पंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन !

प्रवीण बर्दापूरकर  

लोकसभेची सदस्य असलेल्या , सख्खी बहीण प्रीतम यांना नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे बऱ्याच अस्वस्थ आहेत . मंत्रीमंडळ विस्तारानंतर दिल्लीहून मुंबईला परतल्यावर केलेल्या भाषणात आणि ‘दिव्य मराठी’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अस्वस्थता , रोष आणि संभाव्य बंडखोरीही मोठ्या चतुराईनं व्यक्त केलेली आहे . पंकजा मुंडे या काही भाजपाच्या साध्या नेत्या नाहीत . त्या तीनवेळा विधानसभेच्या सदस्या होत्या . एक पूर्ण टर्म कॅबिनेट मंत्री होत्या . पक्षाच्या राज्यातल्या सुकाणू ( कोअर ) समिती तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत , पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि त्यांच्याकडे मध्यप्रदेश या एका महत्त्वाच्या राज्याचं प्रभारीपदही आहे ; यांचा अर्थ राजकारणाच्या क्षितिजावर दीर्घ काळ राहण्याची संधी पंकजा मुंडे यांना आहे .  त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ,  त्या भाजपाचे दिग्गज नेते , ज्यांनी महाराष्ट्रात पक्ष रुजवला , फुलवला आणि सत्तेच्या सोपानावर नेऊन बसवला असं समजलं जातं , त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा कन्या आहेत . मात्र , ही अस्वस्थता म्हणा की , रोष व्यक्त करताना म्हणा की संभाव्य बंडखोरीचे संकेत देताना , हे का घडलं याच्या मुळाशी त्या जात नाहीयेत ही खरी मेख आहे .

गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई ,संचित आणि राजकीय भांडवल महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या विशाल वटवृक्षासारखं पसरलेलं आहे . त्यांच्या नावाची मोहिनी अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे आणि भविष्यातही ती  असेलच . कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गोपीनाथ मुंडे यांनी शून्यातून राजकारणाला सुरुवात केली . प्रचंड मेहनत घेत त्यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि निवडणुकीतील विजय समीप आणून ठेवला . त्यासाठी तब्बल तीन वेळा वणवण फिरत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला . राज्यातल्या प्रत्येक गाव-तांडा-वाडीपर्यंत संपर्क प्रस्थापित केला  कार्यकर्त्यांचं घट्ट जाळं विणलं हे लक्षात घ्यायला हवं .  मात्र , एक निसर्ग नियम पंकजा मुंडे यांनी लक्षात घेतलेला नाही आणि तो म्हणजे , विशाल वृक्षाच्या सावलीतील झाडं मोठी होत नाहीत ; मनाप्रमाणे बहरतही नाहीत . मोठं होण्यासाठी , बहरण्यासाठी स्वत:चं जे कर्तृत्व सिद्ध करावं लागतं ते करण्यासाठी त्या छोट्या झाडाला यश येत नाही . अगदी तस्सच पंकजा मुंडे यांच्याबाबतीत झालं आहे . मुद्दा स्पष्ट करुन सांगायचा  तर , गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याई / भांडवलाच्या बाहेर जाऊन त्यांच्या परळी या विधानसभा मतदारसंघात तरी पुरेसा राजकीय प्रभाव पंकजा मुंडे निर्माण करु शकल्या आहेत का , हे शोधायला हवं .

पंकजा मुंडे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली . २००९ मध्ये त्यांना सुमारे ९७ हजार मते मिळाली आणि त्या सुमारे ३६ हजारांचं मताधिक्य घेऊन विजयी झाल्या . गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानभुतीची लाट असूनही २०१४च्या निवडणुकीत पंकजा यांच्या विजयाचं मताधिक्य २६ हजारांवर आलं . २०१९च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मतांत सुमारे पांच हजारांनी घट झाली आणि त्यांचा सुमारे ३१ हजार मतांनी पराभव झाला . असं का घडलं आणि ते यापुढे घडू नये यासाठी खरं तर नियोजन करण्याऐवजी पुन्हा पंकजा भावनेच्या आहारी गेल्या . धनंजय मुंडे यांनी छत्तीस हजारांचं मताधिक्य तोडून त्यांचं स्वत:चं विजयी मताधिक्य मधल्या काळात प्रस्थापित केलं ; हे का घडलं हे पंकजा मुंडे यांनी शोधण्याचा प्रयत्न  करायला हवा होता .
गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर सैरभैर झालेल्या त्यांच्या अनुयायांना शोकावेगातून बाहेर काढून पक्षाच्या यशाच्या मार्गावर चालण्यासाठी उद्युक्त करण्याची किमया करताना पंकजा मुंडे यांनी दाखविलेला संयम विलक्षण आणि वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जिद्द , दृढ असल्याचं संघर्ष यात्रेच्या काळात दिसलं होतं . पण , अजूनही त्याच ‘इमोशनल ट्रॅप’मधे पंकजा मुंडे अडकलेल्या आहेत  . म्हणून सत्तेत असूनही ना त्या मराठवाड्याच्या नेत्या झाल्या , ना त्यांच्या नेतृत्वाची बीजं या काळात राज्यभर अंकुरली गेली . पंकजा मुंडे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर महाराष्ट्र आणि मराठवाडा तर सोडाच परळी विधानसभा मतदारसंघातील तरी गाव न् गाव पिंजून काढत मतदारांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केल्याचं अजून तरी दिसलेलं नाही .

गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करताना पारंपरिक  मतदारांसोबतच समाजातील  बहुजन , दलित आणि अल्पसंख्याकांनाही सोबत घेतलं . समाजातले सत्तेपासून कायमच वंचित राहिलेले असे विविध गट एकत्र करुन पक्षाचा तोंडवळा बदलवून टाकण्यात मुंडेंना जे यश लाभलं आणि पक्ष विस्तारत गेला आणि त्यांचंही नेतृत्व उजळत गेलं . पंकजा मुंडे मात्र एका विशिष्ट जातीच्याच कळपात तर अडकून पडल्या नाहीत ना ? असा प्रश्न सहाजिकच त्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत . पंकजा मुंडे ज्यांचं नाव न घेता ज्यांचा उल्लेख ‘कौरव’ असा करतात त्यांच्या  ( पक्षी : देवेंद्र फडणवीस ) नेतृत्वाभोवती पक्षातले केवळ ब्राह्मणच  नव्हे तर बहुजन , मागासवर्गीय आणि मराठा नेत्यांचा गोतावळा जमलेला आहे .  ( २०१९च्या  विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयी १०५ पैकी तब्बल ३७ उमेदवार बहुजन , ३५ मराठा , १८ एस सी / एसटी आणि  केवळ ७ ब्राह्मण तसंच अन्य उच्चवर्णीय आहेत ! )  आणि या गोतावळ्याची मोट या कथित ‘कौरवा’ने अशी काही घट्ट बांधली आहे की भारतीय जनता पक्ष विधानसभेतला सर्वांत मोठा पक्ष बनलेला आहे .

गोपीनाथ मुंडे अगदी शेवटपर्यंत मी भाजपचा कार्यकर्ता आहे असं म्हणत असत . पंकजा मुंडे मात्र स्वत:चा उल्लेख नेता असा करतात आणि स्वत:ला नेताच म्हणवून घेतात . कार्यकर्त्यांची ‘आई’ असाही स्वत:चा उल्लेख त्या करतात . भाषणातही त्या ‘मी’ , ‘माझं’ , ‘मला’ आणि मुंडे साहेबांची पुण्याई या पलीकडे फारशा जात नाहीत . कष्ट करुन कर्तृत्व गाजवून जो नेता होतो त्याच्या नेतृत्वाची मोहिनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी विरोधकावरही दीर्घ काळ राहते. ज्यांचा उल्लेख पंकजा मुंडे कौरव असा करतात ते राज्यभर सतत पक्षासाठी वणवण फिरतात आणि पंकजा मुंडे मात्र परळी विधानसभा मतदारसंघासाठीही आठवड्यातले चार दिवस देत नाहीत . हे वास्तव केवळ भाजपच्याच नाही तर सत्ताधारी पक्षाच्याही लक्षात आलेलं आहे . मतदारांनी आपल्याला का नाकारलं , याचा आत्मशोध घेण्याऐवजी पंकजा मुंडे स्वप्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारख्या वागतात , हे विसरता येणार नाही आणि ते पक्षातल्याही नेते व कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही हेही तेवढचं खरं .
राजकारण मग ते कोणत्याही पक्षाचे असो प्रत्येकाला एक ‘गॉडफादर’ वरिष्ठ स्तरावर निर्माण करावा लागतो . गोपीनाथ मुंडे यांचं कर्तृत्वचं असं होतं की , अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , मुरलीमनोहर जोशी , प्रमोद महाजन यांच्यासारखे गॉडफादर कायम गोपीनाथरावांच्या पाठीशी होते . स्वकर्तृत्वाने असा एखादा गॉडफादर जर दिल्लीत निर्माण केला असता आणि महाराष्ट्रभर नेते , कार्यकर्त्यांचं मोहोळ स्वत:भोवती निर्माण केलं असतं तर आज असं पक्षात एकटं पडण्याची आणि ‘मला कुणी संपवू शकत नाही’ असं अरण्य रुदन करण्याची  वेळच पंकजा मुंडे यांच्यावर कधीच आली नसती .

‘पक्षाच्या संदर्भात मी कोणतीही नाराजी किंवा अस्वस्थता व्यक्त केलेली नाही , बंडखोरीचे संकेत दिलेले नाहीत’ असं पंकजा मुंडे नक्कीच म्हणू शकतात , म्हणाल्याही आहेत . कारण त्यांचं भाषण हा चतुर राजकीय वक्तृत्वाचा अप्रतिम नमुना आहे . ‘ही नाराजी ही अस्वस्थता कार्यकर्त्यांची आहे’ , असं पंकजा मुंडे जेव्हा म्हणतात तेव्हा कार्यकर्त्यांकडून ‘हे’ वदवून घेण्यासाठी काय करावं लागतं , हे राजकारणात आणि राजकारणाच्या परिघात वावरणाऱ्या सर्वांना ठाऊक आहे , यांचा विसर त्यांना पडावा हे आश्चर्यच आहे . पंकजा मुंडे पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत म्हणजे राष्ट्रीय नेत्या आहेत आणि नाराजी/अस्वस्थतेचं  कारण असलेला मंत्रीमंडळ विस्तार दिल्लीत झाला आहे म्हणून त्यांना हे शक्तिप्रदर्शन मुंबईऐवजी दिल्लीत घडवून आणता आलं असतं . मुंबईत कार्यकर्त्यांनी काढलेला नाराजीचा सूर आणि दिलेल्या घोषणांचे आवाज दिल्लीतच उमटायला हवे होते !

अगदी खरं सांगायचं तर , पंकजा मुंडे यांनी जरी संभाव्य बंडखोरीचे संकेत दिले असले , अस्वस्थता व्यक्त केली असली तरी अन्य राजकीय पर्यायही त्यांच्यासमोर फारसे नाहीत . धनंजय मुंडे असल्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाऊ शकत नाहीत . काँग्रेस पक्ष प्रभावशून्य झाला आहे आणि त्या पक्षात त्यांना स्थान नाही , मनसेच्या बाबतीत सांगायचं तर , ‘नेता कोण ?’ या एका मुद्द्यावर एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत . राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा . मात्र , सर्व बाजूने कोंडीत सापडलेल्या वाघाला शिवसेना आपल्या कळपात सामील करुन घेईल की नाही याची शक्यता कमीच आहे . इथे ‘शक्यता कमी’ असा शब्दप्रयोग केला आहे . याचाच अर्थ शिवसेनेच्या अटीतटीवर प्रवेशही मिळू शकतो , असा घेता येईल !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleएका छोट्या गैरसमजामुळे…..
Next articleअवकाश सफरीसाठी बुकिंग सुरू!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.