नेहरू व सुभाष

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १८

(साभार – साप्ताहिक साधना)

– सुरेश द्वादशीवार

१९३८ व ३९ ही दोन वर्षे नेहरूंना कमालीची अस्वस्थ करणारी आणि काँग्रेसमध्येही असंतोष निर्माण करणारी होती. ३८ च्या हरिपुरा (गुजरात) काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषबाबूंची निवड वर्किंग कमिटीच्या मर्जीविरुद्ध झाली होती. मात्र त्यावेळी त्यांना नेहरूंचा पाठिंबा मिळाला होता. सुभाषबाबूंच्या समाजवादावरील निष्ठेबाबत नेहरू नि:शंक होते. त्यांच्यातील मतभेदही उघड होते व ते सर्वज्ञात होते. सुभाषबाबू नेहरूंहून नऊ वर्षांनी लहान होते आणि त्यांच्यातला उतावळेपणा कमालीचा तरुण होता. लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेहरूंची निवड झाली तेव्हाच त्यांच्यातील मतभेदांना सुरुवात झाली.

नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली तेव्हा सुभाषबाबू त्यांच्या सोबत होते. मात्र अध्यक्षांच्या भाषणानंतर त्यांनी लाहोर अधिवेशनात तीन ठराव मांडले. त्यातील पहिल्या ठरावात देशात पर्यायी सरकार स्थापन करून काँग्रेसने त्यामार्फत देशाचा राज्यकारभार चालवावा असे म्हटले होते. दुसर्‍याने ब्रिटीश सरकारला देण्यात येणारे सगळे कर थांबविण्याचा संदेश देशाला दिला होता. तर तिसर्‍याने सरकारशी संपूर्ण असहकार करण्याची मागणी केली होती. गांधीजींना सुभाषबाबूंचा हा उतावळेपणा आवडणारा नव्हता. स्वातंत्र्याचा लढा योग्य मार्गाने व शांततेने चालविण्याचीच त्यांची इच्छा होती. नेहरूंनाही हे ठराव मान्य नव्हते. परिणामी ते सारे अधिवेशनाने नामंजूर केले.

आपले ठराव नामंजूर झाल्यानंतर सुभाषबाबूंनी पक्षापासून फारकत घेतली व  ‘डेमॉक्रॅटिक काँग्रेस पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना केली. मात्र हा पक्ष फक्त कागदावरच राहिला. पुढे सुभाषबाबूंनी लिहिलेल्या ‘माय स्ट्रगल’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्याचा साधा उल्लेखही केला नाही. मात्र सुभाषबाबूंच्या या दुराव्याविषयी नेहरूंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘सुभाषचा संताप लवकरच विरेल. तो हट्टी असला तरी समजूतदार आहे. माझ्याहून वयाने लहान असलेला तो माझा भाऊ आहे. मी त्याची समजूत घालू शकेन.’ पुढे झालेही तसेच. सुभाष पुन्हा पक्षात सहभागी झाले. नंतरच्या काळात मात्र त्यांची स्वातंत्र्याकांक्षा एवढी बळावली व एकारली की त्यासाठी प्रसंगी हिंसेचा व फॅसिस्ट आणि नाझी शक्तींची मदत घेण्याचा विचार ते करू लागले. पुढे लखनौ काँग्रेसमध्ये नेहरूंनी जपानने चीनवर केलेल्या हल्ल्याची जी निर्भत्सना केली तीही त्यांना आवडली नव्हती. आपल्या स्वातंत्र्यासाठी मिळेल तेथून मदत घेणे आपल्याला भाग आहे. प्रसंगी जर्मनी, इटली व जपानही आपल्याला मदत करतील असे त्यांना वाटत होते. याच काळात जर्मन अधिकार्‍यांशी त्यांनी संपर्कही साधला होता. नेहरू व काँग्रेसचा पहिला विरोध फॅसिझमला व त्याच्या वर्णवर्चस्ववादाला होता. या मुद्द्यावर त्यांचे सुभाषशी पटणे अशक्य होते. काँग्रेसची मागणी फॅसिझमविरुद्ध लढताना इंग्लंडने आपलाही साम्राज्यवाद सोडावा अशी होती. या दोन भूमिकांमुळे काँग्रेसमध्ये काही काळ दुभंग उत्पन्न झाल्यासारखे दिसले. त्यातून नेहरूंचे सुभाषबाबूंशी अतिशय आत्मीयतेचे संबंध होते. ‘तू युरोपात असताना कमलाला भेट व तिच्या प्रकृतीची काळजी घे.’ अशी नेहरूंची त्यांना गेलेली खासगी पत्रे आता उपलब्ध आहेत. मात्र नेहरू मूल्यांबाबत कोणाशीही, अगदी सुभाषशीही तडजोड करायला तयार नव्हते.

या दोन लढाऊ नेत्यांना एकाच वेळी बाहेर राहू देणे सरकारला मानवणारे नव्हते. त्यामुळे नेहरू मोकळे असतील तर सुभाष तुरुंगात आणि सुभाषबाबू मोकळे असतील तर नेहरू तुरुंगात असा अलिखित नियमच त्या सरकारने केला होता. लखनौ काँग्रेसच्या वेळी सुभाषबाबू भारतात परतले तेव्हा सरकारने त्यांना मुंबईतच अटक करून तेथील ऑर्थर रोड तुरुंगात टाकले व नंतर येरवड्याला हलवले. त्यांच्यावर कोणताही आरोप नव्हता. त्या अटकेचे कारण सरकारलाही नीट सांगता आहे नाही. तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड झेटलंड पार्लमेन्टमध्ये म्हणाले, ‘खरे तर अशा अटकेचा सरकारलाही खेद आहे. पण ती भारताच्या प्रशासनाची गरज आहे.’

हरिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुभाषबाबूंनी केलेले भाषण स्वातंत्र्याकांक्षेने ओतप्रोत भरले होते. त्यासाठी मिळेल तेथून मदत घेण्याची त्यांची तयारीही त्यांनी जाहीर केली होती. या भाषणाच्या वेळी गांधीजी अनुपस्थित होते. त्यांना ते आवडलेही नव्हते. काँग्रेसची वर्किंग कमिटी व बहुसंख्य काँग्रेसजन सुभाषबाबूंच्या या अतिउत्साही भूमिकेवर मनातून नाराज होते. आपल्या अध्यक्षपदाचा काळ, आजारी अवस्था व तुरुंगवास यामुळे त्यांनाही आपली भूमिका नीट पार पाडता आला नाही. याही काळात नेहरूंशी त्यांचा पत्रव्यवहार कायम राहिला. महत्त्वाची बाब ही की सुभाषबाबूंच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेहरू म्हणाले, ‘मी सुभाषच्या विचारांचा असतो तर कदाचित त्याच्याचसारखी भाषा बोललो असतो. मात्र मला हिंसाचार, फॅसिझम व नाझीवाद आवडणारा नाही आणि त्यांची मदतही मला चालणारी नाही.’

नंतर झालेल्या त्रिपुरी काँग्रेसच्या अधिवेशनातही सुभाषबाबू पक्षाच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवडून आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या व गांधीजींच्या अधिकृत उमेदवाराचा, पट्टाभिसीतारामय्या यांचा पराभव केला होता. परिणामी सारी वर्किंग कमिटी व सामान्य काँग्रेसजनही त्यांच्या विरोधात गेले होते. यावेळपर्यंत सुभाषबाबूंचा फॅसिझमची मदत घेण्याचा इरादा पक्का झाला होता व तो त्यांनी पक्षाजवळ उघडही केला होता. त्यांची अध्यक्षपदी निवड होताच वर्किंग कमिटीच्या सर्व सभासदांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले. या काळात नेहरूंनी सुभाषबाबूंचे मन वळविण्याचा अनेकवार प्रयत्न केला. ‘आपल्याला लोकप्रियता लाभली असली आणि आपण निवडून येऊ शकत असलो तरी हा देश आपल्याहून गांधीजींना अधिक चांगला समजला आहे. तो त्यांच्या सोबत आहे. तुम्ही गांधींपासून दूर जाल तर या देशापासूनही तुटाल.’ असे नेहरूंनी त्यांना वारंवार समजावले होते. मात्र सुभाषबाबू त्यांची भूमिका सोडायला तयार नसल्याने अखेर नेहरूही त्यांच्यापासून दूर झाले. सुभाषबाबूंचे पक्ष सदस्यत्व मग वर्किंग कमिटीनेच रद्द केले.

त्यावर संतापलेल्या सुभाषबाबूंनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या नव्या पक्षाची स्थापना केली. मात्र त्यालाही फारसा पाठिंबा मिळाल्याचे कुठे दिसले नाही. यानंतरचा काळ ते आपल्या निवासस्थानीच आपल्या पुढच्या योजना आखत राहिले.  दि. १६ आणि १७  जानेवारी ४१ च्या मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांनी त्यांनी आपले थोरले बंधू शरदबाबू व पुतणा शिशिर यांच्यासोबत पोलिसांना चुकवून घर सोडले व ते बिहारमधील गोमोह या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथून मजल दर मजल करीत ते अफगाणिस्तानात गेले. पुढे जर्मनी व जपानमध्ये राहून त्यांनी त्यांचे युद्धप्रयत्न चालू ठेवले. या काळात टोकियो विद्यापीठात केलेल्या एका भाषणात ते म्हणाले, ‘भारत स्वतंत्र झाला तरी त्यात एकाएकी लोकशाही येणे उपयोगाचे नाही. त्यातील जातीयवाद व आर्थिक विषमता मोडून काढायला त्यात काही काळ कठोर हुकूमशाही येणे आवश्यक आहे. शक्य असेल तर फॅसिझम आणि कम्युनिझम यांना एकत्र आणून तयार केलेली हुकूमशाहीच तेव्हा भारतात आणावी लागेल.’

सुभाषबाबूंची ही भूमिका गांधीजी, नेहरू व पटेल यांच्यासह देशातील कोणालाही मान्य होणारी नव्हती. परिणामी सुभाषबाबू काँग्रेसपासून व देशाने चालविलेल्या लोकलढ्यापासून कायमचे तुटले.

नंतरचा त्यांचा प्रवास, आझाद हिंद सेनेची त्यांनी जपानच्या मदतीने केलेली स्थापना, तिचा इम्फालमध्ये झालेला पराभव व पुढे एका विमान अपघातात सुभाषबाबूंचा झालेला मृत्यू सर्वज्ञात आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने नेहरू मनातून कळवळले. त्यावेळी त्यांच्यासोबत असणार्‍यांनी त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची नोंद करून ठेवली आहे. ‘कोणत्याही योद्धयाला त्याच्या अखेरच्या काळात ज्या वेदनांचा सामना करावा लागतो त्यातून सुभाष सुटले.’ एवढेच ते म्हणू शकले. पुढे लिहिताना त्यांनी म्हटले, ‘सुभाषच्या देशभक्तीविषयी गांधीजींसह कोणाच्याही मनात कधी संशय नव्हता. त्यांचा मार्ग आम्हाला मान्य नसला तरी ती त्यांची निवड होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना जे योग्य वाटले तेच त्यांनी केले. तथापि त्यांचा मार्ग चुकला हे तेव्हाही माझ्या मनात होते. त्यांना विजय मिळाला असता तरी त्याचे श्रेय जपानला गेले असते. बाहेरच्या एखाद्या देशाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यावे ही गोष्ट समाजमनालाही मानवणारी नव्हती.’

पुढे १९४६ मध्ये सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त बोलताना ते म्हणाले,‘आम्ही एकमेकांचे सहकारी होतो. स्वातंत्र्याचा लढा आम्ही खांद्याला खांदा लावून २६ वर्षे लढलो. मी त्यांना सदैव माझ्या धाकटा भाऊ मानले. आमच्यात मतभेद होते. पण त्यांच्या मनाच्या स्वच्छतेविषयी व त्यातील देशभक्तीविषयी माझ्या मनात कधी शंका आली नाही. त्यांचा लढा सार्‍यांना सदैव स्फुरण देणारा असेल. त्यांच्यासारखा विचार माझ्या मनात असता तर कदाचित मीही त्यांच्या मार्गाने गेलो असतो.’

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमालाजुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://bit.ly/2IALWvx

Previous articleटिकटॉक सुसाट
Next articleखलनायक आणि चाणक्य(?)ही… 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here