पवारसाहेब, सुरुवात तर छान झाली…

– मधुकर भावे

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर  शरद पवार यांनी स्वत: महाविकास आघाडीची बैठक बोलावली. त्यांच्या घरी बोलावली. दुसऱ्या दिवशीच बोलावली. कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला जे बळ मिळाले आहे, या बैठकीचे ते मुख्य कारण आहे. वातावरण काय आहे, यावर निवडणुका लढवल्या जातात. देशभरातील वातावरण काहीसे वेगळे आहे.  महाराष्ट्रात तर नक्कीच वेगळे आहे. ही बैठक पवारसाहेबांनी घरी बोलावण्यामध्ये बैठकीचे गांभीर्य अधिक वाढलेले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०२४ मध्ये आहेत. म्हणजे अजून १७ महिने आहेत. ठरवलं तर तयारीला भरपूर वेळ आहे. या आघाडीत प्रामुख्याने तीन पक्ष आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना  पक्षाचे सध्याचे आमदार १६, राष्ट्रवादीचे ५४ आमदार आणि काँग्रेसचे ४४ आमदार. काही अपक्ष अशी एकंदर बेरीज ११४ आहे. आघाडी कायम राहण्याकरिता जागा वाटप हा मुख्य विषय आहे. २०१९ ची निवडणूक लढवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एक समान सूत्र होते आणि ते सोपे होते. वाद होण्याचे कारण नाही. ते सूत्र असे की, ‘सध्या ज्या जागा ज्या पक्षाने जिंकलेल्या आहेत त्या जागा त्या त्या पक्षाला.’ म्हणजे २८८ जागांपैकी ११४ जागांचे वाटप हे कसलाही वाद न होता आज होऊ शकते. शिवसेनेतून फूटुन शिंदे शिवसेनेत जे गेले ते मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडावे लागतील. उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्या जागांवर नवीन उमेदवार देतील. म्हणजे ४० जागांवर त्यांना नवीन उमेदवार द्यावे लागेल. अर्थात या जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या धरल्या तर ११४+४० म्हणजे १५४ जागांचे वाटप विनातक्रार झाले समजा. रहिल्या जागा १३४. या जागांच्या वाटपाचे सूत्रही सोपे करता येईल. या १३४ जागा २०१९ च्या निवडणुकीत दोन क्रमांकावर ज्या पक्षाकडे होत्या त्या पक्षाला त्या जागा सोडायच्या. म्हणजे ‘अ’ जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी झाला असेल आणि दोन नंबरला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर ती जागा त्या त्या पक्षाला सोडायची. हे सोपे सूत्र  तिन्ही पक्षांनी एकदा मान्य केले की, वाद होण्याचे काहीच कारण नाही. शिवाय एकदा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हटल्यानंतर ‘तो तिन्ही पक्षांचा उमेदवार’ मानला गेला पाहिजे आणि तसे वातावरण तयार झाले पाहिजे.

१९५७ चा अनुभव म्हणून सांगतो. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली तेव्हा या समितीमध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा,  जनसंघ आणि रिपब्लिकन पक्ष असे सर्व पक्ष एकत्र होते. जागा वाटप करताना त्यावेळी वाद झालेच नाहीत. ‘समितीचा उमेदवार म्हणजे तो माझा उमेदवार…’  अशी राजकीय पक्षांचीच नव्हे, तमाम महाराष्ट्राची भावना होती. समितीच्या बैठकीत जागा वाटप करताना रिपब्लिकन पक्षाचे बी. सी. कांबळे यांना लोकसभेची एक जागा द्यायचे ठरले. मतदारसंघ कोणता असावा. अहमदनगर. त्या मतदारसंघात काँग्रेसचे आठरे-पाटील हे तगडे उमेदवार. तिथे बी. सी. उभे राहिले. सव्वा लाख मतांनी निवडून आले. त्यावेळच्या मतदारांनी उमेदवार पाहिला नाही. पक्ष पाहिला नाही. जात पाहिली नाही. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ याचा पुरस्कार करणारा जो- जो, तो-तो आपला उमेदवार.  मुंबईतील ताडदेवच्या तुळशीवाडीत राहणारे नौशेर भरूचा हे पारशी उमेदवार जळगावला उभे राहून विधानसभेला विजयी झाले. सगळ्यात आश्चर्याची लढाई होती, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील. जनसंघाला ती जागा सोडण्यात आली. त्यांनी उमेदवार दिला त्यांचे नाव होते, प्रेमजीभाई आशर. समितीचे हे उमेदवार कोणाला फारसे माहितीही नव्हते.  त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार कोण होते? तर १९५२ ते १९५७ पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले जगन्नाथराव भोसले. हे भोसले कोण? तर सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते ते. एक लाख मतांनी ते पराभूत झाले आणि प्रेमजीभाई निवडून आले. पंडित नेहरू यांना आश्चर्य वाटले. त्यांनी चौकशी केली… ‘भोसलेजी को हराके चुन के आये हुए है कौन?’ प्रेमजीभाईंचे नाव समजल्यावर पंडितजींनी त्यांना बोलावून घेतले…. आणि अभिनंदन केले. त्या निवडणुकीत लोकसभेत जनसंघाचे दोनच खासदार होते. बलरामपूरमधून (उत्तर प्रदेश) निवडून आलेले अटलबिहारी वाजपेयी आणि रत्नागिरीतून निवडून आलेले प्रेमजीभाई….. पहिला निकाल लागला तो अटलजींचा. खूप उशिरा प्रेमजीभाईंचा निकाल लागला. तिथून जनसंघाचा एक उमेदवार विजय झाल्याचे कळल्यावर अटल बिहारी म्हणाले… ‘चलो, मेरे साथ एक तो हैं….’

ही उदाहरणे याकरिता सांगितली की, जेव्हा जनतेच्या मनात प्रस्थापितांना पराभूत करण्याचा निश्चय असतो, त्यावेळी मतदार जात पाहत नाहीत. पक्ष पाहात नाहीत. पैशाला महत्त्व राहत नाही. प्रलोभनांना बळी पडत नाहीत. अर्थात १९५७ च्या चळवळीचे वातावरण आज नाही. परंतु ते वातावरण तयार करता येईल.लोकांचे म्हणून जे प्रश्न आहेत. न परवडणाऱ्या शेतीचे आहेत. बेरोजगारीचे आहेत. महागाईचे आहेत. कष्टकरी महिलांचे आहेत. असंख्य प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करून प्रचाराचे विषय काय ठरवायचे,कोणी कोणते विषय हाताळायचे,व्यक्तिगत टीका कोणावरही करायची नाही, स्थानिक प्रश्न कोणकोणते आहे, काही प्रश्न राज्याचे आहेत, काही प्रश्न त्या त्या जिल्ह्याचे,मतदारसंघाचे आहेत…. याची पद्धतशीर विभागणी करून प्रचाराकरिता या मुद्द्यांची चर्चा करावी लागेल.  प्रचार करणाऱ्या टीमचे एक शिबीर घ्यावे लागेल. संपूर्ण आघाडीसाठी ‘महाराष्ट्र निवडणूक प्रचारप्रमुख’ हे पद तयार करून त्यांच्या समितीत प्रत्येक पक्षाचे दोन-तीन याप्रमाणे सदस्य प्रचाराची दिशा ठरवतील. आणखीन पुढचा प्रश्न येईल तो जाहीरनामा. एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे की, ‘जाहीरनामा’ हा एक उपचार आहे. कोणत्याही निवडणुकीत जाहीरनामा वाचून मतदार मतदान करीत नाहीत. तरीसुद्धा उद्या सरकार आले तर तुमचे धोरण काय राहणार? हे मतदाराला विचारता येईल, असा तो दस्तावेज असतो. म्हणून जाहीरनामा समिती ही एका पक्षाची न करता किंवा पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा न करता  ‘महाविकास आघाडीचा जाहीरनामा’  या सूत्राने जाहीरनामा तयार केला तर तिन्ही पक्ष एकजीव होवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, पक्षाभिमान बाजूला ठेवून ठरलेले ध्येय साध्य करताना अहंकाराला मुरड घातलेली आहे, याचा प्रत्यय मतदारांना जाणवला पाहिजे.

जे कराल ते मनापासून करा.आपल्याला जिंकायचे आहे, या जिद्दीने करा. पाट्या टाकण्याचे काम म्हणून कोणतीही गोष्ट होता कामा नये. जीव घालून प्रत्येक विषय हाताळला तर वातावरण तयार व्हायला वेळ लागणार नाही. पवारसाहेबांनी स्वत: बैठक बाेलावली. उद्धव ठाकरे बैठकीला त्यांच्या घरी आले.  हाच एक चांगला संदेश महाराष्ट्रात जातोय. पुढची बैठक उद्धवसाहेबांच्या घरी घ्या. तिथे पवारसाहेब हमखास जातील. पुढची बैठक नाना पटोले यांच्या घरी घ्या. या सगळ्या विषयाला घरगुती स्वरूप दिले तर….पक्ष कार्यालयापेक्षा घरी होणाऱ्या बैठका अधिक मनमोकळ्या होतील.  पक्षीय अहंकार एकदम गळून पडतील. शिवाय मर्यादित संख्येत अशा बैठका विषयाला धरून होतील. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयात बैठक ठेवली तर मग अरे, भाऊसाहेब आले…. अरे, रावसाहेब आले… अरे, अण्णासाहेब आले… अशी गर्दी वाढत जाईल. लोक घुसत जातील. प्रत्येकाला पुढे-पुढे करायला हवे असते. शिवाय अलिकडे प्रत्येक बैठकीत कॅमेरे लागलेले असल्याने या ‘दांडेकरां’समोर आपला चेहरा दाखवण्याची हौस असलेले खूप असतात. म्हणून अनावश्यक गर्दी टाळा. दर १५ दिवसांनी अशी बैठक होईल..किंवा नेते जसा दिवस ठरवतील त्याप्रमाणे. एका शिस्तीत हे सगळे निर्णय बांधून घ्या.

पुढचा मुद्दा प्रचाराचा. एकदा आघाडीचा उमेदवार  म्हटले की, पक्षाचे वाटे पडता कामा नयेत. शिवसेनेतर्फे जो उमेदवार असेल त्याच्या सभेला पवारसाहेबही असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील. राष्ट्रवादी – काँग्रेसच्या उमेदवारांच्या सभेला उद्धव ठाकरे असतील… हे सांगण्याचा उद्देश असा की, उमेदवार आघाडीचा आहे. हा परिणाम मनावर ठसवण्याकरिता याची फार आवश्यकता आहे. आजच एक बातमी वाचली की, आघाडीच्या पहिल्या एकत्रित सभेला कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला जाणार आहे. कल्पना चांगली आहे. त्यांना याच सभेपुरते आणा.  एकदा प्रचार सुरू झाला की, ज्या १५-१६ राज्यात बिगरभाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आमंत्रित करण्याच्या भानगडीत पडू नका. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार करावा. बाहेरच्यांची गरज नाही. इथल्या लोकांचे प्रश्न इथल्याच लोकांना माहिती आहेत. म्हणून बाहेरचे लोक आणणे टाळा.

आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेची निवडणूक मे २०२४ मध्ये आहे. विधानसभा ऑक्टोबर २०२४ मध्ये आहेत. कदाचित या दोन्ही निवडणुका एकत्र होतील. पण, आता ती शक्यता नाही. तेव्हा महाविकास आघाडीने आगोदर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या ४८ जागावाटपाचे सूत्र सुद्धा ठरवून घ्यावे. आणि त्याच नियमाप्रमाणे ते असावे. २०१९ च्या निवडणुकीत ज्या आघाडीतील पक्षांनी ज्या जागा जिंकल्या, ती जागा त्यांना आणि क्रमांक दोनची जागा ज्या पक्षाला असेल ती जागा त्या पक्षाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आघाडीने इतर राज्यांच्या बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले तरी चालू शकेल. मात्र विधानसभेाठी आपलेच लोक पुरेसे आहेत. शिवाय आणखीन एक मत व्यक्त करतो. माझा सल्ला कोणी विचारलेला नसल्यामुळे सल्ला देत नाही. पण, अनुभव म्हणून सांगतो. ज्या गावात प्रचारसभा असेल त्या गावातील प्रचारसभेला आघाडीचे नेते गेले की, त्यांनी त्या गावातील हॉटेलमध्ये न थांबता त्या त्या पक्षाच्या उमेदवाराच्या घरी किंवा कार्यकर्त्याच्या घरी थांबावे. जशी आणि जितकी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेला आपले मानून घरच्यासारखा वावर तिथे झाला तर कसा फरक पडतो बघा….  एक आठवण मुद्दाम सांगतो. मी तेव्हा लहान होतो. म्हणजे १३ वर्षांचा. १९५२ ची लोकसभेची निवडणूक. आमच्या त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्यातून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसने पाठींबा  दिलेले डॉ. चिंतामणराव देशमुख (पहिले अर्थमंत्री) उभे होते. पेण येथे प्रचाराला गेले असताना ते रामभाऊ मंडलिक यांच्या घरी उतरले. मंडलिक यांचे  घर म्हण, बाहेर पडवी. मग ओटी आणि मग स्वयंपाक घर. पायजमा आणि बंडीवर चिंतामणराव रामभाऊंच्या ओटीवर आराम खूर्चीत घरच्यासारखे बसून वावरत होते. त्यावेळच्या बातम्या अजूनही लक्षात आहेत… पेण गावातील लोक चिंतामणराव यांना बघायला मंडलिकांच्या घरी ‘ही’ गर्दी करून आले. आठवण मुद्दाम का सांगतोय, नेत्यांनी कार्यकर्त्यासारखे वावरले तर त्याचा परिणाम फार वेगळा होतो. पूर्वी ‘सर्किट हाऊस’ नव्हती.  नेत्याने कार्यकर्त्याच्या घरी उतरणे, हाच रिवाज होता आणि त्याचा सगळ्या गावाला आनंद वाटायचा. शे. का. पक्षाचे फार मोठे नेते भाऊसाहेब राऊत हे त्यावेळी कोट्यधीश होते. पण निवडणूक प्रचारात बैलगाडीतून प्रचाराला जायचे. वातावरण निर्मितीसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शिवाय निवडणूक म्हणजे दोन राष्ट्रांचे युद्ध नाही. विरोधकही आपला मित्र आहे,या भावनेने ती लढवली पाहिजे.

शेवटचा मुद्दा सांगून थांबतो…

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई  मतदारसंघात जॉर्ज फर्नांडिस उभे होते. विरोधात होते काँग्रेसचे केंद्रीय मंत्री. स. का. पाटील. जॅार्ज पराभूत होणार असेच वातावरण होते. जॅार्ज यांनी एक पोस्टर काढले. ‘तुम्हीच स. का. पाटील यांना पाडू शकता… ’ या पोस्टरने धुमाकूळ घातला. वातावरण बदलले. प्रचार टिपेवर आला असताना जॅार्जची दाढ दूखू लागली. तेव्हा स. का. पाटील राहत असलेल्या नरिमन पॅाईंटच्या ‘कस्तुरी’ इमारतीत असलेले दंतचिकित्सक डॉ. दस्तुर यांच्याकडे जॅार्ज दाढ दाखवायला गेले. सोबत मी होतो. लिफ्ट खालच्या मजल्यावर आल्यावर त्यातून स. का. पाटील बाहेर आले.  त्यांना पाहताच जॅार्ज जाेरात म्हणाला, ‘मिस्टर एस. के. पाटील, आय विल डिफिट यू… ’ स. का. पाटील यांनी नमस्कार करून शांतपणे ते म्हणाले, ‘इफ सो… आय विल काँग्रेज्युलेट यू…’ आणि स. का. पाटील ३० हजार मतांनी पराभूत झाल्यावर जॅार्ज यांना अभिनंदनाचा पहिला फोन आला तो, स. का. पाटील यांचा होता.

निवडणूक कशी लढवावी,आणि वातावरण कसे ठेवावे… याचे अनेक िकस्से आहेत. ते कधीतरी सांगता येतील. सध्या एवढेच सांगणे आहे की, आता कसलेही वाद न करता दीड वर्ष महाविकास आघाडी टिकवा आणि महाराष्ट्राच्या पुरागामी परंपरेला साजेल असा विजय मिळवा. महाराष्ट्राला आणखीन काही नको आहे..

सध्या एवढेच…

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9869239977

Previous articleडिजीटल गर्लफ्रेंड : आभास हा नवा !
Next articleसुनीती देव : जशी होती तशी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.