक करून व त्यांच्या हातात बेड्या घालून स्थानिक पोलीस ठाण्यात नेऊन बंद केले. हा सारा प्रकार काही आठवडे चालला. त्यात नेहरूंना त्यांच्या सहकार्‍यांसह दीड वर्षांची शिक्षा झाली. मात्र ते जेलपर्यंत पोहचण्याआधीच सरकारने त्यांच्या मुक्ततेचा आदेश काढला. नंतरचा काही काळ अलाहाबादेत व कुटुंबाच्या सहवासात घालवीत असताना त्यांना आपण गमावलेले व गमवीत असलेले घरचे आयुष्य प्रथम जाणवले. आपण आपल्या पत्नीला अजून नीट ओळखले नाही. स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याची व नेहरू कुटुंबाची खरी सून म्हणून आपली ओळख पटवून देण्याची तिची धडपडही आपण लक्षात घेतली नाही. आईच्या बिघडत जाणार्‍या तब्येतीकडेही आपण लक्ष पुरवू शकलो नाही अशा असंख्य विचारांनी ते या काळात फार हळवे झाले… मात्र याच काळात त्यांनी अहमदाबाद नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली. तीत ते प्रचंड बहुमताने निवडून आले. या काळात देशबंधू दास (कलकत्ता), बॅरि. विठ्ठलभाई पटेल (मुंबई), बॅरि. वल्लभभाई पटेल (अलाहाबाद), चक्रवर्ती राजगोपालाचारी (मद्रास) आणि डॉ. राजेंद्रप्रसाद (पाटणा) हेही नगरपरिषदांचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

अध्यक्षपदी निवडून येताच नेहरूंनी अधिकारी व सभासदांची एक बैठक बोलावली. तीत ते म्हणाले ‘मी येथे सत्तापदासाठी आलो नाही, सेवेसाठी आलो आहे. हे शहर तात्काळ स्वच्छ व येथील प्रशासन लगेचच गतिमान होणे गरजेचे आहे. स्वराज्याची हाक येताच मी माझे पद सोडून देईन हेही लक्षात घ्या.’ हा काळ नेहरूंना प्रशासनाची कार्यपद्धती समजावून देणाराही होता. तथापि नेहरूंच्या  या कारकिर्दीवर केलेल्या अभिप्रायाची चार्ली अँड्र्यूज या पत्रकाराने केलेली नोंद अशी- ‘नेहरूंच्या समाजावादाविषयीची आपली मते कशीही असोत, मात्र या म्युनिसिपालटीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे.’ याच सुमारास नेहरू अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडले गेले. परिणामी दरदिवसाचे त्यांचे काम पंधरा तासांएवढे वाढले.

डिसेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांच्या निवडणुकीत मोतीलालजी व दास यांच्या नेतृत्वातील स्वराज्य पक्षाने (अर्थातच काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर) प्रचंड विजय मिळविला. केंद्रात त्याचे ४५ सभासद निवडून आले व सहयोगी पक्षांच्या मदतीने त्यात पूर्ण बहुमत मिळवून त्याच्या अध्यक्षपदी बॅरि. विठ्ठलभाई पटेल यांची निवड झाली. या सभागृहाला अधिकार मात्र फार थोडे व तेही मार्गदर्शनाच्या पातळीवरचे होते. खरी सत्ता गव्हर्नर जनरलच्या हाती होती. मात्र या निवडणुकीने मोतीलालजी व दास या दोन्ही नामांकित वकिलांची मैत्री आणखी घट्ट केली. दास हे कमालीचे परिणामकारक व शैलीदार वक्ते होते आणि त्यांची देशभक्ती संशयातीत होती.  त्यांच्यात संघटनकौशल्याएवढीच प्रचाराचीही चांगली जाण होती. त्या निवडणुकीनंतर दक्षिणेत काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाने नेहरूंची सरचिटणीस पदावरची निवड कायम केली. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली व नेहरूंचे मैत्र चांगले होते. त्यांच्यात धार्मिक प्रश्नावर कडाक्याचे वाद होत. मौलाना धर्मनिष्ठ तर नेहरू वृत्तीनेच सेक्युलर होते. मात्र त्यांचा स्नेह अतूट होता. नेहरू म्हणायचे मोहम्मद अलींची धार्मिकता कमालीची कडवी तर गांधीजींची तेवढीच नम्र आहे. मात्र या दोघांचेही धार्मिक असणे सारखेच अतार्किकही आहे.’

नेहरूंच्या धार्मिकतेबाबतची एक घटना येथे नोंदविण्याजोगी. सेवाग्राममधील एक बैठक आटोपून परतताना त्यांनी बापूंचा जड अंत:करणाने निरोप घेतला. तेथे हजर असलेल्या बांनाही त्यांनी हात जोडले. त्यावर बा सहजपणे म्हणाल्या, ‘परमेश्वर तुमचे कल्याण करील’… त्यावर पाठ वळवून नेहरू हळू आवाजात म्हणाले, ‘पण बा, हा परमेश्वर आहे कुठे आणि असलाही तर तो गाढ झोपलेलाच असला पाहिजे.’ त्यांच्या उद्गारांवर बा काहीशा विचलित झाल्या. त्यांची समजूत काढीत गांधीजी म्हणाले ‘जवाहर स्वत:ला कितीही निरीश्वरवादी समजत असला तरी ईश्वराची उपासना करणार्‍या अनेकांहून तो परमेश्वराच्या अधिक जवळचा आहे.’ माणसात ईश्वर पाहता येणार्‍याला माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा वाटते आणि एखाद्याला ती तशी वाटत नसली तरी जगाच्या लेखी ती ईश्वर सेवाच असते. मोहम्मद अली एकदा त्यांना म्हणाले, ‘तुम्ही काही म्हटले तरी तुम्ही मनातून धर्मश्रद्धच आहात.’ त्यावर नेहरूंच्या मनात आलेला प्रश्न होता, ‘मग धर्म काय आणि धार्मिक असणे म्हणजे तरी काय?’ गांधीजींच्या मते नेहरूंची ईश्वर सेवा ही त्यांच्या लोकसेवेत परिवर्तित झाली होती.

१९२२ मध्ये केमाल पाशाने तुर्की खिलाफत रद्द केली आणि देशातील मुसलमानांना काँग्रेसविषयी वाटणारा ओढा संपला. स्वाभाविकच हिंदू-मुस्लिम ऐक्यही मंदावले. हिंदू महासभेच्या लोकांनी या काळात बनारसमध्ये एक इस्लामविरोधी मोहीमही काढली. पण ती फार काळ चालली नाही. १९२४ च्या फेब्रुवारीत गांधीजींना अपेंडिसायटीसच्या ऑपरेशनसाठी पुण्याच्या इस्पितळात हलविले गेले. डॉक्टर मुर्डाक या ब्रिटीश लष्करी सर्जनने ही शस्त्रक्रिया केली. यावेळी नेहरू मोतीलालजींसह त्यांना भेटायला पुण्याला आले. याचवेळी ब्रिटीशांनी गांधीजींना झालेली पूर्वीची सहा वर्षांची शिक्षा माफ केली. तोवर त्यांनी दोन वर्षे तुरुंगात घालविली होती. मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा ‘यंग इंडिया’ आणि ‘नवजीवन’ या पत्रांचे संपादन हाती घेतले. ‘माझी देशभक्ती माझ्यापुरती वा भारतापुरती राखीव नाही, ती कोणाच्या विरोधात नाही, ती जगाच्या स्वातंत्र्याचे लक्ष्य समोर राखणारी आहे. माझा अहिंसेचा आग्रहही त्याचसाठी आहे’ असे यावेळी ते म्हणाले.

याच सुमारास मोतीलालजी व देशबंधू दास मुंबईला आले. त्यांची व गांधीजींची विधिमंडळातील प्रवेशाबाबत यावेळी झालेली चर्चा मतभेदातच संपली. तेव्हा काहीसे नाराज झालेले मोतीलालजी म्हणाले, ‘ठीक आहे. आपण या मतभेदावरच मतैक्य करू’. मोतीलालजींचा आत्मविश्वास प्रसंगी अहंकाराच्या पातळीवर पोचणारा होता. आपली भूमिका व आपले निर्णय यांच्या अचूकपणाविषयी त्यांची नेहमीच खात्री असायची आणि दुसर्‍या कोणासाठीही, अगदी गांधीजींसाठीही ते त्यात बदल करायला तयार नसायचे. गांधींविषयीचा आदर होता पण त्याचवेळी त्यांचा स्वत:विषयीचा आत्मविश्वासही जबर होता. गांधीजींची भेट होण्याआधी मोतीलालजी मिशा राखायचे नाहीत. पुढे एक दिवस नेहरूंनी गांधीजींना त्यांचा मिशा वाढवायला लागण्याआधीचा फोटो दाखविला. त्यातले त्यांच्या चर्येवरचे आत्मविश्वासदर्शक कडवेपण, ओठांची ठाम ठेवण आणि उंच उचललेली हनुवटी गांधींनी पाहिली आणि ते नेहरूंना हसून म्हणाले, ‘हा माणूस एवढा ताठ का आहे आणि मला केवढ्या महत्त्वाकांक्षी माणसाशी लढावे लागत आहे हे या फोटोने मला समजावले आहे.’

नेहरू मात्र या मतभेदाने आणि पक्ष व देश यात त्यांनी निर्माण केलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाने कमालीचे वैतागले व बरेच दिवस त्या सार्‍यापासून दूर होत आनंद भवनात विश्रांतीला गेले. पण याच काळात कमला नेहरूंच्या तब्येतीने उचल खाल्ली. त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन ते डेहरादूनला गेले. यावेळी मोतीलालजी, स्वरूपराणी, विजयालक्ष्मी, रणजीत पंडित आणि नेहरूंची धाकटी बहीण कृष्णाही त्यांच्यासोबत होती. मात्र तेथेही कमला नेहरूंच्या प्रकृतीला आराम पडत नसल्याचे दिसून येताच डॉ. एम. ए. अन्सारी या मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांना युरोपात, स्वित्झर्लंडमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी सारे नेहरू कुटुंबच युरोपात गेले.

दरम्यान डेहरादूनला असताना, दार्जिलिंगमध्ये देशबंधू दास यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. मोतीलालजींचा खंदा समर्थक व मित्र हरवला होता. देशबंधूंच्या निधनाने मोतीलालजी मनाने खचल्यागत झाले. त्याच स्थितीत ते नेहरूंसोबत विदेशात गेले. देशबंधूंचे निधन सार्‍या देशानेही अतिशय दु:खद अंत:करणाने स्वीकारले.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

Previous article९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट
Next articleमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक… 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.