पवार पत्रकारांवर रागावतात, त्याची बातमी होते!

साभार- दैनिक दिव्य मराठी

– संजय आवटे
—————————————

शिखराची चिंता शरद पवारांनी आता करू नये. त्यांचे ‘बेसिक’ मात्र त्यांना खुणावते आहे. ही वेळ रागावण्याची नाही. हीच तर खरी संधी आहे, त्यांनी स्वतःला शोधण्याची, खोदण्याची.
——
शरद पवार पत्रकारांवर रागावले. त्याची बातमी झाली.
राज ठाकरे पत्रकारांवर ‘ऑन एअर’ भडकले तरी ती बातमी होत नाही. नरेंद्र मोदी पत्रकारांना मोजतही नाहीत. त्याची बातमी होत नाही. अमित शहा पत्रकारांना जुमानत नाहीत. त्याची बातमी होण्याचा प्रश्नच नाही. पवार पत्रकारांवर रागावतात. त्याची बातमी होते. मुद्दा असा आहे की, सुसंस्कृत संयमाची अपेक्षा पवारांकडून आहे. आणि, ते खरेही आहे. गेल्या इतक्या वर्षांत जेवढी टीका पवारांवर झाली, तेवढी कोणावरही झाली नसेल. जेवढी थट्टा पवारांची झाली, तेवढी महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याची केली गेली नसेल. कोणत्याही राज्याच्या लाडक्या नेत्याच्या कानशीलात लगावली गेली नसेल. आणि, तरीही ‘शांत राहा’, असे आवाहन पवार करू शकतात!

एवढी टीका होऊनही त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार कधी बोलले नाहीत. ‘बारामतीचा बाजीराव’ असे अग्रलेख पवारांवर लिहिणारे पत्रपंडित होते, तेव्हाही पवार त्या संपादकांविषयीचा आदरभावच बाळगून होते. एवढी टीका होऊनही पवारांचे स्थान कधी ढळले नाही. अशा दर्जाचा दुसरा नेता महाराष्ट्रानेच काय, देशाने पाहिलेला नाही. ‘पवार संपले’च्या आरोळ्या होत राहिल्या, पण पवार पुढे पुढे जात राहिले आणि त्यांचे स्थान अधिकच बळकट होत गेले. त्यांच्या जागी अन्य नेता असता, तर तो केंव्हाच इतिहासजमा झाला असता, पण पवार मात्र समकालीन राहिले. ‘रिलिव्हंट’ राहिले. बदलत्या परिस्थितीतही स्वतःचे स्थान राखून पुढे जात राहिले.

***

पवारांचे हे मोठेपण खरेच.

पण, आज ते कमालीचे अस्वस्थ आहेत, कारण त्यांची माणसं त्यांना सोडून जात आहेत. आयुष्याच्या या वळणावर आपल्या एकेका माणसाने अशी साथ सोडणे किती क्लेशकारक असते, हे पवारांशिवाय अन्य कोणाला समजणार नाही.

देशाच्या राजकारणातला हा अखेरचा नेता आहे, जो माणसांनी सिद्ध केला आहे. त्याच्यात त्या माणसांचे सगळे गुण आहेत आणि त्याच मातीतले सगळे अवगुणही आहेत. पण मुळात मातीत उगवलेला असा हा नेता आहे. कोणत्याही ‘इमेज मेकिंग कंपनी’ने नव्हे, वा कोणाच्या पोटी जन्मल्याने नव्हे, तर माणसांनी उभा केलेला हा नेता आहे. ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या’ वा ‘इलेक्शन मॅनेजमेंट गुरू’ने नव्हे, स्वतःच या स्थानापर्यंत पोहोचलेला असा हा नेता आहे. माणसांच्या गोतावळ्यातून, मित्रांच्या मैफलीतून, मातीतील हितसंबंधांतून सेंद्रिय पद्धतीने आकार घेतलेला असा हा नायक आहे. नेता जन्माला घालण्याच्या नव्या पद्धती जन्माला येत असताना, अशा प्रकारचा नेता हा आता इतिहास वाटावा, अशी ही प्रक्रिया आहे.

अवघ्या महाराष्ट्राला शरद पवार या नावाचे अप्रूप आहे. राजकारण नावाची गोष्ट महाराष्ट्राला शिकवली ती या नावाने. कोणत्याही मैफलीत जेव्हा अन्य विषय नसतात वा मैफल कोणत्याही विषयाने खुलत नाही, तेव्हा कोणीतरी हे नाव उच्चारते आणि मैफलीत रंग भरू लागतात. या नावाबद्दल टोकाची मते असू शकतात. पण, दोन्ही टोकांना त्या विषयीच्या चर्चेत तेवढाच रस असतो. मराठी माणूस तसा स्थितप्रज्ञ आणि ‘ठेविले अनंते’च्या जातकुळीतला. पण, त्याचा राजकारणातला रस वाढवला तो शरद पवार या नावाने. एखादे उत्तेजक द्रव्य घ्यावे, अशी त्याची राजकारणाविषयीची नशा निर्माण केली, तीही याच नावाने. आदरवाइज, जेव्हा आयएएस वगैरेही करिअरचे मार्ग ठाऊक नव्हते आणि पन्नासाव्या वर्षी हेडमास्तर होणे, हे आकांक्षेचे मध्यमवर्गीय अत्युच्च टोक होते, अशा वेळी ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री होणे, ही लोकांसाठी एखादी ‘फॅंटसी’ होती. आणि, राजकारणाला खेळाचा थरार असू शकतो, ही तर विटीदांडू खेळत बसलेल्या मराठी माणसासाठी ‘डिस्कव्हरी’ होती. खेळाच्या कोणत्याही चौकटीत न रमलेल्या आणि खेळाचे नियम स्वतःच तयार करणा-या शरद पवार या खेळियाने राजकारणाविषयीचे कुतुहलच वाढवून ठेवले. एखाद्या जादूगाराप्रमाणे लोक शरद पवारांकडे पाहू लागले!

***

शिवाय, हा नेता कसा! हमीद दलवाईंसारख्या सुधारकाची पाठराखण केल्याने व्होटबॅंक हातची जाईल, हे ठाऊक असूनही त्यांची सोबत करणारा, ओमर अब्दुल्लांना मानसपुत्राचं प्रेम देणारा, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी किंमत चुकवणारा. पंचायत राज व्यवस्थेत महिलांच्या आरक्षणानं सारी सरंजामी- पुरुषसत्ताक व्यवस्था दुखावणार असूनही तो निर्णय घेणारा. व्यक्तिगत आयुष्यात एका मुलीवर नसबंदी करून घेणारा. हातात गंडादोरा नसणारा नि कर्मकांडं वगैरे काहीही न मानणारा. गोविंद तळवळकरांपासून ते महानोरांपर्यंत, अंबानींपासून नारळीकर आणि अगदी पुलं- सुनीताबाईंपर्यंत सर्वांशी मैत्र असणारा असा नेता.

किती दंतकथा तयार केल्या महाराष्ट्रानं! तुम्ही कोणतंही पीक सांगा नि फक्त प्रॉब्लेम सांगा, साहेब तुम्हाला औषध सांगतील, इथपासून ते असं एक गाव सांगा, ज्या गावातला किमान एक माणूस साहेब सांगू शकणार नाहीत! आणि, ते खोटं होतं असंही नाही. दिल्लीत राजकारण करतानाच एका रात्रीत सोमेश्वर साखर कारखानाही ताब्यात घेणा-या पवारांचा आवाका किती विलक्षण आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती. एखादा चमत्कार वाटावा, अशी स्मरणशक्ती, एकाच वेळी सगळ्या आघाड्यांवर काम करण्याची युक्ती, हे सगळंच असाधारण होतं. शरद पवारांनी राजकारणाला वलय मिळवून दिलं. तोवर राजकारण ही एकतर तपस्या होती किंवा निष्ठा, पैसे मिळवण्याची जागा होती किंवा सरंजामी मनसबदारी. पवारांनी त्याला करिअरचं वलय मिळवून दिलं. गळ्यात सोन्याची चेन नाही वा हातात ब्रेसलेट नाही, २४ तास राजकारण करणारा असाधारण क्षमतेचा ‘स्टेट्समन’ अशी त्यांची प्रतिमा उभी राहिली. पवारांच्या व्यक्तिमत्त्वात ना ‘एक्स फॅक्टर’, ना चुंबकीय वक्तृत्व; पण एखाद्या कार्यक्रमाला पवार आहेत, एवढ्या बातमीनंच तो सोहळा अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरू लागला. पवार नावाचं वलय वाढतच गेलं.

***
२०१४ च्या लोकसभेनं सगळी सूत्रं फिरवली. नरेंद्र मोदींनी राजकारणाची सगळी स्पेस घेऊन टाकली. शरद पवारांच्या पक्षाची पार दैना उडाली. पण, कायम ‘रिलिव्हंट’ राहाण्याच्या त्यांच्या स्वभावानं त्यांनी त्या फेजवरही मात केली. असाध्य आजारावर मात करणा-या विजिगिषु वृत्तीनं स्वतःला सावरत पवार नव्या व्यवस्थेतही महत्त्वाचे ठरले. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊनही, भाजपला बाहेरुन पाठिंबा ऑफर करत त्यांनी स्वतःचा ‘रिलिव्हन्स’ कायम ठेवला. मग कधी मोदी, तर कधी जेटलींनी बारामतीचं कौतुक करावं, कधी साक्षात मोदींनी पवारांना गुरुपद बहाल करावं, अशातून स्वतःचा ‘इगो’ खुलवत पवार अमृतमहोत्सव साजरा करू लागले. ‘लोक माझे सांगाती’, असे सांगू लागले.

पण, तोवर राजकारणाचा अवघा पटच बदलला होता. पवारांच्या हातातून खेळ निसटला होता. आपलाच वापर होतोय, हे समजेपर्यंत एकेक विकेट जाऊ लागली होती. मुळात, पवार राजकारणात आले, ते एका निष्ठेनं. तो काळच भारावलेला होता. स्वातंत्र्यचळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व पवारांच्या भवताली होतं. घरात समाजवादाचा विचार होता. तो वारसा घेऊन पवार राजकारणाच्या रणांगणात उतरले. मुळातलं धुरंदर, मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व आणि जोडीला राजकारणासारखं रणांगण. मग त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही.

पण, पुढं भलतंच घडत गेलं.

पॅशन आणि निष्ठा यापेक्षाही ते या खेळातच अडकत गेले. रोजच्या नव्या खेळीने स्वतःवर खुश होत गेले. लोक वेड्यासारखे टाळ्या पिटत गेले. त्या खेळाची नशा अशी लोकविलक्षण, की खेळाचे प्रयोजनच ते स्वतःही विसरत गेले. माणसांपेक्षाही मग स्कोरबोर्डावरचे आकडे मोठे होत गेले. हळूहळू त्यांच्यासोबत अशाच खिलाडींची टीम जमत गेली. हमखास मॅच जिंकून देणारा कॅप्टन म्हणून बाकीचे गल्ली कॅप्टन त्यांच्याभोवती जमा झाले. त्या गल्ली चॅम्पियन्सना मॅच जिंकण्यात रस होता. आणि, हा कॅप्टन कोणतीही मॅच जिंकून देणारा होता. समोर सोनिया असोत वा दालमिया, आपला कॅप्टन कधी हरणार नाहीच, म्हणून तर ते गोळा झाले होते. कॅप्टनलाही त्याचे भान कधी आले नाही. त्याच्या नशेत तो बेधुंद होता. प्रत्येक डाव जिंकत होता. हरणारी खेळीही खिशात घालत बाजीगर ठरत होता!

२०१४ ला मॅच हातातून निसटली, तेव्हा तरी त्याने सावध व्हायला हवे होते. आत्ममग्नतेच्या नशेतून बाहेर यायला हवे होते. पण, तसे घडले नाही. स्वातंत्र्यचळवळीचा वारसा असलेल्या या नेत्याने तेव्हा नवे स्वातंत्र्ययुद्ध उभे करायला हवे होते. ती त्याची क्षमता होती. ती त्याची मूळ प्रेरणा होती. पण, क्रिकेटपासून शेअर मार्केटपर्यंत सगळ्यांशी नाते असलेल्या या नेत्याकडे तोवर गमावण्यासारखेही बरेच काही होते. आणि, मुख्य म्हणजे या नशेतून बाहेर पडणे सोपे नव्हते. नवी व्यवस्थाही साहेबांच्या शब्दाबाहेर नाही, असे पर्सेप्शन असलेले अनेकजण त्यामुळेच साहेबांना प्रमाण मानत राहिले. नको तेवढे सावध असणारे साहेब या नशेत बेसावध राहिले. त्यांना जाग आली, तेव्हा त्यांनी अखेरचा प्रयत्न केला. निकराचा प्रयत्न केला. पूर्ण शक्तीनिशी केला. पण, तोवर डाव संपला होता. सारे होत्याचे नव्हते झाले.

हा कॅप्टन आता जिंकून देऊ शकत नाही, ही खात्री पटताच उंदरांनी जहाज सोडले. बाकी सारे खिलाडी अजिंक्य संघात गेले. आणि, कॅप्टन एकटा राहिला. एकाकी राहिला.

यशवंतरावांच्या अखेरच्या एकाकीपणाचा खोल ठसा शरद पवारांवर आहे. त्यामुळे ते कायम ‘रिलिव्हन्ट’ राहाण्याचा प्रयत्न करत असतात. कायम सत्तेसोबत असण्याचा प्रयत्न करत असतात. तो प्रयत्न त्यांनी गेली काही वर्षे केला. पण, त्यातून गाढव गेलं नि ब्रह्मचर्यही.

***

आज साहेब एकाकी आहेत.

त्यांच्या हातात वय नाही. परिस्थिती अजिबात अनुकूल नाही.

पण, त्यांनी रागावून चालणार नाही. जहाज सोडून चालणार नाही.

खेळाच्या नशेपेक्षा आज त्यांना आठवावी लागणार आहे ती पॅशन, ज्यासाठी ते राजकारणात आले. ती कमिटमेंट, ज्यासाठी व्होटबॅंक झुगारून ते विचारांसोबत गेले. स्वातंत्र्यलढ्याचा तो वारसा, ज्याने त्यांना बुलंद केले. समाजवादाचा संस्कार, ज्यामुळे त्यांचे सामान्य माणसाशी नाते कायम राहिले. इथला सर्वसामान्य माणूस, साधा शेतकरी, ज्यासाठी ते धावून गेले. भूकंपानंतरही न हादरलेले आणि नव्हत्याचे होते करणारे शरद पवार त्यांना स्वतःला आठवावे लागतील. घरात खायची वानवा असलेली पोरं आमदार झाली, खासदार झाली, कारण लोक त्यांच्या पाठिशी उभे राहिले, हे शरद पवारांना आठवावे लागेल. सत्तेशी आणि व्यवस्थेशी नातं सांगत ‘रिलिव्हन्ट’ होण्यापेक्षा हा संघर्ष त्यांना आठवावा लागेल. जो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत होता. या वयातही पवार असा संघर्ष उभा करू शकतात. आजच्या पराभवानं त्यांची खेळाची ‘नशा’ उतरली असेल, तर तेवढी आशा नक्कीच आहे.

***

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवारांनी २० वर्षांपूर्वी स्थापन केला, तेव्हा कोणीतरी म्हटलं होतं, ‘चला, आता एक तरी पक्ष असा स्थापन झाला, जो पवार फोडू शकणार नाहीत!’

पण, हाही पक्ष फुटला. अन्य कोणी नाही, तो पवारांनीच फोडला. त्यांच्या राजकारणाचाच तो अपरिहार्य परिपाक होता. राजकारणाची परिभाषा बदलल्यावर आणि राजकारणाचे रुपांतर नशिल्या, उत्तेजक खेळात झाल्यावर यापेक्षा काही घडणे अपेक्षित नसते. ‘राष्ट्रवादी’ हा मुळात पक्ष नव्हताच, ती ठिकठिकाणाच्या सरदारांनी स्वार्थासाठी, हितसंबंधांसाठी, जीव वाचवण्यासाठी, अस्तित्वासाठी केलेली आघाडी मात्र होती. तिचा जीव सत्तेत होता. सत्ता गेली, सरंजामदारांच्या या ढोंगी आघाडीचा जीव गेला.

पण, शरद पवारांच्या राजकारणाचा जीव त्यापेक्षा अधिक आहे. त्या राजकारणाचा पोत ओळखण्याची ही वेळ आहे. आजही महाराष्ट्रात, शिवसेना वगळता, राष्ट्रवादी कॉंग्रेसएवढे केडर कोणत्याही पक्षाकडे नाही. मुख्य म्हणजे, अशा स्वरूपाच्या पक्षाला एक मोठी स्पेस आहे (ती स्पेस भरून काढण्याच्या स्थितीत कॉंग्रेस नाही) आणि ती आजची आवश्यकताही आहे. सरदारांकडे पाठ फिरवून, या साध्यासुध्या पोरा-पोरींना बळ देत, निःसंगपणे पवार राजकारणात उभे राहिले, तर ते जिंकतील की नाही, हे माहीत नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात मात्र त्यांचे नाव गौरवाने लिहिले जाईल, जे कदाचित ते पंतप्रधान झाले असते, तरी लिहिले गेले नसते!

‘मी प्रचंड आशावादी.. मी राष्ट्रवादी’ असे म्हणताना,

“करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची

रणात आहेत झुंजणारे अजून काही!”

ही आशा पवारांनी तरी बाळगायला हवी.

शिखराची चिंता शरद पवारांनी आता करू नये. त्यांचे ‘बेसिक’ मात्र त्यांना खुणावते आहे. ही वेळ रागावण्याची नाही. हीच तर खरी संधी आहे, त्यांनी स्वतःला शोधण्याची, खोदण्याची

(-लेखक दैनिक दिव्य मराठीचे संपादक आहेत )

98812 56009

-शरद पवार पत्रकारावर नाराज का झालेत त्याचा हा Video. क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=6Ho_7–41nM

Previous articleतिसरा अँगल-शरद पवार का रागावले? 
Next articleफडणवीस आणि ठाकरे विरुद्ध पवार !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.