नेमका खिळा शोधला पाहिजे!

थकवा असा सहज येत नाही. त्याचं कर्जासारखं आहे. कर्ज घेणं गैर नाही, पण ते वेळेवर फेडावं लागतं, नाहीतर माणूस त्या व्याजातच बुडतो आणि कर्जबाजारी होतो. थकव्यातही तसंच घडतं. शरीराचा, मनाचा, बुद्धिमत्तेचा वापर आपण करतो, तिला वेळच्या वेळी पोषण दिलं, विश्रांती दिली, उत्तम विसावा दिला तर तिची झीज भरून निघते. जर ते केलं नाही तर थकवा जात नाहीच, उलट वाढतच जातो.

‘थकवा येणं’ बंद करता येणार नाही. पण, ज्यांची शारीरिक,मानसिक क्षमता उत्तम आहे, अशांना थकव्याचा प्रतिकार करता येतो. पण आजकाल असं दिसतं की, आपण ही क्षमताच वाढवत नाही. योग्य आहार-योग्य विहार आणि योग्य व्यायाम यापासून आपल्यापैकी अनेकजण शेकडो मैल लांब आहेत. सुधारणा होणार कशी?

अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जायला नको. पण, साधारण २५ वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवई वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट किंवा चटण्या मिक्सरमध्ये होत नसत. खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. हाॅटेलात जाऊन जेवणं किंवा ऊठसूठ बाहेरचं खाणं हे उडाणटप्पूपणाचं लक्षण समजलं जात होतं. त्यामुळे, खाण्या-पिण्याची तंत्रं टिकून होती.

गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. आमटीची कढई लोखंडाची असायची. डायनिंग टेबलाची पद्धत नव्हती. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. काट्या-चमच्यानं जेवत नसत. जवळपास घरोघरी दुधदुभतं भरपूर होतं. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. बेकरीच्या पदार्थांना स्वयंपाकघरात मज्जाव होता. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चार-चार दिवसांचं शिळं अन्न घरात ठेवण्याची रित नव्हती. पण आता घरोघरी फ्रिज ओसंडून वाहत असतात.

मेतकूट-तिखट लावलेला कच्चा चिवडा, कच्चे किंवा भाजके शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. अक्षय्यतृतीयेच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावू देत नसत आणि पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. गुळांबा आणि साखरांबा हे पदार्थ घरी केलेत असं तर मी गेल्या १५ वर्षांमध्ये पाहिलंच काय, ऐकलंसुद्धा नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?

सातवी-आठवीत शिकणाऱ्या मुला-मुलींना काकवी माहित नाही. गव्हाचा चिक माहित नाही. उडदाच्या पापडलाट्या माहित नाहीत. घरात केचप, साॅस, जॅम, मेयाॅनीज, नटेला च्या बाटल्या असतात, पण मधाची बाटली नसते. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात केलेला भात आताच्या शाळकरी मुलांना माहितच नाही. दर गुरूवार किंवा शनिवारचा नारळ घरात आला की खोबऱ्याच्या वड्या व्हायच्याच. डबाभरून केल्या तरी चार दिवसांत संपायच्या. मग पुन्हा नवीन करायच्या. हाळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असायचे. आता मुलांच्या आहारातून हे पदार्थच गायब झालेत. एकूण कुटुंबातूनच या पदार्थांना गायब करण्यात आलंय. मुंजीतले भिक्षावळीचे लाडू अतिशय पौष्टिक असतात, आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा भिक्षावळीतल्या साडीलाच महत्व आलंय.

वाॅशिंग मशीन्स नव्हती, कपडे हातानंच घासावे लागत,धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. आता मात्र ही सवय नामशेष होत चालली आहे.
माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेत पायी चालत जायचं आणि यायचं, हा शिरस्ता होता. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, मुंज झाल्यावर दररोज संध्या करावीच लागे आणि तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी तर अनिवार्य होतं. शक्यतो कुणीच परान्न घेत नसत. प्रवासातही घरची शिदोरी सोबत असायची.

शालेय वयातल्या मुलांचे थकव्याचे प्रश्न तर गंभीर आहेत. पण त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातली बहुतांश कारणं राहणीमानाशीच संबंधित आहेत. स्वच्छ, सुती आणि सैलसर कपडे वापरणाऱ्या व्यक्ती पहा आणि तंग, चित्रविचित्र रंगाचे,भडक कपडे घालणाऱ्या व्यक्ती पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सूज्ञांच्या लगेच लक्षात येईल. आता तर शाळांचे गणवेशही चित्रविचित्र रंगांचे आणि मळखाऊ असतात, त्या रंगांमध्ये उत्साही वाटणार तरी कसं?
रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं व्हायचं. अगदी पावसातही !

रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. रात्रभर जागरणं करण्याची परवानगी नव्हती. जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. पण, जेवण स्वयंपाकघरातच असायचं. टीव्ही बघत खायची पद्धत नव्हती. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत !

या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आताइतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती. पण, त्यामुळं थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा” हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं. आपली आयुष्यं नुसती धावपळ करण्यातच जातायत..! अतिशय मोठ्या महत्वाकांक्षांपासून माणसं स्वत:ला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवायची. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं.

लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. त्यामुळं, टार्गेट्स चा ससेमिरा नव्हता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर यायचा. पण, प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, थकवा तर येणारच !

आपल्या हातून घडत असलेल्या , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक चुका यात नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या थकव्याविषयी आणखी सविस्तरपणे निश्चितच बोलू शकू, चर्चा करू शकू.

©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Previous articleगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’!
Next articleजाणतो मराठी, मानतो मराठी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.