पिसाटलेली पत्रकारिता !   

-प्रवीण बर्दापूरकर

माध्यमात आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स  माध्यमात लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली , पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे . अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) न आलेल्या समन्सवरुन देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी जो राजकीय इव्हेंट उभा केला त्यात माध्यमे आणि त्यातही विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या अलगद अडकल्यानं माध्यमांच्या विश्वासाहर्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उमटलं आहे . गायक त्याच्या गायकीतून , साहित्यिक त्याच्या निर्मितीतून , मूर्तीकार-चित्रकार त्याच्या कलाकृतीतून ओळखला जावा किंवा जातो तसंच पत्रकार त्याच्या बातमीतून , लेखनातून ओळखला जावा अशी अपेक्षा असते . स्पर्धेमुळे प्रकाश वृत्त वाहिन्यां ( न्यूज चॅनेल्स ) तसंच वेब पत्रकारितेत ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘लाईव्ह’चा धुमाकूळ सुरु असून त्यात मुद्रित माध्यमांचीही ससेहोलपट होतं असल्यानं सर्वच माध्यमांच्या वृत्तसंकलनात एक प्रकारचा ‘लोडेड’ पिसाटलेपणा आलाय . त्यामुळे माध्यमांचा तोल बिघडला आहे . अभ्यास करुन , नीट माहिती घेऊन नेमके प्रश्न विचारणं , सत्य लोकांसमोर आणणं आणि बातम्या चूक ठरणार नाहीत याची दक्षता घेणं पत्रकार/संपादक विसरले आहेत , असं सध्याचं चिंताजनक चित्र आहे .

शरद पवार यांचाच वर उल्लेख केलेला इव्हेंट घेऊ . राज्य सहकारी बँक गैरव्यवहारात शरद पवार यांच्या विरुद्ध गुहा दाखल झाल्यावर जो कांही इव्हेंट उभा केला गेला त्यात सगळी माध्यमे तारतम्य विसरली , पत्रकारितेच्या मूल्यांपासून दूर गेली . पहिला भाग असा की हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे . त्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर प्रदीर्घ काळ सुनावणी झाली , अनेक पुरावे सादर झाले . त्यावर विचार केल्यावर अखेर सुमारे सहा वर्षानंतर न्यायालयाचा निर्णय आला ; त्याप्रमाणे बँकेच्या अनेक माजी संचालकांवर  गुन्हे दाखल झाले . मूळ तक्रारीत शरद पवार यांचे नाव नाही हे खरंय पण , न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशात पान ६८ व ७९ वर शरद पवार यांच्या नावाचा ४ ठिकाणी उल्लेख आहे , याची खातरजमा पत्रकारांनी केली नाही . तक्रारीत नाव नसेल पण , चौकशी दरम्यान आलेल्या माहितीच्या/पुराव्याच्या आधारे आरोपींच्या यादीत आणखी कांही नावे जोडली जातात हे माहित असणारे जाणकार पत्रकार ( इंद्राणी मुखर्जीच्या चौकशीतून आलेल्या माहितीतूनच कॉंग्रेस नेते एम चिदंबरम अडकले असूनही ) आता उरले नाहीत असा त्याचा अर्थ आहे . म्हणूनच ‘मूळ तक्रारीत शरद पवार यांचं नाव नाही’ या ‘सरकारी संत’ अण्णा हजारे यांच्या विधानाला प्रसिद्धी देऊन शरद पवार यांना क्लीन चीट देण्याची घाई माध्यमांनी दाखवली . ही याचिका दाखल करणारे लातूर जिल्ह्यातील जेवरी येथील माणिक जाधव यांना किंवा संबधित वकिलाला गाठावं , त्यांच्याकडून नेमकी माहिती घ्यावी , असे पत्रकारांना सुचलं नाही आणि त्यांनी तसे करावे हे त्यांच्या संपादकांनीही सुचवले नाही , असं दिसून आलं .  राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी या निमित्तानं नरेंद्र मोदी  मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर राजकीय द्वेषबुद्धीचा आरोप केला पण , या चौकशीचे आदेश कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले शिवाय तेव्हा केंद्रात शरद पवार यांचाही  समावेश असलेले युपीएचे सरकार होते , या माहितीत तथ्य किती आणि त्याबाबत पवार यांना प्रश्न का विचारण्याचं जर्नालीस्टीक भान मात्र  माध्यमांना राहिलं नाही .

या घटनेचा राजकीय फायदा घेण्यात शरद पवार यांचं कांहीच चुकलेलं नाही ; तसा फायदा त्यांनी उठवला नसता तर त्यांना मुत्सद्दी राजकारणी म्हणताच आलं नसते . मंत्री , मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री असा शरद पवार यांचा दीर्घ प्रवास आहे . मंत्र्यांना न्यायिक  अधिकार असतात , अनेक प्रकरणात ते सुनावणी घेतात , न्याय-निवाडा करतात म्हणून चौकशी आणि न्यायिक प्रक्रिया याबद्दल शरद पवार अंधारात असणं शक्यच नाही . त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याकडे विनाबोलावणे जायचे नसते हे शरद पवार यांना अर्थातच  चांगलं ठाऊक असणारच . तरी त्यांनी स्वत:हून चौकशीला जात असल्याचं जाळं   फेकलं , ‘मुंबईत येऊ नका’ असं  कार्यकर्त्यांना सांगितलं . त्याचा अर्थ ‘या’ असा होतो हे त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाऊक आहे . म्हणून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईला धावले . सलग दोन लोकसभा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या आणि सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या शक्यतेमुळे विरोधी पक्षात आणि पक्षांतराच्या लाटेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला आलेली मरगळ व नैराश्य दूर करण्यासाठी शरद पवार यांनी नियोजनबद्ध रचलेली ती शक्तीप्रदर्शनाची यशस्वी झालेली ती खेळी होती . असं अचूक टायमिंग साधणारे आपल्या राज्यात तरी शरद पवार हेच एकमेव नेते आहेत . ‘शेर बुढा नाही होता’, हेच त्यांनी या खेळीतून दाखवून दिलं . माझ्या अंदाजाप्रमाणे शरद पवार अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात जाणारच नव्हते . मात्र , ठरवल्याप्रमाणे निवडणुकीच्या ऐन हंगामात दिवसभर प्रसिद्धीच्या झोत ओढावून घेण्यात ते यशस्वी ठरले .

लगेच अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचंसंकट उभं केलं आणि ते पवार कुटुंबीयांनी एकत्र बसून दूरही केलं ( असं म्हणायचं !) . राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला त्या बैठकीत प्रवेश दिला नाही . मग , अजित पवार यांच्या कथित राजीनाम्याचं संकट पवार कुटुंबापुरतं मर्यादित होतं का , ते संकट पक्षावरचं होतं तर त्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना प्रवेश का नव्हता ; माध्यमांनी अजित पवार यांच्या ओघळलेल्या अश्रूंची बातमी केली पण , राजकारणात भावना आणि नात्यांना स्थान नसते हे माहिती नाही का , असे अनेक प्रश्न पत्रकारांनी विचारले नाही . ‘दिल्लीश्वरांसमोर झुकणार नाही’ असं बाणेदारपणे शरद पवार म्हणाले . श्रीमती सोनिया गांधी परदेशी असण्याचा मुद्दा काढून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीनं श्रीमती सोनिया गांधी यांचं निर्विवाद नेतृत्व असलेल्या कॉंग्रेससमोर नमतं घेत सरकार का स्थापन केलं , युपीएचं नेतृत्व सोनिया गांधी याच्याकडे नव्हतं का , हे नेमके प्रश्न विचारायला पत्रकार शरद पवार यांना पत्रकार घाबरतात का ?

शिवसेनेचे ‘युवराज’ आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचं सध्या बरंच कौतुक आहे ; ते व्हायलाही हवं . शिवाय पक्षात दुसरं सत्ताकेंद्र घरातलंच असावे ही उद्धव ठाकरे यांची इच्छाही स्वाभाविकच आहे . आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याची तर घाई संजय राऊत यांना जाहीर उतावीळपणानं झाली आहे . निवडून आल्यावर गेला बाजार २९ वर्षीय आदित्य उपमुख्यमंत्री होतीलही पण , ज्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाऊन , वेळ प्रसंगी तुरुंगात जाऊन , बसनं फिरुन पक्ष वाढवला त्या अनेक ज्येष्ठांना बाजूला टाकत एकदम आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री का करायचं , जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला कुणी आणि कोणत्या खुंटीवर अडकवला ,  हे नेमके प्रश्न पत्रकार शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना विचारत नाहीत . एकीकडे भावना आणि नात्याला राजकारणात स्थान नाही असं म्हणत सेनेतून फुटून निघायचं आणि दुसरीकडे आदित्य यांच्या विरोधात मनसे उमेदवार का देणार नाही , निवडणूक लढवण्यासाठी ‘रायगडा’ला इतक्या उशीरा जाग का आली , लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा न करता भाजपच्या विरोधात प्रचार करण्याचा राजकीय आत्मघात का केला , हे नेमके प्रश्न राज ठाकरे यांना पत्रकार विचारत नाहीत . एकीकडे संविधानावर श्रद्धा आणि दुसरीकडे नक्षलवादाचे समर्थन का , तुमच्या ताठर भूमिकेमुळेच एमआयएम आणि कॉंग्रेससोबत वंचित आघाडीची युती झाली नाही , हे खरे आहे की नाही हे नेमके प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकार विचारत नाहीत .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर अनेक प्रश्न विचारले जातच नाहीत . समृद्धी मार्गापासून ते शेतकऱ्यांची कागदोपत्री झालेली कर्जमाफी असा तो व्यापक पट आहे . महाजनादेश यात्रेचा खर्च सरकारच्या तिजोरीतून झाला की पक्षाच्या , हा साधा पण, कळीचा प्रश्नही कुणी पत्रकार देवेंद्र फडणवीस यांना विचारत नाही . बहुसंख्य पत्रकार तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर शरण गेल्यासारखे झालेले आहेत .

एकंदरीत काय तर , नेमके प्रश्न न विचारले न जाण्याची लागण केवळ शरद पवार यांच्यापुरती मर्यादित नाही . नेमके प्रश्न विचारायला विसरणं हे लक्षण बाणेदार , विवेकी पत्रकारितेचं नाही ; कुणासमोर न झुकण्याचं , कुणाला तरी ‘फेवर’ करण्याचं किंवा दबाव असल्याचं हे लक्षण आहे . पत्रकारिता ;लोडेड’ आणि ‘गाइडेड’ झाल्यासारखी लख्खपणे  दिसते आहे . त्यामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर डाग पडतो हेही विद्यमान बहुसंख्य माध्यमकारांना ठाऊक नसावं , हे निश्चितच क्लेशदायक आहे  . ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ संपादक , दिवंगत डॉ. अरुण टिकेकर यांच्या ‘लोडेड पत्रकार हा दलाल असतो’ या म्हणण्याची अशा वेळी आठवण होते .

माध्यमांच्या आणि त्यातही प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या किती बातम्या खऱ्या ठरल्या नसतील किंवा ठरत नाहीत हा आंकडा खूपच मोठा आहे . गेल्या साडेचार वर्षात राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या किती बातम्या खऱ्या ठरल्या ? या एका बातमीनं तर माध्यमांचे स्त्रोत किती कच्चे आणि उतावीळपणा कसा ठासून भरलेला आहे , याचं पितळच उघड पडलं ! ही बातमी वाचून कंटाळा आला म्हणून दोन वर्षापूर्वी एकदा     मी देवेंद्र फडणवीस यांना एसेमेस पाठवला की आता तरी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार का , तर त्यावर त्यांनी स्मायली पाठवली ; म्हणजे विस्ताराची नेहेमीप्रमाणे पुडी सोडण्यात आलेली होती ! लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा कोण खासदार मंत्री होईल याचे पांच पर्याय देण्यात आले आणि त्यापैकी चार चक्क पराभूत झाले . प्रत्यक्षात ‘तो’ पाचवा खासदार नव्हे तर मुंबईचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री झाले . स्वत:ला ‘दादा’ समजणाऱ्या मुंबईतल्या एकाही पत्रकाराला ही माहिती आधी मिळाली नाही ; बातमी खोटी ठरण्याची केवढी ही दारुण शोकांतिका ! राहुल गांधी नांदेडहून लढणार , अक्षयकुमार नावाचा नट लोकसभा निवडणूक लढवणार , याही बातम्या अशाच सुपर फ्लॉप सदरातल्या आणि माध्यमांची विश्वासाहर्ता घालवणाऱ्या . अक्षयकुमार तर भारताचा नागरिक नाही आणि परदेशी नागरिकाला भारतात निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे पत्रकारितेचं मुलभूत अज्ञान दर्शवणाऱ्या या बातम्या होत्या . खऱ्या न ठरलेल्या आणि पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवणाऱ्या बातम्यांची या अशी अन्नेक उदाहरणे सांगता येतील . नारायण   राणे , राधाकृष्ण विखे , उदयन राजे भोसले , वैभव आणि मधुकरराव  पिचड , रामराजे नाईक-निंबाळकर अशा अनेकांना जेवढी घाई भाजपत जाण्याची नव्हती त्याच्या दुप्पट घाई माध्यमांना या सर्वांना भाजपत ढकलण्याची झालेली होती . दररोज नवे मुहूर्त जाहीर होत होते . केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या निवडणूक  विषयक तयारीचा आढावा घेतलेला नसतांना निवडणुका १७ सप्टेबरला आणि त्याही मुंबईतून जाहीर होण्याचा उतावीळपणा दाखवला गेला . माफ करा पण ,  माध्यमांची ही अवस्था ‘ओल्ड मॅन  इन हरी…’ पेक्षा वाईट आहे हे म्हणताना मनापासून खेद वाटत आहे .

शालेय आणि पत्रकारांच्या स्कूल मध्ये मिळालेलं सुमार शिक्षण , त्यामुळे चूक भाषा , सर्वच स्तरावर गळेकापू स्पर्धा , मालक आणि पत्रकारांचे वेगवेगळ्या स्तरावर निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध आणि मी करतो तेच बरोब्बर ; मला माहिती आहे तेवढंच ज्ञान अस्तित्वात आहे , अशी आलेली तुच्छ वृत्ती अशा घातचक्रात आजची माध्यमे सापडलेली आहेत . त्यामुळेच माध्यमांच्या ; विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्यात आणि कांही अंशी मुद्रित माध्यमात पिसाटलेपणा वाढला आहे त्यामुळे  नेमके , स्पष्ट , बोचरे  प्रश्न विचारण्याची वृती बोथट झालेली आहे !  अध:पतन ही एक मुलभूत प्रक्रिया असली तरी पत्रकारितेचं इतकं अध:पतन होईल असं वाटलं नव्हतं आणि हे इथेच थांबेल असं दिसत नाही हे जास्त भयावह आहे .

जाता जाता- बातम्या अशा चुकल्या असत्या तर माधव गडकरी यांच्यासारख्या संपादकानं वार्ताहराला  फाडून खाल्लं असतं . अशी एखादी जरी बातमी पुन्हा दिली असती तर रमेश झंवर , शरद मोडक मोरे , रमेश राजहंस , लक्ष्मणराव जोशी , प्रकाश देशपांडे आणि दिनकर रायकर यांच्यासारख्या अचूकतेसाठी आग्रही असणाऱ्या वृत्तसंपादकांनी तर डोळे वटारुन , पांच मिनिटात बातमी खरी की खोटी याची खातरजमा त्यांच्या ‘सोर्स’द्वारे केली असती आणि संबधित  वार्ताहराला धारेवर धरलं असतं . असे चिकित्सक आणि अचूकेतेसाठी आग्रही असणारे ज्येष्ठ आता माध्यमांत उरले नाहीत , असाही बातम्या सतत खऱ्या ठरत नसल्याचा अर्थ आहे !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799

 

Previous article■ पुस्तकं
Next articleलग्न-स्त्री-पुरूष संबंध-ट्रस्टीशिप
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.