पवारांच्या रागावण्याची गोष्ट

-विजय चोरमारे
…………………………………

शरद पवार पत्रकारावर संतापले याची बातमी आज सगळीकडं जोरदार आहे. पक्षातील लोक सोडून जाताहेत म्हणून पवारांचा तोल गेला असंही कुणी म्हणत आहे. ‘नेत्यांबरोबर तुमचे नातेवाईकही पक्ष सोडून जात आहेत’, या प्रश्नावर शरद पवार भडकले. ‘इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं? तुम्ही असा प्रश्न विचारूच कसा शकता?’ असे म्हणत पवार पत्रकारपरिषदेतून उठून जाऊ लागले.
पवारांनी असं वागणं बरं आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे देता येईल. त्यांच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. पण सगळा दोष पवारांच्या माथी मारून पत्रकारांना नामानिराळे राहता येणार नाही.
पवारांचा असा संतापण्याचा प्रकार मी एकदा पाहिलाय आणि एकवेळचा ऐकलाय. आणि पवार वारंवार पत्रकारांवर रागावत असल्याचे कानावरही आले आहे. अर्थात पवारांची ही चिडचिड त्यांच्या आजारपणानंतर पाहायला मिळत होती.

२००४ च्या निवडणुकीवेळी कोल्हापुरात त्यांची पत्रकारपरिषद होती. एक ज्येष्ठ पत्रकार त्यांना तालुका पातळीवरील दोन नेत्यांच्या मुलांच्या राजकीय हालचालींच्या संदर्भाने विचारत होते. पवारांनी त्याबाबत एक, दोन, तीन प्रश्नांची उत्तरे शांतपणे दिली. संबंधित पत्रकार तोच प्रश्न पुढे चालवू लागला तेव्हा पवार भडकले. तुम्हाला काही कॉमन सेन्स आहे का ? तुम्ही तेच तेच काय विचारता? चाळीस वर्षे संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्याला गावपातळीवरचे किती विचारता? ते ठाकरेंच्या पोरांना विचारता ते मला विचारता का? असं खूप काही बोलले. आमच्या पत्रकार मित्रानं आगळीक केली होती त्यामुळं पवारांचं ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता.
तर हा एक माझ्यासामक्ष घडलेला प्रकार.

आणखी एक तपशीलवार ऐकलेला प्रसंग आहे
२००९च्या निवडणुकीवेळी बारामतीमधला. अजित पवार यांनी कलमाडी यांचा प्रचार केला नाही त्यासंदर्भातील प्रश्न होता. पवारांनी त्याचे उत्तर दिले. पक्षाच्या अध्यक्षांनी प्रचार केल्यानंतर बाकी कुणी प्रचार केला किंवा नाही याला अर्थ नसतो, असे उत्तर पवार यांनी दिले होते. त्यानंतरही संबंधित पत्रकाराने तोच प्रश्न लावून धरल्यानंतर पवार भडकले होते.

श्रीरामपूरमध्ये नातेवाईकांचा संदर्भ आल्यामुळे ते भडकले. पवारांना शांतपणे त्या प्रश्नाचे उत्तर देता आले असते. आणि पवार रागावल्यानंतर तिथं शांतता असायला हवी होती. परंतु त्यानंतरही संबंधित पत्रकार ‘नातेवाईक’ हा शब्द उच्चारून काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता, हे उद्धटपणाचे होते. पवारांसारख्या नेत्याच्या सभ्यपणाचा गैरफायदा घेण्यासारखे होते.
शरद पवार पत्रकारांना सहज उपलब्ध असतात. नातवाच्या वयाच्या पोरसवदा पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचेही उत्तर देत असतात. त्यांच्या आवडीच्या विषयांनी खुलवत नेले की पुढे कितीही अवघड, नाजूक प्रश्नांचीही मोकळेपणाने उत्तरे देत असतात. परंतु कुणी सुरुवातच वाकड्यात जाऊन केली तर त्यांचे बिनसते आणि मग ते खुलत नाहीत.

पवार हे प्रसिद्धीलोलुप नेते नाहीत, परंतु पत्रकारांना टाळतही नाहीत. पवारांच्या आजच्या वागण्यावर टीकाटिप्पणी करणारे अनेकदा राज ठाकरे यांचे टोले खाऊन निर्लज्जपणे हसून आलेले असतील. शिवसैनिकांनी पत्रकारांना बडवल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या कलावंत मनाचे न थकता कौतुक करणारेही असतील.
अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेला जाऊन ‘आवळे शिजल्यामुळे’ एकही प्रश्न न विचारता परत आले असतील. किंवा त्यांनीच दिलेले छापील प्रश्न विचारून मुलाखत घेणारे असतील. डार्लिंग मोदींनी अद्याप पत्रकारांच्या एकाही त्रयस्थ प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही हेही त्यांना आठवत नसेल. परंतु एवढे सगळे असूनही पवारांचा कसा तोल गेला आहे हे सांगण्यात अनेकांना धन्यता वाटत असेल.

थोडा तिरका प्रश्न आला तर प्रमोद महाजन, अर्जुन सिंग वगैरे तोंडावर पत्रकाराची अब्रू काढत होते. शिवसेनाप्रमुख अपमानजनक बोलून गप्प करत होते. राज ठाकरेही तेच करतात. उद्धव ठाकरे भलतेच काहीतरी सांगून कल्टी मारतात. एकटे शरद पवार सगळ्या प्रश्नांची नीट तपशीलवार उत्तरे देतात. कुणी आगाऊपणा केला तर मात्र सटकतात. अर्थात अलीकडे आजारपणानंतर झालेला हा बदल आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे.

ता. क. : इथं माध्यमातल्या लोकांची एक गंमत नोंदवावीशी वाटते. बरेच आमदार खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडून चाललेत. त्यावरून हे पक्ष कसे काय वाईट ठरतात किंवा टार्गेट होऊ शकतात? स्वार्थासाठी पक्ष सोडून सत्तेच्या वळचणीला जाणारे टीकेचे लक्ष्य व्हायला पाहिजेत. भ्रष्ट संधीसाधू लोकांना पक्षात घेणारे टार्गेट व्हायला पाहिजेत. पण घडतेय उलटेच. जाणारे, घेणारे नामानिराळे. आणि आव्हानात्मक परिस्थितीत लढताहेत तेच यांच्या निशाण्यावर ! त्या उदयनराजेंना का कुणी विचारत नाही, की परवापर्यंत ईव्हीएमच्या झोलवरून राजीनामा द्यायला निघालेले तुंम्ही एकाएकी झोल करणारांचा झोला पकडून का चालला आहात? पण हे कुणी विचारणार नाही आणि गमतीगमतीनं विचारलं तरी ते जे काही थिल्लर उत्तर देतील त्यावर फिदीफिदी हसुन दाद देतील.

कमरेचे डोक्याला गुंडाळून व्यवसायाची वाय झेड करून टाकलीच आहे. पण जनाची नाही किमान मनाची तरी!!

(लेखक महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक आहेत)

95949 99456

शरद पवार पत्रकारावर नाराज का झालेत त्याचा हा Video. क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=6Ho_7–41nM

Previous articleपवारांच्या ‘सभ्य’पणाची गोष्ट
Next articleतिसरा अँगल-शरद पवार का रागावले? 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here