नेमाडे – कसबे वाद आणि आपण वाचक

– प्रा.हरी नरके

साहित्यिक वाद महाराष्ट्राला नवे नाहीत. त्यातून वैचारिक-साहित्यिक मंथन व्हावे अशी अपेक्षा असते. वादविवाद आणि चि कित्सा यातून विचार घासून पुसून घेतले जातात. त्यात वार आणि प्रहार असले तरी त्याला एक वैचारिक-वाड्मयीन दर्जा असतो. आपसातले मतभेद मांडायलाच हवेत.

साहित्यकृतीच्या सामर्थ्य आणि मर्यादा यांच्यावर घमासान वाद व्हायलाच हवा. त्यातून लेखकाला योग्य मार्गदर्शन मिळते. विचारकलहाला कशाला घाबरता असे आगरकर म्हणत असत. मराठी माणूस हा मूलत:च कलहप्रिय आहे. बाराशे वर्षांपुर्वी उद्योतन सुरी यांनी मराठी माणूस हा “कळवंड करणारा” असतो असे त्याचे अचूक वर्णन केलेले आहे. “भांडखोरपणा” हे मराठी माणसाचे “सार्वकालिक ओळखपत्र” आहे.

सध्या महाराष्ट्रात दुष्काळी वातावरण असले तरी कसबे-नेमाडे वादाच्या रणभेरी घुमत आहेत. हे दोघेही बलदंड योद्धे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत.

या दोघांनाही मानणारा युवकांचा एक मोठा वर्ग आहे. तो त्यांच्यावर अमाप प्रेम करतो. तो सध्या त्यांच्यातील या वादाने व्यथित आहे. दोघेही आपलेच, आपलेच दात नी आपलेच ओठ, कोणाची बाजू घ्यायची याने तो संभ्रमित झालेला आहे.

प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचे गारूड गेले ४० वर्षे ज्याच्या मनावरून उतरलेले नाही असा मी एक छोटा वाचक आहे. कोसला ते हिंदू, टिकास्वयंवर, देखणी आणि त्यांच्या भाषणांची व मुलाखतींची पुस्तकं, तुकाराम, साने गुरूजींवरील समीक्षापर पुस्तकं, हे सारं नेमाडपंथी साहित्य एकदाच नाही तर अनेकदा मी वाचलेलं आहे. हे केवळ मराठीतलंच नाही तर अखिल भारतीय पातळीवरचं, जागतिक पातळीवरचे श्रेष्ठ साहित्य आहे आणि म्हणूनचे नेमाडे हे जागतिक पातळीवरील महान साहित्यकार आहेत असं माझं मत आहे.

प्रा. रावसाहेब कसबे यांचेही प्रत्येक पुस्तक मी काळजीपुर्वक वाचलेले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान, झोत, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार, भक्ती आणि धम्म, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, मानव आणि धर्मचिंतन, हिंदुराष्ट्रवाद,” हे त्यांचे सारेच ग्रंथ मी बारकाईने वाचलेले आहेत. पुन्हापुन्हा वाचत असतो. परिवर्तनवादी चळवळीचे महान भाष्यकार, वक्ते आणि विचारवंत म्हणून रावसाहेब मला नितांत आदरणीय आहेत. त्यांचे “देशीवाद, समाज आणि साहित्य” हे पुस्तक वाचताना मात्र मला खूप त्रास झाला.

व्यक्तीश: या दोघांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या दोघांनीही मला आजवर उत्तम मार्गदर्शन आणि प्रेम दिलेले आहे. मी या दोघांनाही स्वकीय तत्वज्ञ आणि मार्गदर्शक मानतो.

अशा परिस्थितीत त्यांच्यातील वादावर लिहायला मी अपात्र माणूस आहे. कारण एकतर मी या दोघांच्याही लेखणावर अमाप प्रेम करीत असल्याने त्यांच्याबाबतीत पक्षपाती असण्याची दाट शक्यता आहे. किमान त्यांच्याबाबतीत तटस्थ राहणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
त्यामुळे त्यांच्यातील वादात न पडण्याचे मी ठरवले होते. आजही खरंतर माझं तेच मत आहे. या दोन मोठ्या माणसांच्या वादात न्यायाधीश, किमान ज्युरी होण्याची आपली लायकी नाही हे मला पुरेपूर माहित आहे.

त्यामुळे जेव्हा मी श्री. अशोक बाबर यांचे “देशीवादाचे दुश्मन” हे पुस्तक वाचले तेव्हा रावसाहेबांच्या किंवा बाबर यांच्या पुस्तकांचे समग्र परिक्षण करणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे
आहे याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली.

हे या पुस्तकांचे परीक्षण नसून फक्त काही धावती निरिक्षणे आहेत. ही माझी व्यक्तीगत निरिक्षणे असल्याने ती सर्वांना पटायलाच हवीत असे नाही. माझ्या या लेखणातला धोका असाय की हे दोघेही माझ्यावर नाराज होऊ शकतात. न घरका ना घाटका असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही लिहिले पाहिजे.

१. नेमाडे यांच्याबद्दल श्री. विद्याधर पुंडलिक यांनी असे लिहिले आहे की, नेमाडे हे मुटके मारणारे पट्टीचे पोहणारे आहेत. म्हणजे असे लोक पोहण्यात पटाईत असल्याने ते अशा पद्धतीने विहीरीत मुटके मारतात की काठावर उभे असणारांच्या अंगावर भरपूर पाणी उडते. नेमाडे त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे अनेकदा वादग्रस्त ठरत असतात. ते सतत प्रकाशझोतात असतात. त्यांची मतं अतिशय टोकदार असतात. विवाद्य असतात.

ते एक अत्यंत निर्भय आणि संपुर्ण स्वतंत्र तत्वचिंतन असलेले श्रेष्ठ विचारवंत तसेच निर्मितीशील साहित्यकार आहेत. आजतरी मला त्यांच्या तोडीचा दुसरा भारतीय पातळीवरचा श्रेष्ठ साहित्यिक दिसत नाही.नेमाडेंना नीट समजून न घेता केवळ त्यांच्या देशीवादी मांडणीला शिव्याशाप देणारांनी, त्यांना जातीयवादी म्हणणारांनी आजवर महात्मा गांधींनाही असेच दूर लोटले, परिणामी गोडसेवादी बोडक्यावर बसले. सनातन की नेमाडे, गोडशे की गांधी यात निवड करावी लागेल.पण ज्यांना ते स्वत: सोडता इतर सारेच प्रतिगामी वाटतात अशा संशयवाद्यांचा विजय असो! ते थोरच आहेत.

२. प्रा. रावसाहेब कसब्यांनी अफाट वाचन, चिंतन आणि संशोधनाद्वारे मौलिक लेखण केलेले आहे.

त्यांचा नेमाडे यांच्यावरचा ग्रंथ मात्र त्यांच्या आजवरच्या कामगिरीला साजेसा नाही असे मला खेदाने म्हणावे लागते. या पुस्तकात अनेक ठिकाणी रावसाहेबांनी नेमाडॆंवर जे व्यक्तीगत शेरे आणि ताशेरे मारलेले आहेत त्याची काहीच गरज नव्हती. अपशब्द आणि मानहानीकारक मजकूर तर अगदीच आक्षेपार्ह आहे. नेमाडेंना ते कुणीतरी भुरटा आणि प्रतिगामी समजतात हीच मुळात फार मोठी वेदनादायक बाब आहे. रावसाहेबांनी व्यक्तीगत आकसाने प्रेरित होऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे असे सतत वाटत राहते. तो त्यांनी लिहिला नसता तर अधिक बरे झाले असते. त्याला “देशाचे दुश्मन” या दिनकरराव जवळकरांच्या पुस्तकाच्या धाटणीचे “देशीवादाचे दुश्मन” हे पुस्तक लिहून श्री. अशोक बाबर आणि श्री. सुशील धसकटे यांनी उत्तर दिलेले आहे.

३. आरपीआयच्या दोन गटांमध्ये ज्याप्रकारच्या उखाळ्या पाखाळ्या चाललेल्या असतात, त्या नळावरच्या भांडणाची कळा या पुस्तकाला आलेली आहे. श्री. अशोक बाबर आणि सुशील धसकटे यांनी रावसाहेबांना दिलेले उत्तर म्हणजे नळावर एकमेकांच्या झिंज्या धरणे किंवा भर चौकात एकमेकांची गचांडी धरण्याच्या पातळीवरील कामगिरी आहे. श्री.बाबर यांनी अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचा आवाका फार मोठा आहे. पण ते टोकाचे नेमाडे समर्थक आहेत. कट्टर भक्त. नेमाडे हे सर्वांगपरिपुर्ण साहित्यिक आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे शेरास सव्वाशेर म्हणुन त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी रावसाहेबांवर केलेले हेत्वारोप आणि मारलेले असभ्य ताशेरे यांच्यामुळे ह्या पुस्तकाचा दर्जा घसरलेला आहे.

४. रावसाहेब आणि बाबर या दोघांनाही “षडयंत्र [ कॉंन्स्पीरशी ] थिएरी” प्राणप्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे एकच आरोप ते दोघेही एकमेकांवर करीत आहेत. दोघेही हेत्वारोपांचा परस्परांवर तुफान मारा करतात. “तू हिंदुत्ववादी आहेस,” “तू जातीयवादी आहेस,” “तू प्रतिगाम्यांचा हस्तक आहेस,” “तू सरंजामी मानसिकता मानणारा आहेस,” असे आरोप दोघांनी एकमेकांवर केलेले आहेत.

५. या दोघांना जे लोक जवळून ओळखतात त्यांना माहित आहे की ह्या दोघांचेही एकमेकांवरचे आरोप बिनबुडाचे आहेत. निराधार आणि असत्य आहेत.

६. या दोघांनाही खूप मानसन्मान मिळालेले आहेत. आणखी मिळोत. ते दोघेही नितांत सन्मानणीय आहेत. पण ते एकमेकांचे स्पर्धक आणि अतिहितचिंतक असणार. त्यामुळे हे प्रहार आपापली टेरीटरी सांभाळण्यासाठी केलेले असू शकतात. इगो आणि प्रसिद्धीचा झोत कोणावर कमी आणि कोणावर जास्त याच्या इसाळातूनही हे भांडण चालू असणार. मेरी कमीजसे तेरी कमीज ज्यादा सफेद क्यों? हा मुद्दाच जास्त प्रभावी दिसतो.

७. हे दोघेही वैचारिकदृष्ट्या फुले-शिंदे-शाहू-गांधी-आंबेडकरांना मानणारे आहेत, एकाच छावणीतले आहेत. दोघेही परिवर्तनवादी आहेत. मतभेद असलेच तर ते तपशीलांचे असू शकतात. स्वभावांचे असू शकतात. फारसे गंभीर असे विचारसरणीचे- तात्विक म्हणता येतील असे मतभेद मला तरी दिसत नाहीत. शैली, मांडणी, अन्वेषण, छावणी यांचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या दोघांच्याही काही चुका झालेल्या असू शकतात. मांडणी सदोष असू शकते. मात्र त्या दोघांपैकी कोणीही आजवर “चुकीच्या बाजूला” उभे राहिलेले नाहीत.

८. परिवर्तनवादी छावणीपुढे आज अनेक गंभीर आव्हानं उभी आहेत. प्रतिगामी शक्ती रोरावत चालल्या आहेत. अशावेळेला आपण सार्‍यांनीच एकत्र यायची गरज आहे. अन्यथा परिवर्तनवाद्यांचे अस्तित्वच संपेल अशी भिती आहे. आपल्या भुमिका परस्परपूरक असताना जर एकत्र येता येत नसेल तर निदान एकमेकांना खाऊ का गिळू या वृत्तीने लक्ष्य तरी करायला नको असे माझ्यासारख्या एका छोट्या आणि गरिब माणसाला वाटते.

 

– प्रा.हरी नरके

(लेखक संशोधक व विचारवंत आहेत)

Previous articleसमजून घेवूया मानवी मेंदूच अनाकलनीय कोडं
Next articleगांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र नव्हते , पण शत्रूही नव्हते !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.