पाच बाय अडीच सेंटीमीटरमधला फोरप्ले…

मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८
-योजना यादव
आपल्याला समाज म्हणून सोसेल तेवढंच खरं वागायचं कंडिशनिंग झालंय. फार खरं कुणालाच पचत नाही. मग खरं वागण्याची खुमखुमी आली की काय करायचं ? शांत राहून ते खरं स्वतःतच मुरू द्यायचं. ते मुरवणं सोपं करण्याचं कामही या सीरियल करतात. उदाहरण म्हणून नेटफ्लिक्सवरच्याच ‘मास्टर्स ऑफ सेक्स’चं घेऊ. ही २०१३ मधली अमेरिकन मालिका . विल्यम मास्टर्स आणि वर्जिनिया जॉन्सन एका वेडानं झपाटतात. हे वेड कसलं ? तर निर्मितीचं मूळ असणाऱ्या संभोगाचं सांगोपांग विवेचन करण्याचं वेड. सेक्स आणि सेक्सभोवती असलेलं शुचितेचं वलय आणि मानसिक बांधिलकी यापलीकडे जाऊन त्यातली नैसर्गिकता शोधण्याचं वेड दोघांमध्ये असतं.  पण या संशोधनातली दोघांच्या कुटुंबांची भूमिका, सामाजिक दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर येणारी सामाजिक प्रतिक्रिया हे सगळंचं अनुभवताना आपल्या समाजानं सेक्ससंदर्भात डोळ्यांवर बांधलेल्या पट्ट्या बोचायला लागतात. पण हे बोचणं उमजूनही आपण काहीच करु शकत नाही.
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

मला कंटाळा आलाय. की थकवा आलाय ? किंवा कंटाळा आणि थकव्यात फरकच कळत नाहीये ?

कधी कधी मोबाईल स्क्रिनच्या पाच-बाय अडीच सेंटीमीटरच्या स्क्रिनमध्ये घुसून स्वतःला स्क्रिन लॉक करुन टाकावं वाटतं. किंवा दहाएक दिवस मोबाईलच हातात घेऊ नये…कुण्णा कुण्णाशी संपर्क करु नये , असं वाटतं. एकेकदा मोबाईलमध्ये आभासी जंजाळात हरवून जायला स्पेस हवी असते, तर कधी कधी मोबाईलपासूनच स्पेस हवी असते. मी गेम ऑफ  थ्रोन्सचे (म्हणजेच जीओटी )सात सिझन वीस दिवसात  पाहिले. ज्यांना अजून हे प्रकरण माहिती नाही, त्यांना थोडं इस्तार करुन सांगू (प्रूफ रिडरनं याचा विस्तार करुन आमच्या एक्सप्रेशन स्वातंत्र्य आणि एक्सप्रेशन methodology वर गदा आणू नये नये)…तर गेम ऑफ  थ्रोन्सच्या एका सिझनमध्ये दहा एपिसोड  असतात. एक एपिसोड  एक तासाचा असतो. म्हणजे एक सिझन सुमारे दहा तासांचा. सात सिझन म्हणजे सत्तर  तास. नऊ,साडे नाऊ किंवा दहा तास ऑफिस ,जेवणखाण आणि इतर गोष्टींचे पाचेक तास गेले की उरलेल्या वेळेत झोप किंवा गेम ऑफ  थ्रोन्स अशी स्पर्धा लागायची. पण रोज आठ तासाची झोप गरजेची असली तरी तिला compromise करायला लावायचं. पण जीओटी पहायचंच. ऑफिसमध्ये  अर्ध्या तासाच्या लंच ब्रेकमध्ये पाच मिनिटात जेवण उरकायचं. आणि उरलेली पंचवीस मिनिटं पुन्हा जीओटी. तर या सगळ्या प्रकरणात चार मुख्य अस्पेक्ट आहेत. मोबाईल,वेळ,जीओटी आणि माज. पहिले तीन तुम्हाला कळाले असतील. पण हे माज प्रकरण काय आहे ?असं तुम्ही विचाराल .

तर इतका जीव तोडून तुम्ही जीओटी पाहता त्याची प्रेरणाच हा माज असतो. म्हणजे तुमचे फेसबुकी इंटलेक्चुअल फ्रेंड उठसूट जीओटीबद्दल काहीबाही टाकत असतात, त्यांच्यात तुम्ही सासबहू बघणारे बहू ठरु नये, असं तुम्हाला वाटत असतं. बरं पूर्वी वाटणं वाटण्यावरच थांबायचं. आता आपल्याकडं वाटण्यावर लगेच पर्याय असतो. हल्ली आपलं कुठलं बी वाटणं सबस्क्रिपशनवर भागवून घेता येतं. नाही आलं तर आपली मित्रमंडळी त्याची सोय करतातच. कसंतरी करुन आपल्या मोबाईलची शान वाढवायला HOTSTAR आणि NETFLIX चं लॉग इन मिळतंच. तसं मग आपण लगेच कुणाला तरी ‘मेरे पास HOTSTAR है. NETFLIX है. तुम्हारे पास क्या है’ म्हणावं. आणि समोरच्यानं ‘माझ्याजवळ वेळंय म्हणावं’ मग आपल्यालाही आपला-आपला वेळ हवा हवा होतो. आणि आपण जगाला गां…. दाखवत खास आपला वेळ मिळवण्यासाठी धडपडू लागतो. फेसबुकी मित्रांना माहिती असलेली गोष्ट आपल्याला माहीत पाहिजेच म्हणून इतके कष्ट घेतो की वीस दिवसात आपल्याला सीन-न-सीन पाठ होतो. आणि मग तो ‘आम्ही जीओटी पाहणारे’चा माज शरीराच्या दोन सेंटीमीटरपर्यंत अलगद थर करुन बसतो. बसतो म्हणजे बसतोच. तो उतरु नये म्हणून मग जीओटी संपलं तरी आपण रोज नेटफ्लिक्सला लॉग इन  करुन नवं नवं शोधत रहातो. किंवा आपण काही नवं शोधतच नाही. चारी दिशा, चारी उपदिशा , आभाळ आणि पाताळातनं ते आपल्यावर आदळत असतं. अरे तू सेक्रेड गेम्स नाही पाहिलं ? अरे मास्टर्स ऑफ  सेक्समधली जॉन्सन कसली दिसते रे? अरे लस्ट स्टोरीतली करण जोहरची फिल्म च्युतियाय रे ? राधिका आपटे…आपटे…आपटे…मग नेटफ्लिक्सवरचे हे लोक आपल्यावर इतके आपटत राहतात की आपल्या भोवतीची माणसं थेट १८५७मधली नाहीतर १७५८ मधली वाटायला लागतात.

एखादं सत्य त्या एकट्याचं कधीच नसतं. डोकं वर करुन पाहिलं की त्या-त्या पिढीचं आयडेन्टिफिकेशन त्यात दिसायला लागतं. नेटफ्लिक्स ,इंटरनेट,आणि मोबाईलवरच्या भरमसाठ माऱ्यात जीव घुसमटला तरी तिथून निसटू न वाटण्याची मनोवस्था कदाचित आज अनेक जण अनुभवत असतील. पण हे इतकं वेड का लागतं? एक मोठा सामाजिक गट जेंव्हा एखाद्या गोष्टीनं झपाटून जातो, त्याची कारणमिमांसा त्या समाजाच्या रचनेत किंवा तिच्या रचनेतल्या दोषातच शोधायला हवीत. नेटफ्लिक्स किंवा तत्सम प्लॅटफार्म भारतात आले-आले म्हणेतो लोकप्रियतेच्या शिखरावर चढले. सिनेमा आणि सीरिअल पाहण्याच्या सामायिक आनंदाला या माध्यमांनी व्यक्तिवादी रुप दिलं. आणि प्रत्येकाच्या आवडीचं वर्गीकरण करुन त्याच्यासाठीचं  मनोरंजनाचं माध्यम उपलब्ध करुन दिलं. मार्किटिंगच्या भाषेत याला कस्टमायझेशनही म्हणतात. यातनं एकाच कुटुंबातल्या अनेक सदस्यांच्या आवडीतलं आणि विचारधारेतलं वैविध्य अधोरेखित होतं. पर्यायांच्या अभावानं आजवर कुटुंबातला कुणी ना कुणी एकमेकांच्या आवडीखातर तडजोड करत होतं, हे सिद्ध होतं. ती तडजोड या माध्यमानं संपवून टाकली. आज रिमोटसाठी भांडत बसायची गरज नाही. फक्त आपला आपला फोन घ्यायचा आणि एखादा कोपरा गाठायचा. प्रत्येकाला असा स्वतःपुरता भोवताल हवासा झालाय. या स्वतःपुरत्या भोवतालाचे संस्कार जितके वाढत जातील, तसा सामुहिक संस्कारांना गंज चढायला लागेल. कुठल्याच बदलांना निव्वळ कृष्णधवल परिणामांमध्ये पाहणं म्हणजे जजमेंटल होणं. मोबाईल फ्रेंडली मनोरंजनाच्या माध्यमांचा विचार करताना तर या जजमेंटल होण्याचाही कस लागणार आहे. या माध्यमातून दिसणारं मोकळेपण आणि भोवतालातल्या संकुचितपणातली तफावत अशी तारेवरची कसरत त्या माध्यमाच्या नादी लागणाऱ्या प्रत्येकाला करावी लागणार आहे. ती कशी…?

तथाकथित सामाजिक संकेतांतलं तकलादूपण लक्षात आलं की त्या समाजात वावरणं मुश्किल होतं. आणि नेटफ्लिक्स आणि तत्सम प्लॅटफार्मवरच्या बहुचर्चित सीरियल त्या संकेतांवरच प्रश्नचिन्ह उभं करतात. बुद्धिमत्तेचा कस लागावा इतक्या उच्च दर्जाच्या कथाबिजातून हे वेबीसोड अनेक सामाजिक दांभिकतांवर ओरखडे ओढतात. या विचारांची मांडणीही त्यांनी नितांत सुंदर कलात्मकतेत केलेली असते. त्यामुळं विचारप्रणालीतली स्पष्टता असणारा याकडे ओढला नाही गेला तरच नवल. सगळ्या सामाजिक प्रश्नांचं मूळ असणारी त्रिसूत्री अर्थात सेक्स ,क्राईम आणि पनिशमेंट हा या मांडणीतला प्रमूख धागा आहे. गेम ऑफ थ्रोन्समधे दिसणारा सत्तासंघर्ष भलेही काल्पनिक वाटत असेल, पण जीओटीतून दिसणारं सत्ता,सेक्स आणि क्राईमचं समीकरण सार्वकालिक सामाजिकतेचच प्रतीक आहे. विंटर इज कमिंग ही जीओटीची कॅचलाईन. हा विंटर एकटादुकटा येत नाही. तर त्यासोबत भुताखेतांची फौज चाल करुन येते. या भूतांसोबतचा कडवा संघर्ष म्हणजे थेट मृत्यूसोबतचा संघर्ष पुढ्यात वाढून ठेवलेला असताना जीओटीतले इतर राजेरजवाडे नसत्या सत्तासंघर्षात गुंतलेले आहेत. एकाबाजूनं मृत्यूपंथावरचं सैन्य चाल करून येत असताना ते विसरुन भ्रामक गोष्टींसाठी रंगलेली अहमहमिका जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर पहायला मिळते. त्याचचं कथात्म रुप म्हणजे जीओटी. म्हणूनच आधीच सामाजिक दांभिकतेनं आलेली अस्वस्थता जीओटी आणि इतर गोष्टी पाहून अधिक गहिरी होऊ लागते. पण हे पाहताना किमान एक समाधान असतं की आपल्या जाणिवांना सुसंगत वाटेल, अशी मांडणी करणारा एक गट जगाच्या पाठीवर आहे. याचा अर्थ आपले सहधर्मा कुठेतरी आहेत, ही जाणीव सुखावणारी असते. पण ते सहधर्मा आभासी जगात वावरत असतात. आणि जगणं वास्तवाच्या पातळीवर सुरु असतं. मग भोवतालाकडं पाठ फिरवून आपल्या वैचारिक स्पष्टतेचं आयडेन्टिफिकेशन ज्यात दिसतं त्यात हरवून जावंसं वाटतं. पण कालांतरानं हाही फसवा एकेरी संवाद वाटू लागतो. आपण फक्त बघे असतो. फक्त पाहत असतो. ऐकत असतो. त्यातनं आपल्यात जे उमटतं, त्याला मोकळं करायला फक्त आभासी डीजीटल माध्यमच असतं. आणि पुन्हा त्या संवादात नवं एकेरीपण येतं. म्हणूनच थकवा येऊ लागतो .

आपल्याला समाज म्हणून सोसेल तेवढंच खरं वागायचं कंडिशनिंग झालंय. फार खरं कुणालाच पचत नाही. मग खरं वागण्याची खुमखुमी आली की काय करायचं ? शांत राहून ते खरं स्वतःतच मुरू द्यायचं. ते मुरवणं सोपं करण्याचं कामही या सीरियल करतात. उदाहरण म्हणून नेटफ्लिक्सवरच्याच ‘मास्टर्स ऑफ सेक्स’चं घेऊ. ही २०१३ मधली अमेरिकन मालिका . विल्यम मास्टर्स आणि वर्जिनिया जॉन्सन एका वेडानं झपाटतात. हे वेड कसलं ? तर निर्मितीचं मूळ असणाऱ्या संभोगाचं सांगोपांग विवेचन करण्याचं वेड. सेक्स आणि सेक्सभोवती असलेलं शुचितेचं वलय आणि मानसिक बांधिलकी यापलीकडे जाऊन त्यातली नैसर्गिकता शोधण्याचं वेड दोघांमध्ये असतं. पण या संशोधनातली दोघांच्या कुटुंबांची भूमिका, सामाजिक दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर येणारी सामाजिक प्रतिक्रिया हे सगळंचं अनुभवताना आपल्या समाजानं सेक्ससंदर्भात डोळ्यांवर बांधलेल्या पट्ट्या बोचायला लागतात. पण हे बोचणं उमजूनही आपण काहीच करु शकत नाही. वर्जिनियाचं कन्विक्शन कुठल्याच समाजाला पचनी पडणारं नाही. सेक्ससंबंधीच्या संशोधनात पुरुषाचं असणं गैर वाटत नाही, पण त्यातला  वर्जिनियाचा सक्रिय सहभाग मात्र तिच्यासाठी प्रश्नांची मालिकाच घेऊन येते. त्यातही तिच्या विचारातली स्पष्टता आणि संशोधनातली भूमिका तिच्या लेकीच्या आयुष्यावर परिणाम करणारी ठरते. हे सगळं पाहताना कितीदा स्वतःला वर्जिनियाच्या जागी ठेवून पाहिलं मी. आणि तिनं भोगलेल्या परिणामांच्या जवळ जाणारं आपलं आयुष्य पाहून सेक्सबाबत समाज संक्रमितच होत नसल्याचं सतत जाणवत राहिलं.

नार्कोस आणि सेक्रेड गेम्स ….नेटफ्लिक्सवर गाजलेल्या आणखी दोन वेबसीरिज. सेक्स,क्राईम आणि पनिशमेंटला आणखी काळी किनार जोडणारा व्यापार म्हणजे ड्रग्ज. अंमली पदार्थांच्या व्यापारातला वारेमाप पैसा आणि त्याजोडीनं येणारी गुन्हेगारी वाट जागतिक वास्तव बनत चाललं आहे. या अमानवी विश्वातला सेक्सही तितकाच खुनशी पातळीवर गेलेला आहे. सेक्रेड गेम्समध्ये दिसणारं त्याचं प्रतिबिंब अंगावर शहारे आणतं. ही मालिका पहिल्या पोस्टरमध्येच हिट झाली . पण त्यात पोस्टरसोबत तिच्या नावातून झळकणारा लैंगिकतेचा खेळ स्पष्ट होत होताच, ती प्रक्षेपित होण्यापूर्वीच तिला मिळालेल्या लोकप्रियतेचं तेच गमक होतं. सेक्रेड गेम्स आल्यानंतर दोन गटातल्या चर्चांना उधाण आलं. काही जण यातल्या खुनशी लैंगिकतेच्या आणि  डीजीटल माध्यमाच्या रुपात बाई , बाटली आणि ड्रग्ज विकण्याच्या मानसिकतेवर बोट ठेवून याच्या सामाजिक परिणामाबाबत चिंतीत होते. तर दुसरीकडं तरुणांच्या प्रत्येक घोळक्यात सेक्रेड गेम्सनं मनोरंजनाच्या नव्या अनुभूतीचं रुप धारण केलं. पण सेक्रेड गेम्स काय किंवा आणखी एखादी वेबमालिका काय, हा साराच तत्कालिक लोकप्रियतेचा ओव्हरडोस असतो. रोज आदळणाऱ्या कंटेटच्या माऱ्यात समाजाचं स्मरण दुबळं व्हायला लागलंय. त्यामुळं इथून पुढच्या काळात कुठलीच कलाकृती दूरगामी परिणाम करणारी असेल का, हाच प्रश्न आहे.

कोणत्याही काळातली कला तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब असते, असं मानलं जातं. पण हल्लीची सामाजिक मानसिकताच वावटळीसारखी झालीये. त्यामुळं तिचं प्रतिबिंब असणाऱ्या कलेला मशरुम इतकं आयुष्य मिळणार हे ही सयुक्तिकच म्हणायला हवं. या सगळ्यात गोची फक्त स्थिरतेच्या अवकाशाची आस असणाऱ्या जिवांची होणार आहे. मी माझ्या एका कवितेत म्हंटलं होतं.

फॅण्टसीच्या अक्राळविक्राळ मादीची पिल्लं

सैरभैर फिरत रहातात मेंदूच्या दिवाणखान्यातून…

मोबाईलच्या पाच बाय अडीच स्क्रिनवरचं मनोरंजन असंच फॅण्टसीच्या मादीच्या पिल्लांचं सैरभैर धावणं आहे. त्यात समकालीन सामाजिक सिमरिंग आहेच. पण त्यातून निसटून एका शांत अवकाशाच्या शोधाची आसही आहे. तोवर नैतिक गप्पांच्या फडात रंगण्याचा पर्याय असतोच. जसे..

हे संबोधन नसलेल्या

प्रार्थनांचे दिवस

आगतिकतेच्या समेवर

शीघ्रपतन होणारा आवेग.

निमूट सरकत राहणारी

क्षणांच्या मुंग्यांची रांग

विवेकाचं उसनं अवसान

बकाल शहराचं

फुसकं फर्मान.

पॉलीथीनच्या पिशवीत कोंबून

कचऱ्यात टाकावं

इतकं टाकाऊ आयुष्य.

तरी आपण

नैतिक गप्पांचे फड रंगवू…

 

———————–

 

योजना यादव,

संपादक,मेहता पब्लिशिंग हाऊस

9579760123

[email protected]

 

Previous articleगांधी कथा
Next articleसाबरमतीत… सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.